तफरीह

Submitted by Theurbannomad on 21 May, 2020 - 20:02

जफर, त्याची तीन महिन्यांची गर्भवती बायको आणि त्याची ४ वर्षाची मुलगी एका ओंडक्याला लटकून मदतीची वाट बघत होते. ज्या जहाजाने ते प्रवास करत होते ते जहाज वादळात अडकून उलटलं होतं. बरोबरचे प्रवासी आपापल्या परीने जीव वाचवायचा प्रयत्न करत मिळेल त्या वस्तूला धरून पाण्यात तरंगायचा प्रयत्न करत होते. बुडण्यापूर्वी जहाजाच्या कप्तानाने मिळतील तितक्या बाटल्यांमध्ये 'आमचे प्राण वाचवा...आम्ही मत्रा बंदरापासून चार-पाच तासांच्या अंतरावर घर्रब ( पश्चिम दिशेचं अरबी संबोधन ) दिशेला वादळात अडकलो आहोत आणि आमची सफिना ( जहाज ) बुडायच्या बेतात आहे' असा संदेश लिहून बाटल्या समुद्रात जितक्या लांब शक्य होईल तितक्या लांब फेकून दिल्या होत्या. समुद्राला भरती येते तेव्हा जर त्या बाटल्या जवळपासच्या किनाऱ्यापर्यंत पोचल्या तर मदत मिळणं शक्य होतं. अर्थात मदत येईपर्यंत बुडणाऱ्या प्रवाशांना जीव वाचवण्यापलीकडे काहीही करणं शक्य नसतं. जफर मनात अल्लाहची करुणा भाकून लवकरात लवकर कोणाचीतरी मदत मिळावी अशी आशा करत होता, कारण त्याच्या लहान मुलीचा जीव फार काळ वाचवणं त्याला शक्य नव्हतं.

काही तासांच्या धडपडीनंतर पाण्यात तरंगणारे अनेक जण अतिश्रमामुळे बेशुद्ध पडले. काही जण पाण्यात गारठून अल्लाहच्या वाटेला निघून गेले. जफर अर्धवट ग्लानीत आपल्या बायको-मुलीला हलवून हलवून जागं ठेवत होता. त्याने मदत मिळायची आशा अजूनही सोडली नव्हती. त्याचे पिंगट टपोरे डोळे खाऱ्या पाण्यामुळे लालबुंद झाले होते.रेशमी भुरकट कुरळे केस चिप्प ओले होऊन चेहेऱ्याला चिकटले होते.अखेर काही वेळात त्याची शुद्ध हरपली. पाण्यात तरंगणाऱ्या अर्धमेल्या आणि मृत्युमुखी पडलेल्या शरीरांमध्ये ओंडक्याला अडकलेलं त्याचं शरीर लाटांवर तरंगायला लागलं.

" यास्मिन....इमान..." जोरात ओरडत जफर जागेवर उठून बसला. त्या ओरडण्यामुळे आजूबाजूचे अनेक लोक दचकले. दोन-तीन जण हकिमांना बोलवायला धावले. अखेर चार-पाच हकीम कुठूनसे त्या झोपडीवजा घरात आले आणि त्यांनी जफरला आडवं केलं. खजुराच्या झापांच्या चटईवर कापड अंथरून तयार केलेल्या बिछान्यावर जफरसारखे अनेक जण पहुडले होते. काही शुद्धीत तर काही अर्धवट ग्लानीत होते. वादळानंतर काही तासांनी समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या रशाद गावच्या मासेमार लोकांना काही बाटल्या पाण्यात तरंगताना सापडल्यामुळे त्यांनी लगेच समुद्रात जाऊन शक्य तितक्या लोकांना वाचवून आपल्या गावात आणलं होतं.

" आप कौन है? " एका मध्यमवयीन हकिमाने जफरला जडीबूटीचं औषध पाजत विचारलं. जफरने आपल्याबद्दल आणि आपल्या बायको-मुलीबद्दल माहिती पुरवली. हकिमाने आपल्या दोन सहाय्यकांना जफरला आधार देऊन वादळातून वाचलेल्या लोकांमधून फिरवायला सांगितलं. " अपनी बेटी और बेगम आगर बची है तो यहीं कहीं होगी.." हकिमाने जफरला धीर दिला आणि तो बाजूच्या माणसाकडे गेला. जफरने धडपडत उठून त्या सहाय्यकांच्या आधाराने चालायला सुरुवात केली. त्या झोपडीत तरी त्याला दोघांपैकी कोणी दिसलं नाही. बाजूच्या चार-पाच झोपड्यांमध्ये वाचवून आणलेले प्रवासी आहेत अशी माहिती त्याला त्या मदतनीसांनी दिली आणि एक एक करून तो प्रत्येक झोपडीत जाऊन आला.

