छप्पन भोग (जिव्हा जिज्ञासा~३)

Submitted by ज्येष्ठागौरी on 28 May, 2020 - 00:00

॥छप्पन भोग॥

जिव्हा जिज्ञासेचा शेवट पक्वान्नानी व्हायला हवा असं ठरवलं होतंच ..A person with sweet tooth पेक्षा मला आपला गोडघाशा हा शब्द फार गोड वाटतो.
बापूंना रोज जेवणानंतर गोड आवडायचं.अेखादा लाडवाचा तुकडा,वडी किंवा दाणे गूळ तरी नक्कीच.
वड्यांवरुन आठवलं आअी खूप साऱ्या वड्या करायची. नारळाच्यापासून ते बेसनाच्या वड्यांपर्यंत ,अुकडलेल्या बटाट्याच्या आणि मटारच्यासुध्दा!तिचं स्वतःचं असं अेक तंत्र होतं.मिश्रण कितीवेळ ढवळायचं, शेवटी पिठीसाखर कधी घालायची ,किती घोटायचं आणि कधी थापायचं आणि कधी वड्या पाडायच्या.कधीही न बिघडणारं तंत्र!,चॉकलेटच्या अप्रतिम वड्या करणारी सुधाकाकूही वडी चंद्रिका आहे पण तरीही आमच्या घरात माझी ताअी आत्या ज्या श्रीखंडाच्या वड्या करायची त्या केवळ अप्रतिम,त्याला तोड नाही.त्या कधीही ठोकळ चौकोनी आकारात नसायच्या तर साचा वापरुन कापलेल्या. बहुतेक वेळेला बदामाचा आकार. आअीच्या बहुतेक वेळा ताटात थापलेल्या आणि चौकोनी कापलेल्या .घरच्यांना कडेच्या वड्या म्हणजे चक्क पक्षपात.मोहन नेहमी आअीला म्हणायचा की अेकदा तरी घरच्यांना मधल्या चौकोनी वड्या दे.
बापू नेहमी त्यांच्या आअीच्या म्हणजे अक्कांच्या, नारळाच्या तिरंगी वडीचं वर्णन आवर्जून सांगायचे.त्या घीवर आणि चंद्रकला अुत्तम करायच्या.
वडी आणि बर्फी ह्या बहिणीच खरं तर, पण या मराठी जिव्हेनी वड्याच जास्त खाल्ल्या आहेत.वर्षाच्या सासूबाअींनी मुद्दाम केलेल्या खसखशीच्या वड्या ही त्यांची मेहनतीनं केलेली खासियत केवळ अपूर्व!अरु करते तो खरवस आणि खरवसाच्या वड्या हा तर रसनेला सलामच.लाडू तर लहानपणापासून आपण खाल्ले आहेतच .पोळीचा ,गूळ घातलेला लाडू डब्यात कधीतरी असायचा .बेसनाचा लाडू दिवाळीत जास्त आणि त्याहीपेक्षा हिंदी सिनेमामधल्या माँमुळे जास्त परिचित झाला.बेसनाच्या लाडवांवरुन आठवलं . माझी मुलं लहान असताना आअी त्यांना गोष्ट सांगत होती त्यात बेसनाच्या लाडवांचा अुल्लेख होता.मुलं म्हणाली तू बऱ्याच दिवसात लाडू केले नाहीस , झालं मी घरी येअुन बघते तो आपली तब्बेत बाजूला ठेवून कुसुमताअी बेसन भाजताहेत.,केवळ नातवंडांसाठी..म्हणजे बेसन लाडू नक्कीच विशेष आहेत तर..लाडवावरचे "बत्त्याचे" विनोद मात्र शतकानुशतकं चालूच राहणार.
लाडू, विशेषतः रव्याचा जरा घाबरुनच करायचा कारण तो कधीही फसवू शकतो .बाकी बेसनाचा लाडू त्यामानानं कमी फसणारा पण लग्नानंतरच्या सुरुवातीच्या दिवसात केलेले तूप जास्त झाल्यानं अेकमेकांवर रेलणारे रवा लाडू बघून ऑफिसमधल्या मित्रमंडळींची बऱ्याच काळ हसायची बेगमी मी केली होती. त्यांनी ते लाडू स्ट्राॅनी खाण्याचीही ऑफर दिली होती.नंतर ऑफिसमध्ये भोळे मॅडमनी शिकवलेल्या झटपट आणि न फसणाऱ्या रव्याच्या लाडवांनी मला वाचवलं आणि त्यांना त्या गेल्यानंतरही मनात कायम ठेवलं . पिवळे मूग आणि नाचणीचे लाडू फक्त अरुचेच. अळीवाचे आणि डिंकाचे रेवतीमामीचेच.तसंच जरा बिचकत करायचा तो म्हणजे अु मो अर्थात अुकडीचे मोदक.ते फक्त विनयावहिनीच्याच हातचे.ती कोकणातली त्यामुळे कधी अेकवीस कळ्यांचा तर कधी अेकावर अेक. तशीच तिच्या हातची फणसाची सांदणं फार चविष्ट.हळदीच्या पानावरची..बेफाट..खव्याचे तळणीचे मोदक ही फक्त माझ्या सासरची स्वर्गीय खासियत!त्याचं पावित्र्य फार वेगळं कारण ते आमच्या घरच्या उजव्या सोंडेच्या मोरयाच्या सत्यविनायकासाठी असतात.
आअीसुद्धा तशी अुमोंच्या फार वाटेला जायची नाही.वेगवेगळ्या पोळ्या मात्र करायची गुळाची, पुरणाची,खव्याची आणि साखरेचीही.साटोऱ्या आणि लवंग लतिकाही. तशी नवऱ्याच्या पणजोळी कर्नाटकात सासूबाअींच्या मामींनी केलेली नारळाच्या सारणाची पोळी.केवळ स्वर्गीय.आअी ओल्या नारळाच्या करंजीच्या सारणात गुलकंद घालायची.सुक्या खोबऱ्याच्या खुळखुळा करंज्यांना मात्र मागणी कमीच म्हणून क्वचित करायची.पण त्या त्या सणाला विशिष्ट पदार्थ करण्याच्या परंपरा ती पाळायची. श्रावणी सोमवारी शाळेतून घरी येअीपर्यंत पानं मांडलेली असायची तेंव्हा खांडवी आणि सांज्याच्या पोळ्या गोडासाठीं असायच्या. श्रावणी शुक्रवारची पु.