ll विस्मरणातील पांडुरंग ll

Submitted by Sanjeev Washikar on 9 June, 2020 - 06:11

ll विस्मरणातील पांडुरंग ll
कांही माणस निसर्ग नियमानुसार जन्माला येतात, मात्र ती का जन्माला येतात किंवा जन्माला येणे हा कांही त्यांचा गुन्हा असतो काय ? भविष्य काळात जे जीवन त्यांना जगावे लागणार आहे, त्याला ते कितपत जबाबदार आसतात ? असा प्रश्न मानवी मनाला अनेक वेळा पडतो. कधीकाळी एका इनामदाराच्या संपन्न कुटुंबात जन्मलेल्या पांडुरंगास मात्र आमच्या मामाच्या घरात जन्मभर मानवी पाण्याचा पंप अर्थात पाणक्या बनून रहावे लागले.

पांडुरंगाचे कुटुंब हे मुळचे कर्नाटकातील होते . पांडूच्या लहानपणीच त्याचे वडील वारले . त्याच्या आईचा स्वभाव अतिशय गरीब व भोळसट असल्या मुळे इतर नातेवाईकांनी त्यांना खूप त्रास दिला .सर्व जमीनजुमला ,संपत्ती काढून घेतली . त्यांच्या त्रासाला कंटाळून मोलमजुरी करण्या साठी,पोट भरण्या साठी त्याची आई दोन लहान मुलांना घेऊन घरा बाहेर पडली .

अमच्या मामाचे गाव हे एक जागृत देवस्थान आहे. देवळाच्या समोरच लहान लहान दगडी पायऱ्यांचा मोठा घाट व त्या समोरून कायम पाण्याने भरलेली दुथडी नदी पण ती संत पणे वाहत असते. नदी. हजारोच्या संख्येने भाविक लोक देवदर्शना साठी येत असतात . आम्ही देखिल सुट्टीत लागली कि मामाच्या गावी जात असत .तिथे पांडु हा आमच्या सर्वांनचा कुतुहलाचा एक विषय असायचा. काळा कळकट रंग , कृश शरीर, पांढरी वाढलेले दाढी,लोकलज्जेसाठी नेसलेला पंचा ,मानेच्या हेलकाव्याने हलणारी त्याची पांढरी शेंडी ,तर कधी हसला, तर दिसणारे पिवळे दात, चेहरा कायम भांबावलेला,घाबरलेला,हातात मात्र नदीतून पाणी भरण्यासाठी कायम घागर.

वास्तविक पाहता देव दर्शनासाठी दूरवरून अनेक भाविक लोक येत असत,देवधर्मा साठी, प्रसादासाठी हजारो रुपये खर्च करीत आसत, मात्र पाणी भरण्याच्या निमित्ताने हजारो वेळेस देवाच्या समोरून येऊन देखील, हा पांडु मात्र देवाला कधीच नमस्कार करीत नसे." पांडू देवाला नमस्कार कर "असं आम्ही मुलांनी गंमतीने चिड्वले, तर तो आम्हालाच नमस्कार करायचा.देवावर त्याचा इतका का राग होता कुणास ठाऊक? कदाचित त्याला पाणी भरण्याचे टारगेट दिलेले असायचे ,ते न भरल्यास त्याला मामाच्या शिव्यांचा महाप्रसाद मिळत असे. दिवसातून शंभर शंभर घागरी पाणी, पांडू नदीतून भरून आणत असे .एखादा माणूस जास्त पाण्याने हात पाय धुवू लागल्यास, हा आपला जीव कासावीस करुन घेत असे.पाण्याचा रंग काय आहे हे, त्या पांडु रंगास चांगले माहीत होते.

तुम्हाल कदाचीत असे वाटेल कि पांडु वेडा असणार पण पांडुरंग मुळीच वेडा नव्ह्ता.त्याला पंधरा वीस वर्षा पूर्वीच्या गोष्टी विचारल्या तरी तो त्या अगदी बरोबर मान डोलवत सांगत असे.पांडु अतिशय प्रामाणिक होता, त्याला मामाने " पांडु मी जरा बाहेर जाउन येतो, घराकडे लक्ष ठेव," असे सांगितले तर तो घराच्या दारातून माणूसच काय, पण एखाद्या मुंगीला सुध्दा आत सोडणार नाही.खाण्या पिण्याची कधी सुध्दा तक्रार करणार नाही.अन्नदाता मालक जे देइल,ते त्याला मान्य असे.एकेक वेळी त्याच्या बोलण्याच्या टिपण्या इतक्या मार्मिक असत कि समोरचा देखील थक्क होत असे .मला एकदा लवकर परगावी जायचे होते,तेंव्हा मी त्याला म्हणालो"पांडु मला लवकर बाहेर जायचे आहे,सूर्य उगवण्याच्या आधी मला उठव" त्यावर तो म्हणाला"सूर्य उगवला तर ना,सूर्य उगवलाच नाही तर मी तूला कसा उठवणार"असे कांही ऎकल्या वर याला वेडा तरी कसे म्हणायचे.

