जिव्हा जिज्ञासा

Submitted by ज्येष्ठागौरी on 25 May, 2020 - 22:27

जिव्हा जिज्ञासा

शाळेत असताना गोड,तिखट,आंबट,कडू,तुरट आणि खारट अशा सहा चवी असतात असं कळलं,तर आजीकडून भक्ष्य,भोज्य,लेह्य ,चोष्य आणि पेय असे पाच भोजन प्रकार असतात असं समजलं आणि लक्षात अालं की सत्य, द्वापार,त्रेता आणि कली या चार युगांमध्ये, रज,तम आणि सत्व या तीन गुणांनी युक्त ,खाणे आणि पिणे या दोन क्रियांची जबाबदारी अेकटीवर पडते ती म्हणजे जिव्हा.
माझ्या ओळखीत आणि बघण्यात खाण्यापिण्याची आवड नसणारा माणूस नाही. कमी अधिक प्रमाणात सगळेच खाण्याचे शौकीन असतात आणि आपापल्या परीनं त्याचं समर्थन करत असतात.पण मी By Choice Vegetarian असल्यानं मी फक्त शाक पदार्थांबद्दल लिहू शकते. माझ्याही जिव्हा जिज्ञासेची सुरुवात वरण ,भात ,तूप ,मीठ आणि लिंबू ह्या पंचामृताने झाली असणार आणि याव्यतिरिक्त श्रेष्ठ असा पदार्थ नाही अशी माझी अाजन्म समजूत झाली.नंतर अशा श्रेष्ठ पदार्थांमधे भर पडत राहिली आणि काही कालांतरानं कमी श्रेष्ठ झाले आणि यादीतून गळले पण वरणभात हा अव्वल नंबरावर राहिला.पण अेकूणातच बहुतेक सर्व भाज्या आणि फळं आवडत असल्यानं कधी पंचाअीत आली नाही. बापूंबरोबर मंडअीत जाअुन भाजी आणायची गोडी लागली ती आजतागायत कायम आहे. बापू मंडअीतून नुसती भाजी आणायचे नाहीत तर मुलं आणि नंतर नातवंडं यांना दाखवायला आमच्या भल्या मोठ्या टेबलवर रंगसंगती अनुभव आणायचे.पांढरा मुळा,लाल मुळा कोबी, फ्लॉवर, पिवळी लिंबं,टोमॅटो,बीट,दुधी,कारली सगळं मांडून ठेवायचे.संपूर्ण लाल भोपळा आणून तो मुलांना कोरुन दाखवून म्हातारीची गोष्ट जिवंत करायचे.नंतर त्या भोपळ्याची वाटावाटी करताना आअीला काव यायचा.त्यांनी नातवंडांना दाखवायला संपूर्ण अख्खा पडवळ मंडअी ते औध रिक्शात अुभा धरुन आणून हात दुखवून घेतलाय. या भोपळ्यावरुन दोन गोष्टी आठवल्या,अेक म्हणजे सुधाकाकूनी, केलेल्या अप्रतिम भोपळ घारग्यांना काय म्हणतात अशी विचारणा करणाऱ्या विशाखापट्टणमच्या मिलिटरीच्या Quarters मधे राहणाऱ्या अमराठी भगिनीस These are Pumpkin Cookies असं सांगून घरच्यांना चक्रावून सोडलं होतं आणि दुसरं म्हणजे मंडअीजवळ वाळलेले पोकळ दुधी भोपळे मिळायचे मोहननी ते आणून त्यावर करकटकनी कोरुन आतून दिवा सोडून सुंदर Lampshade केली होती.
