शाश्वत विकास म्हणजे काय? -भाग ३.२

Submitted by जिज्ञासा on 26 June, 2020 - 06:38

पहिल्या भागाचा दुवा: https://www.maayboli.com/node/75247
दुसऱ्या भागाचा दुवा: https://www.maayboli.com/node/75248
भाग ३.१ चा दुवा: https://www.maayboli.com/node/75249
डिस्क्लेमर - सध्याची परिस्थिती अत्यंत वेगळी आहे. या लेखात सुचवलेले सगळे उपाय आत्ता लागू पडतीलच असे नाही. सर्वांनी प्रथम आरोग्याची काळजी घ्या.

मी पहिल्या लेखात लिहिलं होतं की दोन मुख्य प्रश्न जे सर्वाधिक महत्वाचे आहेत - एक म्हणजे संसाधनांचा प्रश्न आणि दुसरा म्हणजे उर्जेचा प्रश्न. आपल्या आधीच्या काही भागात आपण मुख्यतः नैसर्गिक संसाधनांच्या वापराविषयी बोललो. या भागात उर्जेविषयी काही गोष्टी जाणून घेऊ.

सूर्य हा सर्व उर्जेचा स्रोत आहे. पण आपल्याला म्हणजे प्राण्यांना सूर्याची उर्जा थेट वापरता येत नाही. झाडे आणि काही सूक्ष्मजीव सूर्याच्या उर्जेचे रूपांतर रासायनिक उर्जेत म्हणजे ग्लुकोज नावाच्या साखरेत करू शकतात. याशिवाय अणुउर्जा आणि जल आणि पवन उर्जा असे दुसरे उर्जेचे स्रोत आहेत. या सर्व स्त्रोतांचे आपापले फायदे तोटे आहेत.

सध्या आपण मुख्यत्वे खनिजतेलापासून मिळणाऱ्या उर्जेचा वापर करतो. याचा मुख्य फायदा हा की हा एक कमी entropy असलेला स्रोत आहे. ही एक मजेशीर आणि महत्वाची संकल्पना आहे. उर्जेच्या स्रोतातली काही उर्जा ही खर्च करताना वाया जाते. त्या वाया जाणाऱ्या उर्जेला entropy म्हणतात. ही वाया जाणारी उर्जा जितकी जास्त तितकी त्या स्रोताची क्षमता कमी आणि लागणारा वेळ जास्त. उदाहरणार्थ, मी एक किलोमीटर चालत गेले तर मला स्कुटरपेक्षा जास्ती वेळ लागेल कारण माझी शारीरिक उर्जा ही पेट्रोलच्या तुलनेत अधिक entropy असलेला स्रोत आहे.

आता दुसरा मुद्दा प्रदूषणाचा - विचार केला तर आपल्याला असे लक्षात येईल की बहुतेक कमी entropy असलेले स्रोत हे अधिक प्रदूषण करणारे असतात. शिवाय एका स्रोतामधून दुसऱ्या स्रोतात उर्जेचे रूपांतर केले तर काही उर्जा वाया जाते. जरी विजेवर चालणाऱ्या वस्तू थेट प्रदूषण करत नसल्या तरी वीज बनवण्यासाठी कोणत्या तरी प्रकारचे प्रदूषण घडत असते. दगडी कोळसा जाळून, किंवा सोलर पॅनल किंवा पवनचक्की बनवण्यासाठी लागणारी सामग्री गोळा करताना प्रदूषण होतच असते. यातील बहुतेक स्रोत हे खनिजतेलापासून बनत असल्यामुळे ते वापरताना कार्बनडायऑक्साईड तयार होतो ज्याने वातावरणात तपमानवाढ होते. यात आपण अणुउर्जेचा विचार करत नाहीयोत पण त्यातही प्रदूषण होते मात्र तपमानवाढ होत नाही. Radioactive waste तयार होते जे विषारी असते आणि सहज dispose करता येत नाही.

तिसरा मुद्दा renewable की non-renewable - खनिज तेलाचे साठे मर्यादित आहेत हे जरी खरं असलं तरी त्यामुळे होणाऱ्या प्रदूषणाकडे बघता त्याच्या वापरावर बंधनं येणं साहजिक आहे. याचा थोडा खोलात जाऊन विचार केला तर आपल्याला लक्षात येतं की आपण जमिनीत असलेलं खनिज तेल जाळून कार्बनचे चक्र फिरवतो आहोत. जमिनीत वस्तुरूपात असलेला कार्बन हा जाळल्यावर हवेत वायुरूपात राहतो. झाडांच्या मार्फत तो पुन्हा वस्तुरूपात येऊ शकतो देखील पण हे चक्र आपल्या गतीने फिरते. खनिज तेल निर्माण व्हायला लाखो वर्षे लागली. तो सर्व कार्बन जर आपण काहीशे वर्षात हवेत सोडला तर तो शोषून घेण्याची पृथ्वीची क्षमता नाही. इतक्या गरागरा चक्र फिरवले की ते कोलमडते. आज तसेच काहीसे होते आहे. शिवाय हवेतील वाढत्या कार्बनडायऑक्साईडमुळे पृथ्वीचे तपमान वाढून सर्व जीवसृष्टीला धोका निर्माण झाला आहे. बाकी वायुउर्जा आणि सौरउर्जा यांचे इतर तोटे आहेत. तेव्हा ऊर्जेचा कोणता स्रोत सर्वात चांगला याचे एक उत्तर नाही. त्यातल्या त्यात पाण्याला असलेल्या नैसर्गिक उताराचा वापर करून निर्माण केलेली जल उर्जा हा बऱ्यापैकी प्रदूषणमुक्त, renewable, आणि अधिक entropy असणारा उर्जेचा स्रोत आहे. पण ही उर्जा सर्वत्र उपलब्ध नाही आणि पुरेशी देखील नाही.

मग हा उर्जेचा प्रश्न सुटणार कसा? - त्यावर मुख्य उपाय म्हणजे उर्जेची एकूण गरज कमी करणे आणि दुसरा म्हणजे hydroocarbon-based economy च्या ऐवजी carbohydrate-based economy कडे वळणे. आता आपण हे उपाय थोडे विस्ताराने पाहू.

