फ्रॅन्सिसची गोष्ट

Submitted by Barcelona on 11 July, 2020 - 02:37
Frances Perkins on Time cover

फ्रॅन्सिसची गोष्ट

“पण तू दर रविवारी येशील ना नेहमीसारखी?” पॉलने अडखळत विचारले.
“हो तर, आपली भेट कशी रे चुकवेन?” फ्रॅन्सिस पॉलचा हात घट्ट धरून म्हणाली.
“पण आता मला निघायला हवं. उद्याचा दिवस महत्त्वाचा आहे”.

जड मनाने ती निघाली खरी पण तिचे मन भूतकाळात घुटमळले.

तिला पॉल भेटला तेव्हाचा काळच वेगळा होता. एका आळसावलेल्या दुपारी फ्रॅन्सिस मैत्रिणी बरोबर मॅनहॅटनमध्ये दुपारच्या चहासाठी विसावली होती. आता तिशीनंतर मैत्रिणीही फारशा उरल्या नव्हत्या. बहुतेक जणी संसाराला लागल्या होत्या. पण दिवसा ‘हेल्स किचन’ मधल्या मुलांचा सर्व्हे करायचा नि रात्री कोलंबिया मध्ये एम.ए.चे तास ह्यात गुंतलेल्या फ्रॅन्सिसला मन जडेल असे कुणी भेटले ही नव्हते.

अचानक आरडाओरडा सुरू झाला आणि आगीचे बंब भोंगा वाजवत जमा होऊ लागले. फ्रॅन्सिस धावत चौकात गेली तर फॅक्टरीच्या बिल्डींगला आग लागली होती. इमारतीच्या आठव्या-दहाव्या मजल्यावर कपड्याचा कारखाना! कापडाचे तागेच्या तागे आणि त्यात सापडलेल्या ब्लाऊज शिवणाऱ्या कारागीर मुली.

जीवाच्या आकांताने इमारतीच्या बाहेर पडायला धडपडत होत्या. काही टीनएजर, काही विशीच्या आसपास. सगळ्या युरोपातील निर्वासित. कुणी धूरात घुसमटल्या, कुणी आगीत होरपळल्या, कुणी बाल्कनीच्या कट्टयाला लोम्बकळल्या, कुणी दहाव्या मजल्यावरून उड्या टाकल्या…

सुन्न झालेल्या फ्रॅन्सिस नंतर कळले त्यादिवशी १२३ मुली गेल्या. फ्रॅन्सिसच्या मनात एकच विचार आला - “हे पुन्हा कधीही नको!”

साक्षीदार म्हणून फ्रॅन्सिस चौकशी समितीच्या मदतीस आलीच, पण तिचे शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रातील अनुभव बघून ‘सेफ्टी कमिटी’ वर ही तिला घेतलं. समितीच्या कामात अनेक लोकांचा संपर्क येत गेला, त्यात पॉलही होता.पॉल अर्थशास्त्रज्ञ होता आणि तेव्हाच्या न्यूयॉर्क मेयरच्या ऑफिसात बजेट सेक्रेटरी होता.

पॉलने मागणी घातली तेव्हा फ्रॅन्सिसने सामाजिक क्षेत्रात थोडेफार नाव कमावले होते. सफ्राजेट म्हणून मतदानाच्या हक्कासाठी काम असो की नॅशनल कंझ्युमर लीग साठी काम असो ती कधीच मागे हटली नव्हती. स्वतंत्र विचाराची म्हणून तिची ओळख होती. तिने पॉलला होकार दिला खरा पण ‘मी काम करत राहणार आणि मी माझे नाव बदलणार नाही’ ह्या अटींवर.

लग्नानंतरही तिचे सेफ्टी कमिटीचे काम चालू राहिले आणि त्यातून कारखाना सुरक्षिततेसाठी आवश्यक अनेक प्रथांचा जन्म झाला. जसे प्रत्येक इमारतीत संकटकालीन मार्ग (फायरएस्केप) असावा, सर्व दारांजवळ “एक्झिट” अशी स्पष्ट पाटी हवी. फायर ड्रिल नियमितपणे व्हायला हव्या. इमारतीत पाण्याचे फवारे (स्प्रिंकलर) जागोजागी हवे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे एका खोलीत किती लोकं असावे ह्याचे मापदंड (ऑक्युपन्सी लिमिट) ठरवण्यात आले.

