"सुघट"

Submitted by ज्येष्ठागौरी on 13 June, 2020 - 02:21

img.jpgसुघट

आमच्या लग्नात रुखवत द्यायचं ते काय, असा प्रश्न आईनी माझ्या सासऱ्यांना विचारला तेंव्हा पपांनी सांगितलं की अगदी शकुन म्हणून एखादं भांडं द्या.आमच्याकडे खरंच खूप भांडी आहेत आणि ती बघून नंतर हवी ती घेऊ दे तिला आणि खरंच आमच्या लग्नात नसलेल्या , संसार अर्ध्यात असताना गेलेल्या सासूबाईंचा संसार बघून मी थक्क झाले.किती हौसेनं त्यांनी संसार जमवला होता.पहिल्यांदा ती भांडी बघून घाम फुटला , minimalism~ सूक्ष्मवाद ही कल्पना नसल्यानं आईकडेही खूप भांडी होती पण एकत्र कुटुंब आणि येणं जाणं खूप होतं त्यामुळे लागायचीही पण आता एवढ्या प्रचंड भांड्यांचं आमच्या छोट्या संसारात करु काय ते समजेना. मग हिय्या करुन बरीच भांडी व्यवस्थित खोक्यांमध्ये घालून ठेवली.मग बाकीची भांडी हळुहळू वापरुन हाताखालून जाऊन जाऊन सवयीची झाली. मग जेवताना कधीतरी पाणी प्यायच्या फुलपत्रांवरचं नाव वाचलं की करमणूक व्हायची.कधी नवऱ्याचं कधी दीराचं, कधी सासऱ्यांचं,कधी आजेसासऱ्यांचं. त्याबरोबर एक तारीख असायची आणि कारणही.म्हणजे १२ मे १९६५, चि राजूस मुंजीनिमित्त.असा सगळा मोकळा मामला.उगाच डोक्याला ताण नसलेला , कार्यकारण भाव सांगितलेला. कधी नुसती तारीख मग त्या तारखेवरून चर्चा.की अमुक अमुक दिवशी काय होतं. एकंदरीत काय ह्या भांडयांच्या निमित्तानं माझ्या सासरच्या मंडळींच्या नात्यांची आणि घटनांची ओळख व्हायला लागल्या. एका डब्यावर मात्र एका बाजूला जोशी यांच्याकडून आणि दुसरीकडे मीनामावशीकडून अशी संशयास्पद हालचाल!बरं दोन्हीच्या तारखा वेगळ्या म्हणजे culprit कोण जोशी की मीनामावशी ते आजवर कळलेलं नाही पण दोघांपैकी एकानी डबा न बघता कॅरी फॉरवर्ड केला हे निश्चित जाणवून पोटभर हसलो.तर सांगायचा मुद्दा असा की सासूबाईंच्या भांड्यांच्या संसारात मी रमले.मग अगदी थोडी भांडी हौसेखातर स्वतः घेतली.आमच्या लग्नाच्यावेळी कुंडा हा प्रकार 'द्यायला घ्यायला बरा' अशा विचाराने प्रचलित होता त्यामुळे अशा लग्नांमधून असे अनेक करमरे कुंडे आपोआप जमा झाले.तशा भांडयांच्या अनेक प्रचलित लाटा ~पक्षी साथी येऊन जातात.उदाहरणार्थ कॉपर बॉटमची भांडी,सपाट तळाची भांडी, टपरवेरचे डबे, त्या लाटेवरही स्वार झाले इत्यादी . राजूदादाच्या लग्नाच्यावेळी मिल्क कुकरची साथ होती. त्याला लग्नात १२मिल्क कुकर भेट म्हणून आले होते.त्या वेळी भेट देण्याचीही लाट होती हेही नोंद व्हायला हवं.