अफसीन

Submitted by Theurbannomad on 25 May, 2020 - 19:40

मसूद आपल्या गढीच्या छतावर उभा राहून समोरची खाडी न्याहाळत होता. त्याच्या आसपास त्याचे हुजरे, खासे सरदार, खबरे, लढवय्या गुलामांच्या तुकडीचा प्रमुख अशा अनेकांची गर्दी होती. ती गढी म्हणजे मसूदच्या तीस वर्षांच्या हिंसक आणि आक्रामक लढायांचं केंद्रस्थान होतं. त्याचे वडील खाडीच्या आसपासच्या परिसरातल्या टोळ्यांमधल्या एका टोळीचे प्रमुख होते. अरबस्तानात होणाऱ्या व्यापाराचा आणि दळणवळणाचा एकमेवच स्रोत असलेल्या त्या खाडीतून रोज अनेक होड्या, गलबतं आणि पडाव मनुष्यांची आणि सामानाची ने-आण करत असत. त्यापैकी एखाद-दुसऱ्या गलबताला अडवून अथवा त्यांच्यावर चढाई करून आपली खंडणी वसूल करणाऱ्या त्या चाचे लोकांच्या टोळ्या व्यापाऱ्यांसाठी आणि तिथल्या परिसरातल्या किडूक मिडूक राज्यांसाठी जरी डोकेदुखी असल्या, तरी त्यांच्या उपद्रवाला लगाम घालायची हिम्मत कोणाच्यात नव्हती. या टोळ्यांचा हिंसक आणि कपटी इतिहासच असा होता, की त्यांना परिसरातले काही लहान राजे आपल्या राज्याला हात नं लावण्याची खंडणी देत असत. अर्थात अशा परिस्थितीत लढाऊ जहाज अथवा गलबतांचा सुसज्जित तांडा असेल, तरच त्या खाडीतून निर्धोकपणे प्रवास करणं शक्य होतं.

सराब टोळीच्या प्रमुखाच्या - आदिलच्या तिसऱ्या बायकोच्या पोटी जन्मलेला मसूद आपल्या बापाच्या आणि भावंडांच्या कृष्णकृत्यात जाणता झाल्यापासून सामील झाला असला, तरी त्याने अल्पावधीत आपापल्या महत्वाकांक्षांना मूर्त रूप देण्याची तयारी सुरु केली होती. साम - दाम - दंड - भेद आणि त्याबरोबरच त्या वाळवंटात अस्तित्वात असलेल्या आणखी एका शस्त्राचा म्हणजेच सोयरीक जुळवून कुटुंबाचा भाग करण्याच्या प्रथेचा पुरेपूर वापर करून त्याने आपली टोळी चांगलीच विस्तारली. एक एक करून आपल्या मोठ्या भावंडांचा आणि आपल्याला दाद नं देणाऱ्या नातेवाईकांचा काटा काढून त्याने टोळीवरची आपली पकड मजबूत केली. शेवटी परिसरातल्या वीस-पंचवीस टोळ्यांपैकी अर्ध्या टोळ्यांच्या प्रमुखाच्या मुलीशी लग्न करून आणि उरलेल्या टोळ्यांची 'विल्हेवाट' लावून त्याने आपला एकछत्री अंमल त्या परिसरात प्रस्थापित केला. चाचेगिरी सोडून त्याने त्या खाडीच्या वेगवेगळ्या जागी आपले सरदार पेरून रीतसर ' कर ' गोळा करायला सुरुवात केली. शेवटी आपल्या वडिलोपार्जित घराच्या जागी एक मातीची टुमदार गढी उभारून त्याने आपल्या 'सम्राटपदाचा' बिस्मिल्ला केला. मक्केच्या अमिराच्या आणि खलिफाच्या खालोखाल आता त्याच्या सामर्थ्याचा दबदबा अरबस्तानात दूरदूर पसरला होता. आपल्या पंधरा-वीस बेगम, भला थोरला जनानखाना आणि डझनभर अपत्यांच्या बरोबर आपल्या त्या प्रचंड गढीमध्ये तो विश्वविजेत्याच्या थाटात राहायला लागला होता.

