प्लँचेट !! भयकथा

Submitted by Kavyalekha on 29 June, 2020 - 11:57

प्लँचेट !
ते पाच जण आज टाकीवर जमले होते…. बऱ्याच दिवसांनी… वेळ काढून…! बिल्डिंगमधले लहानपणापासून चे मित्र होते ते… सगळ्यांच्या करियरच्या वाटा जरी वेगळ्या होत्या तरी कशी का होईना त्यांनी आपली मैत्री टिकवली होती…. खरंतर आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यात इतकंही कठीण नव्हतं ते….
.. आदित्य, नेत्रा, अवनी, विशाल आणि सुदीप.
सगळ्यांचे नवीन जॉब्स सुरु होऊन काही महिने झाले होते. नेत्राने स्वतःचे छोटेसे डेंटल क्लिनिक चालू केले होते. अवनी इव्हेंट मॅनॅजमेण्ट मध्ये आपला जम बसवतं होती. आदित्य आणि विशाल एकाच कंपनी मध्ये पण वेगवेगळ्या डिपार्टमेंटस मध्ये होते आणि सुदीप सतत नोकऱ्या बदलण्यात बिझी होता. खरंतर सर्वांमध्ये सुदिपने प्रथम नोकरी चालू केली होती, पण लगेचच ती सोडूनही दिली होती. पूर्ण ग्रुपमध्ये सर्व त्याला समजावून थकले. पण तो कधीच कोणाचे ऐकायचा नाही. स्वतःच्या मनाप्रमाणे तो काहीही करायचा. तेही बऱ्याचदा परिणामांचा विचार न करता ! मनमौजी, बेफिकीर आणि बिनधास्त होता तो ! ग्रुप लीडर जरी आदित्य असला तरी सुदीप स्वतःचे म्हणणे ऐकायला लावायचा. समोरच्याला तो असा काही कन्व्हिन्स करायचा की त्याचे बोलणे सारे लॉजिकल आणि सोपे वाटायचे.
खुप दिवसांच्या बिझी शेड्युल नंतर सारे जमले होते. फार दिवसांनी त्यांना असा निवांत वेळ मिळाला होता.
“अरे यार ... माझ्या डोक्यात ना एक मस्त प्लॅन आहे. आपण या महिन्याच्या 15 तारखेच्या वीकएंडला दोन दिवस अलिबागला जाउया. मजा येईल यार. शिवाय कोजागिरी सुद्धा आहे. म्हणजे पौर्णिमा. फुल्ल मून नाईट !!... बीच… चंद्र… चांदणं.. बॉनफायर.. वाईन.. व्हिस्की.. मस्त सीफुड.. सही वाटेल आमच्या काकांच्या बंगल्यावर !” सुदीपने पूर्ण प्लॅन आखला होता. सगळं जवळजवळ ठरवून तो सर्वांना विचारतं होता. प्लॅन काही वाईट नव्हता. सर्वांना एक ब्रेक हवा होता. पण कोणाचेच नक्की होतं नव्हते.
नेत्राची कॉन्फरन्स असल्यामुळे तिला जमणार नव्हते. अवनी फ्री होती. आदित्य आणि विशालला नेमके त्या शनिवारी ऑफिसला जाणे जरुरी होते. जायचे तर साऱ्यांनी एकत्र असे ठरल्यामुळे प्लॅन कॅन्सल झाला. मग कितीतरी ऑपशन्स सुचवून झाले. मूवी, स्टॅन्ड अप कॉमेडी शो... जिथे सर्वजण एकत्र जाऊ शकतील. पण कोणाचंच एकमत होतं नव्हतं. काहीही करून रुटीन पासून थोडं का होईना लांब पळायचं होतं त्यांना.. आता सगळेच कंटाळले हया डिस्कशनला...एव्हढ्यात, मगाचपासून स्वतःच्याच विचारात गढलेला सुदीप जोराने ओरडला, " आयडिया... एक छान आयडिया आली आहे माझ्या डोक्यात! सर्वांनाच जमण्यासारखे आहे. इथंच राहून कुठेही न जाता आपण आपली मजा करू शकतो... माझ्याकडे अजून एक मस्त प्लॅन आहे.. "
त्याला पुरतं बोलू न देता अवनी आणि नेत्रा किंचाळ ल्याच त्याच्यावर, " आता अजून काय नवीन सांगणार आहेस..? .इथे बिल्डिंगमध्ये काय करणारं आहोत आपण??.. आम्हाला क्रिकेट किंवा फुटबॉल नाही खेळायचाय.. तुम्हीच करा काय ते..''
"अरे हो हो.. पहिले ऐका तर.. मी असं काही सांगणार आहे ज्यात सर्व सहभागी होऊ शकतात." सुदीप त्यांना मधेच थांबवत म्हणाला."अरे.. व्हॉट इफ, आपण आपला नाईट आऊट अलिबागच्या बंगल्याऐवजी इथेच केला तर?.. ''
नेत्राला सुदीपचे प्लॅन्स जरा अतीच रिस्की वाटायचे. तिचे प्रश्न तयार होते. "म्हणजे नक्की काय करायचं आपण?... इथे कुठे करायचा? आपल्या सर्वांच्या घरचे कसे तयार होतील?. कुणाच्या घरी ऑकवर्ड होईल यार.. नीट मजाही नाही करता येणार...''नेत्राचे हे बोलणं सर्वांना पटलं. ते तिला दुजोरा देऊ लागले.
सुदीपचा मात्र आपल्या कन्व्हिन्सिग पॉवर वर प्रचंड विश्वास होता. त्याने त्याचे म्हणणे चालूच ठेवले. "अरे यार, इथे म्हणजे जरुरी नाहीए की कुणाच्या घरी करायचा. आपण नाईट आऊट करायचा... तो ही इथेच !. आपल्या बिल्डिंगच्या गच्चीवर...मी सगळयाचा व्यवस्थित विचार केलेला आहे..."
"पण परमिशन कशी काढणार सोसायटीकडून आणि आपले पेरेंट्स??'' नेत्राचे प्रश्न काही संपत नव्हते.
"अगं यार नेत्रा.. लिसन यार.. आपण सर्वांची परमिशन काढायची ती कोजागिरी सेलेब्रेट करायला. पण प्रत्यक्षात आपण आपल्या पद्धतीने आपली मजा करायची. तसंच 'डी' बिल्डिंग सोसायटी मध्ये अगदी टोकाला आहे. जुनी बिल्डिंग असल्यामुळे प्रत्येक विंगला सेक्युरिटीची कटकट नाहीए. कंपाऊन्ड वॉल च्या त्यापलीकडे फक्त जंगल, झाडी -झुडपं आहेत. त्यामुळे आपल्या आवाजाचा कोणालाही त्रास होणार नाही. महत्वाचे म्हणजे तुम्हाला माहीतच आहे की, 'डी' बिल्डिंगमधले अर्धे-अधिक फ्लॅट्स एकतर रिकामे आहेत... किंवा बंद आहेत.. आपल्या सोसायटीचे सेक्रेटरी लेले ग्राउंड फ्लोअर वर राहतात. तेही घरात एकटेच असतात. तिसऱ्या मजल्यावरच्या काकांनी तर बिल्डिंगमधल्या कुणाशी फार काही संबंध ठेवलेला नाहीए. सो यांचा सवालचं नाही. घरच्यांची परमिशन कशी काढायची ते सर्वांनी आपापले बघा. Its not that difficult !! फक्त लेलेंकडून गच्चीची चावी आणि परवानगी दोन्ही लवकरात लवकर मिळवायला हवं. थोडं अवघड आहे. पण मी करेन ते...तुम्ही फक्त moral support म्हणून माझ्यासोबत चला .. कोजागिरीला वेळ आहे. पण हे परमिशनचं कामं आपल्याला आजच करता आलं तर बेस्ट आहे... सो let's not waste our time & get going.."

