प्रतिमा

Submitted by Theurbannomad on 20 May, 2020 - 12:40

घारीब टोळीचा सरदार मतीन आज खुश होता. बरेच दिवसांनी त्याला त्याची युद्धाची खुमखुमी शांत करायची संधी मिळाली होती. संपूर्ण अरबस्तानाला आपल्या घोड्याच्या टाचेखाली आणायची त्याची राक्षसी महत्वाकांक्षा लहान वयापासून त्याने बाळगली होती. वयाच्या विसाव्या वर्षी आपल्या वडिलांच्या निधनानंतर आपल्या मोठ्या भावाचा कपटाने खून पाडून आणि उरलेल्या भावंडांना आपल्या धाकधपटशाने मुठीत ठेवून त्याने आपली टोळी विस्तारात नेली होती. टोळीतल्या सरदारांना रक्ताची चटक लावून त्याने बराचसा प्रदेश आपल्या अमलाखाली आणला. वेगवेगळ्या प्रदेशात आपले खास मर्जीतले सुभेदार नेमून त्याने राज्यविस्तार करताना सुद्धा आपली पकड कुठेही ढिली पडू दिली नव्हती. त्याच्या विरोधात जे जे लढले अथवा उभे राहिले, त्यांना क्रूरपणे मारून त्याने आपली दहशत बसवलेली होती. अशा या अक्राळविक्राळ असुरी शक्तीच्या विरोधात उभी असलेली एकमेव टोळी आज मतीन नेस्तनाबूत करणार होता. मलिकी टोळीचा प्रमुख इद्रीस आपल्या शत्रूंमधला बहुधा शेवटचा जिवंत शत्रू असावा, आणि म्हणूनच त्याला ठार करून आपण स्वतःला अरबस्तानाचा अनभिषिक्त सम्राट घोषित करू शकू या कल्पनेनेच मतीन हरखून गेला होता.

मतीन आपल्या सल्लागार मंडळाबरोबर आपल्या गढीत युद्धाची तयारी करण्याच्या उद्देशाने बसला होता. त्याचा दरबार चांगलाच मोठं होतं. दरबाराच्या मधोमध वाळूच्या आणि सुकलेल्या गवताच्या मिश्रणातून तयार केलेल्या मातीच्या प्रतिकृती होत्या. लढाई होत असलेल्या भागाचा बकऱ्याच्या कातडीवर रेखाटलेला नकाशा, त्या नकाशानुसार तयार केलेली त्या प्रदेशाची प्रतिकृती आणि मलिकी टोळीच्या मुख्य सरदारांची त्यांच्या प्रतवारीनुसार आणि सैनिकांच्या संख्येनुसार केलेली विभागणी अशा जय्यत तयारीनिशी मतीन आणि त्याचे रक्तपिपासू खासे सरदार आपापल्या लोकांबरोबर चर्चेला जमले होते.

" फाझल, साद, महमूद, या वेळी कोण आपल्या सैन्याचं नेतृत्व करणार? " मतीन दाढी कुरवाळत छद्मीपणे हसत बोलला. " आपल्या एका तुकडीला हे युद्ध जिंकायला पाठवला ना, तरी आपण तीन-चार दिवसात जिंकू. पण सगळ्याला आपल्या सैन्याची ताकद समजू दे...आहेत तितके सगळे सैनिक युद्धभूमीवर मला हवे आहेत. लढायला एक तुकडी पुढे पाठवू, बाकीचे मैदानात उभे असतील...तुम्हीच मला आपापसात ठरवून सांगा, कोण पुढे जाणार?"

