हरवले ते....

Submitted by ज्येष्ठागौरी on 29 May, 2020 - 21:50

हरवले ते...
आमच्या शाळेत वर्तनपत्रिका म्हणून एक छोटी पुस्तिका होती.शाळेला उशीर झाला,गणवेश नीट नसेल,वेण्या वर बांधल्या नसतील,किंवा सुटल्या,गृहपाठ केला नसेल किंवा काही वस्तू आणायला सांगितली असेल आणि आपण विसरलो की त्यावर तारीख पडायची.म्हणजे सौम्य अशी ताकीद आणि अशा तीन तारखा पडल्या की परिक्षेतल्या मार्कांतून एक मार्क वजा व्हायचा.एखादं चांगलं काम केलं तरही त्याच्यावर नोंद व्हायची.पण हे जरा कठीणच.ही पत्रिका रोज दप्तरात असणं गरजेचं असायचं.इथंच आमची माशी शिंकायची.मुळात रोज दप्तर उलटं करून त्यातून निघणाऱ्या अशोकाच्या बिया,बुचाची फ़ुलं, काढलेली चित्रं असा खजिना पलंगावर ओतणे मग त्यात रेंगाळणे हे ओघाने यायचंच. मग अभ्यास करताना,मग तो कधी जेवणाच्या टेबलावर ,कधी अभ्यासाच्या टेबलावर,कधी दिवाणखान्यात कधी स्वयंपाकघरात ,मग पुन्हा दप्तर भरणे यात न जाणे ती वर्तनपत्रिका कशी हरवायची!शाळेत जायच्या आधी शोधाशोध सुरू व्हायची मग चिडचिड मग रडारड ह्या क्रमाने कृती घडायच्या आणि घरची लोकं हैराण होऊन जायचे.आईनं एकदा सज्जड दम भरला आणि सांगितलं की या एका ठिकाणी ती वर्तनपत्रिका ठेवायची आणि परत हरवून शोधायला लागली तर मीच त्याच्यावर तारखा घालीन.असं आपण हरवण्यात पटाईत असणार.तीच गोष्ट सेफ्टी पिनांची, इतक्या वेळा तुळशीबागेतून आणल्या तरी साडी नेसायच्या वेळी एक सापडेल तर शप्पथ.रबर पेनसिली ह्यातर हरवण्यासाठीच होत्या,तीच गोष्ट काळ्या रिबीनींची. केसांनाही वळण नसल्यासारखे सरळ केस ,रिबीनाचा कधी हात सोडायचे कळायचं नाही.आईनी तेंव्हा एक मोठा रोल आणून ठेवला होता,हरवली रिबीन की नवीन तुकडा कापायचा, त्याच्या दोन्ही बाजूंना उदबत्तीनं चटका दिल्यासारखं करायचं,तीन छोटी भोकं पाडायची,की पुढची रिबीन हरवायसाठी तयार.