हो-ना करता करता हळूहळू सगळेच तयार झाले. ते पाचजण सेक्रेटरी लेलें कडे पोहचले तेव्हा जरासा उशीरच झाला होता.
"I hope ते झोपले नसतील?" अवनीची शंका रास्त होती.
"हो यार, किती खडूस आहे तो माणूस. आपल्याच दुनियेत असतो सदानकदा ! थोडासा विचित्र आहे. आपल्याला सहज नाही ऐकणार तो. " विशालचे हे बोलणे ऐकल्यावर मात्र सुदीप वैतागला. त्याने चिडून सगळ्यांना बजावले, " प्लीज, नेगेटिव्ह बोलून सगळ्या प्लॅनचा आधीच विचका नका करू. आता आलो आहोत तर रिकाम्या हाताने नाही जायचं. "
4 वेळा बेल वाजवल्यावर मग कुठे दार उघडलं गेलं. लेलेंच्या चेहऱ्यावर नेहमीपेक्षा जास्त आठ्या उमटल्यासारख्या वाटल्या. तसाही त्यांचा निमुळता, अरुंद चेहरा, डोळ्याभोवती जमलेली काळी वर्तुळं, वयोमानानुसार वर आलेली गालफडं, किडकिडीत शरीरयष्टी पाहून कुणालाही भीती वाटली असती. त्यांना कुणी कधी हसताना पाहिले नव्हते. सतत कसल्याशा दडपणाखाली ते वावरत असल्यासारखे वाटतं. आजही त्यांनी मुलांना आतसुद्धा घेतले नाही.