आज गच्चीवर आपल्या खास लोकांबरोबर जमण्याचं कारण अर्थातच खास होतं. त्याला पुढच्याच महिन्यात आपल्या पन्नासाव्या जन्मदिवसाच्या निमित्ताने आपल्या खास लोकांना जंगी मेजवानी द्यायची होती. आपल्या बाजूच्या आसनावर त्याने आपल्या थोरल्या नुकत्याच मिसरूड फुटलेल्या मुलाला - हमीदला बसायला सांगून त्याने आपल्यानंतर आपला उत्तराधिकारी कोण या प्रश्नाचं उत्तर आपल्या बाजूने सगळ्यांपर्यंत पोचवलं होतं. हमीद आपल्या बापाच्या लौकिकाला साजेसाच होता, कारण त्याचं क्रौर्य आणि निष्ठुरपणा परिसरात चांगलाच 'ख्यातनाम' होता.विशीच्या उंबरठ्यावर असतानाच त्याने वाहतूक कराच्या व्यतिरिक्त प्रवासी लोकांकडून ' सुरक्षा कर' वसूल करायला सुरुवात करून आपल्या पुढच्या वाटचालीची कल्पना सगळ्यांना दिली होती. सुळसुळीत कपड्यांमधल्या कमनीय स्त्री-मदतनीसांनी सगळ्यांच्या पेल्यांमध्ये मद्य ओतल्यावर मैफिल रंगात अली आणि जमलेल्या सगळ्यांनी खरपूस भाजलेल्या मांसखंडाच्या तुकड्यांचा आस्वाद घेत एक एक करत आपापल्या सूचना मांडायला सुरुवात केली.

" जहाँपनाह, मला असं वाटतं , की आपण पूर्वेकडच्या देशातून खास नर्तकींना इथे आणावं. मी ऐकलंय, त्यांच्या नाचामध्ये भले भले फकीर लोक पण बेहोष होतात..." सरदार कासीम पेला उंचावत फिदीफिदी हसत बोलला.

" जहाँपनाह, आपल्या अक्ख्या साम्राज्यात सात दिन लगातार प्रत्येक घरावर, रस्त्यावर आपण आपला निशाण लावून त्याच्या खाली पलिते जाळत ठेवूया...आने जाने वाले मुसाफिरों की आँखे खुली कि खुली रीहनी चाहिये..." उंटांच्या पलटणींचा प्रमुख फरीद आपले दात विचकत हसला.

त्या सगळ्यांमध्ये आपल्या राजाच्या वाहवाहीची आणि स्तुतीची स्पर्धा सुरु होती. या सगळ्यात शांत बसलेला एकमेव होता त्या साम्राज्याचा व्यापारप्रमुख एहसान. त्याच्याकडे नजर गेल्यावर कुतूहलाने मसूदने दाढी कुरवाळली आणि त्याला प्रश्न विचारला, " क्या हुआ एहसान ? बात क्यों नहीं कर रहे हो?"

एहसान आपल्या जागेवरून उठला. हातातला पेला त्याने खाली ठेवला. आपल्या कपड्यांवरच्या सुरकुत्या ठीकठाक केल्या आणि हात मागे नेऊन छाती पुढे काढत तो उभा राहिला. अचानक बैठकीचा नूर पालटला. एहसान काय बोलणार, याकडे सगळे जण कान टवकारून लक्ष द्यायला लागले.

" जहाँपनाह, मी मागच्या महिन्यात मक्केला गेलो होतो तेव्हा तिथल्या अमीराच्या महालात खलिफांना भेटलो होतो. त्यांनी बोलता बोलता मला सांगितलं, की त्यांच्याकडे एक किताब आहे. ती किताब आत्तापर्यंत या पवित्र अरब जगात झालेल्या सगळ्या मोठ्या सम्राटांची किताब आहे. खलिफा म्हणाले, की त्या किताबात जोपर्यंत एक सफा ( अरबी भाषेत पुस्तकाचं पान ) आपल्या नावाचा जोडला जाणार नहीं, तोपर्यंत इतिहासात आपला उल्लेख महान अरबी सम्राटांच्या गिनतीमध्ये होणार नाही. मेरी आप से दरख्वास्त है हुजूर, आपण आपल्या शिष्टमंडळाला उंची वस्त्रं, दौलत आणि मोती घेऊन मक्केला खलिफा साहेबांना भेटायला पाठवावं आणि त्यांना आपल्या नावाचा सफा त्या किताबात शामिल करायला सांगावा...मेरे हिसाब से आप के लिये इससे बडा तोहफा और कुछ नहीं हो सकता..."

