चिमणीचे दप्तर

Submitted by Sanjeev Washikar on 24 May, 2020 - 08:05

चिमणीचे दप्तर.
परमेश्वराने स्त्री व पुरुष अशा दोन जाती जरी निर्माण केल्या असल्या तरी त्यांच्यात एकमेकाबद्दल वाटणारे प्रेम,आदर ,आपुलकी ,जिव्हाळा हे मात्र कांही वेगळेच असते . मग हे नाते मुलाचे व आईचे असेल किंवा वडिलांचे व त्यांच्या मुलीचे असेल अथवा भाऊ बहिणीचे ही असू शकेल, मात्र नात्या प्रमाणे प्रत्येकाची एकमेकाबद्दल असणारी ही ओढ, ही कांही न्यारीच असते आणी शेवटी स्त्री व पुरुषाला जन्म देणारी एकमेव व्यक्ती ही स्त्रीच असते . आता पहा ना, माझी सात वर्षाची छोटी मुलगी ,मी तिला प्रेमाने "चिमणी" म्हणतो . तिची आणि माझी अशी काय गट्टी जमते कि कधी कधी मला असे वाटू लागते कि आपण तिच्या शिवाय राहुच शकणार नाही . तिची पण "My daddy is the best " अशीच कायम कल्पना असते. वडील हाच तिचा आदर्श ,वडील हीच तिची शक्ती . वडील हेच तिचे सर्व कांही.Every girl may not be queen to her Husband,but she is always a Princess to her Father.

मी कांही कामा निमित्त परगावी गेलो, तर मी लवकर सुखरूप परत यावा म्हणून हिने लगेचच प्रत्येक दारात, छोटी छोटी भांडी पालथी करून ठेवायला सुरवात केलेलीच असते.आपल्या प्रत्येक खाऊ मध्ये न विसरता बाबांचा हा निम्मा वाटा ती आवर्जून ठेवतेच. ऑफिसातील काम संपवून मी ज्या वेळी घरी येतो ,त्या वेळी हे माझं पिल्लू माझ्या स्वागताला कायम तयार असते . मग पटकन येउन माझ्या पायाला विळखा घालेल ,मग मी "चिमणे'' "चिमणे" म्हणत तिला उचलून कडेवर घ्यायचे . तिचे ते गोबरे गोबरे गाल आणि गोल गोल गोट्या सारखे चमकणारे डोळे फारच विलोभनीय दिसतात .बाबांच्या कडेवर बसल्यावर जगातील सर्वात सुरक्षित व्यक्ती आपणच आहोत ,असा कांहीतरी तिचा अविर्भाव असतो . मी रात्री जेवायला बसलो कि ,हळूच टेबला खालून येउन, ती कधी माझ्या मांडीवर येउन बसते हे मला कळत देखिल नाही . मग माझ्या ताटातील घास तिला भरवण्याचा तिचा आग्रह चालूच असतो . जेवण झाले कि दिवसभरात घरात काय काय घडले, याचे अविर्भावा सहीत इत्थंभूत वर्णन चिमणीच्या मुखातून ऐकण्या सारखे असते . आज दादाने पेन हरवले ,अभ्यास केला नाही म्हणून बाईंचा कसा ओरडा खाल्ला ते अगदी खेळताना कुणी कुणाला जोरात धक्का दिला इथ पर्यंत . हे सर्व चालू असताना तिच्या आईच्या तिला सूचना मात्र सारख्या चालू असतात .

" आगं, चिमणे !! बाबा आत्ता दमून आलेत ना ,त्यांना थोडी विश्रांती घेऊन देशील कि नाही? मात्र आता चिमणीचा उत्साह कमालीचा वाढलेला असतो .तिने सांगितलेली प्रत्येक गोष्ट मी मनापासून ऐकावी अशी तिची फार इच्छां असते . मी माझी मान जराशी जरी दुसरीकडे वळवली कि हि चक्क ''बाबा" असे म्हणत माझी हनुवट धरून तिच्या कडे पाहायला लावते . मला मात्र या गोष्टीची इतकी सवय झाली आहे कि यातील एखादी गोष्ट जरी नसेल तर, दिवसभरात आपण कांहीतरी चुकलो आहे असे वाटू लागते .तिने मला बाहेरून, कांही ना कांही वस्तू कायम आणायला सांगितलेल्या असतात आणि मी त्या कामाच्या गडबडीत कायम विसरतो . संध्याकाळी घरी आलो कि " बाबा "मी तुम्हाला सकाळी पिंक कलरची वही आणायला सांगितली होती ,ती कुठे आहे ?"
" अरे बापरे ! मी तर ती विसरलोच कि , उद्या नक्की आणतो हं चिमणे."
" मग तसे वचन द्या बघू " मग तिच्या छोट्या छोट्या हातावर हात ठेऊन तिला तसे वचन द्यायचे, हे असले वचनांचे कार्यक्रम आमचे कायमच चालू असतात .तिला दिलेले वचन म्हणजे ,माझ्या मनासाठी एक मोठी लक्ष्मण रेषाच असते .

