उकिरडा ( एक अ-राजकीय प्रहसन )

Submitted by Theurbannomad on 27 May, 2020 - 20:42

गावकुसाबाहेरच्या एका उकिरड्यावर आपापल्या जेवणाची वेळ झाल्यावर त्या उकिरड्यावर पोसले गेलेले प्राणी एक एक करत जमायला लागले. दर आठवड्याच्या शुक्रवारी गावच्या घरांबरोबर मंडई, खाटीकखाना, मासेबाजार अशा खास जागी जमलेला खास कचरा जमा करून स्वच्छता अभियानाच्या गाडीतून गावाबाहेर आणला जाई आणि उकिरड्यावर टाकलं जाई. या दिवशी दूरदूरच्या गल्लीबोळातून वेगवेगळ्या जातीचे, आकाराचे आणि वयाचे प्राणी सहकुटुंब त्या उकिरड्यावर जमा होतं असत. त्या प्राण्यांबरोबर त्यांच्या कुळात जन्म घेतलेले काही लाळघोटे नातेवाईक असत, जे आपल्या पोटाच्या सोयीसाठी आपल्या कुटुंबप्रमुखाबरोबर सगळीकडे हिंडत असत. परजातीच्या प्राण्यांशी होणाऱ्या वादविवादात आपल्या प्रमुखाच्या मागे उभं राहून तारस्वरात केकाटणे आणि चुकून एखाद्या योद्ध्याच्या वंशातल्या मनुष्यप्राण्याने दगड अथवा काठी उगारली, तर आधी दूर पळून जाऊन तिथून दातओठ विचकून दाखवणे अशा गोष्टींमध्ये हे नातेवाईक पारंगत असत.

उकिरड्याचा मालकी हक्क तसा त्या गावाचा. त्या जागेवर अनिर्बंध सत्ता गाजवणे प्राणी किंवा पक्षी जगतातल्या कोणाला जमलं कधीच जमलं नसलं, तरी श्वान जातींच्या प्राण्यांची तिथे इतरांहून जास्त वट चालायची. त्यांच्या मागच्या सहा-सात पिढ्या त्या उकिरड्यावरच पोसलेल्या असल्यामुळे त्यांच्या कुळात जन्म घेणाऱ्या कुलोत्पन्न कंठ फुटल्या फुटल्या थेट उकिरड्याच्या मोक्याच्या स्थानांवर हक्क प्रदर्शित करू लागे. अनेकदा हक्कप्रदर्शन करताना नको त्या प्राण्याशी नको ते 'सुसंवाद' केल्यामुळे त्याच्या कुटुंबाच्या इतर सदस्यांना आणि त्यांच्या जीवावर स्वतःच्या पोटापाण्याची सोय करणाऱ्या त्यांच्या आश्रित प्राणिजनांना मध्यस्थी करावी लागे. आजसुद्धा कचऱ्याच्या गाडीतून उकिरड्याच्या एका बाजूला ताज्या कचऱ्याची भर पडल्यावर हे सगळे प्राणी आपल्या हिश्यासाठी धावले होते.

" मी सगळ्यांना निक्षून सांगत आहे की सगळ्यात आधी मला आलेल्या जिन्नसांचा आढावा घेऊ द्यावा. त्यानंतर मी सगळ्यांना त्यांचा हिस्सा देईन...आमच्या अनेक पिढ्यांपासून आम्हाला अनुभव आहे या सगळ्याचा..." अर्थात हे बोलणारा श्वान म्हणजे याआधी उल्लेख झालेला कुलदीपक. आजूबाजूच्या असंख्य श्वानांनी आपल्या या युवराजाच्या भोवती कोंडाळं करून तारसप्तकात भुंकून त्याच्या म्हणण्याला दुजोरा दिला. त्यापैकी काही शरीराने कमजोर असलेले श्वान हळूच उकिरड्यावर पडलेल्या कचऱ्यातली हाडं मोजायला लागले. हाडांची संख्या श्वानप्रजेहून कमी असली, तर आजवरच्या प्रथेला अनुसरून आपण उपाशीच राहू असा रास्त विचार त्यामागे होता.

