"अवकाश"

Submitted by ज्येष्ठागौरी on 11 July, 2020 - 03:31

अवकाश
आजी कधीतरी म्हणताना म्हणायची कशाला तरी "अवकाश"आहे अजून.गंमत वाटायची तेंव्हा फार त्या शब्दाची.नंतर हे अवकाश शास्त्र शिकताना सूर्यमालेतून भेटलं मग कवितेतून भेटत राहिलं , सुनीताबाईंच्या पुस्तकाच्या नावातून भेटलं,ऑफिसमध्ये हिंदीतून रजेचा अर्ज (अर्जित अवकाश) करतानाही भेटलं आणि अचानक एका लेखातून भेटलं.लेखाचं नाव आहेThe Great Indian (Personal) Space Mission.सध्या चर्चाही मिशन मंगल किंवा चांद्रयानाची असली तरी आपण personal space वर लक्ष द्यायला हवं अशा आशयाचा हा लेख आहे.
आमचं गावातलं घर खूप मोठं होतं आणि एकत्र कुटुंब,भरपूर येणं जाणं आणि पाहुणे रावळे असणारं होतं. पण अगदी खूप पाहुणे आले तरी माझ्या खोलीवर फारसं आक्रमण होणार नाही इतपत मोठं होतं. काही काळ मी आणि माझा मधला भाऊ संजयनी एक खोली share केली आणि काही काळ माझी चुलत बहिण सुजाता आणि मी.संजय आणि माझ्यात खूप भांडणं व्हायची याचं मुख्य कारण मी त्याच्या पलंगावर माझ्या वस्तू ठेवायची आणि त्यातल्या केसाच्या पिना ,किंवा कानातलं त्याला टोचायचं. मग तो त्याचा सूड म्हणून रात्री मला भुताच्या गोष्टी सांगणे,निरनिराळे भयंकर आवाज काढणे, असे उद्योग करायचा.हे तो करतो हे माहिती असून मी आरडाओरडा करायची पण ह्या सगळ्यात महत्वाची गोष्ट होती की ह्या सगळ्यांपासून फक्त तोच मला वाचवू शकेल असा विश्वास मला होता.माझ्या मनातल्या अवकाशात तो संकटमोचन होता आणि मी मात्र त्याच्या वैयक्तिक भौतिक जागेवर आक्रमण करत होते.आम्हा तिन्ही भावंडांत खूप अंतर होतो त्यामुळे आम्ही तसे स्वतंत्र वाढलो.आई बापूंचा सहवास प्रत्येकाला पुरेपूर आणि अविभक्त मिळाला.त्यामुळे तसं बघितलं तर आम्ही आपोआप आपापल्या अवकाशात वाढलो.बापूंनी स्वतः चे निर्णय स्वतः घ्यायला नेहमीच उद्युक्त केलं आणि ते पाठीशी मात्र उभे राहिले.आंम्ही तिघांनीही काही काही निर्णय चुकीचे घेतले, त्यांनी सांगून पाहिलं आणि मग एक पाऊल मागे घेऊन ते आमचं निरीक्षण करत राहिले, पडलो तर मदत केली पण निर्णय कधीही लादला नाही. व्यक्तिगत स्वातंत्र्याचे खुले वारे कसे असतात त्याचा धडाच त्यांनी आम्हाला दिला.त्यांच्या चतुरस्र व्यक्तिमत्वामुळे आम्हाला खूप मार्ग सापडले,आणि अवकाशही.जगणं आनंदाचं असावं हा त्यांचा त्यातला मूळ उद्देश असायचा,जो पुढच्या आयुष्यात फार उपयोगी पडला.
आपल्या शारीर गोष्टींबद्दल बोलायचं तर आपल्या शरीरापासूनच लगतचा एक ते दीड फुटाचा भाग हा intimate circle मानला जातो, ह्या परिसरात आई, वडिल ,पती, पत्नी ,मुलं आणि फार जवळचं कोणीतरी एवढेच येऊ शकतात.त्याव्यतिरिक्त दुसरं कोणी आलं तर भय किंवा राग या दोनच भावना निर्माण होतात. त्यापलीकडच्या वर्तुळात म्हणजे friendship circle मध्ये इतर नातेवाईक,मित्र मैत्रिणी, इत्यादींना इथपर्यंत प्रवेश मिळतो ,त्यानंतर participation circle म्हणजे काही नातेवाईक, शेजारी किंवा सहकारी आणि सगळ्यात शेवटी exchange circle म्हणजे ज्यांच्याकडून आपण काही सेवा घेतो मोबदला देऊन.रिक्षा चालक वगैरे,आता काही जे दुसऱ्या वर्तुळात असतात ते कालांतराने पहिल्या वर्तुळात येऊ शकतात किंवा एखाद्या दुराव्यानं पहिल्या वर्तुळातील व्यक्ती दुसऱ्या किंवा तिसऱ्या वर्तुळात जाऊ शकते
त्यामुळे आपलं अवकाश आणि त्याची व्याप्ती आपणच ठरवतो. त्यात कोणाला प्रवेश द्यायचा किंवा नाही हेही आपणच ठरवतो.म्हणजे तसं पाहिजे.तसं नसेल तर खूप काही भीषण परिस्थिती होऊ शकते.लादलेपण असेल तर फार भयानक.अर्थात हे खूप शारीर आहे पण मला वाटतं आपल्या मनातही ही वर्तुळं असतातच असतात.काही जण नात्यानं लांब असतात पण तरीही पहिल्या वर्तुळात असतात काही नात्यानं जवळ पण मनाच्या बाहेरच्या वर्तुळात.पण त्यातही आग्रह किंवा जबरदस्ती असेल तर स्वतः विचार करणं दुरापास्तच.