दारातच उभ्या उभ्या आदित्यने सुरुवात केली, " हॅलो काका, सॉरी आम्ही इतक्या लेट आलो. आमचं तुमच्याकडे एक कामं होतं..." सुरुवात आदित्यने केली तरी पुढचं सगळं सुदीप सांभाळणार होता. नेहमीप्रमाणे त्याने सर्व काही पटेल अशा पद्धतीने त्यांच्यासमोर मांडले.
लेलेंनी रोखून एकवार सर्वांकडे पाहिले. नापसंतीच्या अनेक छटा त्यांच्या चेहऱ्यावर सगळीकडे उठल्या . त्यांनी सुदीपची कल्पना " हे शक्य नाही " असं म्हणून एका वाक्यात उडवून लावली. त्यांची ती अनास्था पाहून सगळे थोडे अपसेट झाले.
पण सुदीप हार मानणाऱ्यातला नव्हता. त्याने ठामपणे आपला मुद्दा चालूच ठेवला," पण का काका? आम्ही सगळं रुल बुक मध्ये राहून घरच्यांच्या परवानगीने करू. मग काय प्रॉब्लेम आहे? आम्हाला हया नाही च खरं कारण कळलंच पाहिजे. " दोघे आपापल्या मुद्द्यांवर अडून होते.
खुप वादविवादानंतर मुलं काही ऐकणाऱ्यातली नाहीत हे पाहून, शेवटचा उपाय म्हणून ते त्या साऱ्यांना म्हणाले, "हे बघा...तुम्हाला खरं काय आहे ते पूर्ण माहित नाहीए . तुम्हाला काय करायचे ते करा, पण गच्चीवर नाही. मी तुम्हाला सगळं काही सांगतो. आजतागायत ही वेळ कधी आली नव्हती. इतकी वर्ष जे मणामणाचं ओझं माझ्या उरावर घेऊन मी जगतोय, ते आज कदाचित काही प्रमाणात उतरेल असं वाटतंय .. सगळं काही जसं घडलं तसं सांगतो, म्हणजे माझ्या नकाराचं कारण तुम्हाला पटेल आणि तुम्ही आपला हा हट्ट कायमचा सोडाल. या, आत या.. "
लेलेंच्या घरी सगळे पहिल्यांदाचं आले होते. घरं तसं जुनंच होतं. घरात सामानही फार नव्हते. एक शिळा, कुबट वास मात्र तिथे भरून राहिला होता. ते जुनाट, उदास घरं, त्याच्या मालकासारखचं होतं !. रया गेलेलं... ! कित्येक वर्षांत रंगकाम न केलेल्या... पोपडे उडालेल्या भिंती..... काच तुटलेलं शोकेस..जुनं पुराण मोजकं फर्निचर...त्यावर साठलेले धुळीचे थर.....आणि पिवळट बल्बच्या अपुऱ्या प्रकाशात आरामखुर्चीत विसावलेले कृश लेलें.. सगळं कसं भकास... भावहीन वाटतं होतं. ... जणु वठलेल्या निष्पर्ण वृक्षासारखं..... जीर्ण विटलेल्या वस्त्रासारखं !. की एखाद्या रंग उडालेल्या चित्रासारखं.. !
लेलेंनी सांगायला सुरुवात केली.
"काही वर्षांपूर्वी हे सारं असं नव्हतं. मी असा नव्हतो. मी आणि माझे दोन मित्र असे आम्ही खुप धमाल करायचो. माझ्या बाईक वर कुठे कुठे भटकायचो. आमच्या आयुष्यातले मस्त, बेधुंद दिवस होते ते ! मनोरंजनाची फार कमी साधनं होती तेव्हा . जरी साधं आयुष्यं होतं आमचं, तरीही सुखी होतो आम्ही. तारुण्य खुप अल्लड असतं. एक वेगळीच मस्ती असते ती... त्या कैफात ते सगळं घडलं. त्यावेळी एका नवीन गोष्टीचं खुप कुतूहल होतं.'प्लँचेट' च !!!तुम्हाला ऐकून - वाचुन माहित असेल त्याविषयी. तर केवळ आपली उत्सुकता शमवण्यासाठी मी आणि माझ्या मित्रांनी ते काय आणि कसं असतं हे करून बघायचं ठरवलं. आम्ही सगळी माहिती गोळा केली. एका शनिवारी माझे आई -वडील गावी गेले होते. सगळे प्रथम माझ्याकडे जमले. पण कोणाच्या घरात नको असलं काही म्हणून आम्ही गच्ची निवडली.
प्लँचेट मध्ये एक चौकोनी ouija बोर्ड असतो. त्यावर काही अक्षरं, 0-9 आकडे आणि काही शब्द जसे की 'yes', 'no', 'ok', 'goodbye' लिहिलेले असतात. 'प्लँचेट' चा अर्थ होतो एक छोटं नाणं. जे फिरून एक अर्थपूर्ण वाक्य तयार करतं. असं म्हणतात की, तुम्ही बोलावलेले अतृप्त आत्मे किंवा अशा काही अद्भुत शक्ती आपण विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं हे नाणं हलवून देतात. आम्ही हे पडताळून पाहायचं ठरवलं. त्याप्रमाणे त्या 'अवसेच्या ' रात्री... आम्ही गच्चीवर जमलो. आम्हाला कशाचीच भीती वाटतं नव्हती. आता वाटतंय खरंच आम्ही तो मुर्खपणा केला नसता तर आज आमची आयुष्य वेगळी असती..."
एक मोठा उसासा टाकुन लेलें थांबले. पुढचं ऐकायची अधीरता सर्वांच्या चेहऱ्यावर दिसत होती.
".. आम्ही ठरलेल्या वेळेप्रमाणे रात्री गच्चीवर गेलो. सगळी मांडामांड केली. काय आणि कसं करायचं आम्ही नीट वाचून काढले होते. आमच्यातला एक जरा जास्तच भित्रा होता. त्याला ह्यात भाग घ्यायचा नव्हता. पण आम्ही बळजबरीने त्याला ह्यात ओढला. अमावस्या असल्यामुळे आभाळात चंद्र हजर नव्हता. चंद्राशिवाय आकाश एका 'आ' वासलेल्या गहिऱ्या काळ्याकुट्ट डोहासारखं दिसतं होतं. असा एक खोल डोह ज्यात कशालाही गिळायची ताकद असावी..!.जणू तो वाटचं बघतं असावा आपल्या सावजाची... !!. ''

