अंगणात माझिया ... शिंपी पक्षी जन्मोत्सव

Submitted by मनीमोहोर on 6 July, 2020 - 08:22

लॉक डाऊनचे माझे काळजीचे , कंटाळवाणे , एकसुरी दिवस आनंदी उत्साही कसे झाले ते वाचा.

सकाळची कामे आटपून मी हॉलमध्ये बसले होते. लॉक डाउन मुळे सकाळी दहा साडे दहाची वेळ असून ही सर्वत्र शांतता होती. एरवीचे गजबजलेले रस्ते ही निर्मनुष्यच होते. सभोवती असणाऱ्या शांततेला कोरोनाची पार्श्वभूमी असल्याने ती शांतता फार काही सुखावह वाटत नव्हती. माझ्या पायात घुटमळणारी मनी ही शांतच होती. मी मेन डोअर उघड ठेवून काही तरी निरर्थक विचार करत बाहेरची झाडं पानं बघत होते. मेन डोरच्या बाहेर असलेल्या ग्रील च्या व्हरांड्यात ठेवलेल्या कुंड्यातली झाडं आणि त्यावरची फ़ुलं मन थोडं प्रसन्न करत होत्या.

तेवढ्यात त्या शांततेला छेद देत अचानकच टिव टिव करत एक चिमुकला पक्षी ग्रीलमधून आत येऊन तिथल्या इन्शुलिनच्या झुडपावर येऊन विसावला . हॉलच्या दारामधून हिरवट पिवळट पाठ , पांढर पोट, डोक्यावर चॉकलेटी चांदवा, टोकदार चोच आणि वर आकाशाकडे गेलेला शेपटीचा तुरा असलेला तो चिमुकला पक्षी मला सहज दिसत होता . त्या इवल्याश्या पक्ष्याला पाहून मी जरा उत्साहित झाले. झाडावर बहुत करून त्याने थोडी फार पाहणी केली आणि पिच पिच अश्या स्वरात आपल्या जोडीदाराला साद घातली. दोनच मिनीटात एक सफाईदार भरारी घेत तो ही ग्रीलमधून आत आला. ते दोघे त्यादिवशी थोडावेळच एकत्र होते त्या झुडपावर. नंतर जे उडून गेले ते दिवसभर फिरकले ही नाहीत. मी ही दिवसभराच्या व्यापात त्याबद्दल विसरून गेले.

पण दुसऱ्या दिवशी सकाळीच परत ती जोडी त्या झुडपावर हजर झाली. माझं काम आटपून मी हॉल मध्ये येऊन बसले तर जोडीची बरीच लगबग चाललेली दिसली. सारख बाहेर जाऊन चोचीतून काहीतरी आणण चालू होतं. घरटचं बांधायचा विचार असेल असा मी अंदाज बांधला पण त्यांना बाचकवायला नको म्हणून उत्सुकता वाटत असून ही मी तिकडे जाण्याचं टाळलं.

दिवस मावळताना ते दोघे ही उडून गेल्यावर मात्र मी त्या कुंडीजवळ गेले आणि दोन फांद्यांच्या बेचक्यात काही काड्या वैगेरे दिसतायत का ते शोधू लागले. थोडी शोधाशोध केल्यावर मला जे दिसलं त्याने मी अक्षरशः अचंबित झाले. जरा आडोश्यातली दोन मोठी लांबट पान अक्षरशः कापसाने दोन चार टाके मारून त्यानी जवळ आणली होती आणि त्याला थोडा खोलगट पसरट असा घरट्याचा आकार द्यायला सुरुवात केली होती. आजवर मी असं पानांच घरटं कधी पाहिलं नसल्याने मला खूपच मजा वाटली आणि मनातल्या मनात मी त्यांच्या वंशवाढीसाठी प्रार्थना ही केली देवाकडे.

घरटं तयार होताना

IMG-20200706-WA0012.jpg

मला अनेक पक्ष्यांची नाव जरी माहीत असली तरी कावळा, चिमणी,पोपट, कबुतर ,घार आणि कडी म्हणजे बुलबुल असे फारच थोडे पक्षी मी ओळखु शकत असल्याने घरी आलेले हे पाव्हणे कोण हे काही मी ओळखु शकले नाही .

