खुर्ची..

Submitted by मनोजकुमार देशमुख on 25 May, 2020 - 00:56

धंदा खुर्चीचा जुना
नव्या दमात चालला
जे गेलेत बळी त्यांचा
खेद कुणास वाटला?

काय झाले ? कोण मेले?
विवरणे ना पाहिले
सत्तेचे भुकेले फक्त
पद जपत राहिले

कोंडले घरात कसे
अन्न नाही खायला
ताटातूट जीवघेणी
मार्ग नाही जायला

जन्मले रस्त्यात कोणी
किती वाटेत मारले
काय पाप म्हणून हे
भाग्य माथी कोरले

अहंकारी कुंड जळे
आणि मुक्यांच्या आहूती
कोणी रक्षावे कुणाला?
षंढ सारेच भोवती

विध्वंसाचे पर्व मोठे
आघात त्याचे विषारी
हात व्यस्थ रक्षकांचे
हाय खुर्चीचे पुजारी

होऊनी उद्विग्न मग
प्रश्न काही विचारले
राजद्रोही ठरवले
जणू बंड पुकारले

आहे रोजचेच आता
सवय लाऊन घेऊ
मेले त्यात मी नव्हतो
धन्यता मानुन घेऊ

Group content visibility: 
Use group defaults