"... वातावरणात एक भयानक शांतता होती. ही 'डी' विंग शेवटची असल्यामुळे तसंच बरेच फ्लॅट्स रिकामे असल्यामुळे फार काही आवाज ऐकू येतं नव्हते. रात्र पुढे -पुढे सरकत होती. हवेमध्ये एक बोचरा गारवा होता..आम्ही गच्चीचा एकदम टोकाला असलेला एक कोनाडा निवडला . प्लँचेट चा एक महत्वाचा नियम असतो, जो काही केल्या पाळावाच लागतो. तो म्हणजे कितीही भीती वाटली तरी हे मधेच सोडता येतं नाही. आमच्या घाबरट मित्राला आम्ही हे बजावले.. धमकावले.. पण त्याचा काही उपयोग झाला नाही. ज्याची भीती होती तेच झालं... "
" ouija बोर्ड लावून झाल्यावर आम्ही ठरवलं कुणाला बोलवायचं ते. आम्ही निवड केली आमच्याच एका कॉलेजच्या मित्राची , जो बाईक accident मध्ये जागीच ठार झाला होता. बाकी दोघांनी याला प्रथम विरोध केला. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे हे रिस्की होतं. एकप्रकारे आमच्यामुळेचं तो हकनाक आपला जीव गमावून बसला होता. आम्ही त्याच्यासोबत लावलेल्या पैजेमुळे मजेची सजा होऊन बसली होती. पण मी हे मानायला तयार नव्हतो.

माझं असं मत आहे की,आपलं किंवा दुसऱ्याचं, कुणाचंच मरण काही आपल्या हातात नसतं. मृत्यू स्वतः ठरवतो कुणाला आपल्याकडे खेचून आणायचं ते !. त्याच्या पुढे तुमच्या -आमच्या सारखी माणसं म्हणजे क्षुल्लक, क्षुद्र जीव....काळाच्या पटावरची फक्त उरलेली प्यादी...खरा वझीर तोच !... आपल्याला एखाद्या कळसूत्री बाहुलीसारखं नाचवणारा...!त्याची नजर पडेपर्यंत आयुष्याची भीक टाकणारा... मृत्युदेव !!!तो जेव्हा येतो तेव्हा कुठल्याही रूपात येऊ शकतो. तुम्ही कितीही अडवलतं तरीही तो बधत नाही. त्याला जे हवं ते तो हिसकावतोच. आपण काही करू शकत नाही नुसतं बघण्याशिवाय. तो असा काही भारून टाकतो आपल्याला की त्याच्याकडे आपण नकळत आकर्षिले जातो.मग तो आपल्याला स्वतःत पूर्णतः शोषून घेतो. मृत्यूचं हे गारुड असचं असतं, मंत्रमुग्ध करणारं....!...तुम्हाला आपल्यात ओढून घेणारं... !

लेलेंच्या या अशा कोड्यात पाडणाऱ्या बोलण्यात कुठेतरी भूतकाळाचा सलं डोकावत होता, की ती येणाऱ्या भविष्याची चेतावनी होती. कोण जाणे . !!
त्यांनी पुढे बोलायला सुरुवात केली.
"कुणाचेही न ऐकता मी त्यालाच बोलवायचं ठरवलं. आम्ही आपापली बोटं ठरलेल्या ठिकाणी ठेवली. कुणालाच कल्पना नव्हती पुढे काय होणार आहे याची. अचानक आधीच वाटणारा गारवा आणखी वाढला. जणू थंडीची एकदम लाटच आली असावी. आसपासची नारळांची झाडं जोरजोराने हेलकावु लागली. अपुऱ्या प्रकाशात त्यांच्या अर्धवट पडणाऱ्या सावल्या एखाद्या हिंस्त्र जनावरासारख्या वाटत होत्या. हजारो नागांनी एकत्र फुत्कार टाकावेत असे आवाज कानांत घुमू लागले. बोर्डवर हालचाल होऊ लागली.. नाणं आपोआप हलत होतं .... तो खरंच आला होता. !!..."

