'द्वि आणि चतुः'

Submitted by ज्येष्ठागौरी on 4 June, 2020 - 02:21

द्वि आणि चतु
१९७५ च्या मार्च महिन्यात बापूंनी आअीच्या विरोधाला न जुमानता घरी काळ्या रंगाची लॅब जातीची कुत्री आणली. तिचा विरोध होता अशासाठी की एकतर तिला प्राण्यांची विशेष आवड नव्हती आणि बापूंचा स्वभाव तिला चांगला माहिती होता.त्यांची प्राण्यांची आवड तिच्या पोटात अनेकदा गोळा उठवून गेली होती.आम्ही मुलं कुत्र्याचं सगळं करु, या आणाभाका किती फोल आहेत हेही तिला पक्कं ठाऊक होतं. पण तिच्या प्रत्येक शंकेला उत्तरं देत बापूंनी तिचा विरोध मोडीत काढला ,तसं माझ्या प्रभाकर काकांकडे आफ्रिकेत कोको नावाचं पाळलेलं माकड होतं आणि बापूही अधूनमधून गाय आणूया किंवा एखादा घोडा आणावा का या विचारात असण्यापेक्षा कुत्रं आणणं बरं असा सारासार विचार तिनं केला असणार आणि आमच्या घरात श्वान सम्राज्ञी प्रवेश करती झाली. बापू पुणे केनल क्लबचे पदाधिकारी असल्याने कुण्या पारशी घरातून pure breed राणी उर्फ बिजली आमच्या घरात अवतरली आणि पुढची दहा वर्षं आमच्याच नाही तर घरी येणाऱ्या प्रत्येकाच्या मनात राज्य केलंन. मे महिन्यात भेटणाऱ्या माझ्या चुलत भावंडांना आमच्यापेक्षा जास्त प्रेमानी भेटणारी ;माझ्या मैत्रीणी, संजयचे ,मोहनचे मित्र या सगळ्यांशी एकदम सख्य असणारी ,आमच्या बरोबर गुलाब रसवंतीत उसाचा रस प्यायला येणारी राणी ही मुलुखावेगळी होती.आंब्याची कोय चाटून पार पांढरी करणारी ,मटार काकडी बटाटाच काय पण मी पुस्तक वाचताना खात असलेली चिंचही ती स्वाहा करायची.
बिजली हे नाव फक्त वर्षभरात तिला शोभेनासं झालं आणि ती शांत स्वस्थ वृत्तीची गुटगुटीत बनली.बापूंकडे येणारा राबता खूप होता आणि त्यांना भुंकणारं , चिडकं कुत्र नको होतं ती अपेक्षा तिनं अशी पूर्ण केली की फेरीवाले अेकमेकांना सांगायचे की खुशाल जा वाड्यात, तिथलं कुत्रं अजिबात भुंकत नाही. पण बापूंना एक family member हवा होता आणि ती सगळ्यात महत्त्वाचा घटक बनली. सुदैवाने आमच्या एकत्र कुटुंबात सगळ्या मंडळींना तिच्या देखणेपणानी आणि गोड स्वभावानी मोहून टाकलं.
माझ्या इतर प्राणी मैत्राविषयी मला जी जवळीक वाटली त्याची नीव तिनंच घातली.
हळुहळू आईचा विरोध मावळला पण तिच्यावर राणीच्या खाण्याची जबाबदारी पडली आणि अर्थातच ती तिनं नेहमीप्रमाणे उत्तम पार पाडली . दिवसभर राणी आईच्या मागं नखांचा चकचक आवाज करत सोबत करत हिंडत असायची. राणीच्या एकंदर बडदास्तीकडे बघून आई समर्थाघरचं श्वान आणि त्या घरची सून यांच्यावरची एक चारोळी ऐकवायची. समर्थाघरचं श्वान अंगणात पहुडलंय आणि घरच्या सासुरवाशीण सुनेला सडा घालायचाय तर ती म्हणते " अहो अहो हाडा
बाजूला पडा
अंगावर पडेल
शेणाचा सडा
पण सततच्या सहवासानं त्या दोघींत एक अनाम सुंदर बंध तयार झाला.राणीच्या बाळंतपणात तिला शिरा करुन खायला घालणारी आई,सर्व पिल्लं गेली म्हणून वेदनेनं विलाप करणाऱ्या, कळवळणाऱ्या राणीची समजूत काढणारी आई ,राणीच्या शेवटच्या आजारपणात फार हलून गेली.राणीनं शेवटचा श्वासही आईजवळ घेतला.दोघी आपापल्या मर्यादा सांभाळत राहिल्या. अशीही नाती असतातच की माणसांत.