आईला फार काळजी वाटायची,की हिचं कसं होणार,एक वस्तू सापडत नाही. आईची बोलणी खाल्ली खूप सुरुवातीच्या आयुष्यात , कारण ही शोधाशोध तिला करायला लागायची. बापू नेहमीप्रमाणे शांत ,आत्ताच्या भाषेत कूल असायचे.त्यांचे काही ठोकताळे वेगळेच होते ते ,अर्थात आता समजताहेत. मोहन आणि आई एका गटात आणि मी बापू आणि संजय दुसऱ्या. पण हळुहळू भान येत गेलं आणि ते हरवण्याचं वेड कमी झालं.नाटकात काम करताना, प्रवासात आपल्या वस्तू सांभाळणे, हेही समजलं.व्यवस्थित राहण्याचे फायदे आणि डौल समजला.दुनिया नीटनेटकं आणि व्यवस्थित राहण्याऱ्यांकडे वेगळ्या नजरेनं बघते हेही कळलं.पण अगदी पूर्ण इलाज झाला नव्हताच.मधून मधून काहीतरी हरवायचं. तरी पिनांची जागा पेनांनी घेतली आणि अजूनही कधी ही पेनं माझी साथ सापडून जातात कळतंच नाही. परिस्थिती सुधारली पण खूप नाही त्यातून नवरा कमालीचा व्यवस्थित,काटेकोर आणि शिस्तीचा, आता आली का पंचाईत,आपण कितीही प्रयत्न केला तरी त्या पातळीवर पोचू शकत नाही असं वाटायला लागलं पण जमलं हळुहळू.तरीही "ढुंढो ढुंढो रे साजना मोरे कान का बाला"असं प्रेमानी गाणं म्हणलं असतं तर बोलणीच खाल्ली असती, शोधणं तर दूरच राहिलं .मुलं नेमकी या बाबतीत माझ्याच वळणावर गेली आणि माझ्या मुलीच्या रिबीनी सुटून केस गळ्यात घेऊन ती घरी यायला लागली तेंव्हा अगदी आरशात बघतोय असं वाटायला लागलं आणि मुलानी वॉटर बॅग हरवायचा चंग बांधला. परीक्षेच्या आदल्या दिवशी एक वही सापडेना म्हणून संतप्त होऊन त्याला विचारल्यावर त्यानी सांगितलं की हरवली नाहीये वही पण मित्राला दिलीय अभ्यासाला कारण तो आजारी होता,असू दे ,माझा झालाय अभ्यास.हे ऐकून आत बरं वाटलं.असू दे मग थोडं हरवणं!दाग अच्छे है सारखं!पण एकंदर आपण सावधचित्त कमी आहोत हे उमजल्यावर जरा फरक पडला आणि आपण काही गुन्हा ,पाप आणि दुसऱ्याचं नुकसान करत नसल्यानं ,जे काही नुकसान होतं ते आपलंच होतं ह्या भावनेमुळे फार अपराधी वाटायला नको .आपण काही हरवलं की किती डोकं लागतं ते शोधायला, बाकीचे लोकही मग त्यात उतरतात,सूचना, शक्यता, सांगतात,काही माणसं तोडगे सांगतात.म्हणजे अनेक माणसांच्या मेंदूला काम मिळतं.
गंमत म्हणजे, मागे माझ्या भल्या मोठ्या डिपार्टमेंट मध्ये एक फाईल सापडेना, सगळ्यांनी शोधाशोध केली, बरं ऑफिसची मालमत्ता म्हणून संस्कारी जीव टाळटूळ करायला लागला,तेंव्हा अरुनी "कार्तवीर्य जुनो "हा मंत्र सांगितला,तो म्हणला की हरवलेली वस्तू सापडते म्हणतात.चार पाच वेळा मनात म्हणला आणि माझ्या पुढे बसणारी ज्योती म्हणाली अरे वा माझा बरेच दिवस स्टेपलर सापडत नव्हता ,अचानक सापडला,म्हणजे बघा मंत्र परिणामकारक आहे, आपल्याला नसेल तरी हरकत नाही,दुसऱ्याच्या वस्तू तरी सापडतील.
घरातल्या हरवलेल्या वस्तू तर कशा हरवतात हे कोडं आहे, मग घरातली बुजुर्ग माणसं बघ नीट ,ठेवलं असशील डाव्या उजव्या हातानी(म्हणजे काय ठाऊक नाही) असा सल्ला देतात आणि आश्चर्य की तसं ते बहुदा सापडतं. कधी काही हरवलं ,ते ज्याला सापडतं त्याला खूप तात्कालिक महत्व प्राप्त होतं, त्यांच्या चुका काही काळ का होईना नजरेआड केल्या जातात.कानातलं घालताना गादीवर बसून घालावं ह्या पोक्त सल्ल्यानुसार वागल्यानं फिरक्या शोधायची माझी बरीच ऊर्जा मी वाचवली आहे.पण वय वाढलं की मगच असे सल्ले देता येतात.