"..आम्ही सगळेच प्रचंड घाबरलो. आपण हे काय करून बसलोय हे समजताच आमच उरलं सुरलं अवसान गळून पडलं. काय करायच कोणालाच सुचतं नव्हतं. काहीही विचार न करता आम्ही लगेचच त्याला जायला सांगितलं. पण इथेच आमची मोठी चूक झाली. आम्हांला हे माहित नव्हतं की, असे प्रेतात्मे येतात तर आपल्या मर्जीने पण जातात स्वतःच्याच मर्जीने ! आता मात्र आमची पाचावर धारण बसली...डोकं सुन्न झालं होतं. पेशंन्स संपत चालला होता. आम्ही त्याला परत विचारले की तो का जातं नाही आहे. काय हवयं त्याला.... आणि प्लँचेटचं नाणं बोर्डवर पुन्हा फिरू लागलं. त्याने एक शब्द तयार केला...तो होता... 'Death'... "
"....Death.. !!"
"... कोणाचा मृत्यू हवा होता त्याला? आणि का?.. आम्ही त्याला परोपरीने समजावले की त्याच्या accident मध्ये आमचा काही हात नाहीए . पण तरीही बोर्ड वेड्यासारखा हलू लागला. मेणबत्या कधीच विझल्या होत्या.... भोवताली सगळं अंधाराचं साम्राज्य होतं... कुणीच काही बोलण्याच्या परिस्थितीतं नव्हतं. .. आम्ही तिघेही अस्वस्थ झालो...आणि भीतीच्या त्या गडद सावटाखाली माझ्या मित्राचा बोर्डवरचा हात अचानक सुटला...आम्ही त्याला परत हात ठेवायला सांगितलं.. पण काही उपयोग झाला नाही.... त्याला दरदरून घाम फुटला... तो अक्षरश: उठून पळू लागला....तोंडाने तो ' मी मरणार ', ....' मला भीती वाटतेय.. '.. 'आपण सगळे मरणार.. '.... असे काहीबाही बरळत होता...असं बडबडत तो गच्चीच्या दाराजवळ पोहोचला...ouija बोर्ड अजूनही कुणीतरी गदागदा हलवल्याप्रमाणे थडथडतं होता. .... "
"... इतक्यात आम्हाला एक जोरदार, काळीज फाटणारी किंकाळी ऐकू गेली. ....दोन मिनिटं आम्हाला काहीचं कळले नाही... आमचे लक्ष गच्चीच्या दाराजवळ गेले... आम्ही कसेतरी धावत तिथे पोहोचलो.... आणि जे बघतलं ते फार भयानक होतं....आजतागायत मी ते विसरलो नाहीए... आमचा मित्र खाली वेडावाकडा पडला होता... काहीतरी भयंकर बघितल्या मुळे त्याचा चेहरा पांढराफटक होता.... डोळे खोबणीतून बाहेर आल्यासारखे वाटत होते.. .. प्राण तर शरीरातून कधीच निघून गेले होते... शवागारातून काढलेल्या प्रेतासारखा तो थंड पडला होता. ... !!!"

"आता मात्र आम्हा दोघांचाही धीर सुटला. आम्ही पळून जाणार इतक्यात लक्षात आलं की गच्चीचा दरवाजा घट्ट बंद झाला आहे. मी तो उघडायचा आटोकाट प्रयन्त करू लागलो. माझा दुसरा मित्र मदतीसाठी हाका मारू लागला. इतक्यात दरवाजा धाड्कन उघडला.... आणि आम्हाला काही कळायच्या आत आम्ही गच्चीतून बाहेर फेकले गेलो... कुणीतरी शक्तीने जोराने ढकलल्यासारखे आम्ही बाहेर जाऊन पडलो.... परत दरवाजा धाड्कन बंद झाला.. पुढचं मला काही आठवत नाहीए. आम्ही दोघं कसे आणि का वाचलो हेही मला माहित नाही.जाग आली तेव्हा दोघंही हॉस्पिटलमध्ये होतो. पोस्टमार्टममध्ये आमच्या मित्राच्या मृत्यूचे कारण 'heart failure' असे नमुद झाल्यामुळे पोलिसांच्या ससेमिऱ्यातून कसेबसे सुटलो... कायद्याच्या कचाट्यातून बाहेर पडलो तरी आमची अवघी आयुष्यंच बदलून गेली..काही काळासाठी, दुसऱ्या शहरात राहूनसुद्धा जिथे जिथे गेलो तिथे तिथे कधीच मनःशांती नशिबात नव्हती. कुण्याच्या तरी गडद छायेखाली वावरत असल्याचा भास सतत व्हायचा.. मृत्यूच्या दाढेतून वाचलो तरीही एक जिवंतपणीचं मरण कायम अनुभवत होतो आम्ही !...रोज प्रेतवतं जगत होतो... फक्त श्वास चालू होते आमचे..शरीर हालचाल करतं होतं आणि जगासाठी आम्ही जिवंत होतो...जिवंत होतो ते मृत्यूची वाट बघतं..हो...कारण आम्हांला असं जगणं नकोसं झालं होतं..तिसऱ्या मजल्यावरचा अंथरूणाला खिळलेला माणूस कोण आहे माहित आहे का तुम्हाला?? एवढाही म्हातारा नाहीए तो.. पण सततच्या आजाराने अकाली वृद्धत्व आल्यासारखा खंगलाय तो.. .. तो माझा मित्र आहे... त्या रात्री माझ्याबरोबर वाचलेला... तोही जाईल.... आज, आत्ता किंवा उद्या..तेव्हा कदाचित हे अघटित थांबेल कायमचं.!. ..मृत्यू बरोबर आपली वेळ साधेल..."
" पण म्हणून तुम्हाला सांगतोय...या फंदात पडू नका. त्या जागी जाऊ नका.. तो आपली वेळ बरोबर साधेल.... हा खेळ आमच्यापाशीचं थांबू दे. ... तुम्ही त्याचे नवे प्यादे होऊ नका... तुम्ही नवा डाव नका सुरु करू.. जा आपापल्या घरी. माझं ऐका प्लीज...त्याला वाटलं तर तो कोणालाही सोडणार नाही.. शहाणे असाल तर नका जाऊ तिथे.. जा बाबांनो घरी.. जा..'' असं म्हणतं त्यांनी त्या पाचही जणांना अक्षरशः घरातून हाकलून लावले आणि दार लावून घेतलं.

