जीवनात ही घडी

Submitted by ज्येष्ठागौरी on 28 June, 2020 - 02:29

जीवनात ही घडी.....

हे माझ्या आईचं लाडकं गाणं होतं आणि ती हे नेहमी कपड्यांच्या घड्या करताना म्हणायची.
खरचंच आमच्या भरपूर माणसं असलेल्या,भरपूर कपडे धुवायला टाकणाऱ्या घरात तिला खूप कपड्यांच्या घड्या करायला लागायच्या आणि ती त्या हे गाणं प्रामुख्यानं आणि इतर गाणी म्हणत करायची.गंमत अशी की वंशपरंपरागत गुण जसे झिरपतात तसे माझ्या मुलीत,माझा कपडे सारखे धुवायला टाकायचा गुण पाझरला आणि आईसारखं मलाही ते गाणं म्हणायची संधी यायला लागली.
आई घड्या छान घालायची, आजीच्या नऊवार साडीच्या सुबक निऱ्या करुन, साडीचा पदर त्या निऱ्यांभोवती खोचून ठेवायची.बापू पांघरुणाच्या घड्या अगदी हात फिरवून अगदी सपाट घालायचे.पंचा किंवा टॉवेल वाळत घालताना टोकाला टोकं जुळवून घालायचे.
शिशुविहारमध्ये स्वतः च्या रुमालाची घडी घालायला शिकवायचे.त्यावरुन आठवलं की आमच्याकडे कल्पना यायची काम करायला,अगदी छोटीशी ,बारीक ,चेहऱ्यावर काही भाव नसणारी मुलगी.तिला नवऱ्यानी सतत कानावर मारल्यामुळे ऐकायला थोडं कमी यायचं,त्यामुळे बोलायची अगदी कमी.तोपर्यंत आई गुडघेदुखीमुळे वॉकर घेऊन चालायला लागली होती .कल्पनाच्या चेहऱ्यावर एक विराण भाव असायचा कायम पण आईशी तिचं जमायचं.नवऱ्यानं सोडून दिलं होतं तिला दोन मुलांसकट, भावाकडे राहायची.तिला स्वयंपाकात वगैरे रस नव्हता, तिला काय काम द्यायचं म्हणून आईनी कपड्यांच्या घड्या करायचं काम दिलं.ते करताना मात्र कल्पनाचा चेहरा बघण्यासारखा व्हायचा.मन लावून ती अगदी घट्ट छोट्या घड्या घालायची कपड्यांच्या.त्या घड्या अगदी घट्ट असायच्या मग ती त्या कपाटात घट्ट लावायची.एखादा कपडा सापडला नाही की आई हाक मारुन विचारायची तर ती "हा काय"असं म्हणून हजर करायची.त्या वेळेला तिच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद आणि काहीतरी केल्याचं समाधान असायचं,एरवी ती अगदी असून नसल्यातली होती. आयुष्याची पूर्ण घडी विस्कटलेल्या कल्पनाला दुसऱ्यांच्या कपड्यांच्या घड्या करताना विलक्षण आनंद मिळायचा.नंतर तिनं आमचं काम सोडलं,त्याचं कारण तिच्या घरचा फुलांचा व्यवसाय होता(कल्पनाच्या भाषेत वोवण्याचा)त्यात तिची मदत लागणार होती,पण जाताना आईच्या पायावर डोकं ठेवून गेली आणि सांगून गेली मला कधीही बोलवा,तुमचे कपडे आवरुन देईन.