आई थोडी लांब असली तरी माझ्या मनातील चार पायांच्या व्यक्तित्वांबद्दलची भीती राणीनं तर घालवलीच पण अतीव प्रेम निर्माण केलं आणि मग शब्दशः मनातल्या प्राणी प्रेमाच्या झऱ्याला असंख्य स्रोत मिळाले. पुढं दोनदा बापूंबरोबर जाऊन सिंहाच्या पिल्लांनाही हाताळून झालं.
बापूंचं आणि तिचं द्वैत निराळं होतं ,पूर्वजन्मीचं संचित होतं.शब्दांत न सामावणारं. आम्हा मुलांसारखंच तिच्यावर कधीही डोळेसुद्धा त्यांनी वटारले नाहीत.त्यांच्यात प्राणी सांभाळायसाठी लागणारा ठहराव उदंड होता.
बापूंनी तिचं सगळं केलं,तिची आजारपणं ,तिचं बाळंतपण. सगळं सगळं.तिच्या शेवटच्या आजारपणात तिचे डॉक्टर तिला घरी सलाईन लावताना म्हणाले की भाग्यवान आहे तुमचं कुत्रं.तेंव्हा बापूंनी त्यांना सांगितलं की भाग्यवान आम्ही आहोत की ती आमच्या आयुष्यात आहे.तिला शेवटी Put to Sleep ची वेळ यायला लागली तेंव्हा बापूंनी स्पष्ट नकार दिला आणि घरच्या माणसासारखं तिचे लिहलेले श्वास संपेपर्यंत सांभाळ करायची ग्वाही दिली, आयुष्यभर तिनं त्यांच्यावर जो विश्वास ठेवला तो त्यांना मोडणं शक्य नव्हतं. पण राणीनं ती वेळ न आणून बापूंना सोडवलं.
जगात किती नाती अशी असतात जी या सगळ्यांच्या परे असतात.बापूंना प्राणी "पाळणे" हा शब्द मान्य नव्हता. शब्द पाळायचा आणि प्राणी सांभाळायचा असं म्हणायचे.
आजही तिची मधाळ आठवण सरसरुन येते आणि एक अदृश्य गोडवा मनात पसरतो.
मी कोण आहे काय शिकलेय काय कमवतेय, माझी काय पत आहे या कशाही गोष्टीशी तिचं काही देणंघेणं नव्हतं.तसं कुठल्याच चतुष्पादाचं नसतं. ती माझी असण्यापेक्षा मी तिची होते ,या जगात असं नातं किती जणांशी असतं?मला सातवीत चाचणीत खूप म्हणजे खूपच कमी मार्क मिळाल्यावरचा अपमान या घडीपर्यंत कोणालाही कधीच सांगू शकले नाही पण मुसमसून फक्त तिलाच सांगू शकले आणि तिनं माझी मूक समजूत घातली.
कोणावरचा तीव्र राग ,अनामिक भीती तिच्या सहवासात नष्ट व्हायची. तिला मिठी मारण्यात काय सुख होतं,तसंच सुख ती पहाटे पांघरुणात येऊन पहुडायची त्यात होतं.तिच्या मखमली कानांवर गाल घासण्यात होतं.मी पुस्तकं वाचत असताना ती पायात बसून असायची, मी तिला गाणी म्हणून दाखवायची , संजयबरोबर टीव्हीवर म्हणजे खरंतर टीव्ही कडे पाठ करुन ती क्रिकेट पाहायची. बापू घरात असेपर्यंत त्यांच्या मागे हिंडायचा तिचा वसा शेवटी अगदीच चालता येईना तोपर्यंत पाळला.मोहन जेंव्हा जेंव्हा पुण्यात असायचा तेंव्हा तेंव्हा तो प्रयोगाहून येईपर्यंत बापूंबरोबर तीपण जागी असायची. आमच्या सगळ्यांच्या आयुष्यातील एक अदृश्य दैवी आवरण होती .
बापू आमच्याकडे येणाऱ्या प्रत्येक माणसाला श्वान पालन या विषयावर जरुर सांगायचे. लहान मुलं असतील तर हात लावायला लावून भीती घालवायचे.श्वान प्रेमी भेटलाच तर मग खलासच.मागे शेखर गोडबोले सांगत होता की त्याचे मांजर प्रेमी वडील ,आलेला मित्र कसा आहे हे,त्याचं मांजराशी वागणं कसं आहे त्यावर ठरवायचे. बापूंचंही तसं होतं म्हणून तर बापूंनी जर्मनीत गेल्यावर काही एक दोन ठिकाणं गाळून जर्मन शेफर्ड चा डॉग शो बघितला आणि मीसुध्दा प्राणीप्रेमींना झुकतं माप देते हेही खरंच आहे आणि जर कधी चुकून Tatoo काढलाच तर नक्कीच पंजे असतील हे वेड लक्षात ठेवून दिलिप अमितानी अमेरिकेत मला भल्या मोठ्या पेट स्टोअर ची सैर करवली. सुदैवाने जोडीदार मिळाला तो अस्सल मार्जार प्रेमी,चांगली चार चार पर्शियन मांजरं सांभाळलेला.