शेवट “पानांचं घरटं” अस लिहून गुगल बाबाला साकडं घातलं तेव्हा एका सेकंदातच शिंपी अस नाव आलं. पानं कापसाच्या धाग्याने शिवून घरटं तयार कारण्यावरूनच त्याला मिळालेलं शिंपी हे नाव किती योग्य आहे हे मनोमन पटलंच अगदी. आणि आपल्याला का नाही हे सुचलं, किती साधं सरळ होत हे कोण ते शोधणं म्हणून माझ्यातल्या मठ्ठपणाला मी हसतच सलाम केला. त्या दिवसांपासून शिंपिदादा आणि शिंपिणबाई अस त्यांचं मी नामकरण ही करून टाकलं.

मग पुढचे आठ पंधरा दिवस सतत बाहेर फेऱ्या मारून शोधाशोध करून कापूस आणणे तो चोचीने पिंजून त्याचा दोरा बनवणे आणि चोचीनेच पानांना भोक पाडून त्यातून दोरा घालून ती पाने सांधणे ह्यातच गेले. मधून मधून शिंपींबाई आत जाऊन वजन झेपेल का , आकारमान ठिक्क आहे ना ह्याचा अंदाज घेत असत. हॉल मध्ये मी खुर्ची अशी अड्जस्ट केली होती की मला त्यांचं काय चाललंय ते सहजी दिसत असे. तसेच माझ्याबद्दलची भीती, संशय नाहीसा होऊन हळू हळू त्यांच्याही मनात एक प्रकारचा विश्वास प्राप्त झाला होता. त्यामुळे ह्या दिवसात कामं भराभर आटोपून शिंपिदादा आणि शिंपीणबाईना बघत रहाणे हा माझ्यासाठी ही एक छान विरंगुळा झाला होता.

एक दिवस मी संध्याकाळी घरट्यात डोकावून बघितले तर छोटी छोटी, लालट पांढरट रंगाची चार अंडी मला त्यात दिसली . घरटं एवढं छान पानांचं पण आतून मात्र कापूस, पिसं घालून मऊ वैगेरे काही केलं नव्हतं. आत फक्त काथ्या च होता. असो.पण अंडी बघताच नवनिर्मितीच्या कल्पनेने मी एकाच वेळी हरखून ही गेले आणि आता ह्यांचं बाह्य शत्रूपासून रक्षण करण्याची जबाबदारी माझी ही आहे ह्या भावनेने थोडी काळजीत ही पडले.

अंडी
IMG-20200613-WA0002.jpg

एकदा अंडी घातल्यावर मात्र तिच्यातली आई एकदम जागी झाली. त्या दिवसात ती जवळ जवळ बाहेर ही पडली नाही. सतत घरट्यात राहून अंडी उबवीत बसली होती. खाणं पिणं आणण्याची जबाबदारी तिच्या जोडीदाराने आंनदाने उचलली होती. अर्थात म्हणून त्या काळात मला जास्त काही आत घरट्यात डोकावता आलं नाही.

अंडी उबवताना

IMG-20200706-WA0022.jpg

पण साधारण दहा बारा दिवसानी जेव्हा तिने about turn करून घरट्यात डोकं खुपसलेलं जेव्हा मी पाहिलं तेव्हाच मला तिच्या कडच्या good news संशय आला. नशीबाने त्यांनंतर थोड्याच वेळात ती बाहेर गेली म्हणून घरट्यात डोकावून मी खात्रीही करून घेतली. चार अगदीच इवले जीव चोच उघडून काही अन्न मिळतंय का ह्याची चाचपणी करत वळवळत होते. तेवढ्यात आई आलीच तोंडात किडा घेऊन. तिने तो किडा चोचीने अक्षरशः मऊ मऊ केला आणि त्यांना भरवला.
पिल्लं
IMG-20200620-WA0002.jpg

आईला पिल्लांसाठी खाणं शोधत फिरायला नको म्हणून कणकेचे बारीक गोळे करून ते घरट्याजवळ ठेवून द्यावेत असा विचार मनात आला होता पण त्यांच्या निसर्ग चक्रात ढवळा ढवळ नको म्हणून मी तो आचरणात आणला नाही. पण आई त्याना भरपूर खायला आणत होती आणि पिल्लं दिसा मासानी वाढत होती. आईने खायला आणलं की "मला दे ..मला दे "म्हणून त्यांची जी काय धांदल उडे ती शब्दात वर्णन करणे केवळ अशक्य. आता त्यांना थोडी थोडी पिस आणि पंख फुटत होते. ती मोठी झालेली बाळसेदार पिल्लच कशी बशी घरट्यात मावत होती म्हणून आईचा मुक्काम घरट्या बाहेरच्या फांदीवरच असायचा.