" पण तुमचं आणि आमचं अन्न वेगळं असूनही तुम्ही आमच्या अन्नाचे हिस्से का पाडणार? मागच्या वेळी गोंधळ घातलात तो काय कमी झाला का?" शेपटीने माशा उडवून लावत नाक फेंदारून एक वृषभकुलोत्पन्न पुढारी पुढे आला. " गेल्या वेळी तुम्ही आमच्या वासरांना कोणत्याशा पुढाऱ्यांच्या भाषणाचे कागद खायला लावले तेव्हापासून त्यांनी आम्हालाच शिंगं दाखवायला सुरुवात केली..... त्यांना अशी शिंगं फुटलीयत तेव्हापासून की आमच्या नाकाला फेस आलाय..." त्यांच्यातला भगिनीसमाज खास वेगळ्या ठिकाणी घोळका करून कुजबुजत होता. त्यातली एक गाय दुसरीला म्हणाली, " अगं तुझे 'हे' आज खूपच चिडलेत...कधी नव्हे तो तक्रार करण्यासाठी पुढे गेलेत...काय जादू झाली गं अचानक? " " काय सांगू तुला...काल-परवापासून कोणत्याशा वर्तमानपत्राचे अग्रलेख खाल्ले तेव्हापासून त्यांचं पित्त वारंवार खवळायला लागलंय...मला नाही बाई हे सगळं आवडत...वर्तमानपत्र आणि त्यातले अग्रलेख पचवायला खूप जड जातात...त्यापेक्षा थोडी शोधाशोध केली ना, तर सिनेमाचे पोस्टर, सार्वजनिक कार्यक्रमाच्या जाहिराती, व्यावसायिकांच्या कामधंद्याच्या पुस्तिका असं पचायला हलकं मिळून जातं की..."

तितक्यात एका गर्दभांच्या टोळक्यातल्या जुन्या जाणत्या महाभागाने वादावादीत उडी घेतली. " मी काय म्हणतो, एकाच्या हातात सगळी सूत्र जाण्यापेक्षा प्रत्येक जमातीच्या एकाला पुढे करून एक सल्लागार मंडळ तयार केलं तर? त्यांच्या मार्फत प्रत्येकाच्या विशिष्ट मागण्या सर्वांसमक्ष मांडल्याही जातील आणि निर्णय घ्यायला सोपंही जाईल..." मगाच्या त्या वृषभकुलोत्पन्नाने मान झटकून शेपटीला हिसडा दिला आणि घुश्यात उत्तर दिलं.." तुमच्या अंतर्गत लाथाळ्या ज्या दिवशी संपतील त्या दिवशी तुमच्याकडून एकाला तुम्ही पुढे कराल ना...मागल्या वेळी तुमच्यातल्या चार जणांनी सर्वांसमक्ष भांडणं केली आणि खाली पडलेले राजीनाम्याचे कागद खाऊन एकमेकांचाच निषेध केला..." " हे बघा, त्यांच्यापैकी दोघांना गावातल्या कुंभारांनी माती तुडवायला नेलंय आता...ते आता त्या कुंभारवाड्याचे पूर्णवेळ कार्यकर्ते झालेत. उरलेल्या दोघांना आता भांडायचं बळ उरलेलं नाही...तेव्हा निश्चित राहा.." " असं काय झालं त्यांना?" " कोणत्याशा नटीच्या चित्रांचं पुस्तक त्या दिवशी खाल्लं आणि काय झालं कुणास ठाऊक...बाजूच्या गावच्या उकिरड्यावरच्या गाढविणींशी सूत जुळवून निघून गेले...."

एव्हाना उकिरड्याच्या कायम चिखल होत असलेल्या एका कोपऱ्यातून डुकरांचा कळप शेपट्या हलवत बाहेर आला. कुटुंबनियोजनाच्या प्रचारपत्रकांच्या ढिगावर त्यांनी आणि त्यांच्या दहा-बारा कुलदीपकांनी ऐसपैस अंग पसरलं. त्यांच्याकडे बघून त्या बुजुर्ग गर्दभाने तोंडातला कोणाच्यातरी अंत्यसंस्काराच्या सभेतला सुकलेला हार खाली टाकला आणि त्यांना प्रश्न केला... " आपलं मत काय? आपल्या बाजूने कोणी तयार आहे का सल्लागार मंडळात यायला?" अचानक त्यांच्यातली एक अनुभवी डुकरीण आपल्या पिल्लांना बाजूला करत पुढे झाली. तिने स्वतःच नाव स्वतःच सुचवून विषय संपवला.

" हे काय? असं कसं? " तिथल्या वृषभांपैकी एकाने दुसऱ्याला विचारलं. " अरे मागल्या खेपेला तिच्या यजमानांना महानगरपालिकेची गाडी घेऊन गेली होती ना...तेव्हा तिने त्यांची जागा घेतली होती. आता ती खुर्ची सांभाळते आणि यजमानांच्या निर्णयाची अंमलबजावणी करते..." " बाकीच्यांनी विरोध नाही केला?" " कसला विरोध? मुळात यांच्या चिखलात हे सोडून अजून कोणी तोंड घालतच नाहीत...आणि उकिरड्यात बरीच चिखलाची डबकी आहेत...प्रत्येक डबकं त्यांनी त्यांच्यातल्या एका एका कुटुंबाला वाटून दिलंय ना...यांच्याकडे सगळं कसं आदर्श समाजवादी असतं.."