उर्जेची एकूण गरज कमी करणे - आपले गेल्या काही शतकातली प्रगती ही केवळ खनिज उर्जेच्या आधारावर झाली आहे. जशी प्रगती झाली तशी उर्जेची गरज वाढली आणि ती वाढतेच आहे! Efficiency नावाची एक संकल्पना उर्जेच्या क्षेत्रात वापरली जाते. पूर्वीच्या गाड्यांपेक्षा आजच्या गाड्या, किंवा एकूणच सर्व इंधनावर चालणारी यंत्रे ही अधिकाधिक efficient कशी होतील यावर भर दिला गेला आहे. त्यामुळे कमी उर्जेत अधिक परतावा मिळेल अशी कल्पना असते. पण तसं खरंच होतं का? जर पूर्वीच्या पेक्षा आजच्या यंत्रांची efficiency अनेक पटींनी वाढली असेल तर मग आपला उर्जेचा वापर कमी होण्याऐवजी वाढता कसा? या महत्वाच्या प्रश्नाचे उत्तर Jevons paradox या संकल्पनेत आहे. यात असे म्हटले आहे की जरी efficiency वाढल्यामुळे उर्जा कमी लागली तरी कमी लागणाऱ्या उर्जेमुळे मूळ वस्तूची मागणी वाढते आणि मग पर्यायाने अधिक उर्जा खर्च होऊ लागते. तेव्हा उर्जेची गरज कमी करायची असेल तर फक्त LED बसवून किंवा अधिक energy star असलेली उपकरणे घेऊन किंवा अधिक मायलेज देणारी गाडी घेऊन उपयोग नाही. आपला प्रत्यक्ष उर्जेचा वापर कमी व्हायला हवा. यासाठी अनेक उपाय आहेत. बरेचसे आपल्याला माहिती असलेले उपाय आहेत.
शक्य तिथे चालत जाणे किंवा सायकलने जाणे, शक्यतो सार्वजनिक वाहनाने प्रवास, गाडीने जाताना एकापेक्षा अधिक जणांनी मिळून जाणे, गरज नसताना गाडीचा वापर टाळणे, लिफ्ट ऐवजी जिना, घरात भरपूर नैसर्गिक उजेड, वायुविजन होईल येईल अशी रचना करणे, गरज नसेल तर उपकरणे बंद ठेवणे, शक्य असेल तेव्हा यंत्राऐवजी मानवी ऊर्जा वापरून काम करणे, सौरउर्जेचा थेट वापर - उदाहरणार्थ, कपडे उन्हात वाळवणे, भांडी उन्हात सुकवणे, उन्हाळ्यात एसीचे तपमान किमान २४ अंश सेल्सिअसच्या खाली न नेणे, उन्हाळ्यात (आणि शक्य असेल तर बाराही महिने) गार पाण्याने आंघोळ करणे, हिवाळ्यात फक्त हीटरचे तपमान न वाढवता अंगावर थराचे कपडे घालणे, सर्व उपकरणे नीट हाताळणे. आपलं विजेचं बिल किती येतं हे पाहून दरवर्षी त्या महिन्यात १०% बिल कमी येईल का असा एक challenge माझ्या एका ओळखीच्या व्यक्तीने घेतला होता आणि आता वर्षभर त्यांचा विजेचा वापर महिना १०० युनिट किंवा कमी होतो.

आपण जेव्हा उर्जेचा विचार करतो तेव्हा आपल्या समोर वापरली जाणारी उर्जा दिसते आणि तीच मोजली जाते. मात्र प्रत्यक्षात ती वस्तू/यंत्र बनवण्यासाठी देखील प्रचंड प्रमाणात उर्जा लागत असते. त्याला technical भाषेत embodied energy असे म्हणतात. आपल्या सध्याच्या अर्थव्यवस्थेत ही उर्जा मोजली जातेच असे नाही. उदा. जर तुमच्या कारचं average annual running 33 हजार किलोमीटर असेल तर ज्या क्षणी तुम्ही गाडी विकत घेता त्या क्षणी गाडी बनवण्यासाठी तुमच्या वार्षिक गाडीच्या प्रदुषणाच्या 10 ते 15 पट प्रदूषण गाडीत बसल्यावर तुमच्या खात्यावर जमा होतं. आणि जर तुमच्या गाडीचं रनिंग 3000 किलोमीटर च्या आसपास असेल तर 33 वर्षे 3000 किलोमीटर गाडी चालवण्यावर होणारं प्रदूषण तुम्ही गाडीत बसायच्या आधीच तुम्ही केलेलं असतं! हे आकडे फक्त एका गाडीच्या निर्मिती करण्याचे. जेव्हा ही गाडी निकामी होईल तेव्हा तिचे भाग सुटे करायला अजून उर्जा खर्च होते जी आपण मोजत नाहीओत.
आता हे आकडे आपल्याला कोणीही सांगत नाही. ही माहिती समजली तर प्रत्येक सुजाण नागरिक नवीन गाडी घेण्यापूर्वी अजून एकदा विचार करेल हे निश्चित!

Hydrocarbon economy to carbohydrate economy:
खनिज तेल हे मुख्यत्वे hydrocarbon चे बनलेले असते. ह्या खनिजतेलातल्या कार्बनची सायकल लाखो वर्षांची आहे. त्या ऐवजी कमी काळाच्या सायकलमधला कार्बन वापरता येईल का? तर मग असा कार्बन कोणता तर carbohydrates म्हणजे झाडे पण एक झाड वाढायला काही वर्षं लागतात मग त्याऐवजी गवत वापरता येईल का जे काही महिन्यात पुन्हा उगवतं? तर गवतापासून जैवइंधन बनवण्याचे काही प्रयोग सगळीकडे चालू आहेत. बायोगॅस च्या वापरामध्ये काही अडचणी असू शकतात. पण छोट्या प्रमाणावर तो वापरला जातो आहे. त्यानेही प्रदूषण होतं पण जमिनीतून खनिज तेल काढण्यासाठी आणि आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी जितकं होतं तितकं होत नाही.
सोलर पॅनेल्स मधून तयार होणारी सौरऊर्जा हा एक पर्याय आहे मात्र ते पॅनेल्स बनवण्यासाठी पृथ्वीवर पडणारा ताण आणि त्याच्या दुरुस्तीसाठी लागणारा खर्च, बॅटरी आणि तिच्यातली घातक घातक रसायने हे सर्व देखील लक्षात घेतले पाहिजे.

एकूण काय खनिजतेल एक ना एक दिवस संपून जाणार आहे. जे non renewable energy resources आहेत ते आपल्या आत्ताच्याच गरजा भागवायला अपुरे आहेत त्यामुळे भविष्यातल्या वाढीव गरजांना ते पुरे पडणार नाहीत. आपल्या उर्जावापरावर नियंत्रण ठेवणे हा एकच शाश्वत मार्ग सध्या उपलब्ध आहे.
अणुउर्जा हा एक असा पर्याय आहे ज्याबद्दल मी अजूनही चांगला की वाईट किंवा शाश्वत आहे की नाही हे ठरवू शकलेले नाही. जर कोणाला याविषयी माहिती असेल तर प्रतिसादात जरूर लिहा.

Jevon’s paradox वर आधारित एक लेख: https://www.newyorker.com/magazine/2010/12/20/the-efficiency-dilemma

उर्जा निर्मितीबद्दलचे अनेक गैरसमज दूर करणारी डॉक्युमेंटरी : The planet of the humans https://youtu.be/Zk11vI-7czE