मागे उभ्या असलेल्या सहाय्यक सरदारांमधून बिलाल चार पावलं पुढे आला. " आका, माझी विनंती आहे की या वेळी मला आपल्या पहिल्या तुकडीचं नेतृत्व करू द्या. याआधी फाझल, संसद आणि महमूदच्या नेतृत्वाखाली मी लढलेलो आहे पण या वेळी मला लढाऊ तुकडीचं नेतृत्व करायची इच्छा आहे. सैन्याचा सरदार कोणीही झालं तरी चालेल.....आपल्या आणि परवरदिगारच्या दुवा असतील तर माझ्या नेतृत्वाखाली माझी २००० योध्यांची तुकडी एका दिवसात आपल्याला इद्रीसचं डोकं नजराणा म्हणून पेश करेल अशी मला खात्री आहे." एका गुढघ्यावर बसून बिलालने मतीनच्या समोर डोकं झुकवलं आणि छातीवर हात ठेवून डोळे मिटून घेतले. मनातल्या मनात तो मतीनच्या संमतीची वाट बघत होता.चौघा सरदारांमधला तो सगळ्यात तरुण सरदार असला, तरी अनाथ असल्यामुळे आणि युद्धापेक्षा समेटावर जास्त भर असल्यामुळे तो मतीनच्या खास मर्जीतला नव्हता. अनेक युद्धांमध्ये शौर्य गाजवूनही त्याला मतीन फारसा जवळ करत नव्हता.

" कोणाला काही हरकत? मी खुश आहे की माझा सगळ्यात तरुण सरदार स्वतः आपल्या हातात तलवार घेऊन पुढे आला आहे...पण कोणाला हरकत असेल तर आधी चर्चा व्हावी. अन्यथा लढाऊ तुकडीच्या नेतृत्वाची तलवार बिलालकडे द्यायला माझी हरकत नाही..." मतीनने बाकीच्या सरदारांकडे बघून डोळे मिचकावले. अखेर आपला सगळ्यात तरुण सरदार तहापेक्षा युद्धाची भाषा करायला लागलेला आहे, तेव्हा त्याला इद्रीससारख्या छोट्या शत्रूविरुद्ध लढायला पुढे होऊ दे आणि त्यालाहिजे रक्ताची चटक लागू दे अशा अर्थाची ती खूण होती. बाकीचे तिघे अनेक युद्धांमध्ये खूनखराबा करून रक्तपाताला सरावलेले होते, तशात हे युद्ध काही फार मोठं नव्हतं. ' पोराला जाऊदे पुढे....हा शत्रू आपल्यासाठी खूपच साधा आहे..." अशा अविर्भावात तिघा बाकीच्या सरदारांनी आपली काहीही हरकत नसल्याचं उत्तर दिलं आणि बिलालला आळीपाळीने आलिंगन दिलं. मतीन आपल्या आसनावरून उठला. आपल्या हाताने त्याने चिलखत, तलवार, शिरस्त्राण आणि आपल्या साम्राज्याचा झेंडा बिलालच्या हातात दिला.फाझलला त्याने सैन्याच्या मुख्य सरदाराचा मान दिला. सादला लढाईच्या सगळ्या व्यवस्थापनाची आणि व्यूहरचनेची धुरा मिळाली आणि महमूद अतिरिक्त तुकडीचा प्रमुख झाला. पुढच्या सहा-सात तासात त्यांनी व्यूहरचना कशी असावी, चढाई करणाऱ्या तुकडीचे किती भाग असावे, चढाया कोणत्या बाजूने कराव्या अशा सगळ्या गोष्टींवर बारकाईने चर्चा केली.

" हुजूर, असाद अजून आला नाही....त्याच्याकडून खबरबात कळली की आपल्या व्यूहरचनेवर शेवटची नजर फिरवत येईल..." साद संध्याकाळ झाल्यावर त्रागा करत बोलला. साद हा मतीनच्या गुप्तहेरांचा प्रमुख होता. आपले नजरबाज पेरून शत्रूच्या गोटातली बित्तमबातमी आणण्याचं काम तो गेली वीस-बावीस वर्ष करत होतं. त्याच्या बातम्या इतक्या अचूक असायच्या, की अनेकदा शत्रूच्या चोरवाटा आणि रसद तोडणं मतीनच्या सैन्याला सोपं व्हायचं.

रात्री उशिरा अखेर असाद आपल्या आठ-दहा हेरांबरोबर दरबारात अवतरला. त्याच्या हातात सांकेतिक भाषेतली टिपणं, शत्रुप्रदेशाचे काही नकाशे आणि मोक्याच्या जागांची माहिती असा ऐवज होतं. दरबारात त्याच्या येण्यामुळे सगळे आनंदले. तासाभरात तयारीवर शेवटचा हात फिरवून पांगापांग होईल आणि दोन-तीन दिवसात बिलालच्या नेतृत्वाखाली आपली पहिली तुकडी चढाई करेल, असा विचार सगळ्यांच्याच मनात घोळत होता.