त्या काळात फ्रॅन्सिसची एफ.डी.आर (फ्रँकलिन रूझवेल्ट) आणि अ‍ॅल स्मिथ यांचीशी ओळख वाढली. न्यूयार्कच्या राजकारणात दोघे उगवते तारे होते. कारखाने व त्यातील सुरक्षा इ. सगळ्या गोष्टींचा अभ्यास केल्यावर फ्रॅन्सिसच्या सेफ्टी कमिटीने “चौपन्न तासाचा कामकाजी आठवडा” हे बिल राज्याच्या सिनेटपुढे आणले. तिने घेतलेला आढावा इतका सर्वांगीण होता की हे बिल पास व्हायलाच हवे ह्याबद्दल एफ.डी.आर सह अनेकांची खात्री होती.

पण म्हणतात ना नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न.. सगळे सेनेटर्स जमा व्हायला सिनेमात शोभतील अशा अनंत अडचणी आल्या. बोटी रद्द झाल्या, टॅक्सी बिघडल्या. एफ.डी.आर ने फिलिबस्टर प्रोसेसची मदत घेतली. ‘फिलिबस्टर’ म्हणजे लांबेचौडे वेळकाढू भाषण ठोकायचे. शेवटी सगळे जमले आणि बिल पास झाले. हल्ली अमेरिकेत आणि इतर अनेक देशात चाळीस तासाचा कामकाजी आठवडा असतो, त्या दिशेने हे पहिले पाऊल होते.

त्या पुढच्या वर्षी सुसानाचा जन्म झाला. फ्रॅन्सिसचा वेळ घर सांभाळण्यात जास्त जाऊ लागला. पण त्याच सुमाराला पॉलला ‘मॅनिक डिप्रेशन’ उर्फ बायपोलर डिसऑर्डरची लक्षणे दिसू लागली. फ्रॅन्सिसला घर चालवण्यासाठी काम करणे भाग होते. अल स्मिथने तिला इंडस्ट्रीयल कमिशनवर काम करण्यासाठी बोलावलं.

इंडस्ट्रीयल कमिशनचे काम सर्व कारखान्यात कायद्याचे नीट पालन होते की नाही हे तपासणे होते. इथे सचोटीने काम करणारी माणसे हवी फ्रॅन्सिसची नेमणूक घसघशीत पगारावर झाली. ती आपले काम इतक्या चोखपणे करत होती की लवकरच तिला कमिशनची प्रमुख करण्यात आले.

ह्या काळात फ्रॅन्सिसचा कामगारांशी अधिक जवळून संबंध आला. तिची कामाची शैली सगळ्यांना सामावून घेणारी होती. त्यामुळे इतर सहकाऱ्यातही तिला मान होता. मात्र पॉलची तब्बेत अधिकच बिघडू लागली होती, वेळोवेळी त्याला इस्पितळात ठेवावं लागत होतं. अशातच अ‍ॅल स्मिथ ऐवजी एफ.डी.आर न्यूयॉर्कचे गव्हर्नर झाले. आता नोकरी जाणार का? पण त्यांनी फ्रॅन्सिसचे काम बघून तिला कमिशनचे काम पुढे चालूच ठेवण्यास सांगितले. पॉलच्या आजारपणासाठी, इस्पितळासाठी पैसा हवा म्हणून फ्रॅन्सिसने काम चालू ठेवले.

मात्र अचानक स्टॉक मार्केट कोसळले. काही मोठ्या बँका बुडाल्या, आणि अमेरिकेतील जवळपास निम्मे कारखाने बंद पडले. ही ‘दि ग्रेट डिप्रेशन’ उर्फ जागतिक मंदीची सुरूवात होती. दरडोई उत्पन्न घसरले व २५% लोक बेकार झाले. (सध्याच्या काळाशी तुलना करायची तर कोव्हीड-१९ च्या साथीत १६% बेकारी आहे असा अंदाज आहे.) इंग्लंडमध्ये अमेरिकेच्या तुलनेत बेकारी कमी असल्याने बेकारांना भत्ता देण्याची योजना सुरू झाली होती. फ्रॅन्सिस तिचा अभ्यास करण्यासाठी इंग्लडला जाऊन आली.