असाही एक मोलाचा सल्ला मिळाला की हरवलेल्या वस्तूची मनात किंमत करायची आणि मग शोधायची,जरा कमी त्रास होतो.पण अर्थात हे भौतिक वस्तूंबद्दल लागू पडतं. पण तसं नेहमी भौतिक गोष्टी हरवतात असं नाही,आई सांगायची की मी चार वर्षांची असताना मुंबई विमानतळावर आईचा हात अलगद सोडवून कुठंतरी रेंगाळले आणि मी हरवले या भीतीने आईबापू दोघांच्या तोंडचं पाणी पळालं होतं. बापू नेहमी म्हणायचे देवळात,गर्दीत आधी मुलं सांभाळा मग इतर मौल्यवान वस्तू.
परझानिया हा एक गुजरातच्या दंगलीमध्ये हरवलेल्या मुलावरचा सिनेमा बघून दोन तीन दिवस मी माझं स्वास्थ्य घालवून बसले.मुलगा हरवल्यानंतर ते अख्खं कुटुंबाचं अक्षरशः सर्वस्व धुतल्यासारखं होतं, माझ्या परिचयाच्या एकांचा धाकटा भाऊ हरवला, त्या कुटुंबांनी खूप शोधूनही तो सापडला नाही पण त्या कुटुंबांनी नवीन घर घेऊनसुद्धा पुढे अनेक वर्षे जुन्या वाड्यातली जागा भाडं भरूनही ठेवली केवळ एकाच कारणासाठी आणि एकाच आशेवर की कधी तो परत आला तर त्याला त्याचं परिचित घर सापडेल.हे मला फार हलवून गेलं.हरवलेल्या व्यक्तीला त्याचं आपलं असं काहीतरी सापडावं धडपड पाहून आतून तुटलं.माझ्या एका मैत्रिणीची पर्स हरवली म्हणजे बहुशः बसमध्ये कोणीतरी चोरली. आम्ही दोघींनी जाऊन रीतसर पोलिसांकडे तक्रार दिली, त्यात यादी दिली काय काय होतं त्याची.त्यानंतरही ती खूप अस्वस्थ होती.कारण त्या पर्समध्ये तिच्या आईनं लिहिलेली एक छोटी चिठ्ठी होती,ज्यात लिहिलं होतं, की लाडू केलेत तुझ्या आवडीचे,ते येऊन घेऊन जा.आणि काही काळानी त्या गेल्या,खरंतर या शब्दांमध्ये ना काही महत्वाचं होतं ,ना काही उपदेश पण त्यातल्या मायेच्या चार ओळी तिला अनमोल वाटत होत्या.आईच्या शेवटच्या चार ओळी हरवल्याचं दुःख गेलेल्या वस्तूंपेक्षा जास्त होतं.
तशा आपण इतर बऱ्याच गोष्टी वेगवेगळ्या टप्प्यावर हरवतो.
कधी स्वास्थ्य,कधी आरोग्य,कधी तहान,भूक,कधी झोप,कधी मन, कधी विश्वास,कधी माणसं,कधी चक्क आठवण असं काहीही. त्याची किंमत कशी करायची हे समजलं नाहीये.काही हरवलेलं सापडलं नाही की
माणसात एक प्रकारची हतबलता येते .अनेकदा आपली चूक नसताना काहीतरी हरवतं तेंव्हा जास्त रुखरुख लागते आणि चूक असेल तर माथी खिळा म्हणतात तसं.ती भावना पिच्छा यथेच्छ पुरवते.कधी आपण स्वतः हरवून जातो ते तर फार अवघड, शोधणं आणि गवसणं फार मुश्कील.कधी आपण खुद्द ,कधी लोकं आपल्याला हरवून टाकतात.