कोणत्याही झोपडीत त्याला आपल्या बायकोचा आणि मुलीचा चेहरा दिसला नाही. त्याने पुढचे दोन-तीन दिवस पुन्हा पुन्हा मासेमारी करणाऱ्या कोळ्यांना त्या जहाज बुडालेल्या ठिकाणी जाऊन कोणी दिसतंय का याचा शोध घ्यायची विनंती केली. त्या बिचाऱ्या कोळ्यांनी जफरला धीर देत आपल्या परीने खूप शोधाशोध केली. एक-दोन पट्टीच्या पोहोणाऱ्यांनी समुद्रात खोल सूर मारून काही हाताला लागतंय का याचा शोधही घेतला. अखेर सगळ्यांचे प्रयत्न थकल्यावर आणि सगळ्यांनी आपापल्या परीने समजावल्यावर जफरने आपल्या बायको आणि मुलीला शोधायचा प्रयत्न थांबवला. दुःखात बुडालेल्या सुन्न अवस्थेत त्याने स्वतःचं शरीर पूर्ववत झाल्यावर ते गाव सोडलं. एका उंटांच्या काफिल्याबरोबर तो आपल्या मूळ गावी परतला.

आपल्या घराच्या कुंपणाशी आल्यावर अंगणार खेळणारी त्याची मुलगी आणि काहीबाही काम करत असलेली त्याची बायको यांच्या प्रतिमा त्याच्या डोळ्यासमोर तरळून गेल्या. जड अंतःकरणाने त्याने कुंपणाचा दरवाजा उघडला. समोर बघितल्याबरोबर तो जागेवरच थबकला...त्याच्या घराचा दरवाजा किलकिला होता आणि आतून तेलाच्या दिव्याचा प्रकाश येत होता. आपल्या अपरोक्ष घरात कोण येऊन राहत आहे, हे नं कळल्यामुळे तो थोडासा गोंधळला. शेवटी आजूबाजूच्या लोकांना जमा करावं आणि मग नक्की घरात कोण राहतंय याचा छडा लावावा असं विचार करून तो शेजारच्या अब्दुलकडे गेला.

" अब्दुल, कैसा है दोस्त? माझी मदत करशील?" अंगणात मेंढीच्या अंगावरची लोकर कात्रीत बसलेल्या अब्दुल्ला त्याने विचारलं.

" अरे जफर, आओ...कैसे हो? इतक्या पहाटे कसं येणं केलं?"अब्दुलने विचारपूस केली.

" तुला नंतर सांगतो सगळं काही...पण मी नसताना माझ्या घरात कोण येऊन राहतंय काही कळत नाहीये....एखादी काठी किंवा तुझा खंजीर घेऊन मला मदत करायला येतोस का?" जफरने दबक्या आवाजात विचारलं.

" तू कुठे गेला होतास?" अब्दुलने विशेष उत्साह नं दाखवता कातरलेली लोकर बाजूच्या कुडाच्या टोपलीत ठेवत प्रश्न केला.

" अब्दुल, अरे मी मजाक नाही करत आहे..." जफरने समजावलं.

" अब्दुलने आता नजर वर केली. जफरच्या मागे आणि आजूबाजूला नजर टाकली. प्रश्नार्थक चेहेरा करून कसलासा विचार केला आणि शेवटी उठून त्याने आपला खंजीर काढला. जफरच्या हातात एक काठी दिली.दोघांनी दबकत दबकत कुंपणाच्या आत पाऊल टाकलं. दारापाशी गेल्यावर अब्दुलने इशारा केला. जफरने लाथ मारून दार उघडलं आणि काठी उगारून पवित्रा घेतला.....समोर दिसलेल्या दृश्याने अब्दुल आणि जफर या दोघांची बोबडी वळली.

" जफर....तू जफर है या ये?" अब्दुल खंजीर रोखत उभा राहिला.