पो ,गौरी जेवणाचं घावनघाटलं,दसऱ्याला बासुंदी आणि गुढीपाडव्याला श्रीखंडच.जाता जाता....श्रीखंड हा पदार्थ बल्लवाचार्य भीमानं शोधला म्हणे शिखरिणी या नावानं दही आणि फळं अेकत्र करुन .तर आमच्याकडे नेहमीच श्रीखंड घरी चक्का करुन केलेलं असायचं. अेका गुढीपाडव्याला चक्का करायसाठी भरपूर जास्तीचं दूध सांगितलं होतं.गवळीबुवांनी दोन मोठ्या पातेल्यात दूध घातलं आणि आअीनं अेक पातेलं ठेवून येअीपर्यंत दुसऱ्या पातेल्यात कधीही कशातही तोंड न घालणाऱ्या आमच्या श्वानसम्राज्ञीनं तोंड घातलेलं दिसलं. मग बापूंनी तिला मनसोक्त दूध पिअु दिलं.मग ते पातेल्यातलं दूध वेगळं तापवून दिवसभर दिलं .रात्री त्याला विरजण लावून दुसऱ्या दिवशी दही साखर दिली,तिसऱ्या दिवशीच काय पण नंतर कायमस्वरुपी ,श्वानसम्राज्ञी ते पातेलं बघितलं की धूम ठोकायला लागली. तो पाडवा तिच्या आणि आमच्या दृष्टीने भलताच संस्मरणीय ठरला. होळीला पुरणपोळी असायचीच पण तो माझ्या भावाचा संजयचा वाढदिवस असायचा आणि त्याला आवडते म्हणून बासुंदीही असायची चारोळी बिरोळी घालून!नंतर संजयच्या हातची रबडी खाणं हा अमृतानुभव होता.तसाच आअीच्या हातची किंचित मीठ असलेल्या हातशेवयांची खीर खाण्यात होता.आजारी पडल्यावर रवा किंवा साबुदाण्याची खीर, बाळंतपणात अळीव किंवा खारकेची खीर आणि शुभकार्यातली गव्हल्याची खीर.लग्नातल्या रुखवतात पाच खिरी शकुनाच्या ,ही आपली किती गोड परंपरा आहे.दिलीप अमिताच्या मांडवपरतण्याला अमिताच्या माहेरी खाल्लेला गव्हल्याचा साखरभात,त्याची चव अजूनही अुतरली नाहीये मनातून.सत्यनारायणाचा शिरा हा केवळ आपण भारतात जन्म घेतला म्हणूनच प्रसाद मिळाला आहे.साखरभात (बैठा) आणि नारळीभात गुळाचा,त्यावर तूप हे मागच्या जन्मीचं पुण्य आहे. आअी घारगे छान करायची ज्याला कोल्हापूरला घाऱ्या म्हणतात तसेच पाकातले चिरोटेही अप्रतिम करायची आणि बापूंसाठी बिनपाकाचेही आणि .थंडीत मोहन आअीच्या मागे " माँ मै बी अे पास हो गया" म्हणून छळायला लागला की गाजर हलवा करायची.दुधी हलवा हा दुधी आमच्या पोटात जावा अशा अिच्छेने होत असावा. पण आम्ही फक्त त्यातल्या खव्याच्या आमीषामुळे खायचो .गुलाबजामच्या खव्यात आअी निशेस्ता म्हणजे काय आठवत नाही पण ते घालायची आणि पाकात गुलाबाचा अिसेन्स!पण सगळ्यात वरकड म्हणजे पुरणाचे कडबू! कडबूंनी बेळगावशी तिची नाळ घट्ट बांधून ठेवली होती.आमरस अुन्हाळ्यात सगळ्यांबरोबर खाणं ह्याचं थेट नातं हात वाळेपर्यंत गप्पांशी आहे.पूर्वी कार्यालयात लग्नाच्या आदल्या रात्री सुधारस असायचा तसा घरीही असायचा केळ्याच्या फोडी घालून लिंबू पिळलेला. आणि अननसाचाही.आणि शिकरणही.साधीसुधी गोडाची गोष्ट विरुद्ध अन्न असलं तरी आपण वारंवार खाल्ली आहेच की आणि लग्नात जिलबी हवीच पण कोल्हापूरकडे आपल्या राष्ट्रीय सणांना घरोघरी असणारी जिलबी.अशी ही महाराष्ट्रीय गोड पदार्थांची मांदियाळी.
लहानपणी श्रीकृष्णाची गोवर्धन पर्वत करंगळीवर तोलून धरल्याची गोष्ट अैकली होती.पण त्यातल्या काही गोष्टी नंतर कळल्या की श्रीकृष्णानी न खाता पिता हे सात दिवस हे अशक्यप्राय काम केलं.इंद्राने शेवटी हार मानली.श्रीकृष्ण म्हणे दिवसातून आठ वेळा खायचा म्हणजे हा युगंधर आहारतज्ञही होता तर..तर अशा माधवाला गोकुळातल्या गोप आणि गोपिकांनी, सात गुणिले आठ असे छप्पन अन्नप्रकार अर्पण केले मुखशुद्धीसकट , तोच छप्पन्न भोग!यात मुख्यत्वे गोड आणि दुधाच्या पदार्थांचा समावेश होता,ही कथा मला फारच गोड वाटते. घरातली बाई ही आपल्या माणसांचा अन्नमय कोष ऋतुनुसार,प्रकृतीनुसार आणि कुवतीनुसार यथाशक्ती अानंदमय कोष करत राहते.ते करणारे हात आणि मन आपल्या मनावर सुखाचा मुलामा देत राहतात. सदैव नेमकी ती चव आत्मनात राहते.
आपल्या प्रत्येकाच्या ठायी श्रीकृष्ण वसलेला असतोच, आणि तसाच तो आपल्या माणसांच्यातही असतो.आपलं स्वतःचं अस्तित्व आणि आपली प्रेमाची माणसं आपल्या आयुष्यात असण्याच्या ऋणाची परतफेड होणं शक्य नसतेच पण म्हणूनच हा छप्पन्न भोग त्या प्रेमाचं प्रतिक बनून राहतो, पिढ्यानपिढ्या. शतकानुशतकं.
ज्येष्ठागौरी