थोडी वाढ झालेली पिल्लं

IMG-20200629-WA0023.jpg

तशात एक दिवस माझा सकाळचा व्यायाम आटोपून मी पिल्लांची खबरबात घ्यायला बाहेर आले तर शेपटी ही न फुटलेली त्यातली दोन पिल्लं मला घरट्याबाहेर आलेली दिसली. पलीकडच्या आंब्यावर त्यांचे आई बाबा बसले होते आणि ते विशिष्ट आवाज काढून त्याना बोलवत होते. इकडे पिल्लांच धैर्य कमी पडत होत. तिकडे आईच्या हाका येत होत्या. शेवटी धैर्य एकवटून पिल्लानी घरट्यातून ग्रील वर झेप घेतली. दोन मिनिटं परत धीर एकवटला आणि सर्व शक्तीनिशी बळ एकवटून पलीकडच्या आंब्यावर आईच्या दिशेने भरारी घेतली.

माझं भाग्य थोर म्हणून हा क्षण मी याची देही याची डोळा अनुभवला . नाहीतर पिल्लं उडून गेली की त्यांचं आणखी काही झालं हा विचार माझ्या मनातून कधीच गेला नसता. पिल्लं मोठी होऊन त्यांनी यशस्वीपणे आकाशात भरारी घेतली ह्या विचाराने खूपच छान ही वाटलं आणि रिकाम्या घरट्याकडे बघून थोडं उदास ही वाटलं.

घरट्याबाहेर आलेलं पिल्लू

IMG-20200701-WA0049.jpg

कोरोना लॉक डाऊनच्या ह्या कठीण काळात शिंपी पक्ष्यांच्या जन्मोत्सवाने जगण्यासाठी मला एक वेगळाच आयाम दिला. माझ्यातली सकारात्मकता खूप वाढवली. कोरोनाच्या ग्रीष्मात सुखद वसंताची अनुभूती मला दिली. निसर्गाच्या ह्या नवनिर्मितीच्या चमत्काराने मला स्तिमित केलं. हंया अनुभवाने मला वेगळ्या अर्थाने खूप श्रीमंत केलं आहे एवढं नक्की.

बागेतल्या तोंडल्याच्या वेलाच्या मांडवावर आणखी एक नवीन मी कधी न पाहिलेल्या पक्ष्यांची जोडी यायला लागली आहे. निसर्गाची ही नवनिर्मिती हाच सृष्टीच्या सौंदर्याचा गाभा आहे.

अनुभव कथन आणि प्रचि : माझी बहीण

शब्दांकन : मी . तिच्या बरोबर आम्ही ही हे तिच्याकडून मिळणाऱ्या अपडेट मधून अनुभवलं आहे. हे आज माबो करांसाठी शेअर करतेय.

व्हिडीओ ही आहे पण बघते कसा अपलोड करायचा ते. हे एवढं एखाद वेळेस वाया जाईल म्हणून आत्ता दाखवतेय . Hope व्हिडीओ ही इथे दाखवू शकेन तुम्हाला.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खुपच छान.
तुम्ही त्यांच्या निसर्ग चक्रात ढवळाढवळ केली नाही याबद्दल तुमचे अभिनंदन.

आमच्या अंगणात अडुळशाच्या झाडावर काही वर्षांपूर्वी शिंपी जोडीने घरटं बांधलं होतं. कमालीचं नाजूक काम! पिल्लं घरट्याबाहेर आली आणि उडायच्या प्रयत्नात एक पिल्लू जमिनीवर पडलं. पण मग कसं तरी खुरडत खुरडत पुढे सरकलो आणि पुन्हा थोडं उडून घरट्यात गेलं बहुतेक. पिल्लांना स्पर्शही केलेला त्यांच्या आईला आवडत नाही या समजामुळे आम्ही काही करू शकलो नाही. पण मग नंतर पिल्लांना पंख फुटले. मग काही दिवसांनी काड्या गळायला लागल्या घरट्याच्या, पूर्ण रिकामं झालं घरटं म्हणून आम्ही ते उतरवलं. निसर्ग किती काळजी घेतो! इवल्याश्या शिंपिणीच्या चोचीत कसली जादू ठेवून पाठवतो तिला, कसं कळतं तिला घरटं कसं बांधायचं, दोन चिमुकले पाय आणि एक चोच या जिवावर किती कौशल्याचं काम करते ही शिंपीण!! मी तर कायमच चकित होते या सगळ्यामुळे!!