असो तर अशा पध्दतीनं जेहत्ते कालाचे ठायी माझ्या सासूबाईंच्या संसाराच्या भांड्यांमध्ये आता माझ्या आवडीची, भेट म्हणून आलेली,carry forward म्हणून आलेली ,खाद्यपदार्थांची देवाण घेवाण करताना आलेली चुकून माकून परत करायची राहिलेली. काही बिन परतीच्या बोलीवरची (मला दोन ठिकाणाहून भांडी परत न करण्याच्या धमक्याही मिळाल्यात) भांड्यांची भर पडली. मुलं शाळेत जायला लागल्यावर त्यात त्यांचे डबे ,बाटल्या ,डब्या यांची भरमार झाली ,त्यात दोन्ही लेकरं वस्तू हरवण्यात तरबेज असल्यानं,जोडी आणली गेली.मग मुलं मोठी झाल्यावर त्यांना nostalgia झाला आणि मलाही स्मरणरंजन आणि संचयी वृत्तीची लागण झाली आणि मुलंही वस्तू टाकेनाशी झाली आणि मलाही त्यांच्या वस्तू टाकवेनात आणि सगळ्याचा आणखी मोठा संसार झाला.आणि सासूबाईंना एवढी कशी आवड याचं उत्तर सहजी मिळालं.पण त्या चूल बोळक्यांमध्ये मन छान रमलं. बाहेरच्या जगापासून लांब नाही तरी आपलं एक वेगळं जग तयार झालं.
ह्याच भांड्यांमध्ये मला एक खजिना सापडला त्याचं ऋण कसं विसरु? तो म्हणजे तांब्याच्या आणि पितळी भांड्यांचा.मला तांब्यापितळ्याची जरा जास्तच आवड आणि ह्या भांड्यांमध्ये धुंडाळताना काय काय धमाल विशेष मिळालं !एक पितळी किटली,पितळी कुकर, बोडणाला लागणारी बिन कल्हईची पितळी परात,तांब्याचं भलं मोठं पिप,पितळ्याचा पेढेघाटी डबा.मग आईकडंच एक पितळी वेडं भांडं(!) आणि लंगडी आणि आजीची डेगची(ती मध्य प्रदेशमधली होती )म्हणून.मग छंद लागला,त्यातली काही छोटी मोठी भांडी वापरायला काढली.आई आणि सासूबाई यांच्या संसारातली पातेली ,तपेली ,घागर,चरवी, तसराळं,ठोक्याचं पातेलं, कळशी,तांब्या ,गडू ,गडवा, रोवळी अशा नावानं आजूबाजूनी वावरणारी मंडळी मला रोज साथ करायला लागली.काही मंडळी रोज वापरणं शक्य नसल्यानं माझ्या दिवाणखान्यात येऊन बसली आहेत.अगदी गुण्यागोविंदा नांदतात, भांड्याला भांडं लागत नाही. प्रत्येक गावच्या भांड्यांचा घाट आणि जडण वेगळी असते त्यामुळे मी कुठंही गेले की बाजारात बरोबर मला अशा वस्तू दिसतात किंवा जास्त बरोबर शब्द म्हणजे ,त्यांना मी दिसते आणि लगेच मी ताकाला जाऊन भांडं न लपवता खरेदी करते आणि माझी सुहृद मंडळी माझ्या आवडी जोपासतात. नवऱ्याच्या मामी, मावशींनी त्याच्याजवळची जुनी गोष्ट कौतुकाने आणि असोशीनं दिली,माझी आवड लक्षात घेऊन मला कोणी कोणी त्यांच्याकडची छोटी भांडी दिली आणि सुचूनी एक नवीन कोरी तांब्याची ओंजळ दिली,मंजूनी तांब्याचा पाणी प्यायचा नवीन सुंदर उभा जग,अरुनी दुधाचं पितळी पातेलं कल्हई करुन नाव घालून दिलं, अशा तऱ्हेनं एक छोटा आणि खूप गोड संग्रह तयार झाला.मंजूच्या सांगण्यावरुन काही भांडी buffing करुन घेतली आणि वारंवार भांडी घासायचे कष्ट कमी झाले.त्याआधी बाई गेली माहेरी आणि काम करी पीतांबरी ह्या उक्तीनुसार माझे हात मी खरखरीत करून घेतले आहेत.ह्यातल्या काही भांड्यांमधून मी पाकसिद्धी करून त्यांच्या माझ्या कुटुंबाचा हृदयाचा रस्ता माझ्यासाठी काढला आहे. मला कधी मी घरी एकटी असले तरी या सगळ्यांची सोबत असते.माझ्या संग्रहाला माझ्यासोबत अनेकांचे हात आणि मनं लागली आहेत.मी एकटी त्याचं श्रेय किंवा खापर घेऊ शकत नाही.