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ही डॉक्युमेंटरी कसे सगळे रिन्युएबल एनर्जी रिसोर्स फॉसिल फ्युएल पेक्षाही बेकार आहेत हे वारंवार मनावर ठसवायचा प्रयत्न करते आणि कसे सगळे जण आपापला फायदा बघायला या क्षेत्रात उतरले आहेत हे ही सांगते. या जगात संत को-णी-ही नाही (झिरो एक्सेप्शन्स) यावर माझा ठाम विश्वास असल्याने मला कोणी फायदा बघितला तर चांगलंच वाटतं त्यातुन कमीत कमी हार्म होऊन नेट पॉझिटिव्ह काही होत असेल की झालं. तर ते एक असो.
यातील खटकलेल्या गोष्टी पुढील प्रमाणे:
१. हायड्रो इलेक्ट्रिसिटी जगात जवळ जवळ १७% वापरली जाते. त्याबद्द्ल चकार शब्द यात नाही. ती संपूर्ण क्लीन असावी सो त्यातील तोटे दाखवता आले नाहीत असं क्षणभर वाटून गेलं. अमेरिकेच्या पुनर्वापरयोग्य इंधनाच्या ५२% वाटा हा हायड्रोचा आहे. डॉक्युमेंटरी मुख्यतः अमेरिकेबद्दल आहे सो हे का वगळलं हे अजिबात आवडलं नाही. कोलोरॅडो नदी समुद्राला मिळत नाही असा एक उल्लेख विथ हुवर डॅम फोटो इतकंच आठवतंय मला.
२. सोलर एनर्जी: पॅनल्स तयार करायला सिलिकॉन आणि कोळसा लागतो. अर्थात कुठलाही इकेक्टॉनिक पार्ट तयार करायला हे लागतंच. आणि ते मिळवताना कार्बन फुटप्रिंट वाढतं. यात ओरेगॉन मधले साठे परत परत ब्लास्ट करताना दाखवण्या इतकं काही सनसनाटी होतं का? बरं पॅनल्सची एफिशियंसी वीस पंचवीस वर्षांपूर्वी जेवढी होती आणि आता जितकी आहे त्याची तुलना केली तर होणार्‍या प्रगतीची कल्पना येईल. (डोक्यु. ती ८% आहे सांगतं. विकीवर वाचल्यावर ती २० वर्षे जुनी माहिती आहे आणी आज ती १५ % आहे असं समजलं). फिअर मॉंगरिंग!
३. सौर उर्जा सूर्य असतानाच जास्त मिळते, तेव्हाच साधारण डीमांड जास्त असते. पण ढग आले इ. कारणाने पीक आवर मध्ये ती कमी होते. आणि लोड बॅलन्स करायला न्युक्लिअर/ थर्मल/ फॉफ्यु. प्लांट चालवावे लागतात. ते डायल ऑन/ ऑफ करण्यात थोडी उर्जा जास्त खर्च होते. पूर्ण आयडल ठेवता येत नाहीत. हे अत्यंत बेसिक कॉमन सेन्स ज्ञान आहे. हे रिव्हीलेशन झाल्यासारखं (मायनस एकता कपूर म्युझिक) दाखवलं. १००% फॉफ्यु जनरेट केली असती पेक्षा ढग आल्यावर करायला लागते आहे यात नेट निगेटिव्ह काही तरी करतोय. असं सतत फील देत सांगितलं गेलं. मगाशी एकता कपूर म्युझिक नाही म्हटलं.... पण बॅकग्राउंड स्कोरही माझ्या डोक्यात गेला.
४. बॅटरी स्टोरेज कपॅसिटी वाढवली तर सोलार स्टोअर करता येईल आणि लोड बॅल्न्सला वापरता येईल. त्यात नॅरेटर १/१० ऑफ १% फक्त बॅटरी आहे म्हणतो. हे ड्रॅमॅटिक म्हणून मस्त वाटतं. पण कशाचं % आहे हे गुलदस्त्यातच राहतं. जे डॉक्यु. कडुन तरी अपेक्षित नाही.
५. सोलार पॅनल्स खराब होतात, विंड टर्बाईन फ्यु डेकेड्सने बदलावे लागतात. ह्यात फ्यु डेकेड्स असे लूज शब्द प्रयोग वारंवार आहेत. ठोस माहिती समजत नाही. आणि कॉन्स्पिरसी वास येऊ लागतो. बरं विंड टर्बाईन करायला स्ट्रील इतर धातू लागणारच ना? काही तरी खर्च केल्याशिवाय काही मिळत नाही हा बेसिक नियम नाही का? मिळणं हे खर्चापेक्षा अधिक कसं करता येईल यावर प्रयत्न करायचा का काहीच खर्च न करता काय करता येईल यापासून सुरुवात करायची?
६. अ‍ॅपल १००% रिन्युएबल उर्जा वापरते. पण ती वापरायला जंगले तोडली. अरे!!!! जागा मिळवायला जंगले नाही तोडणार तर काय? या जगात कोण जंगले न तोडलेल्या जमिनीवर राहतो? आणि कोण पूर्वी जंगल नसलेल्या जमिनीत उगवलेले अन्न खातो??
७. वाळवंटात सोलार फार्म केली आहेत तर जॉश्वा ट्री तोडली. इ. इ. अरे पण जमीन मिळवायला काय केलेलं तुम्हाला चालणारे ? तर काहीच केलेलं नाही.
८. कॉमन अ‍ॅक्टिव्हिस्टची टर उडवणे. त्यांना बायोमास बद्दल काहीच कसं माहित नाही, किंवा काहीच व्हू कसा नाही याची टर उडवणे ही खटकले. हे पॉझिटिव्ह अंगाने आलं असतं तर आवडलं असतं.
९. बाकी दोन तीन क्लायमॅट इव्हेंट्सना सोलार पॅनल बरोबर बॅकप म्हणून फॉफ्यु. असणं हे ही असंच एकदम शोध पत्रकारिता स्टाईल पर्दाफार्श. हो! सोलार १००% रिलायबल नाही. जागा/ # पॅनल्स जास्त लागतात. हे मला वाटतं सगळे जाणतात.
१०. लाकुड जाळणे, फॉफ्यु. जाळणे, सोलार वापरणे, विंड वापरणे, (न्युक्लिअर आणि हायड्रो बद्दल चकार शब्द नाही) बायोमास वापरणे हे सगळं बेक्कार आहे. मग वापरायचं काय?? तर बियाँड सस्टेनेबिलिटी बघा. टेक कंट्रोल ऑव मूव्हमेंट, CO2 प्रॉब्लेम नाहीये तर मानव जात प्रॉब्लेम आहे इ. इ. हे आपलं बुवाबाजी प्रवचन वाटू लागलं ना मला!
११. फोर्ड (का शेवी?) च्या इव्ही लाँचच्या वेळेला मिशिगन मध्ये इलेक्ट्रिसिटी मोस्टली (त्यातही टक्केवारी भयानक चुकलेली आहे हे नंतर वाचुन समजलं) फॉफ्यु. मधुन येते हे त्या मॅनेजरला माहित न्हवतं हे दाखवुन काय साधलं? त्या गाड्या काय फक्त मिशिगन मध्ये चालतात का? ओंटारिओ किंवा कॅली मध्ये विकायला बंदी आहे का? अत्यंत आजतक स्टाईल प्रश्न आणि कन्विनियंट तेवढेच स्निपेट दाखवणे!

लोकसंख्या दर कमी करा, हा एक उपाय सुचवलेला दिसला. हो तत्त्वतः मान्यच. पण हा एक आणि एकच उपाय डोळ्यासमोर धरुन चाललं तर संपलंच मग सगळं.
बाकी काहीच बोलत नाही डॉक्यु.. मला तरी यावर काय उपाय (अगदी उपाय नको पण ढोबळ दिशा तरी) यावर काही तरी भाष्य अपेक्षित होतं. पण एक दुर्दैवी माकडाचा अंत दाखवण्यात फुटेज वापरलं. असे अनेक क्लिशे प्रसंग, टिपिकल इमेजेस ह्या अनेकोनेक दिसतात. त्या टाळायला हव्या होत्या.

