कोरोना-एक काळरात्र

Submitted by चंद्रमा on 3 June, 2020 - 13:11

चिनी प्रदेशातून बनून आला
रौद्ररूपी कोरोणा सैतान!
संपूर्ण विश्वावर झडप घातली,
अन् घडविले मृत्यूचे थैमान!!

होत्याचे नव्हते ते झाले
मोडून पडले गतिमान चक्र!
जनजीवन विस्कळीत झाले,
मंदीचे झाले संकट वक्र!!

पोटाची खळगी भरण्यासाठी
मन झाले छिन्नविछिन्न!
उपासमारीने हाल बेहाल झाले,
पण मिळेना भुकेल्यांना अन्न!!

जीव आपला मुठीत धरून
पायपीट करणाऱ्यांचा कर्दनकाळ!
गर्भवती असणाऱ्या माऊलीचेही,
जन्माला आले रस्त्यावर बाळ!!

प्रेतांचा ढीग साचला
वस्तुस्थिती बिघडली भयाण!
श्र्वासांचे झटपट बंध तुटले,
तुडुंब भरून आले स्मशान!!

नियतीने मातृछत्र हरवले
कोरोनाने पितृछत्र दुरावले!
अस्मानी संकट कोसळले,
डोळ्यातले अश्रू डोळयातच विरले!!

Group content visibility: 
Public - accessible to all site users