डॉ वर्षा जोशी यांचं स्वयंपाक घरातलं विज्ञान हे पुस्तक वाचलं त्यात स्वयंपाकाला वेगवेगळ्या धातूची कोणती भांडी वापरली जातात आणि कोणती वापरावी आणि का याचा छान आढावा आहे.पुलं नी त्यांच्या "माझे खाद्यजीवनमध्ये" कोणता पदार्थ कशात काढावा हे इतकं साद्यत दिलंय.अव्वल दर्जाचा खवैय्याचं हे करु जाणे.
मला या भांड्यांची खूप मजा वाटते.चांगली जडशीळ ,चांदीची असतील तर घणसर अशी भांडी किती पिढ्या टिकली आहेत.
तांबे ,पितळ कल्हई करून वापरले की पदार्थ कळकत नाही असं आई सांगायची.. आईबरोबर जाऊन कल्हई करुन घेतली आहे भांड्याला,त्याला कल्हई करणारे काका,त्यांचा तो भाता अगदी छान आठवतोय.डोक्याला कल्हई हा वाक्प्रचार नंतर कळला आणि आधी त्या भांड्यांचं चकचकीत रूप समजलं हे फार बरं झालं.
दुर्गाबाई भागवतांनी बिन भांड्याचा स्वयंपाक असं एक लेखात लिहिलं आहे.त्यांनी तो केला आहे पण संसार मांडलेल्या मला,हे कठीण म्हणजे अशक्यच वाटलं पण तो आहे फार भारी.मार्ग काढायचा म्हणला की काढता येतोच येतो पण उत्क्रांतीमध्ये मानवानं ही केवढी उडी मारलीये. या अन्न रांधणे, साठवणे , वाढणे या सगळ्या कृतींना साजेशी भांडी दगड आणि धातूंपासून तयार केली ती विकसित केली. पिढी दर पिढी सोयीप्रमाणे साधनं उत्क्रांत होत गेली .सोयी,वेळाची बचत आणि परंपरा यानुसार प्रत्येकाच्या संसार मांडायच्या आपापल्या कल्पना असतात. भरपूर भांड्यांची रेलचेल असावी असं वाटणारी अनेक मंडळी माझ्या आसपास आहेत.कुणाला त्यांचे घाट खुणावतात तर कुणाला त्यांची वजनं. इतर कोणत्याही बाबतीत आग्रही ,आसक्त नसणारी अरु एका चौकोनी डब्याच्या इतकी प्रेमात असते की चुकूनही ती कोणाला देत नाही.किंवा चुकून दिला तर त्याचा मागोवा सतत ठेवते. हे अजब आहे सगळं.त्यावरून तिला भरपूर ऐकावं लागतं पण तो तिचा वेगळा कोपरा आहे.उज्वलानी तर भातुकलीचा अख्खा संग्रह जमा केलाय,काचेपासून ते सोन्याच्या भांड्यांपर्यंत. कोणी परंपरागत आलेला पितळी खलबत्ता तर कोणी दगडी पाटा वरवंटा,किंवा लोखंडी खलबत्ता जपलाय.तोही फार प्रेमानं.