गावातल्या घरात एकत्र कुटुंब होतं, त्यामुळे वैयक्तिकतेच्या कल्पना थोड्या सैल होत्या पण लग्न झाल्यावर छोट्या विभक्त कुटुंबात राहून माझ्या व्यक्तिगत स्वातंत्र्याच्या कल्पना बदलल्या.त्याही अर्थानं माझं अवकाश बदललं. आणि एकदा आपल्या कल्पना बदलल्या की पुन्हा पूर्वीसारखं होणं हे अवघड असतं हेही जाणवलं.मुलं झाल्यावर मनात जगाबद्दल आणखी प्रेम आणि अनुकंपा निर्माण झाली त्या अर्थानी अवकाश रुंदावलं.
बापूंच्या शेजारी झोपून मोजलेले तारे हेही अवकाश होतं आणि आई, बापू, माझे दोन्ही भाऊ संजय ,मोहन हे एकेक करुन गळलेले तारे ही त्याच अवकाशात होते.त्या पोकळ्यांचंही अवकाशच!लहानपणी छोटं असणारं ते अवकाश यथावकाश मोठं झालं.विस्तृत झालं.त्यात सकारात्मक आणि नकारात्मक भावनांनी हात पाय पसरले. परिस्थितीनुसार ह्यातली एक भावना बळावायला लागली.
आयुष्याच्या एका अगदी दुःखाच्या प्रसंगानंतर ऑफिसमध्ये येणाऱ्या एका निवृत्त व्यक्तीनं मला चालायचा सल्ला दिला.जरा मनाविरुद्ध मी तो ऐकला पण खरंच कुठलंही गाणं न ऐकता आपण आपलं चालत राहिलं तर खूप काही अवकाश मिळतं हे कळलं. माझ्या अवकाशातल्या ,माझ्या प्रेमाच्या व्यक्तींबद्दल मी खूप हव्यास बाळगते, त्यांचं रक्षण करण्याचा प्रयत्न करते.होता होईतो त्यांना त्रास होणार नाही ह्याची मी काळजी घेते. असाही एक विचार आला की मीही दुसऱ्या माणसाच्या अवकाशावर कळत नकळत हक्क मालकी सांगत असेन कधीतरी, मुद्दाम नाही पण कधीतरी अतीव प्रेमानी, काळजीनं, कधी नात्याच्या जवळीक असल्यानं, म्हणजे मी intimate circle मध्ये आहे असं धरुन, तर ते मला तपासून पहायला हवं. मुन्नाभाईसारखं जादू की झप्पी मधल्या भावना चांगल्या पण पद्धत चुकीची हे व्हायला नको म्हणून.अर्थात कधी कधी माझ्याही अवकाशावर हल्ला होतो,कधी मोठ्याने बोलणारी माणसं, कधी अनोळखी गर्दीत मुद्दाम लागणारा धक्का,कधी ओळखीची नाहक सहेतुक सलगी,कधी माझ्या फोनवर एखादा फोटो दाखवताना समोरच्या व्यक्तीनं पाहिलेले इतर फोटो,कधी माझ्या पर्समध्ये डोकावून पाहिलेलं कोणीतरी,एखादा अस्वस्थ क्षण जगताना ;प्रश्न विचारुन भंडावणारं कोणी.केवळ कुतूहल म्हणून चौकशी करणारं कोणी,कोणी अगदी मुद्दाम खोचून विचारलेला प्रश्न,कोण्या अगदी जवळची व्यक्तीचा दुखावणारा एकच शब्द.आरपार भेदून जाणारी एखादी नजर,पार थेट माझ्या अवकाशात घुसखोरी करणाऱ्या व्यक्ती, परिस्थिती, भावना.माझ्या अवकाशाचा तळ ढवळते, गढूळ करते.
कधीतरी तर मला समोरच्या व्यक्तीचा विचारांचा, बोलण्याचा, वागण्याचा , जगण्याचा वेग मानवत नाही,झेपत नाही,नाहक दमछाक होते,कधी असंवेदनशीलता सहन होत नाही आणि माझं अवकाश चक्क आक्रसून जातं. मला चक्क गुदमरतं.
कधी अगदी सहज किंवा कारणानी भरुन येणारे आणि वाहणारे डोळे दिसत असून कोणी विचारलं नाही तर बरं वाटतं.माझं अवकाश मला तेंव्हा खुणावत असतं.त्या अवकाशात मी अगदी मुक्त असते,माझ्याबद्दल मत बनवणारं कोणी नसतं, i live in my own space and with my own pace.मी माझ्या गतीनं आणि मतीनं माझ्या अवकाशात मार्गक्रमण करत असते.पण आक्रमणापासून वाचताना आधी शारीर आणि मग मन असा अटळ प्रवास करावा लागतो.जगाच्या वेगापासून वेगळं,आपलं एक विश्व असतं, आपल्या वेगानं चालणारं, कोलाहलापासून दूर, आत शांत शांत वाटणारं. निःशंक मनानी आपण वावरतो. बिनमुखवट्याचं अस्तित्व असलेले आपण तिथं वावरतो आणि जास्त आवडतो स्वतःला. अवकाश या शब्दातच एक मोकळेपणा आहे.त्याला कुंपण घालता येत नाही.बांध नाही.अवकाश म्हणलं तर पोकळी ,म्हणलं तर गच्च भरलेलं मन.ओशो म्हणतात तसं if you love a person give them infinite space.तसं आपण स्वतःवर प्रेम करतोच करतो मग ते अनंत अवकाश कोणाची वाट न बघता दिलंच पाहिजे आधी स्वतःला.मग त्या अवकाशातलं आपलं स्थान कुठलं हेही कळेलं.आपण म्हणजेच आपलं अवकाश हेही कळेल.आपण आहेत तसंच आपलं अवकाश हेही उमजेल.मग तुलना थांबेल आणि आपणच आपल्याला सापडत जाऊ.कधी अगदी सलग, कधी तुकड्या तुकड्यातून भेटू आपण स्वतःला.असं झालं की मग फार प्रसन्न,शहाणं वाटेल. निर्लेप आणि आनंदी.आतून हजार पाकळ्यानी फुलून आल्यासारखं ,आपल्याच अवकाशात, आनंदाच्या डोहात.आत्ममग्न.
ज्येष्ठागौरी