तर रविवारी सकाळी मंडअीत जाणे हा आनंदानुभव आहे.अनेक ओळखीची मित्रमंडळी तिथेच भेटतात आणि आपल्यासारखे "वेडे" भेटल्याचा आनंद होतो. मंडअीतही आपली बांधून ठेवलेली मंडळी असतात बरं.जसे बापूंचे बटाटेवाले दत्तोबा होते,तशी माझी स्मिता आहे , नारळवाले पावगी आहेत, मंडळी वर्षानुवर्षे अेकमेकांना आेळखत असल्यानं दोन्ही बाजूच्या घरच्या लग्नाकार्यांना हजेरी लागते. . मिरची ,कोथिंबीर,आलं, लिंबू आणि कढीपत्ता हे पंचक विकणारी मंडळी वेगळी.मोसमानुसार चिंच,कैऱ्या,मटार,हरभरा यांनी आतली आणि बाहेरची मंडअी फुलून जाते. चंदनबटवा , पोकळा,करटुली, भोकरं, परवर अशा अनवट भाज्यांबरोबर विदेशी ब्रोकोली,झुकिनी,पार्सले अेकत्र नांदते.ती हिरवाअी डोळ्यांना अेक आठवडा पुरते.
लेह्य म्हणजे लोणचं किंवा चटणी , चाटून खाण्यासारखा पदार्थ.या चटणी प्रांतात आअी फार वाकबगार होती. मनिषा दीक्षितांच्या पुस्तकात वर्णन केलं आहे तशी "चटणी चंद्रिका किंवा चटणी सम्राज्ञी.बेळगावची असल्यानं ओल्या आणि कोरड्या चटण्या आमच्या घरी कायम.
दाणे,डाळं,तीळ,कारळा,जवस,लसूण आणि गन पावडर अशा कोरड्या आणि हरतऱ्हेच्या ओल्या चटण्या, अगदी कच्च्या बटाट्याच्या चटणीपर्यंत.कशाची सालंबिलं तिच्या तावडीतून सुटायचीच नाहीत.आधी खलबत्ता ,पाटा वरवंटा आणि नंतर मोहननी तिला त्याच्या सुरुवातीच्या कमाअीतून सुमित कंपनीचा मिक्सर आणून दिला होता त्या सगळ्यांना शब्दशः हाताशी धरुन ती हे काम करत असे.संजय तिला म्हणायचा की अाअी तू त्या मिक्सरमधे फक्त विटकरीचे तुकडे घालून पूड करायची शिल्लक ठेवली आहेस, ती पण कर म्हणजे राधाबाअींना सोपं होअील तवे घासणं.पण अशी ही चटणी सम्राज्ञी कैरी लिंबू यांच्या बरोबरंच अोली हळद, माअीनमुळं, अांबेहळद , मिरच्या , आवळे, मिक्स भाज्या यांची चविष्ट लोणची "घालायची " आणि लाल , हिरवी मिरची तसंच लाल आणि हिरव्या चिंचेचे अनेक प्रकारचे ठेचे आणि पंचामृतही करायची...तिची मोहरी फेसून लावलेली मिरची अफाट असायची,त्याचं प्रमाणही सोपं,सहज लक्षात राहण्याजोगं,माझ्या वहिनीनं शुभांगीनं लिहून ठेवलं आहे.आई छुंदा, मोरावळा, मेथांबा,साखरांबा,गुळांबा करायची. रंजकासुदधा ....
जाता जाता अेक आठवलं आम्ही ज्या चविष्ट चटण्या खाअुनही तिची सतत गंमत करत असायचो ती Chutney आता Oxford Dictionary मधे समाविष्ट आहे आणि Masterchef Australia मधेही आपल्या लेह्य पदार्थाला स्थान मिळालेलं पाहून अाअी समाधानानं हसली असेल.
चोष्य पदार्थ मात्र आमटीतल्या शेवग्याच्या शेंगा आणि आंबे याशिवाय आठवत नाहीयेत अुन्हाळ्यात आंब्याबरोबर येणारी आअी घालायची ती वाळवणं मात्र आठवताहेत. पापड,पापड्या कुरडया,सांडगे, गवारीच्या शेंगा दह्यातल्या, बटाट्याचा कीस,वेफर्स.पण साबुदाण्याच्या अर्धवट ओल्या पापड्या खाअुन टाकण्यात संजयचा हात कोणी धरायचं नाही ,प्लास्टिकच्या कागदावर घातलेल्या पापड्यांचा अर्धा भाग तो लीलया संपवायचा. आअी कधी कधी त्यात टोमॅटोचा रसही घालायची. कुरडअीच्या चिकाचे सांडगे पण छान असायचे.