बरीचशी उर्जा अल गोर, ओबामा, कोक बदर्स, ३६०, आणि अनेक अ‍ॅक्टिव्हिस्ट कंपन्या कशा मार्केट कंट्रोल करत आहेत. कसे पैसे मिळवायला धंदा करत आहेत यावरच फोकस. बिल गेट्स च्या रिवर्स कार्बन जनरेशन वर काही दिसलं नाही.
माझी निराशा झाली. फार नवीन काहीच हाती लागलं नाही, आणि सगळंच कसं बेक्कार आहे हेच दिसलं. वेळ टळुन गेली आहे हे खरंच. पण मग नुसतं अवेअर करायचं असेल तर मग ते आहेच. असो.

आत्ता तरी जे आठवलं/ मनात राहिलं ते लिहिलंय. आणखी आठवलं तर मग लिहितो.

Submitted by अमितव on 26 June, 2020 - 06:50
In an ideal scenario, locally-sourced fuel is far more sustainable than getting natural gas by fracking and transporting it thousands of miles under pressure. पण सध्याची सिस्टीम एका दिवसात बदलू शकत नाही आणि पारंपारिक चुलीचे तोटे भरपूर आहेत. भारतात स्वदेशी इंधन या कल्पनेचा खूप विस्तार व्हायला हवा. उज्ज्वला योजना हा तात्पुरते उपाय आहे शाश्वत उपाय हा स्थानिक पातळीवर इंधन स्वयंपूर्णता आणणे हा आहे.>>>>
अगदी पर्फेक्ट लिहिलत तुम्ही जिज्ञासा.

वरती बरेचजणांनी लिहिलय कि चुलं हे नाईलाजास्तव खेड्यात वगैरे केल जात. असच काही नाही आहे. रिसायकलिंग हा एक महत्वाचा फॅक्टर इथे विसरला जातो आहे. शेतकरी घरामध्ये चिप्पाड, वाळलेला कडबा (जनावरांना घलून उरलेला) , शेंगा वगैरेची साल,इत्यादी भरपुर शिल्लक असते. अगदी सोलाण्याचा शेंगाची टरफल, उडदाच्या शेंगाची टरफल, मिरच्यांची देठ वगैरे सुद्धा टाकली जात नाहीत. फक्त उस उत्पादक शेतकरी सुद्धा एक एकरभर उसाच्या वाळलेल्या मुळ वापरून बरेच माहिने स्वयंपाक करू शकतात.
बरेचदा हे संपविण्यासाठी गॅस असुनही चुलीचा वापर केला जातो. थोडक्यात हे बाय प्रोडक्टस वाया न जाऊ देण्याची धडपड असते अगदी सधन शेतकर्‍याच्या घरातही. त्यामुळ चुल म्हणजे नाईलाजास्त्वच केली जाणारी गोष्ट आहे अस नाही.
रिसायक्लिंग , प्रदुषण यात आता नेमक काय योग्य हे ठरवण कठिण आहे.

Submitted by सीमा on 26 June, 2020 - 06:50

अमितव, मला माहीती नाही की या डॉक्युमेंटरी कडून तुझ्या काय अपेक्षा होत्या. पण ही सर्वसामान्य प्रेक्षकांना प्रश्नाची जाणीव व्हावी म्हणून बनवलेली डॉक्युमेंटरी आहे जी पर्यावरण दिनी रिलीज केली. तपशीलातल्या चुकांची शहानिशा करायला मलाही अधिक वाचायला लागेल.
माझ्या मते ग्रीन एनर्जी ही कशी ग्रीन नाही आणि कदाचित काही वेळा पारंपरिक उर्जा स्रोतापेक्षा पर्यावरणासाठी अधिक घातक ठरू शकते याची जाणीव करून देणे हा या डॉक्युमेंटरी चा मुख्य उद्देश असावा आणि तो बऱ्यापैकी साध्य झालेला आहे.
जलउर्जा ही खरी ग्रीन उर्जा आहे. अर्थात त्यासाठी तुम्ही शक्य तितक्या नैसर्गिक पद्धतीने तिचा वापर केला पाहिजे. मोठ्या धरणांचे दीर्घकालीन तोटे भरपूर आहेत आणि तशाप्रकारे जर जलविद्युत प्रकल्प चालवले जाणार असतील तर ते घातकच ठरतील.
लोकसंख्या कमी करणे हा एक उपाय आहेच पण जे बाकीचे उपाय आहेत तेही अवघडच असणार आहेत. To come to terms with the reality is the main thing. हाच खरा "अवेअरनेस" आहे. मला या साऱ्याची माहिती आहे या नोटवर अवेअरनेस संपत नाही तर तो सुरू होतो. आपण एका अशाश्वत विकासाच्या मॉडेलमध्ये जगतो आहोत. त्यातून बाहेर पडून एका शाश्वत विकासाचे मॉडेल आपल्याला तयार करायचे आहे. अशावेळी काही uncomfortable lifestyle changes आपल्याला सर्वांना अंगिकारावे लागतील.
कोणत्याही प्रश्नाच्या मुळाशी जाऊन तो प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणे (5 why's approach) आणि मग आपले trade offs निश्चित करणे यापासून सुरूवात करता येईल.
It is never easy to give up comforts but if you are convinced that you will benefit from it then you can probably follow it through. हा मानसिकतेतला बदल बहुसंख्य लोकांना पटवून देणे हे सर्वात मोठे आव्हान आहे. एकदा आपण त्या जाणीवेने जगायला लागलो की बाकीचे बदल घडवणं तुलनेने सोपे जाईल.

Submitted by जिज्ञासा on 26 June, 2020 - 07:31

भरत आणि हर्पेन या दोघांनी प्रतिसादात सुचवल्याप्रमाणे माझे, अमितचे आणि सीमाचे उर्जा वापर या अनुषंगाने आलेले "चुलीवरचे जेवण ,गुळाचा चहा,घाण्याचे तेल ई. जुन्या गोष्टी पुन्हा का प्रसिद्ध होत आहेत ?" (https://www.maayboli.com/node/75216) या धाग्यावरचे प्रतिसाद इकडे कॉपीपेस्ट केले आहेत. जर काही हरकत असेल तर नक्की सांगा.
ह्या धाग्यावर आपल्याला सविस्तर चर्चा करता येईल.

बिल गेट्स च्या रिवर्स कार्बन जनरेशन वर काही दिसलं नाही. >> या विषयी कुठे वाचता येईल? इतक्यात मी बिल गेट्स या व्यक्तीविषयी फारसे बरे ऐकलेले नाही (संदर्भ डॉ. वंदना शिवा यांचे oneness versus one percent ह्या पुस्तकाच्या अनुषंगाने झालेली चर्चा. पुस्तक मी वाचलेलं नाही.) पण मी अजून न्युट्रल आहे.

अ‍ॅपल १००% रिन्युएबल उर्जा वापरते. पण ती वापरायला जंगले तोडली. अरे!!!! जागा मिळवायला जंगले नाही तोडणार तर काय? या जगात कोण जंगले न तोडलेल्या जमिनीवर राहतो? आणि कोण पूर्वी जंगल नसलेल्या जमिनीत उगवलेले अन्न खातो?? >> याने प्रश्न सुटला का? प्रदूषण कमी झाले का? तोडलेली जंगले उगवण्यासाठी काय उपाय केले आहेत अ‍ॅपलने?
या ऐवजी अधिक शाश्वत हे ठरले असते की अ‍ॅपलने आपली उर्जेची गरज क्ष टक्क्यांनी कमी केली. पण दुर्दैवाने तसे होताना दिसत नाही.

