कशास मग ते मोठे व्हावे?

Submitted by मनोजकुमार देशमुख on 2 June, 2020 - 01:49

आव नको की ठाव नको
जड टोपण नाव नको
सरड्या सारखे असुदे जीवन
कुंपणापर्यंतही धाव नको

उगीच तुम्ही मोठे व्हा
मोठे होणे जपत रहा
पडला का कुठे डाग
नीट ते शोधून पहा

पाषाणातून देव नको
टाकीचे मग घाव नको
चार चौघात फिरताना
मिळणारा तो भाव नको

मंदिराचा कळस मोठा
देवा सारखा मान खरा
नको अलिप्त मोठेपणा
मी पायरीचा दगड बरा

नको रेशमी वस्त्र भरजरी
समारंभात घालायला
असुदे मी रूमाल सुती
जखमेवरती बांधायला

का अथांग सागर व्हावे
खारटपणाचे दोष घ्यावे
होऊन मी इवलासा झरा
तहानलेल्यास घोट द्यावे

कशास मग ते मोठे व्हावे?
आतून आतून रिक्त रहावे
भले वाटते छोटे व्हावे
गरजे साठी धावूनी यावे

Group content visibility: 
Use group defaults