ज्या गोष्टींचा आणि आपला संबंध,ऋणानुबंध संपतो ती गोष्ट आपल्या जवळ रहात नाही असं म्हणतात आणि मग ती कधीही न सापडण्यासाठी हरवते हे जसं वय वाढत गेलं, तसं समजलं.कुठलाही मंत्र म्हणला तरी पृथ्वीतलावरुन हरवलेलं माणूस परत येत नाही याचं फार वाईट वाटतं.अकाली हरवलेली, माणसं आठवून तर अगदी पुनः पुन्हा! कुछ पाकर खोना है असं म्हणता म्हणता जी माणसं डोळ्यासमोरुन हरवून गेली त्यांच्या बदल्यात काय खाऱ्या पाण्याशिवाय काय मिळालं?हा सवाल राहतो पण जीवन का मतलब तो आना और जाना है। हेच केवळ एक सत्य आहे आणि नियंत्यानं ते स्वतः कडे ठेवलं आहे.काही गोष्टी वय, विवेक, काळ, आणि परिस्थिती आपल्याला शिकवते.एखादी हरवलेली गोष्ट वाटेल तेवढी शोधली तरी मिळत नाही, कितीही हातपाय आपटले, रडलो ,त्रागा केला तरी मिळत नाही ह्याचं भान ,खरंतर आत्मभान यायला वेळ लागतो.सजगता आणि स्वीकार असेल तर हरवणे आणि कधी कधी न सापडणे याचा फार त्रास होणार नाही.हे कळतं पण वळत नाही.
आता माझ्या हरवाहरवीच्या खेळात बापूंचं शांत असण्याचा अर्थ लागतोय,आपल्या जवळचं सगळं जपून ,सांभाळून ठेवावं हे खरंच आहे.ती स्वयंशिस्त आवश्यक आहेच ,पण सत्य हेच आहे की गोष्टी हरवतात आणि सापडतात.काही हरवतात आणि सापडत नाहीत.काही न हरवता अचानक सापडतात.हे अव्याहत चालू आहे. भौतिक गोष्टींबरोबरच मी स्वतःला कुठेतरी,कुठल्यातरी कारणानी , कोणासाठी तरी हरवू नये आणि नव्यानं सापडत जावं.माझ्या आशा आकांक्षा ,स्वप्नं, सकारात्मक भावना माणूसपण मात्र कधीच हरवू नयेत,पण मीपण ,अहंभाव ,अवगुण हरवले तर चांगलं माणूस बनता येईल.
एक गाणं बापू नेहमी म्हणायचे. सैगल यांनी गायलेलं पंडित भूषण यांचं,
जो बीत चुकी सो बीत चुकी
अब उसकी याद सताये क्यों.
पंडित हरिवंशराय बच्चन यांची अशाच अर्थाची एक कविता आहे..
जो बीत गई सो बात गई
जीवन में एक सितारा था
माना वह बेहद प्यारा था
वह डूब गया तो डूब गया
हरवलेल्या गोष्टींचं आपल्या जगण्यातील,असण्यातलं स्थान कबूल करूनही त्याचं हरवलेपण अनिवार्यपणे स्वीकारणे अशा अर्थाची! दोन्ही कवितांमधले शब्द मला हरवलेपणातून बाहेर पडायची उर्मी देत राहतात !move on अर्थात पुढे व्हा! सांगत राहतात.त्या हरवलेपणात हरवू नये असं सांगत राहतात.माझं हरवलेपण मला हरवू नये असं सांगत राहतात.
कुमार विश्वासांच्या शब्दात...
सुख दुख वाली चादर
घटती वढती रहती है
मौला तेरा ताना वाना
चलता रहता है
रूह जिस्म का ठौर ठिकाना
चलता रहता है
जीना मरना खोना पाना
चलता रहता है
ज्येष्ठागौरी

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे पण अफाट सुंदर आहे. 'कार्तविर्यार्जुनो नाम राजा..' मन्त्र एका मित्राने सांगितला होता, मी तो कागदावर लिहून पाकिटात आणि सॅकमध्ये ठेवला होता , नन्तर ते दोन्ही कागद हरवले Happy बच्चनजींची ही कविता मला पण खूप आवडते.