वाचतेय!
वर सीमाने लिहीले आहे तसे आमच्याकडे आजोळी नारळाच्या करवंट्या, नारळ सोलल्यावर निघणारी सालं(त्याचे नाव विसरले) , अगदी झावळ्यांतून झाडूसाठी हीर काढल्यावर उरलेले अवशेष, शेंगांची साले वगैरे जळणासाठी वापरले जात असे. घरच्या गायीम्हशीचे शेण आणि भाताचे तांदूळ केल्यावर होणारा तुसाचा ठीग यातून अगदी जास्तीची माणसं लावून गोवर्‍या करुन घेत. घरात गॅस असूनही हे सगळे चुलीसाठी वापरले जाई. घरात गीझर लावूनही पाणचूल देखील असे. पहिला चहा गॅसवर झाला की गडी चुली पेटवून देत मात्र पूर्ण ज्वलन नाही आणि त्यामुळे ते घातक हा वादाचा मुद्दा असे. घरातली वैद्यकीय व्यवसायातली मंडळी त्यावरुन ओरडत आणि बाकीचे वाया घालवायचे का म्हणून दुर्लक्ष करत. शेती, गाईम्हशी वगैरे बंद करेपर्यंत चुलीचा वापर होता.

तीर >>हीर
>> हो की! करते बदल. धन्यवाद चिडकू! माझं मराठी फारच बिघडत चाललयं!

सुंदर लेख.
माझा वरचा प्रतिसाद फक्त आणि फक्त त्या डॉक्युमेंटरी वर आहे. लेखावर नाही.
मी राहतो तिकडे ६०% ऊर्जा अणू इंधनातून, २६% जल, ७% वारा आणि २% सूर्यापासून तयार होते. उरलेली ३% कार्बन जाळून ( नॅचरल गॅस आणि बायोमास) तयार होते.
अणूऊर्जा चांगली की वाईट यावर मध्यंतरी वाचून ती फार चांगली नाही असं वाटलं होतं. पण ६०% ऊर्जा मिळवायला कार्बन जाळून ते अधिक वाईट असेल त्यामुळे अणू इंधन कार्बन न्युट्रल तरी नक्कीच ठरेल.
त्या डॉक्यु मध्ये जंगले पुन्हा वाढायला काही दशके लागतात असं होतं. हे एक स्टेटमेंट म्हणून ठीक असलं तरी परत संभ्रम निर्माण करणारं आहे. जंगले वाढवणे आणि त्यातील झाडे कापून चिप्स, पल्प करणे हा उद्योग आहे, आणि यात वापरली जाणारी झाडे २ ते ४ किंवा ६ ते ८ वर्षांत पूर्ण वाढतात असं मला वाचलेलं आठवते. याने जंगले मेन्टेन राहून वणवे कमी होतात हा एक म्हटलं तर फायदा.

डिस्क्लेमर: वणवे लागणं हे अत्यंत नैसर्गिक आहे. सध्या बरेच वणवे मानवनिर्मित कारणाने लागतात. Lol

70 % पृथ्वी चा पृष्ठभाग हा महासागर नी व्यापला आहे.
कार्बन चे शोषण झाडे करतात आणि वातावरणात कार्बन चे प्रमाण मेन्टेन करण्याचे काम करतात.
पण महासागरां ची भूमिका काय भूमिका असते कार्बन शोषून घेण्यात.
आणि दुसरा विचार हा की समुद्राच्या पाण्यात नेहमी लाटा उसळत असतात त्याचा वापर करून वीज निर्मिती होवू शकते का.
होत असेल तर माणसाला बाकी कोणत्याच ऊर्जा स्त्रोत वर अवलंबून राहण्याची गरज च नाही.
गरजेच्या वस्तू निर्माण करण्यासाठी ऊर्जा खर्च होण्याचे प्रमाण चैनी च्या वस्तू निर्माण होण्यासाठी लागणाऱ्या ऊर्जेच्या प्रमानाशी किती टक्के जास्त आहे.
माणूस जास्तीत जास्त भौतिक सुखाच्या अधीन गेलेला आहे त्या मुळे गरज नसलेल्या चैनी च्या वस्तू प्रचंड प्रमाणात निर्माण होत आहेत.
सक्ती नी चैनी ची वस्तू निर्मिती बंद करणे हा एक प्रभावी मार्ग आहे.

हीरा यांचा प्रतिसाद आणि त्या ला आलेली उत्तरे -
मानवाने निसर्गात ढवळाढवळ करून निसर्गाचे आणि स्वतः:चे अपरिमित नुकसान करून ठेवले आहे हे म्हणणे एका मर्यादेपर्यंतच खरे आहे. एक तर मानव हा निसर्गापासून वेगळा नाही. दुसरे म्हणजे मानवाव्यतिरिक्त उर्वरित निसर्गाकडूनही निसर्गाची हानी होत असते. साधी पानांची सळसळ झाली तरी ऊर्जा वापरली जाते किंवा transfer होते. कडे कोसळतात, नद्या आपले स्वतः:चे तट ओरबाडतात, त्यांच्या गाळामुळे खाड्या ओहरतात, बंदरे निकामी होतात, एक पूर्ण संस्कृती लयास जाते किंवा उदयास येते. Entropy of the world is increasing, irreversably. पण मानव जात ही अतिशय चिवट आहे tenacious आहे. बिकट आणि प्रतिकूल काळातही तगून राहते. इतकेच नव्हे तर सभोवतालानुसार स्वतः:मध्ये म्हणजे होमो सेपिअन्स ह्याच प्रजातीमध्ये किरकोळ बदल करीत राहून स्वतः:ची अमाप वंशवृद्धीदेखील करते. मैलोन मैल वाळवंट, प्रखर हिवाळा, एक मैल उंचीवर वास्तव्य अशा खडतर सभोवतालाशी मिळतेजुळते घेत स्वतः:ची आणि संस्कृतीची वाटचाल सुरू ठेवते. मानवाने स्वतः:ची वाढ एक्सपोनेन्शिअल ठेवूनही मालथूझिअन थिअरीला खोटे पाडीत अन्नाचीही ग्रोथ लिनीअर न होऊ देऊन एक्सपोनेनशिअल केली आहे. वितरण व्यवस्था आणि सुस्थित शासनव्यवस्था ह्या सध्याच्या तातडीच्या गरजा आहेत त्याकडे अधिक लक्ष दिल्यास डूम्स डे दूर दूर जात राहील.
हे वरचे लिखाण फार बाळबोध वाटेल कदाचित पण डूम्स डे ची फार चिंता करण्यात अर्थ नाही
Submitted by हीरा on 26 June, 2020 - 11:01

मानवाने स्वतः:ची वाढ एक्सपोनेन्शिअल ठेवूनही मालथूझिअन थिअरीला खोटे पाडीत अन्नाचीही ग्रोथ लिनीअर न होऊ देऊन एक्सपोनेनशिअल केली आहे. >> ही फार आत्ता आत्ता घडलेली गोष्ट आहे. गेल्या शेदोनशे वर्षांतली. त्याआधी मानवाची प्रगती बरीचशी तुम्ही म्हणता तशी निसर्गाशी जुळवून घेत झाली. मात्र आता जो जीवविविधतेचा विनाश चालू आहे त्याला sixth mass extinction असे नाव दिले आहे. गेल्या पाच mass extinctions मध्ये नेहमी apex species लयाला गेल्या उदाहरणार्थ डायनॉसोर. सध्या आपण म्हणजे मानव apex species आहोत. या mass extinction ला चालना देणे म्हणजे स्वजातीचा विनाश ओढवून घेणे असणार आहे. सुदैवाने मानवाला चांगल्या बुद्धिमत्तेचे वरदान आहे त्यामुळे आपल्यावरील संकटाची जाणीव आपल्याला झाली आहे. त्यातून वाचून अधिक काळ पृथ्वीवर जगायचे की स्वतःचा सर्वनाश करून घ्यायचा हे आपल्याला ठरवायचे आहे.
ऋणं कृत्वा घृतं पिबेत या चार्वाकाच्या तत्वज्ञानाने जगणार असू तर प्रश्नच मिटला!