माझ्याकडे ज्या मावशी होत्या त्या स्वयंपाकासाठी बोलावल्या होत्या पण ते काम जरा कमी जमायचं हे लक्षात आल्यावर त्यांना वरकाम दिलं, पण कपड्यांच्या घड्या अगदी कशातरीच घालायच्या,चक्क गुंडाळल्यासारख्या.मग नकोच म्हणावं लागलं मला.
मला कपडे घडी करणं आवडायला लागलं ,मुलं अगदी लहान होती तेंव्हा,त्यांचे छोटे कपडे अगदी इस्त्री केल्यासारख्या घड्या घालताना मला एक वेगळ्या प्रकारचं समाधान मिळायला लागलं.हळुहळू तो रोजच्या दैनंदिन कामाचा भाग व्हायला लागला.साहजिकच जी गोष्ट आपल्या रोजच्या कामाचा भाग होऊन जाते त्यातलं सौन्दर्य आपण ओसरुन जातं.अशात मी मेरी कोंडोचे व्हिडीओ बघितले.ती कपडे कसे घडी करायचे याचं शास्त्रशुद्ध शिक्षण देते. कुठलाही म्हणजे कितीही लहान अथवा मोठा कपडा तीन घड्यांमद्धे कसे दुमडायचे आणि त्यानंतर तो कपडा अक्षरशः उभा राहतो आणि verticaly ठेवता येतो, चांगला राहतो आणि कमी जागेत खूप कपडे मावतात अशी बरीच तंत्रं ती शिकवते.या सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे ती कपड्यांवर हात फिरवायला सांगते.त्यातून आपण एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा कपडे घालणाऱ्याला देत असतो आणि सजीव नसणाऱ्या कपड्यांप्रती एक कृतज्ञता व्यक्त होते असं मेरी कोंडोचं मत आहे. मग जरा स्वतःकडे पाहिलं,घड्या घालायला आवडणारे आपण फारच टाकणं टाकतोय असं वाटायला लागलं.परत मन जागेवर आणलं आणि परत एकदा कपडे घड्या करण्याचा आनंद यायला लागला.मला धुतलेल्या कपड्यांचा चुरचुरीत स्पर्श आणि वास खूप आवडतो.आणि नीट बघितलं तर आजूबाजूला बरीच मंडळी असतात ज्यांना माझ्यासारखा नाद आहे.माझा मित्र अतुल खूप छान घट्ट घड्या करतो असं त्याची बायको अरुंधती कौतुकानं सांगते,सुनीताबाई देशपांडे यांच्या लेखातून वसंतराव देशपांडे कपड्यांच्या छोट्या छान घड्या घालायचे असा उल्लेख आहे.किती छान!काही लोकांना हे काम हलकं वाटलं तर वाटू दे बापुडं, मला आपलं छान वाटतं.आवडतं.एक सहज आनंद देणारा प्रकार आहे हा.हॉटेलमध्ये गेलं की आधी मला तिथले घड्या घातलेले टॉवेल, नॅपकिन नजरेस पडतात.
एकंदर घडी घालणे आणि घडी बसणे हा मोठा कार्यक्रम असतो. आयुष्याच्या सुरुवातीला शिक्षण, नोकरी,लग्न,घर मुलं ही चाकोरी असू देत किंवा नसू देत.घडी बसणं ही फार अवघड गोष्ट आहे.लग्न होऊन आलेल्या मुलीला तर सगळं नवीन.एकतर त्या घराची घडी बसलेली असते त्यात सामावून घ्यायचं किंवा नवीन घडी बसवायची असेल तर अनुभव कमी असतो.