मैं कहाँ हूँ ( भाग ४)

Submitted by nimita on 6 June, 2020 - 05:59

*मैं कहाँ हूँ (भाग ४)*
✒️प्रिया जोशी
"अरे देवा !! आता हे कुठलं नवीन संकट ? मला पकडायला येतायत की काय या दोघी? 'म्हणजे यांनीच सांगितलं असेल का त्या काकांना... मला इथे पळवून आणायला ?? 'या दोघी' आहेत का 'हे दोघं ' आहेत ? म्हणजे ... 'ती माशी' आहेत का 'तो माशी' ?? ....काय माहीत बाई!!नीट दिसतच नाहीये काही .... पण उगीच रिस्क कशाला घ्यायची बाई !काय करू आता? त्या दोघींच्या तावडीत सापडण्याआधी इथून पळ काढला पाहिजे... अगदी 'शोले' मधल्या त्या धन्नो सारखा.... भाग मक्षु, भाग... आज बसंती की नहीं - तेरी इज्जत का सवाल है।"

क्षणाचाही विलंब न लावता मक्षुनी आपले नाजुकसे पंख पसरले आणि जीवाच्या आकांतानी विरुद्ध दिशेनी उडायला सुरुवात केली. तिचं नशीब चांगलं म्हणून तोपर्यंत हळूहळू अंधार पडायला लागला होता; त्याच अंधाराचा फायदा घेऊन ती त्या दोघींच्या तावडीतून निसटली. उडता उडता तिचं लक्ष समोर काकांच्या घराकडे गेलं. एक खिडकी उघडी दिसत होती... मक्षु त्या दिशेनी झेपावली. ती खिडकीतून आत प्रवेश करणारच होती- तेवढ्यात तिच्या मनात आलं..' जर मी घरात गेले तर माझं स्वातंत्र्य पुन्हा धोक्यात येईल. मी पुन्हा काकांच्या आणि पर्यायानी या दोन महामायांच्या तावडीत सापडेन !!' हा विचार मनात येताच मक्षुनी आपला इरादा बदलला आणि ती त्या खिडकीच्या बाहेर ठेवलेल्या एका कुंडीत जाऊन विसावली. त्या काळ्या मातीत तिला शोधणं अवघडच होतं.... आज पुन्हा एकदा तिला आपल्या त्या किरमिजी रंगाचा खूप अभिमान वाटला. तिला परत तिच्या जानूची आठवण आली. 'खरंच, किती रोमँटिक आहे माझा जानू !! माझं दिसणं, माझं हसणं, माझं बोलणं सगळ्यावर कित्ती कित्ती प्रेम करतो तो ... प्रत्येक वेळी भेटला की किती छान छान गाणी म्हणून माझी तारीफ करतो...' तिच्याही नकळत मक्षु आठवणींत रमली. "सगळ्यात पहिल्यांदा मला बघितल्यावर त्यानी म्हटलेलं गाणं अजूनही लक्षात आहे माझ्या' ... मक्षु नकळत ते गाणं गुणगुणायला लागली...

कहीं एक मासूम , नाजु़कसी लडकी

बहुत ख़ूबसूरत , मगर सांवलीसी....

बहुत ख़ूबसूरत , मगर सांवलीसी....

इश्श, त्याची सगळ्यांसमोरची ती धिटाई बघून मला तर बाई इतकं लाजायला झालं होतं. लाजेनी माझे गाल अजूनच किरमिजी झाले होते. '

मक्षु आपल्या आठवणीत रमणार इतक्यात तिचं लक्ष खिडकीच्या आत गेलं... त्या मगाचच्या काकू कॉटवर बसून चेहेऱ्याला कुठलंतरी क्रीम लावत होत्या. तेवढ्यात ते काका खोलीत आले आणि काकूंच्या शेजारी जाऊन बसले.... आणि त्यांनी .....'अहो काका !!निदान खिडकीचे पडदे तरी बंद करून घ्या !!! ' मक्षु लाजत म्हणाली. 'काय ही माणसं !! जनाची नाही तर निदान मनाची तरी लाज असावी की नाही ?? हे काका तर माझ्या जानूच्याही दोन पावलं पुढे आहेत !!!'