इतक्यात समोरच्या एका खोक्यातून एक बोका बाहेर पडला. हा बोका म्हणजे समस्त मार्जार प्रजातीचा आद्य आणि आदरणीय प्रतिनिधी. श्वानवंशाशी विळ्याभोपळ्याचं संख्या असलं , तरी मासेबाजारातल्या सगळ्या कचऱ्यावर याला त्या श्वानांनी कायमस्वरूपी मालकी हक्क दिला असल्यामुळे त्यांच्याशी याने छान जुळवून घेतलं होतं. त्याच्या समस्त मार्जार प्रजेला खाण्यापिण्याची कसलीच ददात नव्हती. वेळप्रसंगी थेट मासळीबाजारात जाऊन कोळणींकडचे मासे पळवून आणण्यात त्यांचा हातखंडा होता.

" माझ्या मते आपण प्रत्येक प्राण्याच्या जातीनुसार उकिरड्याची विभागणी करूया. प्रत्येकाने आपापल्या भागातच खायचं-प्यायचं. त्याचप्रमाणे, प्रत्येक भागात काही जागा इतरांच्या अडीअडचणीला कामी येईल म्हणून आरक्षित ठेवायची..." त्याच्या या वक्तव्यावर कोणी काही बोलणार, तोच अचानक तिथे काकसमाजाचे काही प्रतिनिधी अचानक टपकले. " अशी कशी विभागणी? आम्हाला हे मान्य नाही..." " का? आणि तुम्हाला श्राद्धाचा प्रसाद मिळतो ना? तो नसेल तरच तुम्ही इथे येता..." " होय, पण तो मिळायचा...आता श्राद्धाला बाहेरगावी जातात सगळे...पितृपक्ष सोडला तर एरवी आम्हाला काही मिळत नाही..." " पण तुमच्या पूर्वजांनी गोडधोडाचंच जेवण केलं ना? आता आम्ही देऊ ते आणि तितकच गोड मानून घ्या..."

या सगळ्या गोंधळात मूषक समाज काही सामील होतं नव्हता. त्यांना समितीमध्ये सामील नं होता फक्त आंदोलन करायचं होतं. त्यांच्या मागण्या मुळात उकिरडा साफ करण्याशी निगडित असल्यामुळे त्यांच्याकडे कोणालाही लक्ष द्यायला वेळ नव्हता. शेवटी कोणीच काही बोलत नाही, हे बघून त्यांनी निमूटपणे आपापल्या बिळात भूमिगत व्हायचा निर्णय घेतला. तरी त्यांच्यातला एक जण तिथेच घुटमळला आणि योग्य वेळ आल्यावर त्याने आपला मुद्दा पुढे केला..

" मला वाटतं, तुमच्या या समितीमध्ये केवळ आमच्या मागण्या ऐकल्या जाव्या, म्हणून मी सामील व्हायला तयार आहे. परंतु जो गट आम्हाला पाठिंबा देईल, आमच्या मागण्या मान्य करेल, त्या गटाला आम्ही बिनशर्त समर्थन देऊ..."

" तुमची काय मागणी आहे ते तरी सांगा..." कोणीतरी कुजबुजलं.

" या उकिरड्याची किमान सफाई....इथे घाण जास्त झाली की महापालिकेचे लोक येतात आणि आम्ही निष्कारण त्यात मरतो..."

" पण सफाई झाली तर आम्ही काय करायचं? आम्ही चिखल सोडून राहूच शकत नाही..." वराहप्रतिनिधींनी लगेच आपला विरोध जाहीर केला.

" तुमच्या सवयी बदल नं मग..." " त्यापेक्षा तुम्हीच येऊन बघा...चिखलात तुम्हाला हवं ते मिळेल...तुमच्या आवडीचं...त्यासाठी आमच्या जागेत आम्ही तुम्हाला खास वेगळा भाग आखून देऊ..."