मसूद आपल्या आसनावरून उठला. त्याच्या डोळ्यांमध्ये वेगळीच चमक आली. त्याने आवेगाने एहसानला आलिंगन दिलं. बाकीच्या सरदारांनी आपापले पेले उंचावून मसूदला अजून हरभऱ्याच्या झाडावर चढवलं.मसूदला अरबस्तानाच्या महान लोकांच्या यादीत आपलं नाव दिसायला लागलं. मद्याचा अंमल चढलेला होताच...त्यामुळे त्याने एहसानलाच हमीद आणि आपल्या चार-पाच खाशा दरबाऱ्यांबरोबर दुसऱ्या दिवशी मक्केकडे कूच करायची आज्ञा दिली. त्या रात्री मसूद आपल्या जनानखान्यात बेहोष होऊन पुन्हा एकदा आपलं तारुण्य जगला.

एहसान, हमीद आणि बाकीचे हुजरे दरबारी चार-पाच दिवसांच्या प्रवासानंतर मक्केला अमीराच्या गढीसमोर पोचले. त्या गढीच्या बाजूलाच एका छोट्याशा हवेलीत खलिफा राहत होते. आजूबाजूच्या छोट्या घरांमध्ये खलिफांचे मदतनीस,काब्याच्या परिसराचे रखवालदार, हज्जच्या यात्रेची व्यवस्था बघणारे व्यवस्थापक असे सगळे जण राहात होते. त्या परिसराच्या भोवतालच्या संरक्षक भिंतीच्या वरच्या भागात सशस्त्र सैनिक डोळ्यात तेल घालून त्या परिसराचं रक्षण अहोरात्र करत होते. सुरुवातीच्या चौकशा आणि तपासण्या पार पडल्यावर शस्त्रं जमा करून एहसान, हमीद आणि मंडळी खास पाहुण्यांच्या सोयीसाठी बांधलेल्या एका ऐसपैस घरात उतरले. खलिफा साहेबांनी नमाझानंतर भेटायची वेळ दिली. त्याप्रमाणे आपल्या जय्यत तयारीनिशी सगळे जण खलिफा साहेबांच्या प्रशस्त दिवाणखान्यात आले आणि अधीर होऊन खलिफा साहेबांच्या येण्याची प्रतीक्षा करायला लागले.

अखेर खलिफा साहेब आपल्या चार-पाच मदतनीसांबरोबर दिवाणखान्यात आले आणि त्यांनी स्थान ग्रहण केले. त्यानंतर बाकीचे आपापल्या जागेवर उकीडवी मांडी घालून बसले आणि सगळ्यांनी काही सेकंद अल्लाहची करुणा भाकली. डोळे उघडून खलिफा साहेबांनी सगळ्यांचं स्वागत केलं आणि येण्याचं प्रयोजन विचारलं.

आपल्या वयाला आणि स्वभावाला अनुसरून हमीद उतावीळपणे उठला आणि त्याने आपल्या हाताने आणलेल्या वस्तूंचा नजराणा खलिफासाहेबांना पेश केला. खलिफा साहेबांच्या प्रशंसेचे चार शब्द बोलून मग त्याने थेट मूळ मुद्द्याला हात घातला.

" खलिफा साहेब, या पवित्र जागेच्या प्रमुखाची आपली जागा....आम्ही प्रेषितांनंतर आपल्याकडे या महान जगाचा मार्गदर्शक म्हणून बघतो. आपल्या या जगात अनेक महान योद्धे आणि शासक होऊन गेले, ज्यांनी आपल्या कामाचा लौकिक दूरदूरपर्यंत पसरवला. आमची अशी विनंती आहे, की आपल्याकडच्या पवित्र किताबात आपण आमच्या अब्बा हुजुरांचं नाव शामिल करून आजच्या अरब जगतातल्या सर्वाधिक शक्तिशाली, महान आणि कर्तृत्ववान सम्राटाचं नाव इतिहासात अमर करावं..."