इतक्या अभूतपूर्व बेकारीशी लढण्यासाठी तिच्याकडे काही कल्पना, योजना तयार होत्या. वेळोवेळी ती त्या कल्पना कागदी चिठोऱ्यांवर लिहून ड्रॉवर मध्ये साठवत असे. मात्र तेव्हा हूव्हर राष्ट्रपती होते आणि त्यांची मते वेगळी होती. तिच्या योजनांना काही वाव नव्हता. देशातील एकूण परिस्थिती लक्षात घेऊन एफ.डी.आर यांनी राष्ट्रपती निवडणूकीत उडी घेतली आणि ते निवडूनही आले. त्यांनी फ्रॅन्सिसला भेटायला बोलावलं. बेकारीशी लढायच्या आपल्या कल्पनांना आता वाव आहे याचा तिला थोडासा अंदाज आला.

फ्रॅन्सिस ऑफिसात शिरल्याबरोबर एफ.डी.आरनी तिच्यासमोर ‘सेक्रेटरी ऑफ लेबर’ ह्या कॅबिनेट मंत्रिपदाचा प्रस्ताव ठेवला. आपल्या बॅगेतून चिठोऱ्या काढत फ्रॅन्सिस म्हणाली “चाळीस तासाचा कामकाजी आठवडा, बालकामगार बंदी, किमान वेतन कायदा, बेकारी भत्ता, विकलांगता भत्ता, निवृत्तीवेतन आणि सर्वाना वैद्यकीय विमा ह्या सात ही योजना राबवणार असाल तर मी मंत्रिमंडळात येते.”

दिडशे वर्षाच्या अमेरिकन लोकशाहीत बायकांना मंत्रिमंडळात घ्यायची पद्धत नव्हती. तिथे मंत्रिपद मिळत असताना फ्रॅन्सिसला तो बहुमान दिसत नव्हता, तर तिच्यासाठी जनकल्याणाचा तो मार्ग होता. ह्यातच एफ.डी.आरना आपली निवड किती सार्थ आहे हे जाणवले. त्यांनी तिला आपला पाठिंबा दिला.

पॉलला मंत्रिमंडळ इ.झालेल्या घडामोडींची माहिती द्यायला फ्रॅन्सिस न्यूयॉर्कला गेली. पॉलला भेटून फ्रॅन्सिस परतली आणि दुसऱ्या दिवशी मिस.फ्रॅन्सिस पर्कीन्सने मंत्रिमंडळाचा कार्यभार स्वीकारला.

दोन वर्ष फ्रॅन्सिसने कल्याण योजनेवर बरेच काम केले आणि शेवटी १९३५ साली “सोशल सिक्यूरिटी ऍक्ट” वर एफ.डी.आरनी सही केली. कामगारांच्या दृष्टीने एका नवीन पर्वाला सुरूवात झाली. आर्थिक मन्दी हळूहळू दूर होवू लागली.

नोकरदार अमेरिकन वर्गाच्या पगारातून कर कापला जाऊ लागला पण चाळीस तास कामकाजी आठवडा लागू झाला. थोडक्यात तुम्हाआम्हाला “विकेंड” मिळाला. निवृत्तीवेतनाची सोय झाली. वाढणारी लोकसंख्या, बदलणारे कंपन्यांचे स्वरूप, अमेरिकन जीवनमानात अनेक बदल झाले तरी सोशल सिक्यूरिटी आजही उपयोगी ठरत आहे. २०३५ साली म्हणजे सुरु झाल्यापासून १०० वर्षानंतर ह्या योजनेत पैसे कमी पडतील असा अंदाज आहे. पण तरी ही योजना बुडीत जाणार नाही अशी सर्वांना आशा आहे. पुढे ह्या मॉडेलवर अनेक इतर देशांनी कल्याणकारी योजना राबवल्या.

फ्रॅन्सिसची गोष्ट ऐकावी आणि सोडून द्यावी; मोठ्या लोकांच्या मोठ्या गोष्टी. पण (फ्रॅन्सिसप्रमाणेच) क्वचित आपल्या आयुष्यात “हे पुन्हा कधीही नको!” असं म्हणायची वेळ येते … तेव्हा काय केलं?… तिथे खरी आपली गोष्ट सुरु होते.