त्या घरात चक्क जफर, त्याची बायको आणि मुलगी असे तिघे भेदरलेल्या अवस्थेत दाराशी उभ्या असलेल्या 'जफर'कडे बघत होते. अब्दुलचे डोळे पांढरेफटक पडले होते. खंजीर रोखून त्याने हळू हळू दारापाशी सरकायला सुरुवात केली आणि अखेरीस बाहेर पडून त्याने जोरदार आरोळी ठोकली. आजूबाजूच्या घरातले पुरुष धडपडत बाहेर पडले. बायकांनी आणि लहान मुलांनी खिडकीतून बाहेर नक्की काय चाललंय याचा अंदाज घ्यायला सुरुवात केली.

" रसूल, इमाद, हमद, नावेद....जलदी बाहर आओ...इस घर में शैतान घुसा है..." अब्दुलने घामाने डबडबलेल्या अवस्थेत सगळ्यांना वर्दी दिली. चार-पाच जण आपल्या हातात तलवारी, खंजीर, काठी आणि जे मिळेल ते घेऊन जफरच्या घरच्या अंगणात आले. सगळ्यांच्या समोर दोन तंतोतंत एकसारखे दिसणारे जफर उभे होते. त्याची बायको आणि मुलगी भेदरून दारातच उभ्या होत्या.

आजूबाजूचे अनेक जण आता तिथे गर्दी करायला लागले. त्यांनी दोन्ही जफरना अंगणातच दोन टोकांना बसायला सांगितलं. काही बायकांनी जफरच्या बायकोला आणि मुलीला घरात नेलं आणि आतून दार लावून घेतलं. अब्दुल अजून थरथरत होता. त्याला या सगळ्यात नक्कीच काहीतरी चेटूक आहे असं ठामपणे वाटत होतं आणि गेले काही दिवस आपल्या घरात नक्की जफर आणि त्याचे घरचे येत होते, की त्यांचं रूप घेतलेले कोणी याचा विचार करून त्याच्या तोंडचं पाणी पळालं होतं. आजूबाजूच्या तीन-चार घरातल्या लोकांनाही तीच चिंता होती.

" मौलाना साहेबांना बोलवा...जिरगा प्रमुखांना वर्दी द्या..." गर्दीतल्या कोणीतरी चार-पाच पोरांना गावात पिटाळलं. काही वेळात लगबगीने मौलाना साहेब आणि गावच्या जिरग्याचे प्रमुख तिथे आले. समोर दोन दोन जफर बघून तेही चक्रावले. जिरग्याचे बाकीचे सदस्य तिथे आल्यावर सगळ्यांनी मिळून दोघांना मशिदीमध्ये न्यायचा निर्णय घेतला. मशिदीच्या पवित्र पाण्याने दोघांमधला मनुष्यरूप घेऊन गावाला फसवणारा तोतया समंध कोण आणि खरं जफर कोण हा फरक सहज ओळखता येईल असं सगळ्यांचा कयास होतं. आश्चर्य म्हणजे दोघांपैकी कोणीही या निर्णयाला विरोध केला नाही.

मशिदीच्या आत दोघांना आणल्यावर मौलाना साहेबांनी त्यांच्या अंगावर मशिदीचं आणि मक्केच्या पवित्र झमझम विहिरीचं पाणी शिंपडलं. दोघांना किबलाच्या दिशेला तोंड करून नमाज पढायला लावला. दोघांच्या हातात मशिदीतल्या आपल्या जपमाळांपैकी एक एक माळ दिली आणि ती मनगटावर गुंडाळायला सांगितली. कशानेही दोघांच्यातल्या एकालाही काही झालेलं नं दिसल्यामुळे सगळ्यांना अजून आश्चर्य वाटलं. मायावी अथवा काळी शक्ती इतका वेळ पवित्र मशिदीत तग धरूच शकणार नाही, हे माहित असल्यामुळे अखेर मौलवी साहेबांनी दोघेही खरे मनुष्य असावे असा निष्कर्ष दिला.

त्यानंतर जिरग्याच्या सदस्यांनी आपापल्या परीने काहीबाही करून छडा लावायचा प्रयत्न करून बघितला. आरशासमोर उभा करून कोणाची प्रतिमा कशी दिसते, इथपासून दोघांच्या आवडीनिवडी तपासण्यापर्यंतच्या सगळ्या युक्त्या करून झाल्या, परंतु काहीही हाती नं लागल्यामुळे सगळे जण हतबल झाले. बायको-मुलीच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर दोघांनीही सुयोग्य दिली. दोघांच्या शारीरिक खुणा आणि खास अशा सवयी सुद्धा तपासल्या गेल्या. आक्खा दिवस या सगळ्या दिव्यात गेल्यावर अखेर गावच्या लोकांनी दोघांसमोर गुढघे टेकले.