सुदीप सहित सगळे जण पुन्हा टाकीपाशी आले. नेत्रा, अवनी, विशाल, आदित्य सारे खुप गंभीर होते. कुणीच काही बोलत नव्हतं. इतक्यात सुदीप खदखदून हसायला लागला. सगळ्यांनी आश्चर्याने त्याच्याकडे पहिलं.
"अरे मुर्खा, हसतोयस काय? This is not funny. May be ते जे सांगत होते ते सारं खरंही असेल..हसण्यासारखं नाहीए काही.. '' अवनीला सुदीपचा प्रचंड राग आला.
सुदीपचं हसणं मात्र अजूनही थांबत नव्हतं. " प्लीज don't tell me. तुम्ही अशा भाकडं कथांवर विश्वास ठेवता ते.. ! कमॉन यार. तुम्हाला कळत कसं नाही, आपण गच्चीवर जाऊ नये म्हणून मारलेली ती थाप असणार... किंवा एखाद्या मूव्हीची स्टोरी असेल.. भुतं-बितं असतील सगळी कोकणात नाहीतर गावात .. तिकडचे अडाणी लोकं मानतील हे सगळं.. माझा नाहीए विश्वास ह्यावर. जे कधी बघितलं नाही ते कसं खरं मानायचं.. आणि तेही आजच्या जमान्यात.. मुबईंत कुठून येणार हे सगळं.. "
"पण सुदीप कशावरून त्यांच्या म्हणण्यात काहीच तथ्य नव्हतं..?? उगीच नाही कुठल्याच गच्चीवर आपल्याला जाऊ देतं नाहीत." आदित्यला सुद्धा सुदीपचं बोलणं तितकसं पटलेलं दिसतं नव्हतं. बाकीच्यांनी आदित्य आणि अवनीला सपोर्ट केला.
विशाल तर प्रचंड घाबरला होता. " ए बाबा, हे काहीतरी भलतंच आहे. I believe in all such things. आपण हा गच्चीचा नाद सोडू या. त्यापेक्षा घरीच बसून नेटफ्लिक्स बघूया. "...
पण सुदीप हट्टी होता. त्याने कधी कुणाचे ऐकलं होतं जे तो आज सहज मानेल...
"मी तुम्हाला हे सिद्ध करू शकतो. आता... इथे.. बोला लागली बेट??.. ''.. त्याने आपले म्हणणे सोडले नाही. उलटं तो ते खरं करायच्या अधिकच मागे लागला..
"आता मात्र हे अति होतंय हं सुदीप !.. असा काय हसतो आहॆस. कसं प्रूव्ह करणार आहेस?? "... अवनीचा राग अजूनही गेला नव्हता.
"माझ्याकडे एक अशी गोष्ट आहे जी वापरून मी तुम्हाला दाखवून देईन की भुतं वगैरे काहीही नसतं आणि लेलेंनी सांगितलेलं सब झुठ होतं..बोगस गोष्ट होती ती.. . '' असं म्हणून त्याने खिशातून चाव्यांचा जुडगा बाहेर काढला. ..
" ओह माय गॉड !!!are you out of your mind? कुठे मिळाला तुला हा?? तु त्या लेलेंच्या घरातून घेतलास ना?. '' विशाल ओरडल्या बरोबर साऱ्यांनी सुदीपला बडबडायला सुरुवात केली.
पण तो कुणाचेच ऐकायला तयार नव्हता.
" अरे रिलॅक्स यार.. कुछ नही होता है... तुम्ही सगळे डरपोक आहात. कशावरही लगेच विश्वास ठेऊन घाबरता. You know what there is no illusion greater than fear !! तुम्हाला माहितेय ऍगाथा ख्रिस्ती काय म्हणते ते - fear is an incomplete knowledge !!!..so chill.. रिलॅक्स...उगाच घाबरताय सारे.. . तुम्ही उद्या सकाळी 9:00 वाजता मला परत इथेचं भेटा. मी आत्ता रात्री गच्चीवर जाईन. तिथे अर्धा तास मस्त हवा खाईन आणि घरी जाऊन थोडीशी brandy पिऊन छान झोपेन.... म्हणजे तुम्हाला समजेल तिथे असं काही नाहीए.. " साऱ्यांनी त्याला खुप समजावले. परंतु तो आपला हेका सोडायला तयार नव्हता. तो जायला निघाला सुद्धा !..
"ओह नो !..आता काय करायचं रे..? ''नेत्रा आणि अवनी टेन्शन मध्ये येऊन म्हणाल्या.
" हा मुर्ख मुलगा आहे. पण तो आपलं तेच खरं करणार. सुदीप यार थांब... सुदीप.. "विशाल आणि आदित्यच्या हाकांकडे संपूर्ण दुर्लक्ष करून सुदीप 'डी' विंग मध्ये शिरला... त्याने परत मागे वळून पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावर तेच बेफिकीर हसू होतं...