पण काळांतरानीं जमतं हळुहळू. काही गोष्टी नाही जमत,काही जमतात.पण एकंदर लय सापडते जगण्याची.अगदी सहज.अचानक.मग त्या लयीत शिस्तीत, घरादाराला एक ओळ मिळते.आयुष्य पुढे सरकत राहते.आर्थिक,भावनिक, शारीरिक अशा वेगवेगळ्या पातळ्यांवर घडी बसवावी लागते.घडी विस्कटली तर त्याचे परिणाम दूरगामी आणि खोल असतात.प्रगतीला आणि सुस्थितीला अडचणीत आणणारे असतात त्यामुळे घडीवर लक्ष ठेवावं लागतं आणि एक अंकुशही आणि त्यापलीकडे आपण एका विशिष्ट मर्यादेपर्यंतच हे करु शकतो ह्याची जाणीव ही असणं फार गरजेचं असतं.
काही अगदी घट्ट घडीची घरं असतात पण आमचं गावातलं घर हे जरा ऐसपैस मोकळ्या घडीचं घर होतं. ते ह्यामुळे की एकतर मोठं कुटुंब,खूप येणं जाणं, पै पाहुणे राबता असलेल्या घरात शिस्तीच्या चौकटी लावणं मुशकील होतं. आईचा दिवस अगदी लांबच लांब असायचा.लवकर उठणाऱ्या बापूंपासून ते उशीरा झोपणाऱ्या माझ्या भावापर्यंत ,मोहनपर्यंत तो प्रवाही असायचा.तिला कुठलीही गोष्ट ठरवून करता यायची नाही,म्हणजे आज संध्याकाळी फक्त खिचडी कधी करुन लवकर आवरावं असं ठरवलं की त्यादिवशी कोणीतरी जेवायला यायचं.पण म्हणूनच त्या घराला एक वेगळीच गोड घडी होती.अगदी आपलं वाटणारी माणसं आणि घर हे त्या घडीची खासियत होती.रोज नवी माणसं, रोज नवी परिस्थिती.सकाळी दहा वाजेपर्यंत आई सतत चहा करत असायची,बापूंना भेटायला येणाऱ्या माणसांसाठी.एका बाजूला सकाळचं खाणं, कोणाचे डबे,कोणाचं पथ्य,कोणाची आवड,कोणाचे हट्ट हे सगळं सांभाळताना तिची स्वतःची घडी अशी नसायचीच, दुपारचा वेळ तिचा,निवांत तिच्यासाठीचा,वाचनाचा असायचा, तो तिच्या घडीचं भाग होता.
बाकीच्यांच्या घड्या सांभाळताना तिची घडी तिला बसवता आली नाही.तिला शिकायचं होतं, शिकवायचं होतं, पण आमच्या घरातल्या घमासाणात, त्या वेळच्या समाजाच्या विचारांमध्ये ते वाहून गेलं, तिला त्याचं वैषम्य नव्हतं पण कधीतरी थोडं वाईट वाटायचं.फक्त ह्याचा परिपाक म्हणून तिनं आम्हा सगळ्यांना आमच्या घड्या बसवताना, वसवताना पाहिजे ती आणि तेवढी मदत केली.पण ही कथा नवीन नाही आपल्याला.
खूप शिस्त नसेल शक्य पण एकमेकांच्यात मधुर असं बंध होता.तरीही त्यामागे कोणाचा तरी त्याग होताच.असो.पण घडी म्हणजे फक्त शिस्त थोडीच असते.घडी असते ती एखादी गोष्ट सुचारु पध्द्तीनं चालण्यासाठी.काही घरांमध्ये आपल्याला विनाकारण आक्रसल्यासारखं होतं आणि काही घरी अगदी पाय पसरावेसे वाटतात, अगदी खळखळून हसण्याचे आवाज येत असतात. पदार्थांचा फन्ना पडत असतो. सगळे मिळून काम वाटून घेतात ,संपवून टाकतात,बारीक सारीक कुरबुरी एकमेकांचा विचार करून मागे टाकल्या जातात,तिथे घडी नीट बसते. नवीन व्यक्ती सामावली जाते.