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पंढरपूरला आमच्या नातेवाईकांमध्ये एक पद्धत होती. काही कार्य असलं कि जे देवब्राह्मण/कुळधर्म वगैरे असतो तेव्हा भरपूर गोड पदार्थ असायचे. बाबांचे एक काका पंगतीत सगळ्यांना गोड वाढायचे. आधी ताटात पुरणपोळी, त्यावर आमरस, त्यावर बासुंदी, त्यावर लाडू फोडून, त्यावर पिठीसाखर, त्यावर तूप. आणि घरातले मोठे लोक हे आवडीने खायचे! लहानपणी हे बघून मळमळून यायचं. कालांतराने ती पद्धत बंद झाली. अशा अघोरी पद्धतीचं गोडप्रेम आणि पंगतप्रेम नंतर कुठे पाहिलं नाही.

छान झालीये लेखमाला. शेवट नको अजून येऊ देत.
तुम्ही खूप छान लिहिता. उपाहाराच्या पदार्थावर पण येऊ देत एक लेख.

मला आत्ताच्या आत्ता छप्पन तरी प्रकार खायला हवे आहेत असे झाले आहे पण अजीबात मिळणार नाहीयेत.
जेवायच्या आधी का उघडला हा लेख असे झाले आहे मला आता.

गौरी, आता ह्यातल्या रेसिप्या पण लिही लवकर.>>>अगदी ,
ह्या सगळ्या वड्यांचं वर्णन वाचून मला माझ्या वडलांची काकू आठवली,. काय मस्त वड्या करायची श्रीखंडाच्या, बटाट्याच्या . आणि त्या दिसायच्या पण इतक्या एकसारख्या मशीन ने कट केल्यासारख्या.

मस्त जमलंय हे ही.
ह्यातल्या खुपश्या पदार्थांशी जोडल्या गेलेल्या माझ्या आठवणींमुळे एकदम ताजतवानं वाटलं वाचून.

अप्रतिम झालाय लेख....इतकं सुंदर वर्णन केलंय ना की ते सगळे पदार्थ डोळ्यासमोर येत आहेत....तिन्ही भाग खूपच छान

Lockdown मध्ये रोज रोज सतत स्वयंपाक करून करून खूप कंटाळा आला होता,तुमच्या लेखामुळे नवीन रेसिपी करायला परत उत्साह आला.☺️