'बदलता संधिकाल आणि संवेदना'

Submitted by आर्ट आर्च on 26 June, 2020 - 07:27

दिवसभराच्या प्रवासाने थकलेला सूर्य समुद्रात निवला. तुळशी वृंदावनात तिनं दिवा लावला. वा-याच्या लयीत त्याची ज्योत डोलत असली तरी स्थिरतेच्या समेवर ती परतत होती. कातरवेळेच्या कात्रीत सापडलेल्या मनाला प्रकाशाची जितकी गरज होती तितकीच ती तेवत होती. मंदपणे पण ठामपणे. तिचा ठामपणा बोचरा नव्हता तर आधार देणारा होता, स्निग्ध होता. कुठे कुणी दूरवर सायंराग आळवत होतं. ओसरीतल्या शुभंकरोती, पाढे परवचांच्या नादात तिच्या पैंजणांचा आवाज मिसळून गेला होता.
सूर्याची पाठ वळताच अंधाराचं साम्राज्य पसरलं तर खरं पण दिव्यांच्या लखलखाटानं तो अंधार कधी जाणवू दिलाच नाही. फाॅल्स सिलिंगमधल्या फिटेड लाइटच्या प्रकाशात देवघरात क्वचित तेवणा-या ज्योतीत तीच स्निग्धता अजून असेलही तशीच. पण तिच्या आधाराची गरज असूनही ती जाणवण्याची संवेदनशीलता मात्र विझली आहे. ए.सी. चा वारा तिच्याशी हितगुज करत नाही, ती पात्रताच नाही त्याच्यात. चहू दिशांतून हाॅर्नचे, कुकरच्या शिट्ट्यांचे, टी.ह्वी. चे अगणित आवाज बंद खिडकीवर आदळत होते. एकाच पायातलं बिनआवाजाचं अॅन्कलेट तिला टोचत होतं. हातातला वाइनचा ग्लास बाजूला ठेवत तिनं ते उतरवून ठेवलं.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आवडले. आधुनिकतेत, काहीतरी निसटणारे पुर्वापार व आदिम असे, चिमटीत धरण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे.