मुहारीब

Submitted by Theurbannomad on 2 June, 2020 - 19:47

अहमद आणि त्याचे खास सरदार अहमदच्या मातीच्या गढीमध्ये मुख्य खलबतखान्यात एकत्र जमले होते. अडीचशे-तीनशे कुटुंबांची ती टोळी अरबस्तानाच्या एका मोठ्या ओऍसिसच्या आजूबाजूला ऐसपैस पसरलेल्या सालेम गावामध्ये सुखाने राहत असली, तरी आजूबाजूच्या अनेक छोट्या मोठ्या टोळ्यांनी त्यांना हैराण करून सोडलं होतं. गोड्या पाण्याचा भाला मोठा स्रोत, खजूर, ऑलिव्ह, अंजीर, डाळिंब अशा अनेक फळांच्या बागा, बारमाही पाणी असल्यामुळे पिकू शकणारे भाज्यांचे मळे आणि दूधदुभत्यामुळे आलेली समृद्धी यामुळे ते गाव आसपासच्या अनेक टोळ्यांना आपल्या आधिपत्याखाली आलेलं हवं होतं. गावात वर्षानुवर्षे चालत आलेली कलेची परंपरासुद्धा इतकी समृद्ध होती, की तिथे तयार होणारे गालिचे, चटया, चित्रं आणि लाकडी खेळणी दूरदूरच्या बाजारात विक्रीसाठी जात होती. गावाची सुसज्ज फौज जरी नसली, तरी या गावावर चालून आलेली कोणतीही टोळी कधीही पुन्हा दिसली नाही, अशी त्या परिसरात आख्यायिका होती.

अहमदला आज आपल्या खलबतखान्यात एका महत्वाच्या विषयावर आपल्या मुख्य सरदारांना सावध करायचं होतं. गावापासून काही अंतरावर खलिसी टोळीच्या लोकांनी बाजारातून चाळीस उमदे घोडे खरेदीची केल्याची बातमी त्याला त्याच्या काही लोकांनी सांगितली होती. खलिसी टोळी अतिशय क्रूर आणि कपटी टोळी म्हणून प्रसिद्ध होती. मोत्याच्या व्यापाऱ्यांपासून ते छोट्या मोठ्या यात्रेकरूंच्या तांड्यापर्यंत कोणालाही या टोळीने खंडणी वसूल केल्याशिवाय त्या परिसरातून प्रवास करू दिलेला नव्हता. टोळीचा प्रमुख होसाम आपल्या रानटी आणि निष्ठुर वागणुकीसाठी प्रसिद्ध होता. असं म्हंटलं जायचं, की त्याने ठार मारलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या नावाचं गोंदण तो आपल्या शरीरावर करून घ्यायचा. मागच्या काही वर्षात त्याचे दोन्ही हात आणि पाठ गोंदणाने भरून गेली होती, अशी वदंता सगळीकडे पसरलेली असल्यामुळे त्याला आणि त्याच्या टोळीला सगळे जण वचकून होते.

अहमदने खलिसी टोळीचा विषय काढताच सगळ्यांच्या चेहऱ्याचा रंग उडाला. खलिसी टोळीची नजरआपल्या गावावर पडलेली असेल, तर आपल्यासाठी तो खूप मोठा धोका आहे, किंबहुना अस्तित्वाचाच प्रश्न आहे हे सगळ्यांना समजत होतं. ही टोळी नेस्तनाबूत करणं त्या परिसरातल्या कोणालाही जमलेलं नव्हतं. या तळीचे लढाईचे कोणतेही कायदेकानू नव्हते. साम-दाम-दंड-भेद यापैकी कशाचाही वापर करून समोरच्या शत्रूवर विजय मिळवायचा आणि भर चौकात एक एक जिवंत व्यक्तीचा शिरच्छेद करून ते गाव निर्वंश करायचं हा खलिसी टोळीचा लौकिक होता.

" जहाँपनाह, आपल्या गावात मुळात चारशे-पाचशे पुरुष...आपण लढायला उभे राहिलो तरी खलिसी टोळी आपल्याहून कमीत कमी दुप्पट मोठी...त्यात त्यांच्या टोळीचे लोक बायका-मुलांना सुद्धा सोडत नाहीत....आपण कितीही लढायचं म्हंटलं तरी निभाव कसा लागणार?"