Submitted by जिज्ञासा on 26 June, 2020 - 11:43

पण होमो सेपियन्सनी इतक्या कोत्या आणि स्वार्थबुद्धीचे का व्हावे? आम्हांला प्रदीर्घकाळ आमचा वंश जसाच्या तसा टिकवायचा आहे आणि आम्ही म्हणू त्याच अवकाशात, आम्हांला आवडेल त्याच परिसंस्थेत, फक्त मामुली बदल होऊ देऊन, जवळपास status quo मध्ये राहायचे आहे. आम्हांला बदल नको आहे कारण बदलांशी सामना करणे कठीण असते. आमच्यामध्ये इनर्शिया आहे, आणि आम्हांला पुढे जाताना friction ची भीती वाटते. पण निसर्ग (म्हणजे पुन्हा थोडेसे आम्हीच) आम्हांला पुढे ढकलणारच आहे. आणि 'जैसे थे' हेसुद्धा सापेक्ष असते. आपल्याला हिरवेगार रान, त्यात वसलेली 'छान छान', स्वयंपूर्ण, रॅट रेस विहीन गावे आवडतात. पण तीच गावे सोडून मन:शांती किंवा तपश्चर्येसाठी लोक हिमालयात जात असत, जातात.(आजकाल अर्थात एव्हरेस्टवरील कचरा त्यांना हिमालयात येण्यापासून परावृत्त करून गावातच मन:शांती मिळवण्यास उद्युक्त करीत असेल!)
निसर्ग हा चर आणि अचर अशा वस्तुमात्राचा मिळून बनलेला आहे. त्यातल्या अचर वस्तुमात्रात प्रचंड ऊर्जा, पोटेनशिअल एनर्जी असते आणि ती चरसृष्टीला आपल्या तालावर नाचवते. चरसृष्टीला तिच्याशी जुळवून घ्यावे लागते. तिच्या कलानेच चालावे लागते. होमो सेपियन्स कोण मोठे ग्रेट लागून गेलेत बदल नाकारणारे!
अर्थात हा खूपच। दूरचा विचार आहे. आजच्या घडीला 'जीवनात ही घडी अशीच राहू दे', त्यातच कल्याण आहे असा प्रामाणिकपणे विचार करणारे मानवहितचिंतक आहेत आणि असणारच. कारण दीर्घकालीन योजना आणि तात्कालिक योजना असे प्लॅनिंग हवेच. प्रदीर्घकाळाचा विचार आपण करीतच नाही, करू शकत नाही. मानवाला बुद्धी ही अतिरिक्त देणगी मिळाल्यामुळे तो उपद्व्यापरूपी कल्याण करीत राहणारच. मॉस्को नदीवर प्रचंड धरण बांधून कॅस्पियन मधले तिचे जलप्रदान कमी करून कॅस्पियन आटवत आणि खारट करत राहणार, सिंहस्थकाळात शेतीचा हंगाम नसतानाही गोदावरीत पाणी सोडीत राहणार, कच्छ आणि थर वाळवंटात 'सुखाचे चार दिवस त्यांनाही दिसू देत' म्हणून नर्मदा आणि सतलजचे पाणी सोडून वाळवंटात नंदनवन फुलवणार, पारंपरिक परिसंस्था हद्दपार करणार, सिंध आणि अंकलेश्वरला सिंधू आणि नर्मदा कोरडी पाडणार. हे लघु टप्प्याचे नियोजन आपण दीर्घकालीन मानून भविष्यकाळाचा वेध घेतल्याच्या नशेत राहणार! पण ते त्या त्या क्षणाला आवश्यक होते असणार कदाचित.
हे सगळे उलटसुलट विचारप्रवाह आणि घटनाप्रवाह पाहिल्यास, आजचा,आत्ताचा आणि नजीकच्या भविष्याचा विचार करून तेव्हढेच नियोजन करणे कदाचित योग्य ठरेल.
नाहीतरी "गते शोको न कर्तव्यो भविष्यम नैव चिंतयेत, वर्तमानेन कालेन बुधो लोके प्रवर्तते" असे जुने लोक सांगून गेले आहेतच.
Submitted by हीरा on 26 June, 2020 - 15:04

Co2 हवेतून कमी करण्यासाठी पारंपरिक उपयावर च का भर दिला जातोय हे मला समजत नाही.
जंगले निर्माण करावी लागतील ह्या नावाखाली जमिनी हडपल्या जातील.
पाळीव प्राणी मिथेन निर्माण करतात ह्या सबब खाली दुग्ध व्यायसाय आणि poultry व्यवसाय नष्ट केला जाईल.
आणि कृत्रिम मांस ला प्रमोट करून ते वेगळेच आर्थिक साम्राज्य उभे केले जाईल तिथे सामान्य लोकांना स्थान नसेल.
त्या पेक्षा अतिरिक्त कार्बन टेक्नॉलॉजी नी वेगळा करून त्याचा साठा करू शकतो आणि प्रदूषण रोखू शकतो.
आणि ह्याचा होणार खर्च अतिरिक्त कर सक्ती नी लावून प्रतेक उत्पादक ,ग्राहक ह्यांच्या कडून खर्च वसूल करू शकतो.
स्पेस रॉकेट तयारच आहेत जसे साठे वाढतील तसे पृथ्वी च्या वातावरण बाहेर तो साठवलेला कार्बन सोडता येवू शकतो.

अहो कार्बन साठवणं इतकं सोपं आहे का? त्याची एफिशिअन्सी किती आहे बघाल का? त्यावर काम नक्कीच झालं पाहिजे, पण ते सध्यातरी सोल्युशन या सदरात येत नाही.

अमितव, +१ carbon sequestration is very energy intensive process therefore it does not make sense. There is a term called "ERoEI - energy return on energy investment" जर एखाद्या उर्जा स्रोताच्या निर्मितीसाठी जितकी उर्जा खर्च होते त्यापेक्षा अधिक उर्जा तो स्रोत देऊ शकला तर फायदेशीर असते. अन्यथा त्याचा फारसा दूरगामी उपयोग नाही. solar, wind या साऱ्या स्रोतांविषयी हीच मुख्य अडचण आहे की त्यांचा ERoEI फारसा impressive नाही. Tesla चा गाडी कारखाना जेव्हा end to end Tesla batteries मधून निर्माण झालेल्या उर्जेवर चालेल तेव्हा खरा return पाहायला मिळेल. With fossil fuels we are just using up millions of years of energy invested so it certainly has a greater return. But then it is not infinite.