घरच्यांचे फोन यायला लागल्यावर सर्वजण आपापल्या घरी गेले. पण मनात एक अनामिक भीती घेऊन... झोप बहुतेक कुणालाच लागणार नव्हती. जोपर्यंत सकाळी सुदीपला भेटत नाही, तोपर्यंत कुणाच्याच मनाचे समाधान होणार नव्हते.
आणि सुदीप...
...तो आपल्याच मिजाशीत 'डी 'विंग मध्ये घुसला... मगाच पेक्षा विंग जरा जास्तचं शांत आणि भेसूर होती . तो एक -एक मजला पुढे चढत होता.... त्याला सारखं मागून कुणीतरी आल्यासारखं वाटत होतं. नाही म्हणता त्याला आता थोडीशी भीती वाटू लागली. कपाळावर घाम जमा होऊ लागला. पण त्याला बेट हरायची नव्हती... अचानक त्याच्या लक्षात आलं की ग्राऊण्ड फ्लोर वर लेलेंच्या घराला कुलूप आहे.
.. " पण मगाशी आपण सगळे आलो होतो तेव्हा तर नव्हतं??? एवढ्यात कुठे गेले हे??.. की मला ते कुलूप असल्याचा भ्रम झाला???... छोड यार .. ''असा स्वतःच्याच विचारात, शेवटचा मजला चढून तो बंद गच्चीपाशी पोहोचला. . " एवढेसे मजले चढायला मला इतका का वेळ लागला?? असं वाटतंय की मी कधीपासून चढतोय !!!किती वेळ गेलाय कुणास ठाऊक..? "
... अचानक त्याला तहान लागली. घसा सुकल्यासारखा होतं होता.
".. इथेच brandy आणायला पाहिजे होती. .. काय यार.. ''.. असे म्हणतं त्याने खिशातून चाव्यांचा जुडगा बाहेर काढला. त्याला हवी असलेली चावी शोधणे काही इतके अवघड नव्हते. वापरात नसलेली, थोडीशी गंजलेली चावी त्याने कुलूपाला लावली. ... कुलूप लगेच उघडले. गंजलेल्या दाराच्या किरकिरणाऱ्या आवाजात कुणाचेतरी अस्फुटससं रडणं मिसळल्याचा भास त्याला झाला आणि तो दचकला. तरीही त्याने गच्चीत पाऊल ठेवले...
योगायोगाने आजही अमावास्या होती...तीच अवसेची रात्र... तोच मिट्ट काळोख...सगळं आपल्यात सामावून घेणारा अंधार... आत... बाहेर सगळीकडे अंधार... अखंड..अनादि..अनंत... !!!.कुठून सुरू झाला माहीत नाही.. कुठे संपणार माहित नाही.. कृष्णविवरासारखा...ज्यात एकदा पाऊल ठेवलं की कधीच बाहेर पडता येतं नाही... !!
अचानक त्याचा मोबाईल स्विच ऑफ झाला. त्याची भीती थोडीशी वाढू लागली....आजूबाजूला काहीच दिसत नव्हते... अंधार त्याला काही करू देतं नव्हता...तो अंधारात चाचपडू लागला.... आणि कशाला तरी अडखळून पडला. ..
ते काय होतं हे त्याने हात लावून पहाण्याचा प्रयन्त केला.. आणि काही कळायच्या आत एक रक्त गोठवणारी भयंकर किंकाळी त्या गुढं शांततेचा भंग करतं कणाकणात रुतून बसली. ..जणु जवळच असलेल्या झाडीतून कुठलंसं एखादं जंगली श्वापद ओरडल्यागत वाटावं... !!
त्याचा हात एका थंड कलेवरावरून फिरत होता... तो कसातरी उभा राहिला. जीव मुठीत घेऊन मिळेल त्या दिशेला धावत सुटला.. कसातरी एक मजला उतरून खाली येतं असता जिन्यामध्ये अचानक त्याचा टी-शर्ट कुणीतरी खेचल्यासारखं त्याला वाटलं.. मागे बघण्याची त्याची हिंमत होतं नव्हती.. त्याचं पूर्ण शरीर घामाने डबडबलं होतं... सर्वांग थरथरत होतं.. पाय जणू दलदलीत रुतल्यासारखे थबकले होते..
...अंधाराच्या त्या विहिरीत तो कुठेतरी आत आत खेचला जातं होता.. त्याची वर येण्याची सारी तडफड निष्फळ ठरतं होती... सगळ्या संवेदना बधीर झाल्या होत्या...हळूहळू त्याचे डोळे मिटू लागले.. डोळ्यासमोर अंधारी येऊ लागली... अचानक काही दिसेनासे झाले.. काही ऐकू येईनासे झाले... आणि... सारं एकदम शांत झालं... स्तब्ध झालं..
.. दुसऱ्या दिवशी 7 वाजताच सगळे पुन्हा टाकीपाशी जमले.. कुणीचं रात्री नीट झोपलं नव्हतं... सुदीपची वाट न बघता ते स्वतः त्याला बघायला त्याच्या घरी गेले.. घरं बंद होतं..आता गच्चीवर बघण्याशिवाय दुसरा उपाय नव्हता... सारे धावत 'डी' विंग कडे गेले.. सुदीप शेवटच्या मजल्यावरील दोन जिन्यांमध्ये अस्ताव्यस्त पडला होता.. कुणीच त्याला हात लावायला तयार होतं नव्हतं... आदित्यने फोन करून ऍम्ब्युलन्सला बोलावले... तो शुद्धीवर आला की त्याच्या घरच्यांना कळवायचे ठरले..
