कातरवेळी

Submitted by द्वैत on 14 July, 2020 - 07:17

कातरवेळी

ग्रीष्माच्या कातरवेळी
हे अर्घ्य वाहिले कोणी
क्षितीजाच्या डोळ्यांमध्ये
बघ दाटून आले पाणी

हृदयाच्या खोल तळाशी
मग असे हालले काही
लाटेवर लाट उसळली
ह्या दिशा बुडाल्या दाही

कुठलीशी हुरहूर जाणे
आभाळ व्यापूनी गेली
व्योमात अचानक आल्या
ताऱ्यांच्या दाटून ओळी

ह्या अगम्यतेच्या पोटी
गात्रांस पालवी फुटली
मी क्षणभर स्मरण कराया
ही धीट पापणी मिटली

द्वैत

Group content visibility: 
Public - accessible to all site users

उच्च स्तरिय अलंकारीक भाषा
स्वत:ची लाज वाटली आपल्याला अस अजून लिहीता येत नाही.
मला प्रामाणिकपणे असंं वाटत की फार नाही कविता लिहीता आल्या तरी
लिहीलेल्या कवितांपैकी जर एखादी कविता वाचून एखाद्या वाचकाला जरी असं वाटल
आपल्या तळहातावरचं गंगाजल याच्या तळहातावर सोडून याला आपलं आयुष्यच देऊन टाकावंं
तिथे कवी चिरंजीव झाला.
आणि मला ही कविता वाचून अस वाटतय द्वैत!!!

वा! सुंदर काव्य! विशेषत: ही कल्पना मनाला भिडली..
>>>कुठलीशी हुरहूर जाणे
आभाळ व्यापूनी गेली
व्योमात अचानक आल्या
ताऱ्यांच्या दाटून ओळी>>>

ही कविताही आवडली. आपण पूर्वी सुमंदारामाला या वृत्तात काही कविता वेगळ्या आय डी ने केल्या होत्या त्या खूप सुंदर होत्या.

धन्यवाद केशवजी, धन्यवाद हीरा .... @हिरा मी मायबोलीवर ह्या एकाच ID वरून लिहितो ... त्यामुळे तुम्ही वाचलेल्या त्या कविता दुसऱ्या कुणाच्या तरी असतील

Pages