खलिफांनी एहसानकडे कटाक्ष टाकला. त्याला थोडंसं अवघडल्यासारखं झालं. या पद्धतीचं संभाषण अशा पवित्र जागेत थोड्या अदबीनं आणि शांतपणे व्हावं, हा साधा संकेत आपल्या उतावळ्या राजपुत्रामुळे धुडकावला जात आहे, हे त्याला समजलं, पण बाण धनुष्यातून निघून गेला होता. खलिफांनी आपले डोळे काही सेकंद मिटून घेतले.उतावीळपणे आणि अधीरपणे हमीद तसाच उभा राहिला. एहसान ओशाळवाणा होऊन खाली मान घालून स्तब्ध बसला.

" बेटा, ती किताब काही खेळ नाही.त्या किताबात जे जे महान लोक शामिल आहेत, त्यांच्या कर्तृत्वाची साक्ष या अरबस्तानाचा इतिहास देईल...त्यांनी अनेक नेक कामं केली. या जगाला काफिर लोकांपासून वाचवायला आपले प्राण दिले. धर्माच्या प्रसारासाठी प्रयत्न केले...आपल्या तलवारींनी दुश्मनांना पाणी पाजलं...आम्ही आपल्या अब्बाना जाणतो. ते शक्तिशाली असले तरी त्यांनी जे काही केलं, ते स्वार्थासाठी केलं. अजूनही ते जे काही करतात ते स्वतःसाठी...त्यांच्या नावाचा सफा या किताबात जोडायची अनुमती मला माझा जमीर देत नाही...मला आशा आहे तुम्ही समजून घ्याल..."

हमीदच्या चेहरा पडला. त्याने आपल्या नजराण्याच्या थाळ्यांवरून कपडा बाजूला केला. त्या थाळ्या खलिफासाहेबांच्या समोर सरकावल्या. खलिफा पुन्हा एकदा हसले आणि उत्तरले, " बेटा, याची मला काहीही गरज नाही...हि दौलत झकातीमध्ये शामिल कर आणि अडचणीत असलेल्यांना यातून मदत कर...आणि या सगळ्यामुळे माझा निर्णय बदलत नसतो....तसं केलं तर मी परवारदिगारला काय जवाब देऊ?"

हमीद आता संतापला. त्याने रागारागाने आपल्या चढ्या आवाजात खलिफांना बोल लावायला सुरुवात केली. वातावरण तापायला लागलं. खलिफा शांत होते. त्या शांततेमुळे हमीद आणि बरोबरीच्या हुजऱ्यांचा सुद्धा तोल सुटला. एकटा एहसान तेव्हढा शांत होता. अखेर आरडाओरडा ऐकून अमीर आपल्या लोकांबरोबर तिथे पोचला आणि त्याने महत्प्रयासाने हमीद आणि बाकीच्या लोकांना तिथून बाहेर काढलं. खलिफांनी एहसानला तेव्हढं थांबायला सांगितलं. आता दिवाणखान्यात खलिफा आणि एहसान असे दोघेच उरले.

" खलिफा साहेब, मी माझ्या लोकांच्या आणि मुख्यत्वे हमीदच्या वतीने माफी मागतो...रहम....जे झालं ते मला अपेक्षित नव्हतं. " एहसान शरमेने खाली मान घालून बोलला.

" बेटा, जो होता है, उसकी मर्जी से होता है...हम तुम कुछ नहीं करते..." खलिफांनी स्मितहास्य करत उत्तर दिलं. " तुम नेक बंदे हो...मला माहित आहे, तू जरी त्या जालीम आणि कपटी मसूदच्या राज्याचा व्यापार सांभाळत असला, तरी तू कधीही वाईट पद्धतीने कामं केलं नाहीं...तू लोकांवर अत्याचार केले नाहीत आणि तू कोणाची कधी फसवणूक केली नाही..."