देवकृपेने तो जिवंत होता... परंतु किती तरी वेळ तसाच बेशुद्ध पडून होता.. हॉस्पिटलमध्ये काही तासांनंतर त्याला शुद्ध आली.. साऱ्यांना हायसं वाटलं.
"आता यापुढे प्लीज असले स्टंट्स करू नकोसं? नेत्राने त्याला समजावले..
पण तो काहीच बोलतं नव्हता. अजूनही तो शॉक मधून बाहेर आला नव्हता.
"काल रात्री जे घडलं ते एक वाईट स्वप्नं तर नव्हतं ना?? ते सारं खरं होतं की खोटं.?की तो सगळा एक आभास होता आणि ते पडलेलं काय होतं. कुणाचेतरी प्रेत की आणखी काही ... ओह गॉड..! हे काय होतंय माझ्याबरोबर... लेलें खरं सांगतं होते तर मग.. ! पण त्यांच्या घराला कुलूप का होतं..? विचार करकरून डोक्याचा पार भुगा व्हायची वेळ आलीये.. "...असं आपल्याच विचारात गढल्यामुळे कुणाच्याच बोलण्याकडे त्याचे लक्ष नव्हते.. अवनीने त्याला औषधं देण्यासाठी त्याच्या खांद्याला हात लावला.... त्या हलक्याशा स्पर्शाने सुद्धा तो एवढा दचकला की त्याच्या हातातला पाण्याचा ग्लास सुटून खाली पडला...
इतक्यात विशालचा फोन वाजला..."सुदीप आता ठीक आहे.. nothing serious... हं.. हं.. व्हॉट??? काय??? Ohh नो.. हे काय बोलताय तुम्ही...? कसं शक्य आहे हे...? मी नंतर बोलतो तुमच्याशी... बाबा.. ''
विशालचे जोरजोरात चाललेले बोलणे अणि त्याचा धक्का बसलेला चेहरा पाहून सारेच गोंधळून गेले. सारेच अस्वस्थ झाले...
"अरे काय झालं विशाल?? " आदित्यने न राहवून त्याला विचारलं..
ततंपपं करतं तो सांगू लागला.., "अरे.. यार बाबांचा फोन.. फोन..होता.. सु.. सुदीप ची चौकशी करायला.... पण ते सांगत होते की... की आपल्या बिल्डिंग मध्ये पोलीस आले होते... ते लेलें काका... आपण अरे... ते.. त्यांच्या कडे काल रात्रीच तर गेलो होतो... ते.. ते.. त्यांनी आत्महत्या केलीए...कदाचित काल सकाळपासून त्याचं प्रेतं 'डी ' विंगच्या गच्चीवर सडतं होतं... तुम्हाला कळतंय का...? This is horrible... unbelievable !!...अरे मग आपण काल रात्री कुणाशी बोललो... ohh गॉड यार... हे सगळं... अरे.. ohh नो नर्सला.. डॉक्टरला बोलवा लगेच.... सुदीप... are you ok ..??? "...
विशालचा भयांकित चेहरा बघून सगळे मागे वळले. त्याने जे सांगितले ते अजून कुणाच्याच मेंदू पर्यंत पोहचले नव्हते...
आणि एवढयात.. सुदीप...जो इतकावेळ त्यांचं बोलणं ऐकत होता...त्याला लेलेंचे शब्द आठवले- 'मृत्यू ठरवतो कोणाला आपल्याकडे खेचून आणायचं ते.... !!!' आणि त्याच्या छातीत एक जोरदार कळ उठली....

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

Thank you everyone Happy Happy सगळ्यांचे मनापासून आभार. Lol

छानेय आवडली.उत्कंठावर्धक होती. आमचही कॉलेजात फसलेला प्लांचेट प्रयोग आठवला. खरे खोटे माहीत नाही प्ण लागू नये त्या नादाला

Thank you all Happy Happy @ऋन्मेष : कथा काल्पनिक आहे. बापरे खरंच तुम्ही try केलें आहे का?

बापरे खरंच तुम्ही try केलें आहे का?
>>>>
हो
वाटीही हललेली. मग आम्ही घाबरलो आणि सोडले तिथेच. जे आलेले ते खरेच आलेले आणि गेले का की त्या हॉस्टेलच्या रूमवरच राहिले कल्पना नाही. टर्म संपलेलीच. आणि नवीन टर्मला रूम बदलली त्या मित्रांनी.

बाकी पुढचे काही दिवस काही अघटीत तर घडणार नाही ना या भितीने आम्ह सर्वांची फाटलेली.