एकदा माझा एक चांगला चमचा सेटमधला,कॅन्टीनच्या ताटलीतून नजरचुकीनं गेला आणि एवढ्या मोठ्या ऑफिसमध्ये तो गडप झाला , थोडं दुःख झालं त्याचं, पण नंतर अचानक काही दिवसांनी तोच चमचा बटाटेवड्याच्या ताटलीतून माझ्यासमोर आला आणि ते वाचलेलं वाक्य प्रत्यक्षात पटवून गेला if you love somebody ,set it free,if it comes back to you ,it was yours ,if it doesn't ,it was never yours.आपला ज्या गोष्टींशी ऋणानुबंध संपतो ती गोष्ट आपल्याजवळ रहात नाही असं म्हणतात तेही खरं आहे ,तसे काही लबाड डबे माझ्या हातावर तुरी देऊन पसार झालेत.असू देत बापडे! त्यांना नवीन घर मिळालं! नवीन ऋणानुबंध!विविध कारणांनी अनेकदा माझा जीव भांड्यात पडत असला तरी भांड्यांमध्ये माझा तितका जीव नाही आणि ज्या व्यक्तींकडे ती भांडी जातात त्यांच्याशी असणारी नाती मला भांड्यांपेक्षा जास्त महत्वाची वाटतात.
एकदा रविवार पेठेत हिंडताना जुन्या वस्तूंच्या दुकानाशी माझे आणि अरुचे पाय रेंगाळले, ते एक विशेष काहीतरी बघून.माझ्या लहानपणी कोपऱ्यावर दाणे ,फुटाणे विकणारे काका होते.काबुलीही असायची शुक्रवारी.त्यांच्या त्या ढीगांवर एका मातीच्या मडक्यात दाणे गरम राहायला व्यवस्था असायची आणि आपल्याला द्यायला पितळी छोटी मापं असायची.ती ही मापं होती.तशी तीन मापं घेतली घरी येऊन स्वच्छ धुवून नीट बघितलं तर त्यावर 1/8 seer 1/4 seer असं लिहिलं आहे म्हणजे शेर असणार.मुंबईच्या कंपनीचं ओरिएंटल मेटल कंपनी वरळी असं नावही आहे याच्यावर.ही माझी भारी भर भांडयांच्या संसारात.विलक्षण गोड आणि जुन्या दिवसांशी बांधून ठेवणारी.
पण त्याच दिवशी आमचा व्यवहार पूर्ण होत असताना त्या दुकानात एक तरुण विवाहित मुलगी आली,कपड्यांवरुन अंदाज बांधू नये तरीही आर्थिक अडचण असावी , काही पितळी भांडी मोडीत घालायला आली होती ती. पितळी गडवे होते सहा.मन पिळवटून तिनं ते विकले आणि तिच्या त्या वेदनेनी मला आणि अरुला फार खोल खंजीर हृदयात गेला असं झालं.असं मोडीत घातल्यानी मिळणाऱ्या फारच किरकोळ पैशांनी तिची काय अडचण काय दूर होणार होती ह्या विचारानी फार निशब्द झालं.मी माझ्या दिवाणखाण्यासाठी काहीतरी शोभा म्हणून घेत होते आणि ती मीठ भाकरीची सोय बघत होती.पोटात खड्डा पडला.सतीश काळसेकर म्हणतात तसं भाकरीसाठीही पुस्तकं विकता येत नाहीत पण इथं तसं काहीसं होतं हे जाणवून अस्वस्थ वाटलं दूरवर.खूप मन मारून तिनं हा निर्णय घेतला असणार.
खरंतर ही भांडी म्हणजे इतिहास असतो एका कालखंडाचा.हडप्पा आणि मोहेंजोदादोच्य चित्रातही भांडी दिसतात.त्यामुळे संस्कृतीचा अविभाज्य भाग असतो त्यामुळे तो फार गोड असतो.बायकांनाच नाही तर पुरुषांना भांड्यांची आवड असते हे मला जाणवलंय,नवरा,वडिल,भाऊ या सगळ्यांना पाहिलंय मी पण हे लोक आधुनिक वस्तू घेतात किंवा नवीन कल्पना असलेल्या वस्तू.संजयनी तर मोठे मोठे वोक आणि झारेही आणले होते त्याच्या पाकसिद्धीचीची आवड जोपासायला.पण नाहीतर कुठं कांदे कापायचं मशीन,कुठं फ्रेंच fries करण्याचं तर कुठं लसूण सोलायचं मशीन.ज्याचा उपयोग दहा दिवस होतो धडाकून मग मामला थंडावतो. पण यथास्थित चेष्टा मात्र बायकांच्या संचयी वृत्तीची असते.