_______________________________________________________

https://francesperkinscenter.org/wp-content/uploads/2014/04/From-the-Tri...
https://chroniclingamerica.loc.gov/lccn/sn83045462/1933-02-19/ed-1/seq-23/
https://www.fdrlibrary.org/perkins
https://www.mentalfloss.com/article/502019/9-facts-about-frances-perkins...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लेख. आवडला.

सोशल सिक्युरिटी हा तसा ड्राय टॉपिक असताना सीमंतीनीने नेहमीच्या ओघवत्या शैलीत कथेच्या स्वरूपात ओळख करून दिल्याने ही माहिती अजुनच रोचक झालेली आहे. >>>> उलट ह्यात खुद्द सोशल सेक्युरीटी बद्दल माहिती खूप कमी आहे आणि ती अजून यायला हवी होती असं वाटलं. अर्थात लेखाचा मुळ विषय तो नसल्याने वेगळ्या लेखात अशी माहिती आली तरी वाचायला आवडेल.

सर्वांना धन्यवाद.
Happy सोशल सिक्युरिटी एकूणातच जिव्हाळ्याचा विषय दिसतोय. मात्र ड्राय टॉपिक म्हणल्याबद्दल निषेधच! Happy सोशल सिक्यूरिटीचा गाभा विचारशील तर "किसीका दर्द मिल सके तो ले उधार" ह्या अतिशय काव्यात्मक तत्त्वावर आहे. मग त्यावर नियमावली, आणि त्यातील पळवाटांची पुटे चढली की सामान्य नोकरदाराला पार 'कोई हमदम ना रहा' होवून जाते....

चांगला लेख. हे सगळं अजिबात माहित नव्हतं
अवांतर —> सरहदपारच्या मेहमानांना हा टाॅपिक ड्राय वाटू शकतो Wink

>>खरं आहे. म्हणून तेव्हापासूनच सोशल सिक्युरिटी नावाची सरकारी पाँझी स्कीम सुरू झाली.<<
सीमंतिनी, डोंट मीन टु स्टील योर थंडर, बट आय हॅव टु (पार्शली) अग्री विथ उपाशी बोका...

आय बिलिव, फ्यु इयर्स डाउन द लाइन इफ यु सोलली डिपेंड ऑन सोशल सिक्युरिटि, इट कुड लिव यु हाय अँड ड्राय.

असं न वाटणार्‍यांनी (किंवा माझ्या मताशी सहमत नसणार्‍यांनी) वेगळा धागा काढावा...

सोशल बद्दल मी तज्ञ नाही त्यामुळे उपाशी बोका व इतर सर्वांच्याच मताचा आदर आहे. यात सहमत-असहमत प्रश्न नाही. माय थॉटस अराऊंड धिस आर क्वाईट मॅलिएबल. मी वेगळा धागा काढते. इच्छा असल्यास तिकडे जाणकारांनी चर्चा करावी.

फ्यु इयर्स डाउन द लाइन इफ यु सोलली डिपेंड ऑन सोशल सिक्युरिटि, इट कुड लिव यु हाय अँड ड्राय >> याचे कारण मूळ योजना नसून त्याचे नंतर झालेले मिस मॅनेजमेंट आहे असे मला वाटते. आणि ही वेळ ऑलरेडी आलेली आहे बर्‍याच लोकांकरिता.

<< अमेरिका "दि ग्रेट डिप्रेशन" मधून बाहेर पडण्यात सोशल सिक्युरिटीचा वाटा देशोविदेशीच्या अर्थतज्ञांना मान्य आहे. >>
हे देशोदेशीचे अर्थतज्ज्ञ कोण आहेत आणि त्यांनी काय मते मांडली आहेत याबद्दल जाणून घ्यायला आवडेल.

सोशल सिक्युरिटीच्या उगमाबद्दल आणि फ्रान्सिस बद्दल मला काहिही माहिती नव्हती. ती हलक्या फुलक्या शैलीत दिल्याबद्दल सीमंतिनेचे आभार!
सोशल सिक्यूरिटी योजनेमागचा हेतू उदात्तच होता याविषयी शंका घेण्याचे काहीच कारण नाही.
पुढे त्यात योग्या बदल केले गेले नसतील किंवा आताच्या परिस्थितीत त्या योजनेची परिणामकारकता लयाला गेली/जात असेल यांत निश्चित मतांतरे असणारच.
मला लेख फार आवडला.

Pages