आज नेहमी प्रमाणेच संध्याकाळी मी ऑफिसातील काम संपवून घरी आलो होतो. ऑफिसामधील कामाची दगदग ,रस्त्यात असणारी ती प्रचंड गर्दी, ह्या मुळे मी आज फारच दमून गेलो होतो . हातातील बॅग मी खाली ठेवली ,तसेच सौ, ने पाण्याचा ग्लास आणून माझ्या हातात दिला. हे सर्व घडत असताना चिमणी मात्र ,आज मला कुठे दिसेना . लहान मूल आहे, असेल कुठे तरी खेळत असे समजून मी हात पाय धुण्या साठी बाथरूम मध्ये गेलो व थोड्या वेळाने परत बाहेर आलो. तरीही मला चिमणी दिसेना ना, तिचा आवाज ऐकू येईना . आज चिमणी न दिसल्या मुळे मलाही कांहीतरी चुकल्यां चुकल्या सारखे वाटू लागले . रोज कौतुकाने आपले स्वागत करणारी, ती राजकुमारी आज कुठे दिसेना . कांहीतरी निश्र्चितच वेगळे घडले असणार म्हणून मी सौ.ला विचारले देखील " अगं ! चिमणी कुठे दिसत नाही ? तसे ती दाराकडे कटाक्ष टाकत म्हणाली " ती बघा ,त्या पडद्या मागे बसून हुंदके देत रडते आहे .
अरे ! असे रडण्या सारखे झाले तरी काय " मी .
"अहो आज शाळेतून तिला आणण्या साठी आपले नेहमीचे रिक्षेवाले आलेच नाही .त्यानी दुसर्‍याच कुणा रिक्षेवाल्याला रिक्षेवर पाठवून दिले आणि ह्या शहाणी, आपले दप्तर नेमके रिक्षेतच विसरून आली आहे .पोरीने फारच मनाला लावून घेतले आहे हो !! . आता बाबा मला रागवणार , माझी नवीन पुस्तके , वह्या ,खडूचा बॉक्स , सर्व कांही हरवले ,म्हणून आल्या पासून रडते आहे . मी भरपूर समजावले ,पण बाबा काय म्हणतील याचाच जास्त ध्यास तिने घेतला आहे" .