" हुजूर, आपल्या गावाचं भयाण कब्रस्तान करून जातील ते खलिसी.....ते रानटी आहेत, क्रूर आहेत...."

" मला भीती आहे की आपल्या गावच्या स्त्रिया आणि मुलं त्यांचे गुलाम होऊन या गावातून कायमचे बाहेर हाकलले जातील...त्यापेक्षा मी आणि माझे घरचे सगळे खुदकुशी करून स्वतःला सोडवू..."

अहमदने एक दीर्घ श्वास घेतला. त्याला या प्रतिक्रिया अपेक्षित होत्या. मनात कसलासा विचार करून त्याने सगळ्यांना एकत्र बोलावलं होतं. अखेर सगळ्यांच्या प्रतिक्रिया आल्यावर त्याने आपल्या आसनावर खुरमांडी घातली. हातात सरबताचा पेला भरून घेतला. एका दमात घटाघटा तो पेला आपल्या घशात रिकामा केला. आपल्या सगळ्या सरदारांकडे त्याने एक एक करून नजर फिरवली आणि बोलायला सुरुवात केली.

" गेली कित्येक वर्ष आपल्या गावावर हमला झालेला नाही....इतिहासात कोणालाही आपलं गाव जिंकता आलेलं नाही. गेली कितीतरी वर्षं लढाईत गावातल्या एकालाही मौत नसीब झालेली नाही....म्हणून सगळ्यांना भीती वाटते आहे का?"

" सरदार, याआधी गावावर झालेला प्रत्येक हमला गावकुसाबाहेरच्या लढाईत आपल्या पूर्वजांनी थोपवून धरला होता. प्रत्येक जण दहा दहा लोकांना भारी पडलेला होता...पण खलिसी टोळी बदनाम आहे त्यांच्या विश्वासघातासाठी....वो किसी भी हद तक जाएंगे जीतने के लिये..." मुख्य सरदार अदनानने खुलासा केला.

" गुस्ताखी माफ, लेकिन हम डरपोक नही है....अनेक वर्षांपासून आपण कोणी हातात समशेर घेतली नाही याचा अर्थ हा नाही की तिला गंज चढलाय...आपण घाबरायचं कारण काय? " त्या सगळ्यांमधला सगळ्यात तरुण सरदार बिलाल अचानक तावातावाने बोलायला लागला. " आपण लोक कायर आहोत का? लढून मेलो तर जन्नतमध्ये जाऊ...खलिसी टोळी प्रबळ असली तरी आपले इरादे बुलंद असले तर आपण त्यांनाही हरवू..."

बिलालच्या या वक्तव्यावर बाकीचे सरदार उखडले. " आमच्या अनुभवाचे बोल आहेत हे बिलाल...तुला अजून जवानीचा जोश अकलमंदीपेक्षा मोठा वाटतो...पण जोश आणि होश यात फरक असतो..." प्रकरण तापायला लागल्याची चिन्ह दिसायला लागली तशी सुलतान अहमदने आपलं हात उंचावून सगळ्यांना शांत केलं.

" मंजूर....तुमच्या भीतीमागच्या भावना रास्त आहेत...पण तरीही एकदा विचार करा...तुम्हाला खरंच वाटतं की आपल्या सगळ्यांच्या मनगटाच्या जोरावर आपण जिंकू शकणार नाही?" सुलतानाने प्रश्न केला.

" हुजूर, मतलब हम लडेंगे? " सगळ्यांनी चकित होऊन अहमदकडे पाहिलं.

अहमदने दीर्घ श्वास घेतला.

" आज मी तुम्हाला एक अतिशय गुप्त गोष्ट सांगणार आहे. मला अशा आहे तुम्ही या चार भिंतींबाहेर काहीही जाऊ देणार नाही...मला पवित्र कुरणावर हात ठेवून तुमच्याकडून हि कसम हवी आहे. "

" मंजूर" म्हणून प्रत्येकाने खोलीतल्या कुरणावर हात ठेवून शपथ घेतली.