" पण माझ्याकडूनच त्या किताबत नाव सामील करून घ्यायचा प्रस्ताव आमच्या जहाँपनाहना गेला होता...आणि मी इतका नक्कीच सांगू शकतो, की या प्रकारामुळे ते चिडले तर ते या पाक भूमीवर हल्ला करून तुम्हाला आणि अमीर साहेबांना कैद करायचं दुस्साहस सुद्धा करायला कमी करणार नाहीत...आणि त्यांचं सामर्थ्य तुम्हाला माहित आहे.." एहसान अडखळत बोलला.

" बेटा, जिंदगी आणि मौत ठरवणारा कोण? मसूद हज यात्रेला येणाऱ्यांकडून सुद्धा खंडणी वसूल करतो...अशा माणसाच्या हातून आम्हाला मौत आली तरी अल्लाहच्या दरबारात आम्ही ताठ मानेने जाऊ...पण मी तुला पुन्हा सांगतो बेटा, जे झालं आणि जे होणार आहे, ते त्यालाच माहित...." खलिफा साहेबांनी दाढी कुरवाळत एहसानला धीर दिला. " तुला हवं असेल तर तू इथेच राहू शकतोस...आणि गेलास तरी तुला मी इतकीच विनंती करेन, की मसूदच्या सैनिकांप्रमाणे लढायला उभा राहू नकोस...त्यातच तुझं भलं आहे.."

एहसान जड पावलांनी बाहेर आला. एकटाच आजूबाजूच्या परिसरात जाऊन लोकांना आपल्याकडचे पैसे वाटून शेवटी काब्याचं दर्शन घेऊन आला. हमीद आणि बाकीच्या मंडळींना तितकंही करायची बुद्धी झाली नाही. दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे त्यांनी कूच केलं आणि चार दिवसांच्या प्रवासानंतर ते गढीत आले. त्यांनी केलेलं कथन ऐकून मसूदच्या तळपायाची आग मस्तकात गेली.

अखेर आपल्या प्रचंड सैन्याबरोबर मक्केला जाऊन तिथल्या अमीराला आणि खलिफांना कैद करायचं आणि स्वतःला अरब जगाचा अनभिषिक्त सम्राटाचं नव्हे, तर पवित्र मशिदीचा रक्षणकर्ता म्हणून घोषित करून आपल्या मर्जीचा खलिफा नेमायचा असा निर्णय मसूदने घेतला. त्या किताबात आपलं नाव आपण अरबस्तानाच्या इतिहासातला सगळ्यात महान आणि शक्तिशाली सम्राट म्हणून सामील करायचं असाही त्याने आपल्या सरदारांना सांगितलं. आठवड्याभरात मोहिमेची तयारी झाल्यावर चार दिवसात ती मग्रूर आणि रक्तपिपासू सेना मजल दरमजल करत अमीराच्या राज्याच्या वेशीसमोर पोचली. आपल्या सेनेची व्याप्ती बघून कदाचित अमीर आणि खलिफा आपल्याला शरण येतील अशा मस्तीत मसूदने एहसानला निर्वाणीचा खलिता घेऊन आत पाठवलं.

एहसानकडे बघून खलिफा पुन्हा एकदा हसले. एहसानने त्यांना आश्वस्त केलं, की तो त्यांच्या उत्तराचा संदेश घेऊन आपल्या मालकाला शेवटचा भेटेल आणि लढाई सुरु व्हायच्या आधीच तिथून निघून जाईल. खलिफांची त्याला बसवून घेतलं आणि त्याच्या हातात एक रेशमी कपड्यात गुंडाळलेली वस्तू दिली. " उत्तरादाखल फक्त हे तू तुझ्या मसूदला दे..." त्यांनी हसत हसत एहसानला सांगितलं.

" हे काय?" एहसान गोंधळला.

" बघ उघडून..." खलिफांनी त्याला खुणावलं.

तो कपडा उलगडल्यावर एहसानला एक जाडजूड पुस्तक आणि त्याच्या मुखपृष्ठावर सुवर्णाक्षरांनी लिहिलेले शब्द दिसले. ते वाचल्यावर तो हादरला...