अहो कार्बन साठवणं इतकं सोपं आहे का? त्याची एफिशिअन्सी किती आहे बघाल का? त्यावर काम नक्कीच झालं पाहिजे, पण ते सध्यातरी सोल्युशन या सदरात येत नाही.

जगा मध्ये असा एक plant sadhya अस्तित्वात आहे.
ह्या वरून हे शक्य आहे हे सिद्ध झालेलं आहे फक्त त्याचा खर्च जास्त आहे.

अन्यथा त्याचा फारसा दूरगामी उपयोग नाही >> ह्यावर अधिकाधिक काम केलं तर efficiency and किंमत बदलेल. आणि ROI वाढेल. दूरगामी उपयोग इम्प्रोवाईज करत राहिलं तर होईल हे ही तितकंच खरं.

स्वाती ताई आणि सीमा यांच्या पोस्ट्स महत्वाच्या आहेत. कारण हे असे स्थानिक इंधन मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असते. मात्र नुसत्या काटक्या किंवा पाने जाळल्यास त्यातून धूर निर्माण होतो. त्या ऐवजी बायोगॅस तयार केला तर स्वच्छ इंधन आणि खत असे दोन्ही तयार होऊ शकते. या शिवाय biochar नावाचा एक प्रकार जिथे कोरड्या पानांचा किंवा इतर शेतातला कोरडा कचरा मोठ्या प्रमाणात तयार होतो अशा जागी करता येतो. The bio waste is heated in complete or partial absence of oxygen in a process called pyrolysis. यातून अनेक उद्देश साध्य होऊ शकतात. पण मुख्य म्हणजे यात carbon sequestration होऊन biochar (=biocharcoal) तयार होतो. याचा उपयोग बहुतेक वेळा जमिनीचा कस वाढवण्यासाठी केला जातो.

जर एखाद्या उर्जा स्रोताच्या निर्मितीसाठी जितकी उर्जा खर्च होते त्यापेक्षा अधिक उर्जा तो स्रोत देऊ शकला तर फायदेशीर असते. अन्यथा त्याचा फारसा दूरगामी उपयोग नाही.
हे अशास्त्रीय विधान आहे.
ऊर्जेची निर्मिती होत नाही फक्त तिचे स्वरूप बदलते.
ऊर्जा निर्मितीसाठी लागणारी ऊर्जा आणि निर्माण होणारी ऊर्जा ह्याचे प्रमाण हे कमी जास्त असूच शकत नाही.
फक्त आपण ज्या उध्येशा साठी ऊर्जा निर्माण केलेली आहे त्या स्वरूपात ते प्रमाण कमी असू शकत

खूप इण्टरेस्टिंग आणि thought provoking चर्चा/लेखमाला आहे. या विषयावर काही डॉक्युमेण्टरीज पाहिल्या आहेत पण अजून ठाम असे मत नाही बनले.

मात्र यावरून आठवले की अगदी २०-३० वर्षांपूर्वी मध्यमवर्गीय घरांमधे वस्तू या ना त्या प्रकारे वापरत राहण्याची पद्धत होती. जुने कपडे टेबल व फरशी पुसायला, भांडी घासायला व इव्हन हात धुवायला राख, नारळाच्या शेंड्या, लिहायचे कागद एका बाजूने वापरलेले असले तरी त्याची पुन्हा वही करून दुसरी बाजू वापरणे असे असंख्य प्रकार होते. गेल्या काही वर्षात ते कमी होत गेले.

इथे बहुतांश अमेरिकेमधे वर्षातील अनेक महिने बाहेर कपडे दोन तासांत वाळतील इतके कडक ऊन असते, तरी कपडे ड्रायर मधे फिरवले जातात तासभर. कारण बाहेर दोरी लावून वाळवण्याची पद्धत नाही. HOA वाल्यांना पटवायला हवे त्याबद्दल.

बाहेर कपडे वाळत घाल ण्यावर बंदी होती / आहे, असं वाचलं.
https://www.sightline.org/2012/02/21/clothesline-bans-void-in-19-states/

इथेही टॉवर्समध्ये कपडे खिडक्यांत वाळत घालण्यवर बंदी आहे किंवा ते डाउनमार्केट समजलं जातं.

लोक विजेचा,पेट्रोल गरजे पेक्षा जास्त वापर करतात आणि काही वेळा तर विनाकारण ऊर्जा खर्च केली जाते .
त्या वर उपाय आहे ना .
भारतात विजेचे दर ठरवताना टप्पे केले आहेत 100 युनिट पर्यंत एवढ्या दर त्या नंतर 300 युनिट पर्यंत एवढं दर असे .
सरासरी एका कुटुंबाला किती वीज लागू शकते हे ठरवून त्या पुढील युनिट साठी प्रचंड दर ठेवावा.
5 रुपये दर असेल तर लिमिट बाहेर वीज वापरासाठी 100 ते 200 रुपये प्रति युनिट दर असावा.
का नाही लोकांच्या सवयी बदलणार.
ऐश करण्यासाठी स्वस्तात वीज मिळावी हा काही व्यक्ती च मूलभूत हक्क नाही
पेट्रोल आणि डिझेल चे पण असेच नियोजन करावे.
पण हितसंबंध सर्वांचेच गुंतलेले असल्या मुळे असे काही घडणार नाही .
फक्त पृथ्वी वाचवा म्हणून थोडी फार आंदोलन होतील ह्या पलीकडे सुधार होणार नाही.
Corona virus chya भीती नी जग पूर्ण बंद झाले ना दोन तीन महिने .पृथ्वी चे पर्यावरण सुधारण्यासाठी जग तीन महिने बंद ठेवूया असा निर्णय झाला असता आणि तो अमलात आणायचा प्रयत्न झाला असता तर सर्व स्तरातील लोकांनी आकडतांडव केले असते.
पण व्हायरस ची भीती च एवढी जबरदस्त होती की तोंडातून आवाज नाही निघाला.
व्हायरस च वापर सुद्धा पर्यावरण रक्षणासाठी करू शकतो.
कोणी आर्थिक गणित पण जोरजोरात सांगत नाहीत सर्व कसे गपगार पडतात.
जगली ना लोक घरात बसून सुद्धा.

बाहेर कपडे वाळत घालणे एसथेटिक्स च्या दृष्टीने चांगले नाही. काही कपडे बाहेर वाळवणे हे अशोभनीय दिसते. मानवी जीवनात रस आणि आनंद निर्माण करण्याच्या कामात एस्थेटिक्सची भरीव भूमिका असते.

http://www.arti-india.org/
इथे महाराष्ट्रातल्या आरती ह्या संस्थेची माहिती आहे. अर्थात इथल्या काही लोकांना ही संस्था माहीत असणारच कारण पर्यावरण आणि जैव इंधन ह्या क्षेत्रांत तिचे काम मौलिक आहे. ही संस्था बरीच जुनी आहे आणि कित्येक वर्षांपासून पायाभूत असे काम करते आहे. Ashden ने गौरवित आहे.