मक्षिका नी लाजून आपले डोळे मिटून घेतले खरे....पण तिला त्या काका काकूंच्या जागी 'जानू आणि मक्षु' च दिसत होते.... त्या काका काकूंचा रोमान्स बघायचा मोह काही टाळता आला नाही तिला... तिनी हळूच डोळे किलकिले करून बघितलं .... पण समोर romantic दृश्य दिसण्याऐवजी एक gigantic आकृती उभी होती.... नुसती उभी नव्हती तर आपले आठ बाहु पसरून मक्षुच्याच दिशेनी पुढे सरकत होती . मक्षुनी आपले डोळे चोळत नीट बघितलं.... तो तर एक भलामोठा कोळी होता. आणि मक्षुला आपल्या जाळ्यात पकडण्यासाठी पूर्ण तयारीनिशी पुढे पुढे येत होता.

मक्षुची अवस्था अगदी.... ' मैं इधर जाऊँ ; या.उधर जाऊँ '..... अशीच झाली होती. पण आता असं सारखं जीव वाचवून पळत राहायचा तिला कंटाळा आला होता. तिनी आलेल्या संकटाला सामोरं जायचं ठरवलं. तिला शाळेत असताना फळ्यावर लिहिलेला सुविचार आठवला -' शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ' !!

त्या कोळ्याच्या डोळ्यांत बघत ती म्हणाली,"अरे अष्टभुज दानवा, माझ्यासारख्या एका सहा पायांच्या नाजूकशा अबलेला असा त्रास देताना तुला काहीच वाटत नाही का ? अरे, तुझा तो अमेरिकेतला भाऊ बघ... किती चांगला आहे ...दोनच पाय आहेत त्याचे....पण किती मदत करतो लोकांची ! जरा कोणी संकटात सापडलं की लगेच आपला लाल निळ्या रंगाचा युनिफॉर्म घालून ड्युटी वर हजर होतो.... म्हणूनच तर तिकडचे सगळे लोक त्याला 'friendly neighborhood' म्हणतात.... " मक्षु जोरजोरात असंच काहीतरी बरळत राहिली; पण त्या कोळ्यावर त्याचा काही परिणाम होत नव्हता. तो आपलं जाळं मक्षुवर टाकणार इतक्यात कोणीतरी बुंगाट स्पीडनी उडत आलं आणि मक्षुला उचलून घेऊन गेलं.....अगदी त्या कोळ्याच्या डोळ्यांदेखत !!

क्षणभर तिला वाटलं की तिचा जानूच आला तिला वाचवायला.... एकदम फिल्मी हिरो सारखा !! 'मेरा जानम.. मेरा जानू.. ' मक्षुनी मनातल्या मनात गाणं पण म्हटलं. थोडं अंतर उडून गेल्यावर एका सुरक्षित स्थळी तिच्या त्या तारणकर्त्यांनी तिला खाली उतरवलं. मक्षुनी अगदी कृतज्ञतेनी वर पाहिलं.... 'अरेच्या! ही तर त्या मगाचच्या मधमाशांतली एक दिसतीये!! म्हणजे मला वाटलं होतं तशा या दुष्ट नाहीयेत.. माझ्या मदतीसाठी आल्या आहेत दोघी.' मक्षुला हायसं झालं. तेवढयात ती दुसरी मधमाशी पण मक्षु च्या जवळ येऊन ठेपली. काही क्षण कोणीच काही बोललं नाही. मक्षुला असं भेदरलेल्या अवस्थेत बघून त्यातली एक मधमाशी म्हणाली," घाबरू नकोस. आम्ही तुला काहीही करणार नाही. आम्ही मगाचपासून बघतोय तुला... काही प्रॉब्लेम आहे का? कोणी तुझा पाठलाग वगैरे करतंय का? तू अशी लपत छपत का फिरतीयेस?"

त्या माशीचं बोलणं ऐकून मक्षुला थोडा धीर आला. तिनी त्या दोघींना सगळं काही अगदी घडाघडा सांगितलं...

क्रमशः
©प्रिया जोशी
हैदराबाद

Group content visibility: 
Public - accessible to all site users