"हात्तिच्यामारी ! एवढच रड्ण्याचे कारण होय . अग काय ती दप्तराची बाब . साध दप्तर गेल म्हणजे काय आपल्यावर फार मोठी आपत्ती आली . आत्ताच्या आत्ता , सगळ दप्तर मी तुला नवीन आणून देतो मग तर झाले", असे म्हणत मी चिमणीच्या जवळ गेलो व उचलून तिला नेहमी प्रमाणे कडेवर घेतले ." हे बघ मी तुझ्यावर आजिबात रागवणार नाही" . हे ऐकल्यावर देखील चिमणीने आपला चेहरा लपवित मुळूमुळू रडणे चालूच ठेवले . तिच्या डोळ्यांतून ओघळणाऱ्या अश्रूंनी माझा खांद्यावरील सर्व शर्ट भिजून गेला होता .थोड्या प्रेमाने मी तिच्या गालांवरून हात फिरवल्यावर तिला हळू हळू कंठ फुटला व ती रडक्या स्वरात बोलू लागली ." आई म्हणत होती कि ते दप्तर चारशें रुपयांचे होते " अरे !! लहान मुलाना ह्या असल्या किंमती कशाला सांगतात कुणास ठाऊक ? तुला त्याची किंमत काय करायची आहे ,मी तुला त्याही पेक्षा चांगले नवीन भारीतले दप्तर आणून देतो ,मग तर झाले समाधान? नाही नाही ,बाबा मला विकतचे नवीन दप्तर नको ,मला माझे तेच दप्तर पाहिजे " आता मात्र माझी समजूत काढण्याची क्षमता या बालहट्टा पुढे पूर्ण पणे संपली होती .
ठीक आहे चल आपण माझ्या बाइक वरून जाऊ व त्या रिक्षावाले काकांचे घर शोधून काढू आणि दप्तर घेऊन येऊया ,मग तर झाले ना , ही गोष्ट मात्र तिला पटली . तिच्या हट्टा खातर मी, माझी पत्नी तिला घेऊन रिक्षेवाल्याचे घर शोधत त्याच्या घरी येउन पोहचलो . आत्ता रात्रीचे आठ वाजले होते . ते नेहमीचे रिक्षावाले आज घरातच होते . आम्हाला बघून त्यानाही खूप आश्र्चर्य वाटले . ही सर्व घटना त्यांना सांगितल्या वर ते म्हणाले " माझ्या घरगुती कामा मुळे मी आज माझ्या दुस‌र्‍या मित्राला रिक्षेतून पाठवले होते . रात्री तो आणखीन भाडे करणार आहे असे म्हणत होता .तो बहुतेक रात्री ११-१२ च्या पुढे घरी येईल . या बाळाचे दप्तर रिक्षेत असेल तर मी तुम्हाला उद्या घरी आणून देतो .तुम्ही काय बी काळजी करू नकासा ." मला पण हे पटले मात्र चिमणीला कांही केल्यास हे आजिबात पटेना . बाबा आपण रात्री १२ वाजे पर्यंत इथे थांबूया व माझे चारशे रुपयाचे दप्तर घेऊन जाऊ या"असे ती सारखी म्हणत होती. ती दप्तराची किंमत वारंवार ऐकून मी पण गोंधळून गेलो होतो. ही चिमुरडी मुलगी सारखे चारशे रुपयाचे दप्तर, चारशे रुपयाचे दप्तर असे का म्हणते कुणास ठाऊक ? आता रस्त्यावर इतका वेळ थांबणे मला ही योग्य वाटेना ." आपण बारा वाजता परत इथे येऊ .तुला फारतर तसे वचन देतो, मगतर झाले !" मी कशी तरी चिमणीची समजूत घालून तिला घरी घेऊन आलो .

काय ती एवढ्याश्या दप्तराची बाब, पण चिमणीचा तो उदास चेहरा बघितल्यावर आमच्या घरावर फार मोठी आपत्ती आली आहे,असेच मला सारखे वाटू लागले . त्यात तिच्या डोळ्यांतून ओघळणारे तिचे अश्रूं पाहून ,मलाही केविलवाणे वाटू लागले . घरी आल्यावर कसे बसे दोन घास आम्ही खाल्ले असतील . आज मात्र चिमणीचा मांडीवर बसण्याचा हट्ट नाही कि माझ्या ताटातील घास खाण्याची इच्छा नाही .तिच तो हिरमुसलेला चेहरा मला कांही पाहवेना ,हळूच मी तिला उचलून कडेवर घेतले व थोपटत थोपटत बिछान्यावर झोपवले . तिचा तो शांत झोपलेला निरागस चेहरा,मला आज फारच यातना देवू लागला होता. तिचे ते छोटेसे दप्तर,तो शाळेचा रंगीत युनिफ़ॉर्म आणि ते इवलेइवलेसे पायातील बूट माझ्या डोळ्या समोर सारखे दिसू लागले.
तिला थोपटता थोपटता माझा कधी डोळा लागला हेच मला कळले नाही. घड्याळाच्या टोल्याच्या आवाजाने मला अचानक जाग आली . घड्याळात पाहिले तर रात्रीचा चक्क एक वाजला होता . माझा मुलगा ,पत्नी ,चिमणी अगदी शांत पणे झोपले होते.मला ही ह्या घटने मुळे फ़ारच अस्वस्थ पणा जाणावू लागला होता. समजा तो रीक्षावाला सकाळी दप्तर सापडले नाही असे म्ह्णाला तर ? त्यात चिमणीला दिलेले वचन मला सारखे आठवू लागले.
मी हळूच उठलो व माझे कपडे मी घातले आणि मांजराच्या पावलाने घराच्या बाहेर पडलो.घराला बाहेरून कुलूप लावले व हळूच मी माझी बाईक बाहेर काढली व थेट त्या रीक्षावाल्याचे घर गाठले . रीक्षावाल्याच्या घरा समोर त्याची ती रिक्षा पाहिल्यावर मला हायसे वाटले.आत्ता इतका वेळ झाला होता कि कदाचित तो रिक्षावाला झोपला देखील असेल . क्षण भर असे वाटले ,नको या बिचाऱ्यांना त्रास द्यायला ,फारतर परत उद्या येऊ . मात्र मन तयार होईना . मी पुढे होऊन त्यांच्या दारावर टक टक केली .तसे त्या रिक्षावाल्याने दार उघडले . मलाही त्याला अवेळी उठवून त्रास दिल्या बद्दल मनातून विचित्रच वाटत होतं. " मामा काय आमच्या कन्येच दप्तर मिळाले काय हो ? मी कापऱ्या आवाजात त्याला विचारले. तसे तो लगेचच आतून तिचे दप्तर घेऊन बाहेर आला व माझ्या हातात देत म्हणाला " साहेब सकाळी मी आणून दिले असते कि ,इतक्या रात्री तुम्ही कशाला एवढे कष्ट घेतलासा "तो म्हणाल." नाही हो ,मुलीने फारच मनाला लाऊन घेतले आहे ऱात्री जेवली पण नाही. मलाच राहावलं नाही म्हणून मुद्दाम इथ पर्यंत आलो आहे . मी तुम्हाला इतक्या वेळाने येउन त्रास दिला , मला माफ करा हं " असे म्हंटले, तसे त्याने दार लावले .