लेख आवडला!

खरंच मन प्रसन्न झालं लेख वाचून आणि फोटो पाहून! Minimalism निसर्गाकडून शिकावा! तुमचे आणि तुमच्या बहिणीचे आभार हे छान क्षण इथे शेअर केल्याबद्दल!

मस्त अनुभव ममो, पण पायात घुटमळणाऱ्या मनी मुळे पोटात गोळा आला होता. मांजरापासून कसं वाचवलं? फोटो खुप गोड आलेत

मस्तच. वर्णन, फोटो आणि पिल्लू.
आमच्याकडे बागेत खूप वेळा चिमण्या घरटी बांधतात, अंडी घालतात. पण मेले वाईट्ट सरडे खाऊन टाकतात अंडी आणि पिल्लं पण. खूप कमी वेळा जन्मलेली पिल्लं सुखरुप ऊडताना बघितलेत.

काय छान वाटले पाहुन. कालच बघीतले होते. आमच्या बागेत पण शिंपी येतो सारखा. पण त्याला हवी तशी जागा मिळत नसावी. किती गोड आहेत ती पिल्ले. Happy ममो तु आणी जागु फार लकी आहात.

माझं भाग्य थोर म्हणून हा क्षण मी याची देही याची डोळा अनुभवला . नाहीतर पिल्लं उडून गेली की त्यांचं आणखी काही झालं हा विचार माझ्या मनातून कधीच गेला नसता. पिल्लं मोठी होऊन त्यांनी यशस्वीपणे आकाशात भरारी घेतली ह्या विचाराने खूपच छान ही वाटलं आणि रिकाम्या घरट्याकडे बघून थोडं उदास ही वाटलं.>>>>>> हे आवडलं.

किती छान..
अनुभव आणि लेख दोन्ही ही आवडले

किती सुंदर वर्णन आहे आणि फोटो तर अप्रतीम...!! आम्ही सुद्धा आमच्या बागेत शिंपी आणि बुलबुल पक्षांची बाळंतपणं अनुभवली आहेत. सद्ध्या एका साळुंखीने शेजारच्या घराच्या एका खोबणीत घरटं केलं आहे त्यांची पिल्लं पण बघायला मिळतील.

शिंपी पक्षांच्या अंड्यांचा रंग आधी हिरवट निळसर असतो नंतर असा हळु हळु गडद तांबुस तपकीरी होतो अन मग पिल्लं जन्माला येतात. ती पिल्लं आकाराने खुप छोटी असतानाच उडायला शिकतात. त्यांचे आई-वडील त्यांना उडायला शिकवतात ती शिकवणी पहात रहाणं एक पर्वणीच असते. त्या पिल्लांना झाडांच्या पानात गुडुप झाल्यावर आपण हरवलो गेलो आहे की काय असं वाटुन ट्विऊओ... ट्विऊओ... अशा हाका मारत बसतात. मग त्यांचे आई-वडील येउन त्यांना चांगल्या ठिकाणी घेऊन जातात. बरेचदा ती पिल्लं आपण त्यांची शिकवणी बघत असताना शेजारी उभे असु तर आपल्या अंगा-खांद्यावर पण येऊन बसलेली अनुभवलं आहे. शिंपीणीच्या ३-४ अंड्यातुन जरी सगळे जीव जन्माला येत असले तरी कावळे-मांजर यांच्या तावडीतुन फारतर एखाद-दुसरंच जगतं असा वाईट अनुभवही पहिला आहे.

फार छान!
मागच्या पावसाळ्यात मुनिया जोडीने आमच्या खिडकीत घर बांधले होते. एक पिलू होऊन उडाले. आता तीच जोडी आलीय पुन्हा. पण पडदा बाजूला केला की ते उडायचे म्हणून फोटो नाही मिळाले.

सर्वाना मनापासून धन्यवाद. सगळे प्रतिसाद ही interesting. मस्त माहिती गोळा होतेय.

धनुडी आम्हाला ही वाटतच होती भीती पण मनीने मालकिणीशी इमान राखलं आणि पक्ष्यांची काळजी घेतली. ती त्या घरट्याजवळून ही कित्येकदा पास व्हायची पण काही केलं नाही तिने. देवाचीच कृपा ... दुसरं काय ?