आम्ही अमेरिकेत जिथे रहातो तिथे बाहेर कपडे वाळत घालणे हे सामान्य आहे. त्याशिवाय पाऊस, स्नो असतो तेव्हा लॉण्ड्रीरुममधे कपडे वाळत घालायला रॅक्स ठेवता येतात. मी एअर किंवा लोहिट वर कपडे फिरवून घेते आणि लाईन ड्राय करते. लॉण्ड्रीरुममधे दोन ड्राईंग रॅक्स आहेत. शिवाय बाथरुम मधले शॉवर रॉड्स. वर्षभर एसी नाहितर हिटर यापैकी एक सुरुच असते त्यामुळे घरातल्या हवेतील आद्रता कमीच असते. कपडे छान वाळतात आणि इस्त्रीही फार करावी लागत नाही. थोडे प्लॅनिंग लागते. आमच्याकडे उपलब्ध जागा लक्षात घेवून प्रत्येकाला लॉण्ड्रीसाठी २ दिवस दिले होते.
टॉवेल्स, बेडकव्हर्स , किचन मधले डिशटॉवेल्स आणि पायपुसणी मात्र ड्रायर मधे पूर्ण वाळवतो किंवा उन्हाळ्यात कडक उन्हात बाहेर. इथे घरात, बाहेर लावण्यासाठी रिट्रॅक्टेबल क्लोद्सलाईन मिळते आणि बाहेर ठेवायला ड्राईंग अब्रेलाही मिळते. आमच्या ओळखीतल्या स्थानिकांचे आता ७०+ असलेले जे नातेवाईक आहेत ते हिवाळ्यातही ड्रायर वापरत नाहीत. कडक थंडी आद्रता काढून घेते आणि कपडे वाळवते.

बाहेर कपडे वाळत घालणे एसथेटिक्स च्या दृष्टीने चांगले नाही. काही कपडे बाहेर वाळवणे हे अशोभनीय दिसते. मानवी जीवनात रस आणि आनंद निर्माण करण्याच्या कामात एस्थेटिक्सची भरीव भूमिका असते.>>
लँडस्केपिंग प्लॅन करताना युटिलिटी एरीआ विचारात घेवून तिथे क्लोद्स्लाईनची सोय करणे सहज शक्य आहे . असे केल्यास तो भाग आयसोअर वाटत नाही. कुठले कपडे बाहेर वाळत घालायचे आणि कुठले नाही हे आपल्याला लहानपणापासून शिकवलेले असते. बाहेर कपडे वाळवणे म्हणजे डाऊन मार्केट हा एक मुद्दाम पसरवलेला समज आणि त्यातून लोकांचे बदललेले परसेप्शन. एकेकाळी बॅकयार्ड मधे एका बाजूला नीट क्लोद्ज लाईन असत, आतल्या बाजूला कपडे आणि दर्शनी बाजूल बेड कव्हर्स. बाहेर कपडे वाळवणे याचा संबंध मुद्दाम गरीबीशी जोडून , हे असे करणे डाऊन मार्केट म्हणून परसेप्शन बदलवणे झाले. बाहेर क्लोद्स्लाईन म्हणजे घराची किंमत कमी होते हे भरवल्यावर होम ओनर्स असोशिएशन्सनी लगेच रुल्स केले. डिटरजंट विकताना नव्या खोट्या वासाची जाहिरात करायची - ' the refreshing scent of clothes air dried on a clothesline' आणि त्याचवेळी बॅकयार्डातील क्लोद्सलाईन्सना डाऊनमार्केट म्हणायचे? म्हणजे जे नैसर्गिक आणि फुकट आहे ते वापरु नका आणि आमच्याकडून हानिकारक केमिकल्स मधून आभास विकत घ्या.
जिथे लहान फ्लॅट्स मधून कपडे वाळत घालणे शक्य नाही तिथे ड्रायर वापरणे गरजेचे पण स्वतंत्र लॉण्ड्रीरुम्स, मोठे बॅकयार्ड असे असताना ड्रायरचा अनावश्यक वापर सहज टाळता येतो.

Shocking !!!!
I always thought that solar panels grow on trees and wind turbines fall from space.
Alert fossil fuel lobby in action.
Or
I always thought that Thermal Plants grow on trees and Hydro turbines fall from space.

सध्या आपण मुख्यत्वे खनिजतेलापासून मिळणाऱ्या उर्जेचा वापर करतो. याचा मुख्य फायदा हा की हा एक कमी entropy असलेला स्रोत आहे. ही एक मजेशीर आणि महत्वाची संकल्पना आहे. उर्जेच्या स्रोतातली काही उर्जा ही खर्च करताना वाया जाते. त्या वाया जाणाऱ्या उर्जेला entropy म्हणतात. ही वाया जाणारी उर्जा जितकी जास्त तितकी त्या स्रोताची क्षमता कमी आणि लागणारा वेळ जास्त. उदाहरणार्थ, मी एक किलोमीटर चालत गेले तर मला स्कुटरपेक्षा जास्ती वेळ लागेल कारण माझी शारीरिक उर्जा ही पेट्रोलच्या तुलनेत अधिक entropy असलेला स्रोत आहे. >>>>>

तुम्हाला कॅलरीफिक व्हॅल्यु म्हणायचे आहे का ? एण्ट्रॉपी मोजता येते म्हणून टेक्निकली ते ठीक आहे. पण ती एक काल्पनिक तरीही शास्त्रीय संज्ञा आहे. जिचा उपयोग पदार्थाची अवस्था बदलताना तापमान न वाढता वाढलेल्या उष्णतेला दर्शवण्यासाठी होतो. उदा पाणी ते वाफ. दोन्हीकडे तापमान १०० डिग्रीच असते. पण अवस्थांतरात खूप उष्णता वाफेद्वारे शोषली जाते. तापमान सारखेच राहते. त्यामुळे तापमान आणि उष्णता यांचा संबंध दर्शवण्यासाठी एण्ट्रॉपी वापरली जाते.

बहुधा तुमचा निर्देश कॅलरीफिक व्हॅल्यू कडे आहे.

कॅलोरिफिक व्हॅल्यू महत्वाचा parameter आहे पण मला इथे एन्ट्रॉपीच म्हणायचे आहे.
Here is an excellent blog piece explaining the concept in a bit more detail.
https://ajayphatak.wordpress.com/2021/04/06/entropy-and-your-choice-of-e...

उर्जेचा स्त्रोत म्हणून कॅलरीफिक व्हॅल्यू ही संज्ञा योग्य ठरते. एक ग्रॅम कोळसा किती उष्णता देईल , एक लिटर डिझेल किती देईल ही त्याची क्षमता.
कॅलरीज उत्पन्न करण्याची कमाल क्षमता. ती एण्ट्रॉपी नव्हे. एण्ट्रॉपी फक्त अवस्थांतर समजून घेण्यासाठी वापरतात.
एन्थाल्पी व्हर्जेस एण्ट्रॉपी या ग्राफ मधे ती समजते. रेफ्रिजरेशन आणि स्टीम टर्बाईन्स या उद्योगात तिचा वापर होतो. एरव्ही तापमान पुरे असते.

I will suggest that you read the blog first. If you have any questions please feel free to leave a comment on the blog post or here.

मॅडम, इंजिनियरींगचा अभ्यासक्रम महत्वाचा कि ब्लॉगलेखक ?
तुमच्या सूचनेचा आदर आहे. मात्र इंजिनीयरिंगच्या टर्म्स बदलत नाहीत असे मला वाटते.
गुगळून पहा हवे असल्यास.

Pages