मला उडता आलं असतं तर ....... ?

Submitted by डी मृणालिनी on 21 June, 2020 - 05:06

मला उडता आलं असतं तर ....... ?
मला नं हल्ली फारच भन्नाट कल्पना सुचतात. त्यादिवशी मी गोठ्यात बसले होते. अशीच विचार करत. आणि अचानक माझ्या समोरून एक पाकोळी वेगाने उडत गेली. मला इतकं मस्त वाटलं . मलासुद्धा तिच्यासारखं उडावसं वाटलं . मी उठले. जागच्या जागीच उडण्यासाठी दोन -तीन उड्या मारल्या . पण ढिम्म ! मी कसली उडत्ये .... !! मग ट्यूब पेटली. अरेच्चा ! मी कशी उडणाSSर ? ! मी माणूस आहे ना .
असा विचार करते न करते तोच ती पाकोळी पुन्हा माझ्या समोरून उडून गेली. यावेळी मात्र मला काही मस्त बिस्त नाही वाटलं हं . मला तर तिचा रागच आला . मला उडता आलं नाही ,म्हणूनच ती मुद्दाम माझ्यासमोरून उडत गेली. मला चिडवते म्हणजे काय ????
पण मला हे तर कळून चुकलं कि तो आनंद आपण नाही घेऊ शकत. आपण नाही उडू शकत तिच्यासारखं ! खूप चुकचुकल्यासारखं वाटलं . पण समजा ,मला त्या पाकोळी सारखे पंख असते तर ... ? वाव !! मस्तच .. मग तर मी उडतंच राहिले असते. सगळ्यात आधी मी काय करणार माहितीये ?
कर्ली नदीवर मनसोक्त ,वाऱ्याला कापत उडण्याचा आनंद घेणार . तिथे मला river tern ( नदी सुरय ) भेटणार ,हॉर्नबिल्स भेटणार . त्या सगळ्यांकडून मी उडण्याच्या काही विविध पद्धती शिकणार. कित्ती मज्जा !!
ज्या दिवशी लाल भोपळ्याची भाजी असेल त्या दिवशी मी उडत भेडल्यामाडाच्या शेंड्यावर जाऊन बसणार. नंतर माझ्यामागून मम्मासुद्धा उडत येणार ही गोष्ट वेगळी ! शेतात धुडगूस घालणाऱ्या माकडांना पळवून पळवून हैराण करणार. आंब्याच्या ,फणसाच्या ,काजूच्या हव्या त्या झाडावर उड्या मारणार ,खेळणार . मळ्यातल्या हेरॉन ,आयबीस ,किंगफिशर सोबत खूप हुंदडणार . आकाशात घारीसारख्या घिरट्या मारेन आणि पाण्यात मासा दिसल्यावर वेगाने खाली जाऊन त्याला पकडेन . माझ्या मांजरी आणि मोतीसाठी मेजवानी. ! सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे ,या गर्मीपासून सुटका मिळेल . इतर चिमण्यांसोबत भर दुपारी नदीत डुंबेन आणि घरी येऊन थंडगार बेलफळाचं सरबत पिईन . अहाहा !! सुरेख कल्पना .... हा सगळा विचार करत असताना सहज नजर तारेवर बसलेल्या त्या पाकोळीकडे गेली. ती माझ्या बिनडोकपणावर हसत होती.... ! पुन्हा चुकचुकल्यासारखं वाटलं . अरेरे .. ! आपण नाही उडू शकत !

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

किती गोड! मस्त..
आय विश
तुला असेच कल्पनांचे
नवनवीन पंख फुटुदेत.. Happy

खुप छान.. निरागसपणे लिहलयं.. आवडलं..

@च्रप्स.. तुमच्या प्रश्नाचं उत्तर दिलं असतं पण लेखिकेला देऊ दयात.