अशाच एका खूप मोठ्या माणसाला त्यातलं गम्य किती तरलरीत्या कळलं आहे.कुसुमाग्रजांची चमच्यांवरची कविता आठवली?,स्टँडवरच्या सात चमच्यापैकी एक हरवतो तेंव्हा बाकीचे म्हणतात "ती"असती तर तो हरवला नसता आणि मी कुसुमाग्रज म्हणतात की ती असती तर मीही हरवलो नसतो. तसंच हरवून न जाण्यासाठी जे भावनिक आपलेपण लागतं ते अशाच गोष्टीतून सापडत राहतं.कवडसे असतात पूर्वसूरींचे, पुण्याईचे..
चक्र वर खाली होत असतं तसं जुनं जाऊ दे स्मरणालागूनी असं म्हणता म्हणता ते पुन्हा लख्खपणे समोर येतं.प्रत्येक जण आपल्या वेळेला आपापली चूल बोळकी मांडतो, यथाशक्ती ती सांभाळतो,त्यात भर घालतो आणि पुढं करतो. भांडयांवरच्या नावाचे धनी बनतो.माझ्या एका मैत्रिणीनं सगळ्या जुन्या भांड्यांवरही तुझी नावं घालून घे असा अत्यंत व्यावहारिक सल्ला दिला होता आणि तोही मला. मला तो सल्ला फार दुष्ट वाटला,एखादी गोष्ट मी नवीन घेतली असेन तर त्यावर नाव, दिनांक घालणं वेगळं ,तेसुद्धा अगदी गंमत म्हणून ,एक आठवणींचा कवडसा तयार करायचा म्हणून आणि जुन्या गोष्टीवर केवळ हक्क म्हणून नाव घालणं ह्या दोन अगदी टोकाच्या गोष्टी आहेत.मूलतः मालकी हक्क दाखवायचा स्वभाव नसल्यामुळे मी तो सल्ला शिरोधार्य मानला नाही आणि घरीही तसं कोणी पक्के मडकं नाही हे मानणारे. तसंही आपल्या हे मनाशी पक्कं आहे की आपण सगळेच पांथस्थ आहोत या जगात, वाटेवरचे वाटसरू,आखून दिलेली वाट आणि मोजून मिळालेले श्वास घेऊन चालणारे आहोत,ही खूणगाठ बांधूनच वाट चालायची आहे.या वाटेत काही खर्च होणार आहे आणि काही जमा होणार आहे,काही खर्च होताना,काही जमा होणार आहे आणि काही जमा करताना काही खर्च होणारे ,मग कशाची मालकी.कशाचं स्वामित्व! ह्यातून आणखी एक कळलं की तसं बघितलं तर आपण सगळेच या भांड्यांसारखेच असतो. भांडं देताना कधी रिकामं द्यायचं नाही हे आईनं शिकवलं. त्यामुळे आपणही रिकामं राहायचं नाही हे मनात रुजलं.आपणही चांगल्या भावनांनी कायम भरलेलं असावं ही मनीषा बाळगून आहे. कारण मुळात भांड्यांचा तो गुण आहे साठवणे.आपणही ह्या भांड्यांसारखं विविध नावानी वावरतो,वेगवेगळी नियती बाळगतो ,पण कल्हई केल्यासारखं चकचकीत राहायचं, आतलं कळकू द्यायचं नाही आणि एक गोष्ट खरी की जे सणसणीत खरं असतं जे चांगलं असतं, ते वापरलं जातं, उपयोगी पडतं ,टिकतं आणि नंतरही इतिहास बनून राहतं एका काळाचे साक्षीदार बनून.
अशी ही साठा उत्तराची कहाणी सुघट संपूर्ण!
©ज्येष्ठागौरीimg2.jpg (110.29 KB)
img2_0.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त!
जिज्ञासा +१
भेटवस्तुंच कॅरी फॉरवर्ड जुन्या काळापासुन चालत आलंय हे माहिती नव्हत.. Happy