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लेख फार आवडला.
I live in my own space and with my own pace.- >>+१

>>>कधी माझ्या फोनवर एखादा फोटो दाखवताना समोरच्या व्यक्तीनं पाहिलेले इतर फोटो>> अगदी अगदी!
काही लोक फोन फोटो बघायला हातात घेतला की फटाफट मागचे-पुढचे फोटोही बघायला सुरवात करतात! जरी त्या फोटोंमध्ये गैर काही नसले तरी एका विशिष्ट वर्तुळाबाहेर / अवकाशाबाहेरच्या व्यक्तींनी हे स्वातंत्र्य घेतलेले मलासुद्धा आवडत नाही.

छानच. ह्या फेज नंतर तुमची ग्रोथ कशी झाली आहे त्या बद्दल पण लिहा. बालपण छानच गेले आहे हे कळते आहे. यु आर सो ब्लेस्ड.
एकदा महा मुंबई नगरीत पर्सनल स्पेस चे कसे तुकडे पडतात ते ही अनु भवायला आहे. म्हणजे आपले पुणे किती ग्रेट आहे ते समजते.
आम्ही कायम पर्सनल स्पेस मध्येच वावरतो. कोणी अतिक्रमण केल्यास तुरंत हद्दपार.

छान लिहिलंय.. आवडलं! अमृता प्रीतम चा चौथा कमरा आठवला.
काय गंमत आहे, अगदी दोन दिवसांपूर्वी सोच नावाच्या युट्यूब चॅनलवरचा याच विषयावरचा एक व्हिडीओ पाहण्यात आला. आणि आज हा लेख वाचला!
सोच च्या व्हिडिओचा दुवा - https://youtu.be/ovZO-j5JIf4