जादूचे पेन

Submitted by तुषार विष्णू खांबल on 5 June, 2020 - 00:57

जादूचे पेन
शब्दरचना - तुषार खांबल

लहानपणीची गोष्ट आठवते
जादूच्या त्या पेनाची
जे लिहाल तुम्ही कागदावर
भेट घडवी तुमची त्या क्षणाशी

ते पेन शोधत मी आता
साऱ्या जगात फिरतो आहे
काय काय लिहायचे त्याने
याची यादी करतो आहे

लिहीन साऱ्या गमती-जमती
मित्रांसोबत धरेन ताल
पुढे जाण्याच्या धावपळीत
जणू आयुष्याचे झालेत हाल

शाळेमध्ये जमुनी सारे
वर्गामध्ये करू दंगा
आलेच कोणी ओरडाया
तर मिळुन सारे घेऊ पंगा

मधल्या सुट्टीत डब्बा संपवून
फुटबॉल खेळायला पळायचे आहे
खो-खो, कबड्डी आणि लंगडी
हे सारे खेळ खेळायचे आहे

"शांतीवन"च्या शिबिरामध्ये
पुन्हा सामील व्हायचे आहे
त्याच गावातल्या नदीवर
मनसोक्त डुंबून नहायचे आहे

गॅदरिंग मधल्या नाटकात
घ्यायचा आहे मला भाग
सर्वांशी गोड बोलून
मिटवायचा आहे लटका राग

ज्या व्यक्ती आज सोबत नाहीत
त्यांना पण एकदा भेटून घेईन
शिदोरी ह्या साऱ्या क्षणांची
भविष्यात मी सोबत नेईन

निरोप समारंभाच्या आधी मात्र
मला तिथून पळायचे आहे
फक्त गोड आठवणी घेऊन
पुन्हा जीवनाकडे वळायचे आहे

Group content visibility: 
Use group defaults

तुषारजी
छान लिहिली आहे कविता. मी पण शोधात आहे .मिळेल एक दिवशी .