जंगलातले प्राध्यापक

Submitted by डी मृणालिनी on 30 June, 2020 - 12:15

गळ्यात कॅमेरा , हातात ट्रायपॉड आणि डोक्यावर टोपी घातलेले ,घनदाट जंगलातून ,काट्याकुट्यातून वाट काढत चालणारे प्राध्यापक तुम्ही कधी पाहिले आहेत का ?
आज मी तुम्हाला त्यांचीच गोष्ट सांगणार आहे.
परवा धामापूरच्या घनदाट जंगलात आम्ही या प्राध्यापकांसोबत भटकायला गेलो. ( याला सर्वे म्हणतात. ) तेसुद्धा अंधार गुडूप रात्री. सगळी मनुष्य वस्ती उबदार पांघरुणात गाढ झोपली होती. एरवी माणसांनी गजबजणाऱ्या मंदिरामध्येही दोन -तीन पेंगुळलेल्या कुत्र्यांशिवाय कोणीच नव्हतं . ते काही क्षण मला काळजी वाटली . जंगलातही अशीच चिडीचूप शांतता असली तर ?? आपण पाहायचं काय ?.पण काही वेळातच जंगल-प्राध्यापकांनी wolf spyder दाखवून माझ्या या काळजीचा चक्काचूर केला. गुरुदादा amboli bush frog ला कॅमेऱ्यात कैद करण्यात मग्न होता. तोपर्यंत आम्ही इतर सगळे जंगल -प्राध्यापकांसोबत शांत बसलो . अगदी शांत. जंगलाच्या मधोमध ,घनदाट झाडीत. खूप अंधार होता. आजूबाजूला उंच झाडींमधून अंधुक चंद्रप्रकाश येत होता. इकडून तिकडे फिरणारे ,लुकलुकणारे काजवे अंधाराची जाणीव करून देत नव्हते. चारी बाजूंनी चार वेगवेगळ्या प्रकारचे बेडूक तार स्वरात डराँव डराँव करत होते. फक्त माणूसच झोपलाय ,जंगल तर जागं होतं ! झाडांमधील अंतरामधून दिसणारा विशाल धामापूर तलाव मात्र शांत झोपलाय असं वाटत होतं . मी जंगल 'अनुभवत' होते. बाजूला बसलेला विश्वास दादा मात्र ''मच्छर चावतायेत '' अशी कुरकुर करत चापट्या मारत होता. हा एवढाच काय तो माणसाचा आवाज कानी पडत होता. काही दीर्घ काळच्या शांततेनंतर जंगल - प्राध्यापकांनी सांगितले.
'' ही सगळी बेडकं मादीला आकर्षित करण्यासाठी असे आवाज काढतात. हा आवाज काढताना त्यांची vocal chord फुलते. पोटातली हवा ते त्यात भारतात आणि मोठमोठ्याने ओरडतात. ज्याचा आवाज मोठा तो जिंकला !! ''
अरे ! मला ही गोष्ट तर माहीतच नव्हती. कलकेरीत हॉस्टेलमध्ये असताना असे बेडूक ओरडू लागले कि मैत्रिणी म्हणायच्या -'' गावात आज कोणीतरी म्हातारी गुटुक झालेली दिसते. '' मात्र बेडकांच्या या ओरडण्याचं शास्त्रीय कारण आता मला कळलं .
'' बेडूक आपण गिळतो तसा गिळू शकत नाही. काहीही खाल्ल्यावर ते त्याच्या घश्यात अडकतं , ते पुढे ढकलायला तो डोळ्यांची मदत घेतो. म्हणजे त्याचे डोळे त्याच्या घश्यात जातात ,अडकलेल्या पदार्थाला पुढे ढकलतात आणि पुन्हा आपल्या जागेवर येतात. ''
जंगल -प्राध्यापकांनी अजून एक interesting fact सांगून मला चकित करून सोडलं . त्या बेडकांचे बटबटीत डोळे घश्यात जाऊन किती घाण होत असतील ना ! माझ्या मनात बिनडोकासारखा एक विचार आला. समोर लुकलुकणारे काजवे पाहून मला 'कट्यार काळजात घुसली' चित्रपटातलं ते गाणं आठवलं ज्यात शंकर महादेवन एका लहान मुलाला काजव्यांनी भरलेलं झाड दाखवतात.
'' हे खरं असतं का ?''
'' हो ,हो . काजव्यांमध्ये फक्त नरच असे लुकलूकतात आणि उडू शकतात. ज्या ठिकाणी मादी असते तिथे ते असे लुकलुकतात . इम्प्रेशन मारायला ! ''
ही माहितीसुद्धा माझ्यासाठी अगदी नवीन होती. हे जंगल- प्राध्यापक जंगलात पाऊल ठेवल्यापासून सतत खूप भन्नाट आणि रंजक ज्ञान आमच्या मेंदूच्या कोऱ्या कागदावर उतरवत होते. आश्चर्याची गोष्ट अशी कि,मी कुठेही हे सगळं लिहीत बसले नाही . तरी नकळतपणे हे सगळं माझ्या लक्षात आहे. हीच तर गम्मत आहे या जंगलातल्या प्राध्यापकांची ! कॉलेजमध्ये लॅटिनमधली सायंटिफिक नावं घोकवणारे प्राध्यापक आणि हे जंगलातले प्राध्यापक . कित्ती तफावत !
'मी मोठी होऊन काय बनणार ?' यावर मी अनेकानेक स्वप्न पाहिली . हे तुम्हाला माहितीच असेल. कधी पायलट ,कधी हॉकी प्लेयर ,कधी कंडक्टर तर कधी दुकानदार. पण आता मी एक नवीन स्वप्न बघते आहे.. कोणतं ओळखा पाहू ??
जंगलातली प्राध्यापक होण्याचं !!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आवडलं गं. Interesting Happy
फोटो असतील तर टाक.

छान.माणसाला जंगलाची ओढ आहे कारण त्याचे बापजादे हजारो वर्षे तिथेच राहिले होते.
मस्त लिहिले आहे.आवडले.

ही तर प्रस्तावना वाटते आहे. पूर्ण लिहा. खूप छान लिहिले आहेत.
खरोखरच अशी अभ्यासासाठी भटकंती करायला मिळाली असती तर शैक्शणिक जीवन सम्रुद्ध झाले असते.

छान आहे भटकंती आणि जंगल अभ्यास आणि तुमचे स्वप्न सुद्धा . ते पूर्ण होण्यासाठी शुभेच्छा.

छान!

छान अनुभव आहे.
जंगलातला प्राध्यापक होण्याचं स्वप्नं खरंच पूर्ण होवो.

लेखातली एक गोष्ट पडताळून पहा, काजव्यांमध्ये नुसते नरच नाहीत तर माद्यासुद्धा लुकलुकतात.
आणि हो, रात्री जंगलात जाणं तितकं सुरक्षित नाही. शिवाय परवानगी घ्यावी लागते.