योद्धा

Submitted by मधुमंजिरी on 8 July, 2020 - 09:29

प्रत्येकाची बाजू थोडी
आतून आतून वेडी
प्रत्येकाची रात्र थोडी
आतून आतून ओली।

डॉक्टर, नर्स, पोलीस,
सफाई कामगार, सरकारी कर्मचारी
बॅंक, पोस्ट,एलआयसी अन
बस /अॅंब्युलन्स ड्रायव्हर,अधिकारी सरकारी।

प्रत्येकाची व्यथा निराळी
प्रत्येकाची कथा निराळी
घरदारावर ठेवून तुळशी
प्रत्येकाची खंत निराळी।

ट्रेनी डॉक्टर , नर्स, वॉर्डबॉय
पहारेकरी वा पोलीस मामा
ही तर पहिल्या फळीतील सेना
अधिकाऱ्यांनाही नाही क्षमा।

हात गुंतले शुश्रुषेत
पडली बेडी कर्तव्याची
नाही ढळला निश्चय तरी
मनात आठव प्रियजनांची।

प्रत्यक्ष संपर्क जनतेचा
कठीण समयी सेवा तत्पर
बेफिकीर जर झाली जनता
कष्ट निष्फळ होती सत्वर।

सीमेवरती जवान लढती
जखमी वा शहीद होती
एक पाऊलही न पडे मागे
जनकल्याणास्तव शिर हाती।

नको चविष्ट भोजन वा सेवा
योद्ध्याला कसली अपेक्षा
निजण्याला धोंडाही पुरतो
साहवेना परी उपेक्षा ।

समजून घेऊ व्यथा साऱ्यांची
अपेक्षा थोडी कमी करू
देवालाही चुकली नाही चूक
माणूस म्हणून मान्य करू।

यमदूत हे उभे सामोरी
घेऊन कोरोनाची गदा
निष्कारण मोकाट नको
घरातून देऊ साथ सदा।

© सौ मंजुषा थावरे (७.७.२०२०)

Group content visibility: 
Use group defaults