" ही तर पवित्र किताब...खलिफा साहेब, हे तुम्ही मला घेऊन जायला सांगताय?"

" हो बेटा, जे सांगतोय ते कर...विचार करू नको. आणि हे तुझ्या मसूदला दिल्यावर शांत बस. किताब गुंडाळलेला कपडा तेव्हढा बरोबर ठेव..."

" पण...."

" बेटा, भरोसा रख. मैने जो कहा था, वो याद कर.." खलिफा उठले आणि त्यांनी एहसानला निघायची विनंती केली.

एहसान मसूदच्या शाही तंबूत आला आणि त्याने झालेला प्रकार कथन केलं. कपडा उलगडून त्याने ती किताब मसूदला दिली आणि कपडा आपल्या कमरेला गुंडाळला. मसूदला आता आभाळ ठेंगणं झालं होतं.

" ते आपल्या सैन्याकडे बघून घाबरले...माझ्या सामर्थ्याकडे बघून घाबरले....ही किताब मला त्यांनी देऊन टाकली...देखो तो सही...ज्या किताबासाठी सगळं झालं, तीच माझ्या हातात आहे आणि अजून मी तलवार हातातही घेतली नाहीये...हा आहे माझा दरारा..ही आहे माझी दहशत..." मसूदने आपल्या हातातली किताब थयथय नाचवत अक्राळविक्राळ हास्य केलं. आजूबाजूचे खुशमस्करे आणि सरदार पुन्हा त्याच्या जयजयकारात गुंगले.

" उद्या सकाळी नमाज पढून झाला, की आपली एक तुकडी पुढे जाईल...तो अमीर आणि खलिफा आपल्या कैदेत राहतील. त्यांना काय वाटलं...किताब दिली म्हणजे माझ्या अपमानाचा मी बदल घेणार नाही? आणि आपल्या शाही खजिन्याच्या सोन्याची शाई बनवा. माझ्या नावाचा सफा किताबात पहिला असेल आणि तो सुद्धा सोन्याच्या शाईने लिहिलेला..." मसूदने फर्मान सोडलं आणि एहसान खिन्न मनाने आपल्या तंबूत परतला.

रात्री चंद्र डोक्यावर आला तसा अचानक घोडयांच्या टापांचा आवाज यायला लागला. सावध होऊन मसूद, त्याची मुलं, सरदार आणि सैनिक शस्त्रं घेऊन बाहेर आले. आजूबाजूला मोजकेच सैनिक आपल्या तलवारींचे घाव घालून मसूदच्या सैन्याला कापून काढत होते. मसूद आता भांबावला. अमिराकडे इतकं तयारीचं आणि लढाऊ सैन्य नक्कीच नव्हतं, तेव्हा हे आक्रमण कोणी केलं याचा पत्ता त्याला लागत नव्हता. त्याने आपल्या अंगावर चिलखत चढवलं आणि घोड्यावर उडी मारून तलवार परजली. आजूबाजूला बघितल्यावर अचानक त्याच्या लक्षात आलं, की समोरची फौज काहीतरी वेगळीच आहे. त्या फौजेतल्या एकालाही साधं खरचटलंही नव्हतं...त्यांच्यावर केलेले घाव फुकट जात होते आणि त्यांच्या पांढऱ्याशुभ्र कपड्यांवर त्यांनी कापून काढलेल्या एकही सैनिकाच्या रक्ताचे शिंतोडे उडत नव्हते. एक एक करून मसूदच्या सैन्याचा, सरदारांचा आणि मुलांचा नायनाट झाला. मसूद एकटाच आता तलवार घेऊन त्या अलौकिक सैन्याच्या मधोमध उभा होता. त्याच्या व्यतिरिक्त केवळ एहसान त्या रणभूमीवर जिवंत उरला होता.

" तुम सब कौन हो? आणि कपटाने माझ्या सैन्यावर आक्रमण का केलं?" मसूदने संतापाने विचारलं.

एक जण घोड्यावरून उतरून मसूदच्या समोर येऊन उभा राहिला.

" मी अहमद बिन सईद अल हुमेदी.....नाव ऐकलंय?"