घडी बसवणारा माणूस हा खंबीर लागतो,त्याची कुटुंबावरची पकड घट्ट लागते,कुठल्यातरी वेगळ्याच ध्येयानी तो वावरत असतो आणि मग त्या आजूबाजूचे आपोआप त्या चक्रात ओढले जातात.कधी कधी मात्र या माणसाच्या घडी बसविण्याच्या रीतीनं दुसऱ्यांच्या घड्या विस्कटतात.कधी कधी मात्र घडी बसता बसत नाही किंवा अगदी आपल्या मनाप्रमाणे बसत नाही.कधी बसलेली एकदम बिघडून जाते ह्यात सगळ्यात एक गोष्ट महत्वाची म्हणजे law of impermance, "अनिश्च"
पण तरीही बहुतेक सगळ्यांना बसलेली घडी आवडते, आपल्या comfort zone चा भाग असतो तो.घडी कधी कधी कुंपण म्हणून काम करते कधी अगदी अदृश्य सीमरेखा म्हणूनपण.कुटुंबाच्या एका घडीच्या आता त्यातल्या व्यक्तींची स्वतःची अशी एक वेगवेगळी आणि भिन्न अशी घडी असते.तिचं खाजगीपण जपावं लागतं आणि वाढ होऊ द्यावी लागते,ती विस्कटतीये असं वाटलं तर ती सावरावी लागते.
एखाद्यानं विचारलं की काय चाललंय,आपण म्हणतो काही नाही नेहमीच रुटीन! हे रुटीन म्हणजे खरंतर सुरळीत चाललेली ,फार बदल नसलेली घडी असते.पण आपल्याला त्याचा कंटाळा येतो हे अगदी आश्चर्य आहे.
नात्यांमध्ये विस्कटलेल्या घड्या परत सरळ करणं आणखी अवघड,त्यामुळे त्या विस्कटण्याआधीच सांभाळाव्या लागतात हेच खरं.
परिवर्तन खूप होत असतात , कधी सौम्य,कधी रुद्र पण बदल ही एकच स्थिर गोष्ट असल्यानं त्याचा अनिश्चितपणा समजून घ्यायला हवाच हवा.
आयुष्याच्या घडीबद्दल विचार करताना, गुलजारांची ती कविता आठवलीच अपरिहार्यपणे
मुझको भी तरकीब सिखा कोई यार जुलाहे 
अक्सर तुझको देखा है कि ताना बुनते 
जब कोई तागा टूट गया या ख़तम हुआ 
फिर से बाँध के 
और सिरा कोई जोड़ के उसमें 
आगे बुनने लगते हो 
तेरे इस ताने में लेकिन 
इक भी गाँठ गिरह बुनतर की
देख नहीं सकता है कोई 
मैंने तो इक बार बुना था एक ही रिश्ता 
लेकिन उसकी सारी गिरहें 
साफ़ नज़र आती हैं मेरे यार जुलाहे।
त्याच परम शक्तीनं, आपल्या आयुष्याची घडी घालूनंच आपल्याला पाठवलं आहे मग चिंता कसली, काळजी कसली,
आणि जेंव्हा ह्या विश्वाची लय बिघडते,घडी बिघडते तेंव्हा ती घडी परत एकदा घालायला, सावरायला,बसवायला, धर्म संस्थापनार्थ "तो "येतो! युगे युगे!
ज्येष्ठागौरी