मी लहानपणी एकदा बंडा कडुसकरांच्या मँकीशी खेळून भयानक अवतारात घरी आल्यावर सणकून बोलणी खाल्यावर मी मँकीची आई आहे असं सांगून आईला हतबल केलं होतं आणि माझ्या लेकीनं मला वरच्या मजल्यावर राहणारी मालाकाकू, हीच कँथीची आई असं सांगून jaw drop केला होता आणि तिनं आणि धाकट्यानं , मी अनेकदा सावधान करुनही सगळ्या काळज्या घेऊनही दिसेल त्या सर्व कुत्र्यांना, मांजरांना हात लावून चावून घेवून सुया टोचून घेतल्यात.काळजी वाटून त्यांना अधिक काळजी घ्यायला सांगताना "ती" ज्योत पेटली ही खूणगाठ बांधली. खरं तर
वसंतराव देशपांडे यांची लारा, निलीमा ताईचा भीम,नाईकांचा कान्होजी ,मनोहरमामाचा लौकिक, धनूची एल्सा,सनतचा अँलन, लीलाकाकूचे टायगर आणि रेक्सी,सिधयेंचा प्रिन्स,
कोल्हापूरचा ब्राउनी आणि मार्शल,विजया वहिनीचा शेरा,कीर्ती शिलेदार चे पंचम आणि पागल,चंद्रमुखी,कँथी, सुजाताची शेरी आणि डॉबी,सुषमाचा गुरु आणि काकूचे गट्ट्या आणि पिंगळ्या चौबळांची फ्लोरिडा, मावशीचा चित्तरंजन,आमचा पुरुषोत्तम आणि टिल्ल्या,केतनची मिंटी,चुनचुनी,सुचूची बेन,अजित अनुचे मँगो आणि कँडी ,अपू आणि सुचित्राची सनबीम ब्लँकबीम गुब्बू,मिलिंदचे लॉर्ड जिम ,जिमी,डिकी, एल्सा आमचा ब्लॅकू गोटू पिरु काळू पांढरु ही मार्जार सेना ,
या सगळे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष मला भेटले आहेत ,माझ्या मनाच्या छोट्या छोट्या कप्प्यात त्यांनी त्यांची छोटी छोटी पण पक्की घरं केली आहेत.त्या घरांमध्ये फार छान वातावरण आहे निर्व्याज प्रेमाचं. मनातल्या पोकळ्या भरल्यात,अपमानाचे घाव पुसलेत,चुकांच्या कबुल्या मायेनं मागं टाकल्यात. या सगळ्यांच्या प्रेमाचं जग मला राणीनं खुलं करुन दिलं.
बापूंनी जर तिला आणलं नसतं तर मला या विलक्षण जगाची कशी ओळख झाली असती , माझ्या काळजात केवढं रिकामपण राहिलं असतं आणि मला त्याची जाणीवही झाली नसती.
खूप शब्द भळाभळा वाहणाऱ्या या जगात, माझ्यासकट,बहुतांश माणसं प्रत्येक गोष्ट,भावना विचार व्यक्त करण्यात मग्न असताना मला मात्र माझ्या ह्या मूक मितवांची आठवण येते.मूकपणे किती काय करता येतं, अथांग प्रेम,असीम लोभ,सांत्वन, समजूत, निचरा होऊन मोकळं झालेलं मन, हे सगळं विसरलेच होते मी.खरंतर असं बहुदा कोणी नसेल ज्याच्या मनात एखाद्या प्राण्याची सुंदर आठवण नसेल,कुठंतरी एक स्नेहाची तार झंकारली नसेल.
आमच्या घरातही तीन भिन्न वेगळे प्रवास झाले. तिन्ही प्रवास अधोरेखित करणारे, द्वि आणि चतु दोघांच्या प्रेमाचे,एकमेकांच्या सहवासात मिळत असलेल्या रेशीम क्षणांचे.
आईचा एक वेगळा प्रवास, मन- विरोधातून भूतदयेकडे आणि तिथून अव्यक्त दयार्दपणाकडे, अधिक चांगल्या माणसाकडे आणि बापूंचा प्रेमाचा ,आकाश व्यापून टाकणारा, लोभाचा अक्षय्य नात्याचा,आणि माझा...चार पाय आणि मखमल दिसताक्षणी उजळणारा ! शेपूट आणि उभे कान दिसताक्षणी डोळ्यात चमकणाऱ्या चांदण्याचा! द्वि आणि चतु दोघांनी समृद्ध केलेल्या आयुष्याबद्दल फक्त कृतज्ञता व्यक्त करण्याचा!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काय बोलणार एकीकडे तुमचा हा सुंदर लेख आणि दुसरीकडे दोन दिवसापासून सतत वाचण्यात येत असलेली मल्लपुरम ला झालेली हत्तीणीची हत्या..