" होय...तीनशे वर्षांपूर्वी इथे या नावाचा एक सम्राट होता...त्याने काफ़िरांच्या आक्रमणापासून मदिना शहर वाचवलेलं होतं...पण तुझा आणि त्याचा काय संबंध?" मसूदने विचारलं.

" तो मीच आहे...आणि आजूबाजूला जे आहेत ते या पाक अरब भूमीच्या रक्षणासाठी लढलेले माझ्यासारखे योद्धे आहेत...तुझ्या चार हजार सैनिकांना , सरदारांना आणि मुलांना आम्ही ९९ जणांनी खाक केलं आहे....आमची ताकद कळली?" अहमदने मसूदच्या नजरेत नजर भिडवून विचारलं.

" म्हणजे? तुम्ही....तुम्ही भूत..."

" भूत नाही, योद्धे. बेवकूफ, तुला काय वाटलं? उस किताब में क्या सिर्फ हमारे नाम के सफे है? ती पवित्र किताब आहे....ती किताब म्हणजे अरब जगाच्या योद्ध्यांची सेना आहे...आणि या पाक पवित्र भूमीवर कोणीही काहीही वेडंवाकडं करायचा प्रयत्न केला तर त्या किताबातून आम्ही प्रकट होतो...जब तक हम है, तब तक यहां कोई काफर कुछ नहीं कर सकेगा..."

मसूद आता थरथरायला लागला. त्याला आपण आपल्या सत्तेच्या आणि अहंकाराच्या धुंदीत केलेली घोडचूक समजली. त्याच्या हातातून तलवार गळून पडली. तो क्षमायाचना करणार, तोच अहमदच्या हातातली तलवार सपकन आडवी फिरली आणि मसूदच्या धडापासून त्याचं शीर वेगळं झालं.

दुसऱ्या दिवशी एहसान खलिफांसमोर ती किताब आणि त्या किताबावरचा तो पवित्र कपडा घेऊन उभा राहिला. खलिफा साहेब आपल्या हातात एक कागद घेऊन त्यावर काहीतरी खरडत होते. एहसानने खलिफा साहेबांचे आभार मानले. आपल्याला मसूदला तो प्रस्ताव द्यायची बुद्धी होणं, खलिफाच्या दरबारात हमीदने कोणालाही काहीही बोलू नं देता उतावळेपणा करणं आणि त्यावरून मसूदने थेट आक्रमण करणं हे 'कोणीतरी' अगोदरपासून योजलं होतं आणि आपल्याकरवी करून घेतलं होतं, हे त्याला आता नीट उमगलं होतं. किताब खलिफांना दिल्यावर त्यांनी त्या किताबाच्या शेवटी आपण खरडलेला एक सफा जोडला. त्या सफ्यावर काय लिहिलेलं आहे, हे एहसानला दिसलं नाही, त्यामुळे कुतूहलाने त्याने खलिफांना विचारलं.

" बेटा, अब तक इस किताब में ९९ नाम किनके है, ये तो तुम्हे मालूम है...ते सगळे रणांगणावररचे योद्धे आहेत. पण कधी कधी युद्धात विजय मिळवायला योग्य मध्यस्ती करणारा एक चांगला मध्यस्थ लागतो....असा मध्यस्त बरेचदा युद्धात अफसीन ( महत्वाचा योद्धा ) ठरतो....त्याचं नाव आज या किताबात शामिल झालं..."

" म्हणजे?"

खलिफा साहेबांनी किताब उघडून तो सफा एहसानला दाखवला. त्यावर आजच्या कामगिरीच्या वर्णनासकट खुद्द एहसानचं नाव लिहिलेलं होतं!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खुप छान!

टायपो आहेत काही ते करेक्ट करा.

धन्यवाद !
माझ्या ब्लॉग्सना भेट द्या आणि आपल्या प्रतिक्रिया कळवा. शक्य असल्यास आपल्या मित्रमैत्रिणींना ब्लॉग वाचण्याची माझ्यातर्फे विनंती करा.

https://humansinthecrowd.blogspot.com/
https://demonsinthecrowd.blogspot.com/