अशी अनेक माणसे आपल्या समाजात सर्वत्र आढळतील.ज्यांच्या कडे आत्मविश्वास हा प्रकारच नाही.ज्यांना त्यांनी, लहानपणा पासून आपली माणसे मानली ,त्यानाच यानी मरे पर्यंत कवटाळले . त्यांच्याच धाकात हि मंडळी जन्मभर राहिली.काम चुकार पणा केला तर घरातील वरिष्ठ मंडळी त्याला रागवत.त्यांच्या समोर तो चुडिचूप आसे मात्र, त्यांच्या अनुपस्थितीत तो फारच खुश आसे.इतर कामाच्या बायका,मुलांच्या वर रागवून तो आपला रुबाब दाखवी, मात्र याचा परिणाम त्यां बायका,मुलांच्या वर कांहिच होत नसे, उलट याला ती हसून दाद देत असत. " काम केले नाहीस तर तुला घरा बाहेर काढीन" असे जरी कोणी म्हटंले, तरी पांडु जोर जोरात रडत असे मग रात्री जेवणास ही नकार देइ.घरातील बायका त्याची समजूत काढून त्याला जेवणास भाग पाडत.घरातील वृध्द व मोठया स्त्रियांची सहानभुती पांडूला फार होती.घरात कांही गोडधॊड केले कि त्या पांडुला आवर्जवून देत असत.
लहान मुलांच्या वर त्याचा फार जीव होता. मलाही त्याने अंगा खांद्यावर खेळवले होते.आम्ही लहान मुले देखील त्याच्या खूप खोड्या काढीत होतो.कधी त्याच्या शेंडीला दोरी बांध,तर कधी त्याच्या पंचाला कागदाची झुरमूळी लाव.पण आम्हा मुलांच्या वर तो कधी चिडत नसे.घरी बाळंतपणा साठी आलेल्या मुलींची लहान मुले ,रात्र रात्र भर रडत, त्या वेळी पांडु मात्र त्याना रात्रभर घेउन बसत असे.त्याना उगी उगी करत तो रात्र भर जागत आसे.पांडुरंग आहे, म्हटल्या वर त्या लहान मुलांच्या आया मात्र रात्रभर ढाराढूर झोपून टाकत.सकाळ झाली की "हा घे तुझा ढेकूण,रात्र भर मला चावला बघ" असे म्हणून बाळाला पांडु त्याच्या आईच्या स्वाधीन करीत असे.अशा कामाच्या वेळी मात्र पांडु सर्वांना हवा हवासा वाटे. असा घरकामाचा गडी ज्यांचे कडे असेल ,तो घरमालक किती भाग्यवान असेल नाही !

याच गावा शेजारी एक निम-शहरी गाव होते. तिथे चित्रपट गृहात चित्रपट पहाण्या साठी महिलांसाठी बैठक व्यवस्था स्वतंत्र आसायची,आमची आई,मावशी,मामेबहिणी चित्रपट पाहायला जात होत्या,मात्र पुरुष माणूस कोणी तरी बरोबर पाहिजे म्हणून पांडोबाना बरोबर घेत असंत,अशा वेळी चित्रपट पहाण्या साठी मात्र पांडुरंग महिलांच्यातच बसायचे. त्यामुळे डोअरकिपरची चांगलीच पंचाईत होत आसे . तो वारंवार तिथे येउन पांडु च्या तोंडावर बॅटरीचा प्रकाश झोत टाकून पहात असे . महीला साठी आरक्षित असणाऱ्या जागेवर बसण्याचा दावा करणारा त्या काळातील पांडुरंग हा महाराष्ट्रातिल पहिला क्रांतिकारी असावा,थोडक्यात पुरुष असण्याचा हाच काय तो, त्याच्या अयुष्यात झालेला फायदा असावा.

आजोळच्या बनात खेळता खेळता आम्ही लहान असणारी मुले कधी मोठी झालो हे मात्र कळले नाही.प्रत्येक जण आपल्या पोटापाण्याच्या उध्योगाला लागला. मात्र या कालचक्राच्या फेरीत पांडु मात्र कुठे विस्मरणात गेला हे मात्र कळलेच नाही.मध्यंतरी गावात महा भंयकर पूर आला.हजारो लोक बेघर झाले.पूर ओसरला तशा रोगराइ व साथी सुरु झाल्या.याच वेळी पांडुरंगाला कडकडून ताप भरला. मामाने त्याच्या साठी भरपूर औषध पाणी केले ,शुश्रूषा केली पण त्यातच त्याचा मृत्यू झाला.अशा माणसाच्या जाण्याने फार कुणाला वाईट वाटत नाही की त्याच्या साठी रडणारेही कोणी नव्हते. ज्यांच्या अयुष्यात भावनीक विश्व नाही ती व्यक्ती म्हणजे जीवन जगणारा अव्यक्त मानवी सांगाडाच,परमेश्वराने दिलेले की लादलेले जीवन,कोणास ठाउक? ज्या ज्या वेळी मी आजॊळी जातो, देवाचे दर्शन घेतो व मामाच्या घरी येतो, त्या वेळी मात्र उगीचच वाटते की कोणीतरी आपल्याला हाक मारतोय "काय सरजू ! कधी आलास"? व मग मात्र मन भूतकाळात जाते व पांडुच्या आठणीने डोळ्यांच्या कडा मात्र ओल्या होतात . मग एका गाण्याची ओळ आठवते "संत वाहाते कृष्णामाई, तीरा वरल्या सुख दु:खांची जाणीव तिजला नाही"

.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users