खूप छान लिहिलंय.
तुमच्या निगुतीने जमवलेल्या संग्रहाचे फोटो बघायला आवडतील.
लिहीत रहा.

सुरेख!
कुसुमाग्रजांची ही कविता माहिती नव्हती. हृदयस्पर्शी आहे.

खूप सुंदर लेख. फोटो असते तर अजून मजा आली असती वाचायला.
सेटमधला चमचा ऑफिसातील कँटीन मधे हरवून पुन्हा परत मिळणे या बद्दल सेम पिंच Happy

वाह, आपने तो दिल के तार छेड दिए.

मी घर घेतलं आणि आईबाबा आले, तेव्हा आई बरीच भांडी घेऊन आली. त्यामुळे डबे, कूकर, थाळ्या वगैरे मोजकीच भांडी घ्यावी लागली. पुढे लग्न झालं तर नवरा शिक्षण आणि नोकरीनिमीत्त त्याच्या घरापासून लांब होता. त्याने व्यवस्थित संसार उभा केला होता. त्यामुळे एक चमचा सुद्धा विकत घ्यावा लागणार नव्हता. त्याने ही गोष्ट कौतुकाने मला सांगितली आणि मी वैतागले. कारण मला काही खरेदी करायला मिळणार नव्हती. शेवटी कधीतरी दोन-तीन महीन्यांनी स्टीलचे चहा-साखरेचे डबे आणले तेव्हा हौस पूरी झाली.

मग कधी लोखंडी तवा, बोरोसीलची भांडी, कधी आवडलं म्हणून एखादं उलथनं इ. खरेदी चालू झाली. आताही एखादं भांडं आवडलं आणि त्या टाइपचं भांडं आपल्याकडे आहे अशी समज मिळाली की, असू दे आईकडे/सासूबाईंकडे नाहीये, त्यांना होईल म्हणून खरेदी होतच राहते.

३-४ महीन्यापूर्वी एका मैत्रिणीसाठी भांडी घ्यायला घाउक बाजारात गेले होते. सोबत अहो व बाळ होतं. दोघांचेही डोळे अलिबाबाच्या गुहेत गेल्यासारखे चमकत होते. शेवटी आई आपण हे पानासारखं ताट घेऊया ना म्हणून मागणी झाली आणि आवड पुढच्या पिढीत पोहोचल्याची खात्री पटली.

खूप सुंदर! ह्या सुघटांशी नातं असतं. त्यांचा स्पर्श, नाद, स्मृतीगंध ह्याची साक्ष देतात. शेजारच्यांची भांडी आली की घासून पुसून आपसुक वेगळी ठेवली जातात ही आईकडून आलेली सवय! चुकून माकून गेलंच तर वापरायला घेतलं की लगेच स्पर्श व आवाजावरून लक्षात येते चूक. लवकरच काहीतरी खास करून परत केल्या जात. आजकाल तसे शेजारी नाही राह्यले व चवीला काही देण्याची पध्दत फ्लॅट संस्कृतीमुळे राह्यली नाही . पण माझ्या एका दूरच्या नातेवाईकाला दिलेला डबे परत करायची सवयच नाही. नंतर नंतर पार्सलच्या डब्यात घालूनच द्यायला लागले. एकदा त्यांच्याकडे जेवायला गेलो. पोळ्यांचा डबा पाहून लगेच ओळख पटली डबा उघडल्यावर तर खात्रीच झाली. गेले कित्येक डबा शोधत होते तो अचानक इथे सापडला. हळूच डब्यावरचं नांव वाचलं ..... पूर्ण जेवण डबा कसा मागायचा ह्या विचारातच जेवले. भिडस्त स्वभावामुळे मागता आलाच नाही. ह्या प्रसंगाला बरीच वर्षे लोटली तरी मनातून जात नाही. त्यालाही त्याच्या स्वामीकडे जायची ओढ असेल ना . .... आजही तो डबा मला खुणावत असतो...

