वात्सल्याच्या व्यवसायाला

Submitted by प्रजननविरोधी on 14 June, 2020 - 02:43

दारी कपिला गाभण राहता
म्हणोनी तिजला मम गोमाता
कुणी कदाचित कारण पुसता
सत्य कुणाही कळू न देता
देवी, जननी, माया, ममता
पाश भावनिक त्यांवर विणता
मातृत्वाच्या करितो बाता

मग वासरू येत जन्माला
नवमातेचा पान्हा फुटला
त्वरीत बंदी करुनी तिजला
करीत वेगळे तिजतान्ह्याला
घालीत वेसण तिच्या दुधाला
रंगीत वेष्टन चढवुनी त्याला
दिले दुकानी व्यापाराला
वात्सल्याच्या व्यवसायाला

यंत्र दुधाचे केले धेनूला
तंत्र धनाचे जमले मजला
मोल दमडीचे आले जीवाला
किंमत शून्य रित्या स्तनाला

नाही सुटका तिच्या नराला
नराधमासम वागणूक त्याला
रेतन कृत्रिम लादायाला
गर्भारोपण साधायाला
भाव थोरला उक्षवीर्याला

शोषणाच्या कृष्ण लीला
गोधर्माचे झाकण त्याला
शोषून पुरते गोदेहाला
थेंब क्षीराचा अंतिम प्याला
तरीही जीर्ण वृद्धवशाला
दिले विकुनी खाटिकाला
मांस तिचे भक्षायाला
चर्म तिचे नेसायाला
वात्सल्याच्या व्यवसायाला

Group content visibility: 
Use group defaults