" माझ्या अब्बाजाननी मला ही गोष्ट सांगितली, आणि त्यांना त्यांच्या अब्बाजाननी. अल्लाह त्यांना जन्नत बख्शेल...आपल्या गावाकडे वाकडी नजर करून जे बघतात, त्यांना आपल्या गावाचं रक्षण करणाऱ्या एका तिलिस्मी ताकदीचा सामना करावा लागतो...त्या ताकदीचा तोड कोणाकडेही नाही कारण ती ताकद माझ्या बडे अब्बाजानना खुद्द फरिश्ते देऊन गेले होते..."

" कैसी ताकत?" सगळ्यांनी डोळे विस्फारून अहमदकडे बघायला सुरुवात केली.

" आपल्या शाही कारागिरांमध्ये जे मुख्य कारागीर आहेत ना, - चित्रकार मुनीर - त्यांची ताकत आहे ती...ते जे चित्रं काढतात, त्या चित्रांमध्ये एक खास बात आहे. आपल्या गावात जो कोणी अल्लाहला प्यारा होतो, त्याच्या शरीरातून खून आणि बाल मुनीर काढून घेऊन जातो...दफन करण्याआधी. त्यानंतर त्याचं चित्रं तो काढतो. त्या चित्रात रंग असतो त्या केसांच्या राखेचा आणि रक्ताचा....त्यामुळे त्या त्या माणसांची रूह त्या चित्रांमध्ये सामावली जाते. मला माझ्या अब्बाजाननी दिलेल्या किताब-ए-इंद्रजालमध्ये त्या चित्रांना जिवंत करायचा मंत्र आहे. लढाईआधी मी तो मंत्र म्हणून त्या सगळ्या रुहानी ताकदींना जिंदा करतो. त्यांच्यासमोर कोणत्याही सैन्याचा टिकाव लागू शकत नाही...आपल्या सैन्याचं कमीत कमी नुकसान होतं या सगळ्यामुळे....."

त्या सरदारांच्या चेहेऱ्यावर एकाच वेळी आश्चर्य, आनंद आणि भांबावलेपण अशा सगळ्या भावनांचा मिलाफ झालेला दिसत होता. त्यांच्यासाठी हा सुखद धक्का असला, तरी त्यांना या सगळ्या प्रकारावर विश्वास ठेवणं जड जात होतं. आजवर आपण जे लढलो, त्याला पराक्रम म्हणायचं की औपचारिकता असाही प्रश्न त्यांच्या मनाला सतावू लागला. शेवटी प्रत्येकाने त्या किताबाचं दुरून दर्शन घेतलं आणि काहीशा गोंधळलेल्या अवस्थेत अहमदच्या निरोप घेऊन एक एक करत ते सरदार गढीबाहेर पडले.

एकटा बिलाल आपल्या घराकडे जात जात मनाशी कसल्यातरी गोष्टींचे आडाखे बांधत होता. हा बिलाल अख्या गावाला महत्वाकांक्षी आणि आपलं इप्सित साध्य करण्यासाठी शौर्याची परिसीमा गाठणारा म्हणून परिचयाचा होता. त्याच्या लेखी नियम, कायदेकानू अशा गोष्टींना महत्व होतं. येनकेन प्रकारे आपलं विजय व्हावा आणि आपली कामगिरी सगळ्यात उठून दिसावी, जेणेकरून मोठमोठी सत्तापदं आपल्याला मिळू शकतील अशा विचारांचा हा तिरस्कार करत असे. अर्थात लढवैय्या शूर असला तरी काहीसा उतावळा असल्यामुळे अहमदला त्याला काबूत ठेवण्यासाठी अनंत कसरती कराव्या लागत. त्याची स्वामीनिष्ठा आणि शौर्य वादातीत असल्यामुळे अहमदला तो मनापासून आवडत होता.

आजसुद्धा बिलालच्या मनात काही वेगळेच विचार शिजत होते.

