तू गेल्यावर

Submitted by मनोजकुमार देशमुख on 14 June, 2020 - 03:21

नाही वेलीवर फुल उमलले तू गेल्यावर
कुंडी मधले रोपही सुकले तू गेल्यावर

पाणी नाही रखरख आपले शिवार झाले
मेघ गरजले नाही बरसले तू गेल्यावर

तुळशी वाचून उदास नुसते अंगण दिसते
कुठे रांगोळी नाही सजले तू गेल्यावर

ओळख माझी तुझ्या मुळेच ही जगास झाली
माझे असणे मागे हरवले तू गेल्यावर

भात शिजून ना दरवळ आला संध्याकाळी
नाही चुलीला त्या पेटवले तू गेल्यावर

एकांती मी स्तब्धच बसतो नदी काठावर
नाही कुणी मग मला शोधले तू गेल्यावर

घरपण घराचे निघून गेले कळा लागली
मा‍झ्या सवे छत रडू लागले तू गेल्यावर

नाही उमजली किंमत इतकी तू होती तर
उणे तुझे ते आई भासले तू गेल्यावर

Group content visibility: 
Use group defaults