जफरने आपलं जहाज बुडाल्याची कहाणी सगळ्यांसमोर सविस्तर कथन केली. आपल्या बायकोला आणि मुलीला आपण गमावलेलं आहे, त्यामुळे घरात राहात असलेल्या बायको-मुलीला आपण स्वीकारू शकत नाही अस सांगून त्याने जिरगा प्रमुखांकडे आपलं घर आपल्या ताब्यात द्यायची विनंती केली. याउलट घरात रहात असलेल्या जफरने आणि त्याच्या बायको-मुलीने हा इसम आपलं घर बळकावण्याच्या उद्देशाने हा सगळा खेळ करत असल्याचा आरोप करत घर सोडण्यास साफ इन्कार केला. प्रकरण हातघाईला आल्यावर काही लोकांनी मध्ये पडून दोघांना लांब केलं.

अखेर हताश होऊन जफरने आपल्या घरावर तुळशीपत्र ठेवून गाव सोडायचा निर्णय घेतला. तसंही आपलं सर्वस्व आपल्या बायको आणि मुलीच्या रूपाने आपण घालवलेलाच आहे, तेव्हा आयुष्य पुन्हा नव्या जागी नव्या पद्धतीने सुरु करू, असा रास्त विचार करून त्याने आपल्या बायकोच्या मूळ गावी जायचा निर्णय घेतला. तीन दिवस आणि चार रात्रीचा प्रवास करून तो अखेर आपल्या बायकोच्या मूळ गावी पोचला आणि त्याने बायकोच्या घराचा दरवाजा ठोठावला. आपल्या सासू-सासऱ्यांना वाईट खबर कशी द्यायची, याचा विचार करत तो दारासमोर उभा होता. दार उघडलं आणि त्याच्या सासूने दार उघडलं. जफरला बघून तिने आनंदाने आपल्या नवऱ्याला आवाज दिला आणि ती घळाघळा रडायला लागली.जफर आधी गोंधळला, पण आत दिसलेल्या दृश्याने त्याचा मेंदू सुन्न झाला. आत त्याची बायको आणि मुलगी त्याच्या सासऱ्याबरोबर बसलेल्या होत्या. मुलगी धावत येऊन त्याला बिलगली आणि बायकोने त्याला बघून घळाघळा रडत अल्लाहची करुणा भाकायला सुरुवात केली.

मागच्या चार-पाच दिवसात आपल्याबरोबर नक्की काय घडतंय, याचा विचार करत जफर सासऱ्याबरोबर बैठकीवर बसला. सासऱ्याने आणि इतरांनी त्याची विचारपूस केली. वादळातून तो कसा बचावला, कोणी आणि कुठे त्याचे औषधोपचार केले, तो आपल्या सासरी कसा आला अशा आणिक प्रश्नांची सरबत्ते सगळ्यांकडून होत होती आणि जफर आपल्या मुलीच्या केसांवर हात फिरवत शून्यात बघत विचार करत होता.

" अब्बा हुजूर, मी जे काही घडलं, ते तुम्हाला सांगितलं तर तुमचा विश्वास बसणार नाही...पण मी सांगत असलेली प्रत्येक गोष्ट खरी आहे.समुद्रात मी बेशुद्ध झाल्यावर माझे डोळे उघडले ते एका झोपडीत. त्या गावचा नाव होतं रशाद. तिथे माझी तिथल्या भल्या लोकांनी खूप सेवा केली. माझ्यावर औषधोपचार केले. पण त्यांनी मला असाही सांगितलं, की मला एकट्याला वाचवण्यात त्यांना यश मिळालं. मी यास्मिन आणि इमानचा खूप शोध घेतला आणि शेवटी त्यांचं मृत्यू झाला असं समजून आशा सोडली. पण...मी जेव्हा माझ्या गावात माझ्या घरी गेलो तेव्हा...."

" तेव्हा काय?" सासऱ्याने कान टवकारले.