' मुनीर आपलं चांगला दोस्त आहे...त्याला काहीतरी करून आपण आपल्या बाजूला ओढलं आणि त्याच्या त्या चित्रांचा मागोवा काढला, तर आपण त्या चित्रांच्या रूपाने अहमदच्या सगळ्या सैन्याचा मालक होऊ शकू...' त्याच्या मनात विचार घोळत होते. ' त्या सैन्याचा मी म्होरक्या होऊन लढलो तर अरबस्तानातल्या सगळ्यात क्रूर टोळीला नेस्तनाबूत करायची कामगिरी माझ्या नावापुढे लागेल आणि या डरपोक सरदारांना मी तोंडावर सांगू शकेन, की जिगर असल्यावर काहीही झालं तरी भीती वाटत नसते....." बिलाल आपल्या मनाशी झगडा करत होता. त्याचं एक मन त्याला या सगळ्यापासून परावृत्त करत असलं, तरी त्याच्या मूळ स्वभावाला अनुसरून त्याने आततायीपणे मुनीरच दरवाजा ठोठावायचा इरादा मनाशी पक्का केला.

दुसऱ्याच दिवशी सकाळच्या आन्हिकांनंतर त्याने थेट मुनीरच्या घरचा रास्त तुडवायला सुरुवात केली. मुनीर आपल्या घराच्या अंगणात आपल्या कुंचल्याचे फटकारे ताणून चौकटीत बसवलेल्या कापडावर उमटवत बसलेला होता. त्याने बिलालचं आदरातिथ्य करून त्याला घरात नेलं. काही वेळात दोघे घराच्या दिवाणखान्यात गप्पा मारायला बसले.

" मुनीर, काळ आम्हाला तुझ्या आणि सरदार अहमदच्या त्या गुपिताबद्दल समजलं.खुद्द जहाँपनाहांनी आम्हाला सगळ्यांना खुलासा केलं...क्या बात है दोस्त...काय कला आहे तुझ्याकडे..."

" गुस्ताखी माफ, पण त्यांनी तुम्हाला सांगितलं हे जरी खरं असला, तरी माझ्याकडून तुला विस्ताराने काहीच समजणार नाही. माझ्या घरी माझ्या अनेक पिढ्या या राज्याच्या रक्षणाकरता हे काम इमाने इतबारे सुलतानांची करत आल्या आहेत...ते काम माझ्यासाठी असं गुपित आहे, जे मी माझ्या बिवीलाही सांगितलेलं नाही..."

" दोस्त, मला फक्त तुझ्या हातून चितारलेली ती चित्रं बघायची आहेत...मला बाकी काहीही नको..."

" ठीक आहे...पण मी तुला एकदाच त्या चित्रांचा दीदार करायची परवानगी देतो आहे...दोस्त आहेस म्हणून. आणि ही गोष्ट आपल्यातच ठेव..." असं म्हणून मुनीरने आपल्या घराच्या मागील बाजूस असलेल्या एका चोरदरवाज्यातून बिलालला आपल्या तळघरात नेलं. तिथे जवळ जवळ एक हजार चित्रं ठेवलेली होती. त्यात त्या गावातल्या प्रत्येक मृत पुरुषाचं पूर्ण चित्रं त्याच्या घोड्यासकट आणि चिलखत-शिरस्त्राणासकट चितारलेलं होतं. " सुलतानांच्या त्या किताबात त्यांनी आपल्या बोटाने रक्ताचा एक थेंब टपकवला, की हि चित्रं जिंदा होतील. जोपर्यंत सुलतान किताब बंद करत नाही, तोपर्यंत हे सगळे जण जिन्ना बनून त्यांच्या दुनियेतून आपल्या दुनियेत येतील....जिसके खून से ये जिंदा हो जाते है, उसीकी ये सुनते है...याउप्पर माझ्याकडून काही अपेक्षा ठेवू नकोस "

