अन् मग

Submitted by अनन्त्_यात्री on 3 July, 2020 - 23:28

माझ्या क्षणभंगुर कवितेवर
प्रतिसाद देणार्‍या क्षमाशील वाचकांनो,
ह्या कवितेच्या शवपेटीवर मी शेवटचा खिळा ठोकेन.
धन्यवादाचा.

अन् मग
विस्मृतीच्या विस्कळखाईत कायमची दफनल्यावर
ह्या कवितेचं
काळंशार मायाळू खत होवो.

अन् मग
उपेक्षेच्या झळा सोसून,
दुर्बोधतेचे आरोप झेलून,
कोमेजलेली
कुण्या प्रतिभावंताची अस्सल कविता
त्या खतावर
पुन्हा जीव धरून तरारो.

अन् मग
विचक्षण वाचकांनो,
त्या बावनकशी कवितेचं असणं,
गारूड टाकणं,
अस्वस्थ करणारे
प्रश्न पाडणं,
सारं सारं
तुमच्यात
अनिर्बंध साथीसारखं
पसरत जावो.

Group content visibility: 
Use group defaults