मंजूताई, तुमचा प्रतिसाद वाचून मला आठवलं.
लहान असताना आई कोणाकडे काही पदार्थ पोहोचताना हा आपला डबा आहे. हा आठवणीने परत घेऊन ये असं बजावायची तेव्हा त्या मागची भावना कळायची नाही. पुढे जेव्हा स्वतःचे स्वयंपाकघर झाले तेव्हा "आपली भांडी" म्हणजे काय ते कळायला लागलं. डबे ही माझ्या खूप आवडीची वस्तू आहे. I have spent many happy hours just window shopping in container store! आता मिनिमलिझम आणि पर्यावरणाचा विचार करून फारसे काहीच घेतले जात नाही.

धन्यवाद सर्वांना!एक फोटो अपलोड केला आहे!पुन्हा एकदा धन्यवाद,भांडी हा सगळ्यांचा आवडीचा विषय आहे.गंमत म्हणजे नाटकात काम जे वठवतात तेही पात्र असतं:)

छान लिहिलंय.
माझ्या लहानपणी वाढदिवसाला मिळालेले पाणी प्यायचे छोटे ग्लास, उभा डबा वगैरे गोष्टी आई मला मुलं झाल्यावर इथे घेऊन आली. मला वाटलं मुलं काय वापरणार नाहीत पण त्यांनी ती भांडी आणि त्यावरून निघालेल्या (आमच्या लो मि क्ला) आठवणी एंजाॅय केल्या. भाबड् प्रश्नही विचारले Happy

>> बायकांनाच नाही तर पुरुषांना भांड्यांची आवड असते हे मला जाणवलं
हो घरातच पाहातेय Lol

छान लिहीले आहे. लहानपणीपासून घरी ऐकलेले व पाहिलेले भांड्यांचे अनेक प्रकार आठवले. आजकाल इतकी नावे ऐकूच येत नाहीत.

नावे घातलेली भांडी हा ही एक मजेदार प्रकार आहे. आपण जेवताना किंवा पाणी पिताना सहज ते भांडे बघतो तर एखादी २०-३० वर्षांपूर्वीची रॅण्डम तारीख व आपल्या एखाद्या नातेवाईकाचे नाव असते. अगदी लग्न, मुंज वगैरे ठळक तारखा सोडल्या तर बाकी त्या दिवशी असे भांडे देण्यासारखे काय होते हे आठवण्याचा सार्वत्रिक प्रयत्न सुरू होतो Happy ते पेन सारखे इलेक्ट्रिक मशीन येण्याआधी अनेकदा भांड्यांच्या दुकानासमोर दोन विशिष्ठ वस्तू वापरून ही नावे लिहीणार्‍यांना टोटल रिस्पेक्ट! एक लांबट काठीसारखी वस्तू व त्यावर वरून ठोकायला दगडासारखे काहीतरी असे बहुधा.

सुंदर, अगदी रिलेट झाले. मॉल मधल्या भांड्यांच्या विभागात मी पण कितीही वेळ रमू शकते. मागे केरळ ला गेलो होतो तिथल्या एका मॉल मध्ये स्टील ची चांगली दणकट आणि सुंदर घाटाची अनेक भांडी पाहिली पण सामानात आजिबात जागा नव्हती म्हणून एक उलथनं तेवढं घेवून आले. Happy

खूप मजा आली वाचताना. मलाही भांड्यांचा खूप नाद आहे. बघायला आवडतात.