बिलाल आपल्या घरीही आल्यावर विचार करत बसला. ' जिसका खून उसकी सेना...मग माझ्या रक्ताचा थेंब मी त्या किताबात टाकला तर ही सेना माझाच हुकूम मानेल...मग सुलतान अहमद तरी मध्ये कशासाठी हवे? काहीही करून ती किताब मी मिळवली, तर मी सहज शक्तिमान होऊ शकेन...एकट्यानेच मी खलिसी टोळीचा बंदोबस्त करेन आणि माझा पराक्रम लोकांना दिसला की सुलतानांना मी हक्काने सांगू शकेन, की ताज्या दमाच्या तरुण लोकांची फौज आता नव्याने करण्याची गरज आहे....जुन्या सरदारांना आता नवीन पिढीच्या हाती धुरा सोपवायला सांगणं गरजेचं आहे अन्यथा हे राज्य हळू हळू रसातळाला जाईल.....' त्याच्या विचारांमध्ये भविष्यावरची नजर आणि आपल्या राज्याबद्दलचं प्रेम ओसंडून वाहात होतं . अखेर त्याने रात्री गपचूप सुलतानाच्या गढीत प्रवेश करून त्या किताबाची चोरी करायचा बेत पक्का केला. त्याला सुलतानाच्या गढीची इथंभूत माहिती असल्यामुळे पहारेकरी चुकवून आत कसं शिरायचं, हे चांगलंच ठाऊक होतं.

गढीच्या उत्तरेकडून झुडपांच्या आडोशाने त्याने कुंपणाची भिंत ओलांडली. कधीच्या चोरदरवाज्याला बाहेरून कोणत्या पद्धतीने उघडायचं असतं, याची माहिती असल्यामुळे त्याने हळूच तो दरवाजा उघडून आत प्रवेश केलं. पहारेकऱ्यांच्या नजरा चुकवून तो हळूच अहमदच्या खास दरबारापाशी आला. त्याचं दरबाराच्या आत असलेल्या एका चोरदरवाज्याच्या मागे एका गुप्त खोलीमध्ये ती किताब होती. कोणी नसल्याचा कानोसा घेत त्याने तो दरवाजा गाठला आणि हळूच त्या गुप्त खोलीच्या आत प्रवेश केला. ती किताब त्याला समोर एका कपड्यात गुंडाळलेली दिसली. ती उचलून त्याने आपल्या अंगरख्यात लपवली आणि आल्या पावली तशाच पद्द्धतीने तो गढीबाहेर आला. आडोशाने चालत कोणाच्याही नजरेस आपण पडणार नाही अशा बेताने त्याने हळू हळू आपलं घर गाठलं.

दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे आपल्या अंगावर त्याने शिरस्त्राण चढवलं. घोड्याला पाणी पाजलं. रिकीब चढवली. पाठीवर भले, ढाल, हातात समशेर, कमरेला कट्यार अशा योद्ध्याच्या थाटात त्याने घराबाहेर पाय ठेवले. आपल्या पूर्वजांना आणि सुलतानाला स्मरून त्याने किताब उघडून कट्यारीने आपल्या अंगठ्यावर चीर देऊन रक्ताचे दोन थेंब त्यात टपकवले. अचानक जमीन थरथरून आजूबाजूला वाळूची वावटळ तयार झाली. काही क्षणात त्याला हजारभर सैनिक त्याच्या घरासमोर प्रकट झालेले दिसले. त्याने सगळ्यांच्या समोर आपलं घोडा नेला आणि आक्रमणाची हाक दिली. धूळ उडवत ते सैन्य गावाच्या वेशीबाहेर पडलं. लोकांना मात्र एकटा बिलाल प्रचंड धुळीच्या वावटळीत बाहेर पडताना दिसला आणि ते दृश्य बघितल्यावर त्यांची पळापळ सुरु झाली.

सुलतानाकडे ही बातमी जाताच तो खडबडून जागा झाला. त्याचे सरदार लगबगीने गढीमध्ये जमले. त्यांच्या डोळ्यात राग ओतप्रोत भरलेला होता. बिलालला विश्वासघातकी समजून ते अद्वातद्वा बोलत होते. सुलतान आल्यावर प्रत्येकाने त्याला बोल लावून घेतले. सगळ्यांच्या मते बिलालने सुलतानाच्या विरोधात जाऊन खलिसी टोळीला सामील व्हायच्या दृष्टीने कोणालाही काहीही ना कळू देता एकट्याने गावाबाहेर कूच केली होती...अखेर सुलतानाने सगळ्यांना शांत व्हायला सांगून आवंढा गिळला.