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहलय. फक्त वाळलेल्या कपड्यांच्या घड्याच न्हवे तर माझी आज्जी सांगायची दोरिवर वाळत घालणारा कपडा देखिल असा वाळत घालायचा की त्याला ईस्त्री करायची गरज नाही पडली पाहिजे. कपड्यावर एकही चुनी यायला नको. एवढेच न्हवे , एका कपड्याचा गळा ज्या बाजूला असेल बाकी कपड्यांचे गळे पण त्याच बाजूला वाळत घालायचे. उलट सुलट कसेही वाळत घालायचे नाहीत. एका रांगेत त्याच प्रकाराचे कपडे.
ही सवय ईतकी अंग्वळणी पडली की कधी कधी नवर्‍याने अथवा मुलाने कपडे वाळत घातले की त्यांना माझे बोल ऐकावे लागतात. Wink

नेहेमीप्रमाणे छान Happy ...कपड्याच्या छोट्या छोट्या व्यवस्थित घड्या घालत सिनेमा पहाणे मला फार रिलँक्सिंग वाटते.

मला घड्या करायला आवडत असल्या तरी बाकी अनंत कामांमुळे हे काम म्हणजे व्याप होतो कधीकधी. पण कपडे वाळत घालायचं काम मी अगदी नेटकं करतेच. अहानपणापासून धुणं वाळत घालायच्या काठीने उंच दोर्‍यांवर कपडे वाळत घालणं आणि वाळलेले कपडे खाली घेणं अगदी सरावाचं होतं. पण कधीही कपडे वेडेवाकडे वाळत घातलेत असं नाही झालं. टोकाला टोकं जुळवूनच लागतात. आणि पूर्वी सकाळ्च्या शाळा, आईची शाळेची गडबड, बाबांची बाहेर पडायची घाई यामुळे कप्ड्यांच्या वाळतही घालायच्या जागा अगदी पक्क्या ठरलेल्या होत्या. पहाटेच्या वेळी नाईटलॅम्पच्या मिणमिणत्या उजेडतही नेमके कपडे काठीने खाली घेता येत.
अशा शिस्तीच्या सवयीमुळे पंचाईत अशी झाली आहे आता की कामाच्या बाईंनी केलेलं हे काम पटतच नाही. सध्या कामाला कोणीच येत नाही हा भाग वेगळा, पण कसेतरी लोंबकळणारे, जीव टांगणीला लागल्यागत दिसणारे कपडे बघवतच नाहेत!

बाकी दिवसभराच्या रूटिनची म्हणजे स्वतःच्या कामाच्या वेळेची घडी मात्र नीट बसत नाही.

मी पहिल्यांदा टॉवेल वगैरे फक्त दांडीवर अडकवायचे निदान पसरवून ठेवायचा प्रयत्न करायचे.लग्नानंतर गावी गेले असता तिथल्या दांड्या फार उंच असल्याने टॉवेल वेडावाकडा वाळत टाकला.नंतर माझे दीर गप्पा मारायला तिथे आले अस्ता त्यांना ते खटकायला लागले.मुकाट्याने उठून त्यांनी टोकावर टोक असा टॉवेल वाळात घातला. नंतर मलाही तशीच सवय लागली.पण अशी काही फार वेळ आली नाही.कामवालीचे वाळत घातलेले कपडे पाहून तिला नीट टाकायला सांगितले.आताच्या काळात नवरा घालतो,तोही अगदी टोकं जुळवूनच.
मेरी कोंडोच्या नुसार मीही बाहेर जायच्या कपड्यांच्या घड्या घालते.इतकेच कशाला ,हल्ली नवराही बरेचदा घरातल्या कपड्यांच्या तशा घड्या घालतो.

लेख छान आहे पण कपडे वाळत घालणं आणि वाळलेल्या कपड्यांच्या घड्या घालणं हे माझ्या आवडत्या कामात येत नाही त्यामुळे फार रिलेट नाही करता आलं! अर्थात हे काम म्हणून मी जितकं नीटपणे करता येईल तितकं करते म्हणा. But it is not my favorite chore.

लेख नुसत्या घडी घालण्याबद्दल नाहीये तर 'घडी' बद्दल आहे,जिज्ञासा तुला relate झालं नाही तरी लेख आवडला हे वाचून छान वाटलं,बाकी सगळ्यांना धन्यवाद..

खूप छान घडी बद्दलचे विचार. लहानपणी ईस्त्रीवाल्याच्या दुकानासमोर उभा राहून कपडे घडी घालायचे पाहून पाहून घरी ईस्त्री आल्यावर मला मिळालेली शाबासकी आठवली. गावी आजीने गोधडीच्या वेड्यावाकड्या घडीवरून मारलेले आठवले परंतु त्यांनतर खूप सुधारणा झाली आणि चांगली सवय लागली ती अजूनही कायम आहे.