माझ्या आईला एकेकाळी खूप वेड होते पितळेचे. ओढग्रस्त संसारातून एकेक रुपया वेगळा काढून त्यातून पितळेचे डबे ती घ्यायची. माझ्या बाबांच्या कामातूनही पितळेची तोडमोड जमा व्हायची, तीसुद्धा जमा करून ती डबे घ्यायची. त्या डब्यांवर आधीच्या मालकांची नावे लिहिलेली असत.
दर 15 दिवसांनी चिंच,पीठ,मिठाचा काला करून हे डब्बे घासायचे काम माझया गळ्यात असायचे. भांडी घासली की नखे काळीकुट्ट होऊन जात. तरीही मी खूप वर्षे ही हमाली केली. शेवटी 'बस्स झाले, भांडी विकून टाक... आता घासतेय ही शेवटची, परत घासणार नाही.' अशी धमकी देऊन मी तिला ती भांडी विकायला भाग पाडले.... आता थोडे वाईट वाटतेय.

मिल्क कुकरवरून आठवले. आमच्या एका शेजार्याच्या घरी भिंतीवर ओळीने 9 मिल्क कुकर ठेवलेले होते. Happy

त्यांच्याकडे गेले की ते कुकर नजरेत भरायचे आणि शेजारीही हसून आमच्या लग्नातली भेट म्हणून सांगायचे.

5-६ वर्षांपूर्वी आईचे पि तळे चे 3 डबे मी असेच मोडीत काढले.एक तर तिला नको होते,माझ्याकडे ठेवायला जागा नव्हती.नंतर खूप वाईट वाटले .एकतर असे जाडजूड डबे पहायला मिळत नाहीत.माळ्यावर राहिले असते बिचारे.
माझी कामवाली खूप हळहळली ते ऐकून.त्याने अधिकच gilt आले होते.

Pitali ani tambyachi bhandi barich jama zaliyet avad ahe mhaun pan te khup chakchakit asle tarach chan diste. Buffng keyawar ghasnyache jast kasht padat nahit ka.

खुपच छान लेख. चमचा पुराण मलापण रिलेट झालं. माझा एक छोटासा चमचा आहे मी डब्यात नेते नेहमी. माझ्या लहानपणीचा. तो जर दिसला नाही तर मला सैरभैर व्हायला होतं. मुलगा म्हणतो राक्षसाचा प्राण कसा पोपटात तसा तुझा जीव ह्या चमच्यात आहे. Lol एकदा हरवला पण होता, पण सापडला नशीबाने.
मी सुध्दा माझ्या डब्या भांड्यांसाठी आग्रही असते. पूर्वी कोणाकडे भांडी गेली तर ती येइपर्यंत रुखरुख लागायची. हल्ली सगळं बंदच झालय देणंघेणं.
आईने दिलेल्या डब्यांची गोष्ट अजून जरा वेगळी. त्यातलं एक सुद्धा इथे तिथे गेलेलं चालत नाही मला. आई नाहीये तर भांडी जपते मी तिने दिलेली.

साधना, सेम माझ्या आईचं होतं एकेक पै पै जोडून पितळीची भांडी जमा केली होती. नंतर तिला ती घासणं जमायची नाही. त्यात भावजयीच्या भांड्याची भर पडल्,ावर ही भांडी माळ्यावर गेली. किती दिवस अडगळ जपणार म्हणून मीच मोड द्यायला गेले. आधीचा प्रतिसाद लिहीता लिहीता डोळ्यात पाणी आलं ... लिहीलंच नाही.
मला फार हौस नाही आता तर सगळ्याच गरजा कमी केल्यात व आहे हे सांभाळल्या गेलं तर पुरे असं झालंय....
जेगौ , तुझं लेखन भावतं व भिडतं!

खूप छान लेख. जुन्या आठवणी जाग्या झाल्या. आईकडे एक शंकुतला पात्र नावाचे साधेच पातेले होते. उरलेले दूध नेहमी शंकुतला पात्रात ठेवायची ती. आईने पण घर बदलल्यावर कित्येक भांडी घासणे होत नाही म्हणून मोडीत काढली होती. त्यावर आमचे आडनाव सुद्धा वेगळे होते इतके जुने होते ते हंडे, कळशा, बंब. अगदी मंजूताई सारखे होते आहे मला Sad !

Pages