" सगळे जण शांत राहा....तुम्हाला मला काही सांगायचं आहे...मगाशीच मला समजलं, की ती किताब माझ्या दालनातून गायब झाली आहे..." ते ऐकून सगळ्या सरदारांची पाचावर धारण बसली.

" हुजूर, एक बुरी खबर है...मुनीर आया है. " एक पहारेकरी लगबगीने आत आला. मुनीरला बोलावल्यावर त्याने बरोबर आणलेलं एक चित्रं सगळ्यांना दाखवलं.

" हुजूर, माझ्या सगळ्या चित्रातले सैनिक गायब आहेत..." मुनीर घाबरत घाबरत बोलला. त्याने आदल्या दिवशी बिलाल आल्या घरी आल्याची सविस्तर बातमी सगळ्यांना पुरवली.

सुलतान अहमद अचानक विचारात गढला. बाकीच्यांना काहीही कळेनासं झालं. सुलतानाने सगळ्यांना युद्धाची तयारी करायला पाठवलं. बघता बघता संध्याकाळपर्यंत गावाच्या वेशीबाहेर चारपाचशे सैनिकांचा गराडा तयार करून सुलतान आणि त्याचे सरदार खलिसी टोळीची वाट बघायला लागले.

तीन दिवसांनी दूरवरून धुळीचे लोट दिसायला लागले. हळू हळू त्या धुळीतून बिलालची आकृती स्पष्ट दिसायला लागली. तो एकटाच तितका दिसत असल्यामुळे सुलतान आणि बाकीचे सरदार गोंधळले. अचानक सुलतानाने आपलं घोडा पुढे नेला. बाकीच्यांनी अडवायचा प्रयत्न करूनही त्याने कोणाचं काही ऐकलं नाही. बिलाल सुलतानाला सामोरा आला आणि त्याने खलिसी टोळीच्या प्रमुखाचे शीर सुलतानाच्या पायावर ठेवलं.

एकट्या बिलालने अख्या खालिसी टोळीला नेस्तनाबूत केल्याची कुजबूज सैनिकांमध्ये सुरु झाली. सरदारांनी डोळे विस्फारून ते दृश्य बघितलं आणि तोंडात बोटं घातली. सगळ्यांनी बिलालला वाजत गाजत गढीवर नेलं. तिथे त्याचा भव्य सत्कार झाल्यावर लोकांनी त्याच्या नावाचा जयजयकार केला. अखेर हे सगळं बघून अदनान घसा खाकरात उठला आणि त्याने सुलतानाला आपल्याला बोलू द्यायची विनंती केली. सुलतानाने त्याला परवानगी देताच त्याने बिलालकडे एक कटाक्ष टाकत बोलायला सुरुवात केली..

" हुजूर माफी असावी...बिलालच्या जयजयकारात एक गोष्ट आपण विसरत आहोत...त्याने गुन्हा केला आहे...आपल्या गढीत येऊन आपल्या किताबाची चोरी करून त्याने आपली जादुई सेना जिंदा केली आणि तिच्या जोरावर खलिसी टोळीवर फतेह मिळवली....मायावी सेना असेल तर हे काम कोणीही करू शकलं असतं....या सगळ्या जयजयकारात त्याने केलेला गुन्हा लपला तर उद्या आपल्या राज्यात त्याच अनुकरण करणारे लोक पैदा होतील..." अदनान आपली सगळी मळमळ बाहेर काढत बोलला.

" अदनान, एक गोष्ट मला सुद्धा सांगायची आहे...त्या किताबाच्या जादूबद्दल मी खरं बोललो असलो, तरी मी स्वतः अनेक वेळा त्या किताबात माझ्या रक्ताचा थेंब टाकून आपल्या पूर्वजांच्या त्या सैन्याला जागृत करण्याचा प्रयत्न केलेला आहे जो कधीच सफल झाला नाही...तेव्हा खरोखर ती मायावी सेना बिलालने आपल्याबरोबर नेली होती का हे मला माहित नाही...." हे ऐकल्यावर दरबारात अचानक शांतता पसरली.