Minal i think humanity has died million times...How could anyone do that...I feel shameful for being part of such a cruel species...

खूप्च सुरेख लिहिलंय. काही शब्दप्रयोग भलतेच आवडले. अन चतु चा अनुभव अन सहवास असल्याने फारच मनाला भिडला लेख.

khup khup relate zala, pranyanitka nirvyaj prem kunihi kadhihi karu shakat nahi kharay!
mazya chatu- mitranchi athvan zali Happy

I have got so much shit on this site due to my love for dogs but could never put across what I really felt. You have written it so beautifully. Much respect and love for your parents. Wept buckets remembering our weanie daschund while reading this.

सुंदर लेख! आमचा मल्टीस शिट्झु आहे मोती नावाचा. तुमच्या मातोश्री आणि मी एकाच बोटीत, तंतोतंत! Lol
आता ते मी आणि मोतीने आमचं नातं मान्य करून टाकलं आहे! मी घरी आले की तो धावत येतो आणि माफक चाटतो, तेही फक्त पायांना!

अमा, लिहा न तुमच्या विनी बद्दल आणि स्वीटी (?) बद्दल! तुम्ही मस्त लिहाल!

अमा आणि तुम्ही इंग्लिशमध्ये का बोलताय? Lol (कन्फ्युजड बाहुली) एव्हढया सुंदर लेखावर प्रतिसाद इंग्रजी भाषेत वाचायला मजा येत नाही. कृ गै न!

बापूंना प्राणी "पाळणे" हा शब्द मान्य नव्हता. शब्द पाळायचा आणि प्राणी सांभाळायचा असं म्हणायचे.>>>अतिशय आवडला शब्द,प्राण्यांची फारशी आवड नाहीच ,पण पाळणे शब्द पण आवडत नव्हता अगदी दाताखाली खडा आल्या सारखा वाटायचा पण दुसरा पर्यायी शब्द सापडत नव्हता,यापुढे पाळणे शब्द बाद

किती छान लिहिलय.
आमचा चिकू (आमचं भुभू) पण असाच सगळ्यांना जीव लावतो. कायम बरोबर असतो आमच्या सगळ्यांच्या Happy