आमच्या बाल्कनीत चाफ्याच्या झाडावर चार वर्षांपूर्वी असच छान घरटं तयार केलं होतं शिंपी पक्षाने. मी रोज बघायचे पिल्लू पण एक पूर्ण दिवस आम्ही घरी नसतांना तीनही पिल्लू उडाले.
गेल्या तीन वर्षांपासून मुनिया किचन खिडकीत अंडी देतेय. परवा पासून फेऱ्या सुरू झाल्या त्यांच्या. आता माझं पिल्लू ही दोन वर्षाच होत आल, मुनियाचा आवाज आला की ब ब अस हात करून दाखवत मला.

उत्तम अनुभवकथन !!! डोळे आणि मन तृप्त झाले. नशीबवान आहात तुम्ही. आमच्याकडे तर दाणे, पाणी, बर्ड हाऊस एवढे सगळे ठेवूनसुद्धा एक चिमणीसुद्धा घरटे बांधत नाही. नवीन झाडांच्या लिस्ट मध्ये इन्सुलिनचे नाव सुद्धा आता ऍड करतो. Happy

खूपच छान मनोरंजक अनुभव. प्रतिसाद वाचायलाही तितकीच मजा आली.
एक बदल सुचवतो. अंड्यांचा रंग आणि पक्षी दोन्ही पाहिल्यावर असं दिसतंय की हा शिंपी नाही, 'राखी वटवट्या' आहे.

कणकेचे गोळे ठेवले नाहीत हे बरं केलंत. पक्ष्यांची पिल्लं इतकी झरझर वाढतात की बस. त्यांची वाढ लवकर व्हावी, पंखांचे स्नायू लवकर मजबूत व्हावेत म्हणून पक्षी पिल्लांना प्रथिनयुक्त असा किड्यांचा आहार भरवतात.

@वावे
या दिवसात मुनिया घरट्यासाठी जागा शोधायला फिरतात. गवती चहासारख्या लांब गवताची पाती आणि घरट्यासाठी आडोसा+आधार मिळाला की काम चालू. सप्टेंबरपर्यंत घरटं करु शकतात.

@प्रज्ञा९
पिल्लांना स्पर्शही केलेला त्यांच्या आईला आवडत नाही या समजामुळे आम्ही काही करू शकलो नाही.>>> असं नाही काही. खाली पडलेलं पिल्लू उचलून ठेवलेलं चालतं. फक्त वारंवार घरट्यापाशी जाणं त्यांना आवडत नाही. सतत घरटं करणारी जोडी असेल तर ती आपल्याला ओळखते. त्यांना हे जाणवतं की 'ही माणसं सज्जन आहेत', काही धोका नाही.

@मी चिन्मयी
चिमण्या सहसा बागेसारख्या उघड्या ठिकाणी घरटं नाही करणार. त्या साध्याच घरचिमण्या आहेत की काय पहा बरं! शिवाय सरडे अंडी पिल्लं खातात हे नवलच. असं कधी ऐकलं, पाहिलं नाही. पुढच्या वेळी फोटो घ्याल. एक उत्तम नोंद होईल ती.

@DJ..
शिंपी पक्षांच्या अंड्यांचा रंग आधी हिरवट निळसर असतो नंतर असा हळु हळु गडद तांबुस तपकीरी होतो. >>>
असं होणं जरा अशक्य वाटतं मला. शिंप्याच्या अंड्यांचा रंग पांढरट असतो आणि त्यावर लालसर डाग असतात.
रंग बदलायची एक शक्यता आहे; कशी कधी शिंप्याच्या घरात कोकिळा अंडी घालू शकते. पण तांबुस तपकिरी अंडी घालणारी कोकिळा कोणती ते नाही सांगता येणार.

@गोल्डफिश
चिमण्यांना बर्डहाऊस आवडलं नसेल किंवा त्याची जागा चुकली असेल. चिमण्यांना सुरक्षित वाटलं तरच त्या असं बर्ड हाऊस स्वीकारतात. जागा बदलून पहाल.

@अरिष्टनेमी, माझ्याकडे कुंडीत आहे गवतीचहा. तो जरा वर ठेवू का त्यांना दिसेलसा? Happy
फोटो पाहून लक्षात आलं मनीमोहोर, हा राखी वटवट्याच आहे. Ashy prinia.

खूप छान लिहिलेय . तुमच्याबरोबर आम्हीही अनुभवल . ते छोटेसे पिल्लू किती क्यूट आहे !

Pages