मूषक आणि वराह समाजाच्या समझोत्यामुळे तिथले सगळे जण थक्क झाले. मग बाकीच्यांनाही आपआपले हेवेदावे समजुतीच्या मार्गाने सोडवून आपल्या प्रतिनिधीला मार्गदर्शक मंडळात पाठवायचं ठरवलं. काही वेळात श्वान युवराजच्या अध्यक्षतेखाली सर्वसमावेशक समिती तयार झाली. त्यांनी आपापल्या मदतनिसांच्या साहाय्याने उकिरड्याचे सर्वेक्षण करून प्रत्येकाच्या जागा निश्चित करायच्या कृती-आराखड्यावर शिक्कामोर्तब केलं. कमला सुरुवात होणार, तोच दूरवरून काही श्वान धावत धावत आले. बाजूच्या जंगलातून बिबट्या गावच्या दिशेला सहपरिवार येत असल्याची खबर त्यांनी समस्तांना दिली.

" पण ते जंगलात होते ना? इथे कसे आले? "

" मागील अनेक वर्ष जंगलं तोडल्यामुळे त्यांचे निवारे नाहीसे झाले आहेत नं..आणि त्यांचा श्वानांवर जास्त राग आहे.."

" का?"

" या युवाराजांनी आणि त्यांच्या प्रजेने अतिउत्साहाच्या भरात गावकऱ्यांना जंगलातला त्यांचा ठावठिकाणा शोधायला मदत केली...आता ते बिथरलेत...इतक्या वर्षाच्या रागाचा आता कडेलोट झालाय...'

" आपण गावकऱ्यांना जाग करूया का?" श्वान युवाराजांनी अभिमानाने छाती फुलवून समस्येचा तोडगा सुचवला.

" एकट्यादुकट्या बिबट्याचं ठीक आहे...पण जेव्हा अक्खा कळप येतो ना, तेव्हा कोणी पुढे येत नाही..तेव्हा आपण सुद्धा सुरक्षित जागा शोधलेली बरी..."

आणि त्या उकिरड्यावरच्या सभेत हलकल्लोळ माजला. सगळ्यांनी आपापल्या परीने सुरक्षित जागा शोधायचा प्रयत्न सुरु केला. काही मिनिटातच तिथे सामसूम झाली. बिबट्याच्या दहशतीमुळे उकिरडा प्राणीमुक्त आणि गाव हागणदारीमुक्त झाला. तूर्तास तरी सगळीकडे बिबट्यांना पकडणाऱ्या वनकर्मचाऱ्यांचा शोध सुरु आहे आणि प्राणी जाऊनही उकिरड्यावर घाणीचा ढिगारा वाढीला लागलेला आहे...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मायबोलीच्या राजकीय धाग्यांचा त्रास होत असलेल्या एका भद्र जिवाचा हा आक्रोश आहे. हा भद्र जीव अशा एका जगात राहतो जिथे राजकारण माहीतच नाही. यांच्या टीव्ही चॅनेलवर चितळेंच्या मिठाया दाखवतात. घरी येणा-या वर्तमापत्रात फक्त प्रवीण दवणे यांचे लेख असतात. ते अशा एका प्रदेशात राहतात जिथे राजकारणच नाही. भद्र लोकांना राजकारण आवडत नसलेला देश आहे त्यांचा.
अशा लोकांना मायबोलीवर येत असलेल्या धाग्यांचा त्रास होणे स्वाभाविकच आहे. त्यामुळे उपहास म्हणून अलिकडे रूढ झालेली जंगलाची कहाणी अथवा गावाची कहाणी हे आलेच.
लेखात लेखकाचा उमदेपणा, खिलाडू वृत्ती आणि सर्वांना सहकार्य करण्याची वृत्ती दिसून येत आहे. तसेच तक्रारखोरीबद्दलची अनास्था जाणवली.
विनोदी लेखकाकडे उपजतच असलेला दिलदार पणा वाक्यावाक्यातून दिसून येत आहे...
असा स्वच्छ सद-यातला भाबडा तरीही विनोदी लेखक मायबोलीवर जन्मास आल्याने संतोष जाहला.

मी सहसा राजकीय विषयांवर लिहीत नाही पण सध्या इतकी वाईट परिस्थिती असूनही आपल्याकडे महाराष्ट्रात सगळ्या बाजूंनी जी चिखलफेक चालली आहे आणि या विचित्र परिस्थितीत सुद्धा प्रत्येकाची राजकारण करायची चढाओढ चालली आहे ते बघून जे सुचलं ते लिहिलं. इतर वेळच्या राजकारणाबद्दल मला फारसं सोयरसुतक नसतं पण किमान या वेळच्या तरी परिस्थितीचं गांभीर्य समजण्याइतकी अपेक्षा या नेत्यांकडून ठेवली होती.... ती सुद्धा मातीमोल झाली.