" माझ्या घरात मी स्वतः, यास्मिन आणि इमान राहताना मला दिसले...आमच्या प्रतिकृतीच जणू. गावच्या लोकांनी माझ्या आणि त्या मनुष्याच्या परीक्षा घेतल्या...पण तो माझ्यासारखा दिसणारा माणूस सगळ्या परीक्षांमध्ये अपेक्षेपेक्षा जास्त चांगल्या रीतीने पास झाला...त्या यास्मिन आणि इमानने मला ओळखायला सुद्धा नकार दिला...शेवटी गावच्या लोकांचा मार खावा लागेल आणि मला तुरुंगात डांबलं जाईल या भीतीने मी माझंच गाव सोडलं...तुम्हाला झाल्या प्रकारची खबर द्यायला आलो आणि हे सगळं दिसलं...."

" बेटा, मला सुद्धा हे सगळं ऐकून धक्का बसलाय....यास्मिन आणि इमान सुद्धा यथरब गावच्या काही मासेमारांनी वाचवल्यामुळे जिवंत राहिले. त्यांच्याबरोबर चाळीस-पन्नास लोक सुद्धा होते. यास्मीनने तू वाचला नाहीस या समजुतीमुळे इथे यायचा निर्णय घेतला. किनाऱ्याकडच्या सगळ्या गावांची त्या वादळाने नासधूस केली होती...समुद्रातच नाही, तर किनाऱ्यावरच्या सात-आठ गावांमध्ये त्या वादळामुळे खूप नुकसान झालं. तुझ्या गावाची सुद्धा खूप नासधूस झाल्याचं समजलं...आम्ही असं ऐकून होतो, की या सगळ्या गावांमध्ये कोणीच जिवंत वाचलं नाही..."

" नाही..माझं गाव व्यवस्थित आहे. फक्त माझ्या घरात काय सुरु आहे, हे काही माझ्या ध्यानात येत नाहीये..."

" असुदे, बेटा, चल. नमाज अदा करून येऊ मशिदीत..." जफरला घेऊन त्याचा सासरा घराबाहेर पडला.

रस्त्याने चालत चालत जाताना जफर आपल्या सगळ्या अनुभवाबद्दल सांगत होतं आणि त्याचा सासरा ते लक्ष देऊन ऐकत होता. त्याच्या डोक्यात सुद्धा शंकाकुशंकांचं काहूर माजलेलं होतं.मशिदीजवळ पोचल्यावर त्याने आपली पादत्राणं काढायला खाली बघितलं आणि त्याच्या मणक्यातून शिरशिरी गेली....

जफरची सावली त्याला दिसत नव्हती. सूर्य व्यवस्थित उगवलेला असल्यामुळे आजूबाजूच्या सगळ्यांची सावली जमिनीवर पडत असली, तरी त्याच्या जावयाची सावलीच पडलेली नव्हती.....

शेवटी मशिदीच्या वयस्कर मौलाना साहेबांना भेटून त्यांना सगळी हकीकत सांगावी, या हेतूने त्याने जफरला वझू करायला पुढे पाठवलं. स्वतः मात्र त्याने मशिदीच्या मागच्या मौलाना साहेबांच्या घराकडे धाव घेतली. मौलाना साहेबांनी सगळी हकीकत ऐकून घेतली आणि त्यांनी जफरला आपल्यासमोर आणायला सांगितलं.

जफर मौलाना साहेबांच्या समोर बसल्यावर त्यांनी जफरच्या डोक्यावरून हात फिरवला. आपल्या पांढऱ्या दाढीला कुरवाळत त्यांनी अल्लाहची नावं लिहिलेला पवित्र किस्वा ( मक्केच्या काब्यावरच्या कपड्याचा तुकडा ) जफरच्या हातात दिला आणि त्याला उद्देशून बोलायला सुरुवात केली...

" बेटा जफर, मी जे सांगतोय ते नीट ऐक. तू जिंदा नाहीयेस.....तुझंही तुझ्या मुलीवर आणि बायकोवर इतकं प्रेम आहे,की मृत्यूनंतर तू बर्झख लोकात गेलास....बर्झख लोक अवेळी मृत झालेल्या लोकांच्या आत्म्यांचा असतो....तिथे सिला नावाचे जिन्न तुझ्यासारख्या नेक लोकांच्या शोधात असतात. ते तुझ्यासारख्यांना खोटं शरीर देऊन पुन्हा अर्दलोकात ( पृथ्वीवर ) पाठवतात. तू तुझं गाव बघितलं, ती एक माया होती. तुझ्यावर ज्यांनी उपचार केले ते हकीम आणि ते गाव सुद्धा एक माया होती...एक तिलिस्म होतं. बेटा, जोपर्यंत तू तुझ्या मुलीच्या आणि बिवीच्या बंधनात अडकून पडशील, तोपर्यंत ते जिन्ना तुझ्याकडून त्यांची कामं करून घेतील...ते जिन्ना तुझ्यासमोर कोणत्याही रूपात येतील....तुझ्या जेहेनवर ताबा मिळवायला ते तुला मायावी जगात भटकवतील..."