अरु करते ती चीक काढल्यानंतरच्या गव्हाची वाळवलेली अप्रतिम भूसवडी आणि मृणाल करते त्या पद्धतीनं केलेला बटाट्याचा कीस बेफाट असतो. डाव्या बाजूला असणारं तळण म्हणजे बेतात खाण्याच्या चिजा,त्यात पापड पापड्या कुरडयांबरोबरच,विविध भजी ,अळूची वडी ,सुरळीची वडी , वडे , अपर्णाची वाटली डाळ ,सुचित्रा करते तशी वांग्यांची कापं,या सारख्या विविध रसना पण त्या हादडण्यातली मजा कोणी सोडायचं नाही .आता हळुहळु हादडणे,हाणणे आणि चेपणे या क्रियापदाखाली येणारं तळण खाणं कमी झालंय. विनोबा म्हणत प्रत्येकाच्या आयुष्यात हर अेक गोष्टीचा कोटा असतो , माझा बटाटेवड्याचा मी संपवला असावा.आता तर त्याला "फरसाण Item म्हणतात .त्यात तळणाची मजा नाही.
जेवणात डाव्या बाजूला असणारी अजून अेक गोष्ट म्हणजे कोशिंबीर ,ते
अेक धमाल मिश्रण असतं. किती वैविध्य ,कच्ची भाजी किंवा फळं दही ,दाण्याचं कूट ,खोबरं ,कुठं साय.आअी श्रावण घेवड्याचीही कोशिंबीर खोबरं घालून करायची.मीना काकडीच्या कोशिंबिरीत भिजवलेली मुगाची डाळ घालणार तर शुभांगी गाजर मटार कोशिंबिरीत तिळाची फोडणी देणार. दही पाणी काढलेलं असलं की अजून छान असं विजूचं म्हणणं असणार. तसंही दही लावण्याच्या म्हणजे विरजण्याच्या पद्धती पण किती.बापू दोन भांड्यांतून लस्सी सारखं फेसाळ करुन आधी भांड्याला आतून दही लावून घेणार आणि मग दूध अोतणार तर आअी चमच्याचे मोजून शंभर वेढे ढवळणार, आजी थंडीत दह्याला अुबदार शालीत गुंडाळणार,मी तेच काम microwave मधे ठेवून करणार आणि अमिता दही चांगलं लागावं म्हणून दह्याशी बोलणार.... end effectतोच घट्ट वडी दही..
तशा ह्या पदार्थांच्याही फार गंमती जंमती असतात.टोमॅटोची कोशिंबीर नैवेद्याला चालत नाही आणि पुरणावरणाच्या स्वयंपाकात, पुरणाला काकडी दाखवलेली चालत नाही बरं,तार येत नाही म्हणतात पुरणाला...अशाच काही अाख्यायिका थालीपीठ, भाजणीचे वडे किंवा भरड्याचे वडे या बाबतीत आहेत.
तेंव्हा अशी माझ्या जिव्हा जिज्ञासेची डावी बाजू......पाहता पाहता किती गोष्टी नव्यानं सापडल्या.आअीसारखंच बहुतेक बायका साधारणपणे अेक छोटा कारखानाच चालवतात, अुन्हात खटाटोप करतात आणि ही सर्व धडपड आपल्या माणसांना विविध प्रकारच्या चवींचं जेवता यावं म्हणून. किती छान अनुभूती आहे ही.
जिव्हा जिज्ञासेच्या डाव्या बाजूपाशी अिथंच थांबते.अुजवी बाजू पुढं येअीलंच!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर लेख...
खूप जुन्या आठवणी जागवल्या..