बिलाल उठून उभा राहिला. आधी त्याने आपल्या कृत्याबद्दल सगळ्यांची क्षमा मागितली. त्यानंतर त्याने आपण कशा पद्धतीने सेना जागृत केली याच सविस्तर वर्णन केलं. त्याच्या घरातून एकाने जाऊन ती किताब सुद्धा आणली. शिवाय रिकाम्या चित्रांच्या चौकटी सुद्धा बिलालच्या बोलण्यात तथ्य असल्याची खूण दर्शवत होत्याच...हे कोडं कोणालाही सुटत नसल्यामुळे अखेर सुलतानाने डोळे मिटून आपल्या अब्बा आणि बडे अब्बाना मनोभावे साद घातली.

दरबारात अचानक लक्ख प्रकाशात एक आकृती प्रकट झाली. तिचं स्वरूप दिसायला लागलं, तसं सगळ्यांनी आपापली मान झुकवून त्या आकृतीतील सलाम केला. सुलतान अहमदचे अब्बा कासीम प्रकट झाले होते.

" दरबारातल्या सगळ्यांना मला काही सांगायचं आहे...आमचे अब्बू जितके नेक दिल होते, तितकेच शूर होते. फरिश्ते त्यांना प्रसन्न झाले कारण त्यांचं दिल नेक होतं...पण त्यांनी त्यांना वरदान दिलं ते त्यांच्या रक्तातली हिम्मत, जिगर आणि शौर्य बघून....नुसत्या नेक दिलाने काही होत नसत, त्याबरोबर लढायची जिगर असावी लागते हा त्यामागचा संदेश होता. अहमद बेटा, तू किंवा या दरबारातल्या कोणीही आपल्या रक्ताचा थेंब किताबावर टाकला तरी आपल्या पूर्वजांचं सैन्य जिंदा झालं नसतं...कां त्यांना जिंदा करण्यासाठी लागणारा खून एका नेक आणि त्याचबरोबर शेरदिल लढवय्याचा असणं अपेक्षित आहे. आम्ही तुम्हाला साथ द्यायला आहोत, तुमची लढाई लढायला नाही..."

दरबारात अचानक सगळ्यांच्या चेहऱ्यावर बिलालबद्दल अभिमान दिसायला लागला. बिलालने आपल्या मोठ्या सुलतानांना सामोरे जात कुर्निसात केला. त्यांनी बिलालच्या खांद्यावर हात ठेवला आणि ते हळू हळू अंतर्धान पावले. बिलालने किताब हातात घेऊन कपाळाला टेकवली आणि हळूच बंद केली. अचानक एकेक चित्रावर एक एक योद्धा पुन्हा एकदा अवतीर्ण झाला.

आज सालेम गाव अरबस्तानातल्या शूरवीर योद्ध्यांचं गाव म्हणून ओळखलं जातं. गावात बिलालचा भव्य पुतळा वेशीच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी आहे. सुलतानाच्या गढीत खास खोलीमध्ये ती किताब आणि ती चित्रं सुरक्षित आहेत. त्या चित्रांमध्ये अर्थात बिलालबरोबरच्या एकही सरदारच चित्रं नाहीये आणि पुढच्या पिढीतल्या प्रत्येक मृत पुरुषाचं चित्रं संपूर्ण सैनिकी पेहेरावात तयार केलेलं आहे.

गावात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला वेशीवर बिलालच्या पुतळ्याचं दर्शन आधी होतं. त्या पुतळ्याखाली लिहिलेली एक ओळ मनात साठवून येणारी व्यक्ती त्या गावात प्रवेश करते...
' शूर माणसाच्या रक्ताच्या एका थेंबातून सेना निर्माण होते...'

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुहरीब म्हणजे काय ?>> म्हणजे जांगजू / फायटर/ वॉरिअर.
हर्ब म्हणजे लढाई/ जन्ग. पण हा नकारार्थी वापरतात बहुतेक वेळा. म्हणजे मूहारीब अल्लाह म्हणजे अल्लाहशी लढणारा Happy

सुंदर लिहलय.
बिलालचा पुतळा काही पटला नाही पण.

छान.

इस्लाम मध्ये मानवी चेहरे,पुतळे अमान्य आहेत.असो.

का कोण जाणे ही गोष्ट नाही आवडली.कदाचित कळली nasél.