ते हातातले दप्तर पाहिल्यावर माझा आनंद गगनात मावेना. आपल्याला एखादी लाख रुपयाची लॉटरी लागल्या सारखे मला आज वाटू लागले होते . मोठ्या वेगाने मी घरी पोहचलो. आत्ता त्या शांततेत होणाऱ्या मोठ्या आवाजाची मला मुळीच पर्वा नव्हती . मी घराचे बाहेरून कुलूप काढले तसे घाबरत घाबरत माझ्या सौ. पटकन पुढे आल्या ." अहो इतक्या रात्री कुठे गेला होता ." हे बघ मी काय आणंलय ते .चिमणीचं दप्तर ,ते पण चारशे रुपयाचं." मी. हे ऐकल्यावर ती पण गालातल्या गालात हसली . "अहो पण माझी एक तुम्हाला कळकळीची विनंती आहे .चिमणीला आता उठवू नका . दिवस भर रडून रडून व्याकूळ झाली आहे.कृपया माझ्या साठी एवढ करा ." नाही ,नाही मला ते शक्य नाही म्हणत मी चिमणी जवळ गेलो तिला माझ्या कुशीत घेतले व हळुवार तिच्या गालांवरून हात फिरवत तिला जागे केले . "चिमणे, ऊठ. हे बघ मी तुझे दप्तर घेऊन आलो आहे". तशी ती झोपेतून कशी बशी जागी झाली . तिने तिचे दप्तर पहिले . मोठ्या कौतुकाने मान हलवीत ती खुदकन हसली व झोपेतच पेंगुळलेले डोळे मिटून माझ्या कुशीत शांत झोपी गेली .

मी मात्र तिचा चेहरा एकसारखा न्याहळीत होतो. ही आता छोटी वाटणारी राजकन्या कधीतरी मोठी होणार आणि एखाद्या चिमणी सारखी भुर्रssकन तिच्या पतीच्या घरी निघून जाणार आणि आपण मात्र हे आठवणीचे जाळे जन्मभर उराशी बाळगुन ह्या दिवास्वप्नात रममाण होणार, माझे डोळे अश्रूंनी कधी भरुन आले ते मलाच कळले नाही!.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूपच गोड चिमणी,
मीही होते अशीच चिमणी आता माझी सुद्धा आहे एक चिमणी
Happy
मग हे नाते मुलाचे व आईचे असेल किंवा वडिलांचे व त्यांच्या मुलीचे असेल अथवा भाऊ बहिणीचे ही असू शकेल .....अगदी खरं !
माझी चिमणी तिच्या दादासाठी वेडी आहे. पहिला शब्द दादा होता तिचा आई/ बाबा नाही.
नंतर तिचा पहिला इंग्रजी शब्द चेअलपो , दादा बेडवर उड्या मारताना पडेल म्हणून ही केअरफूल दादा म्हणत होती. आम्हाला तीन दिवस लागले हे चेअलपो कळायला Lol
छान लेख .

छान लेख,तुमच्या दोघांत खूप स्ट्रॉंग बॉंडिंग आहे.माझ्या मुलीत आणि तिच्या बाबा मध्ये ही असंच बॉंडिंग आहे. तुमची चिमणी मोठी झाल्यावर मोठी गरुड भरारी घेवो.☺️

मस्त ...खूप रिलेट झालं. मी कधी कामानिमित्त 4/5 दिवस बाहेर राहून आलो की माझी माऊ पण अशीच पायात येते. अगदीच वर्षाची होती तेंव्हा खूप दिवसांनी बघितल्यावर खूप हसायची काय करावं हे न समजल्यामुळे☺️ Happy