आरे बापरे!!! कीती हे शाकाहारी खाण्याचे प्रकार आणि त्या साठी करावी लागणारे खटाटोप. उन्हाळा आला की आम्ही मस्त पैकी भरपूर ताक, लसूण आणि अल्ले घातलेली नाचण्याची अंबिल पितो. उन्हाळा अजिबात बादत नाही.

आवडलं लिखाण
पाच भोजन प्रकाराबद्दल अजून सविस्तर लिहाल का ? कृपया. धन्यवाद.
बर्फाचा गोळा चोष्य मधे मोडेल का?

माझ्याही जिव्हा जिज्ञासेची सुरुवात वरण ,भात ,तूप ,मीठ आणि लिंबू ह्या पंचामृताने झाली असणार आणि याव्यतिरिक्त श्रेष्ठ असा पदार्थ नाही अशी माझी आजन्म समजूत झाली >>>> माझीपण Happy

>>>माझ्याही जिव्हा जिज्ञासेची सुरुवात वरण ,भात ,तूप ,मीठ आणि लिंबू ह्या पंचामृताने झाली असणार आणि याव्यतिरिक्त श्रेष्ठ असा पदार्थ नाही अशी माझी आजन्म समजूत झाली>>> सो ट्रु!!! डिट्टो

धन्यवाद, पाच भोजन प्रकार (गीतेत चार भोजन प्रकार आणि एक पेय असं दिलं आहे) भक्ष्य म्हणजे लाडू पोळी वगैरे, भोज्य म्हणजे खिचडी इत्यादी,चोष्य म्हणजे चोखून खाता येण्यासारखे आंबा, शेवग्याची शेंग, लेह्य म्हणजे चाटून खाता येण्यासारखं पंचामृत,चटणी लोणचे आणि पेय म्हणजे खीर बासुंदी वगैरे. ह्या लेह्य शब्दाचा उपयोग पुलंच्या माझे पौष्टिक जीवन यामध्येही आहे.

खूपच छान.

माझे पौष्टीक जीवन पोस्टावर होते. रविवारची कहाणीमधे खाद्यपदार्थ होते का?

खारातल्या मिरचीची कृती पण लिही.

बरोबर! माझे पौष्टिक जीवन पोस्टावर होते ,मी त्यातला जो उल्लेख लिहिला आहे तो त्यांनी तिथल्या डिंकाबद्दल आहे ,त्यात त्यांनी लेह्य हा शब्द वापरला आहे.पुलंचे सगळे लेख स्मरणात ताजे आहेत.तिथे चूक होणार नाही Happy

डिंकाची consistency कशी होती ह्याबद्दलचा उल्लेख आहे.त्यांनी माझे खाद्यजीवन हा स्वतंत्र लेख लिहिला आहे (फ)हसवणूक मध्ये!

त्यांनी तिथल्या डिंकाबद्दल आहे ,त्यात त्यांनी लेह्य हा शब्द वापरला आहे.पु>> ते शाई बद्दल लिहीले आहे ना?

लेह्य किंवा चोष्य नसून ते कुमारी आसवासारखे पातळ असले पाहिजे Lol असं आहे बहुतेक. डिंकाबद्दल.
लेख खूपच सुंदर आहे!

या लेखातील स्वर ई, उ इत्यादी आवर्जून दुसरीकडून पेस्ट करून आअी,अेक,अुजवी ,येअीलंच,अुन्हात असे सावरकरी पद्धतीने का लिहिले असावेत बारे ? केवळ फॅड म्हणून का? वाचताना भयंकर त्रास होतो . म्हणून वाचायचे सोडून दिले आहे

मी ते पेस्ट केलेले नाहीत हे मुद्दाम नमूद करते,ना की ते फॅड म्हणून लिहिले आहे,माझी आई अशीच लिहायची आणि सुदैवाने आधीच्या गूगल indi वर ती सोय होती.

हा मिस झालेला.
मी ही तुमच्या आई प्रमाणे 100 वेढे ढवळून दही लावते.
माझी एक च तक्रार आहे ती म्हणजे तुम्ही ई लिहित नाही
मंडई - मंडअी
आई - आअी
वाचताना जरा विचित्र वाटते....
बाकी हे जिव्हा प्रकरण धमाल आहे....
पुढील भागाच्या प्रतिक्षेत

क्या बात है...
आई, अन् बाकीचे स्वर अ च्या बाराखडी मध्ये वाचताना मजा आली. माझी आत्या असे लिहायची... नागपूर कडे वापरलं जातं असं माझ observation