भेट

Submitted by मनोजकुमार देशमुख on 27 May, 2020 - 08:20

तोच सागर किनारा
तोच थंडगार वारा
तोच खडक भिजला
मीही तसाच एकला

जगू कसा मी एकटा
कशी गेलीस सोडून
नाते युगाचे आपले
एका क्षणात तोडून

माझे मन ते मासुळी
तुझ्या प्रेमाच्या जाळ्यात
पाणी भरतीचे आले
काय माझ्याच डोळ्यात

दूर धावत येणारी
कशी किनाऱ्याला लाट
तिला पाहून स्मरली
तुझी पहिली ती भेट

तुझे पार धुंद होणे
मजकडे ते येताना
वाट विसरून जाणे
पुन्हा परत जाताना

का संपला सहवास
आता सुखाला आहोटी
स्वप्ने कोमेजली माझी
गाणे विरहाचे ओठी

Group content visibility: 
Use group defaults