जफरला आता आपल्या अनुभवांचा खुलासा व्हायला लागला. आपल्यासमोर उभी केली गेलेली एक एक गोष्ट म्हणजे त्या जिन्नांच्या मायावी जगाचा भाग होता याची जाणीव त्याला व्हायला लागली.

" बेटा, तुला या गावात यायची बुद्धी व्हावी म्हणून ते सगळं त्या जिन्नांनी घडवून आणलं. आता या गावात ते एक एक करून मनुष्यांना वश करतील आणि त्यांचं आत्मा काढून तिथे स्वतः जाऊन बसतील...त्या जिन्नांना शरीर हवं असतं बेटा....फक्त शरीर...."

" मी आता काय केला पाहिजे?" जफरने अखेर सगळ्या सत्याचा सामना करत प्रश्न केला.

" बेटा, मायावी शरीर त्यागून तू पुन्हा बर्झख लोकात जा. तिथे फरिश्ते तुला तुझं मार्ग दाखवतील. पण जोपर्यंत तुझं मन तुझ्या बायको आणि मुलीमध्ये अडकेल तोपर्यंत जिन्ना तुला वश करून तुला त्यांच्यापासून लांब करू शकतील...बेटा, बीवी और बच्ची की फिक्र छोड दो...अल्लाह उनकी हिफाजत कर राहा है..." मौलवींनी त्याला प्रेमाने समजावलं.

" मी तयार आहे...शरीर त्यागून पुन्हा बर्झखमध्ये मी कसा जाऊ शकेन?"

" बेटा, ये किस्वा है. अपने दिल पे इसे रख और खंजर अपने दिल में भोंक ले..डर मत, तुम्हे कुछ महसूस नहीं होगा..."

जफरने त्याप्रमाणे कृती करताच त्याला स्वतःचं मायावी शरीर हळूहळू गायब होत असलेलं दिसायला लागलं. शेवटी त्याच्या शरीरातून पांढरा प्रकाश बाहेर पडू लागला. त्याच्या सासऱ्याने त्याला बायको आणि मुलीबद्दल पुन्हा एकदा आश्वस्त केलं आणि अचानक जफरला आपण कोणत्या तरी प्रकाशाच्या वर्तुळात शोषले जात असल्यासारखं वाटायला लागलं. काही मिनिटात मौलवी साहिब आणि जफरचे सासरे सोडून त्या दालनात काहीही उरलं नव्हतं.

सहा महिन्यात यास्मीनने एका गोड, गोंडस मुलाला जन्म दिला. मुलाचा पहिला दीदार झाल्यावर तिला आनंदाचं भरतं आलं...कारण त्या तान्ह्या बाळाला पिंगे टपोरे डोळे आणि सोनेरी कुरळे केस होते आणि ते बाळ यास्मिन दिसल्यावर निरागसपणे हसत होतं. जफरसारख्या पुण्यात्म्याच्या तफरीहची ( जन्म-मृत्यूच्या सफरीची ) सुयोग्य सांगता झालेली होती.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान आहे.
हर्पे न,
शेवटची ओळ वाचा.माझ्याही नजरेआड झाली होती.

मस्त, यावर चित्रपटकथा लिहुन पैसे कमवा...

साधारण मध्यावर आल्यावर मला वाटलं कि त्याची बायको-मुलगी सापडणं हाच एक चकवा असावा, आणि तो जिवंत असल्याने ते त्याला मारुन त्यांच्या जगात नेण्याचा प्रयत्न करतील...

कथा आवडली. ट्विस्ट जबरी आहे.

तुमच्या सगळ्याच अरेबिक कथा आवडताहेत. कथेमुळे वेगवेगळ्या अरेबिक प्रथा, शब्द, बिलीफ्स बद्दल माहिती होते आहे