" बोल असाद, काय खबर?"

" हुजूर, नकाशे, माहिती हे सगळं माझ्या हातात आहे...आपल्या अंदाजानुसार १५००-१६०० पेक्षा जास्त सैनिक आणि साध्या तलवारी यापेक्षा जास्त ताकद इद्रीसची नाही. हुजूर, फार फार तर तीन-चार तास लागतील युद्ध संपायला...पण हुजूर...." असाद अचानक चाचरला.

" पण..पण काय? असाद, बोलो...बेझिझक बोलो..." मतीनच्या कपाळावर आठ्या पडल्या. दाढी कुरवाळत तो सावरून बसला. बाकीच्या चार सरदारांनीसुद्धा कान टवकारले.

" हुजूर, खबर पक्की नही लेकिन साफ गलत भी नही है.....आमच्या काही जासूस लोकांनी सांगितलंय, की इद्रिसकडे काहीतरी तिलिस्मी ताकत आहे....आधी त्याने ज्या ज्या लढाया लढल्या आहेत, त्या त्या लढायांमध्ये त्याच्या बाजूचा एकही सैनिक, उंट किंवा घोडा मेलेला नाहीये. ज्यांनी इद्रीसबरोबर दोस्ती केली, त्यांच्याबरोबर अजूनही इद्रीसचा खूप चांगला दोस्ताना आहे...पण ज्यांनी त्याच्याशी दुश्मनी केली त्यांच्यापैकी कोणीही लढाईत जिंकू शकलेलं नाही..."

" कैसी तिलिस्मी ताकत? कोई जिन्ना है क्या उसके पास? अशी कोणती शक्ती हे त्याच्याकडे? आणि आहे तर त्याची माहिती का नाही काढली असाद? इतनी बडी भूल?"

" माफी हुजूर, मला इतकंच माहित आहे की त्या इद्रीसच्या महालात एक जागा आहे...तिथे कोणीही...इद्रीसच्या बेगमही जाऊ शकत नाहीत. तिथे जायचा रस्ता फक्त इद्रीसच्या आवाजाने उघडतो. तिथे त्याच्याकडे काहीतरी आहे...त्याच तिलिस्मी ताकतीच्या जोरावर इद्रिस अजिंक्य आहे अजून..."

" तुला वेड लागलंय का? बुड्ढा झालायस तू असाद...तुझ्या खबरी लोकांना बदल आता...ऐसा भी कभी होता है क्या?" मतीन चरफडत असादवर ओरडला.आपल्या सत्तेच्या गर्वात धुंद असलेल्या त्याच्या बुद्धीला असादच्या या माहितीमधलं गांभीर्य समजत नव्हतं. अर्थात आजवरच्या असादच्या कामाचा असलेला लौकिक असा होतं, की त्याला मनोमन असादच्या त्या माहितीला पूर्णपणे दुर्लक्षित सुद्धा करता येत नव्हतं. अखेर इद्रीसने लढलेल्या लढाया छोट्या छोट्या टोळ्यांबरोबरच्याच आहेत आणि अशा कमजोर शत्रूंना हरवून इद्रीसने मुद्दाम सगळीकडे खोट्या कहाण्या पसरवल्या असतील असा निष्कर्ष काढून सगळ्यांनी असादच्या नकाशानुसार व्यूहरचनेवर शेवटचा डोळा फिरवला. आवश्यक ते बदल करून सगळ्यांनी आपापल्या जबाबदाऱ्या निश्चित करून दरबार सोडला.

दुसऱ्याच दिवशी बिलालने आपल्या २००० योद्ध्यांना तलवारीला पाणी पाजायची आज्ञा केली. घोड्यांना नीट खुराक दिला. शिरस्त्राणांचं आणि चिलखतांचं वाटप केलं. एकूण पाच तुकड्या तयार करून प्रत्येक तुकडीचा प्रमुख नेमून दिला. आधी दोन तुकड्या दोन बाजूने आणि एक तुकडी समोरून चाल करेल, मातीची तटबंदी खिळखिळी करेल आणि मुख्य दरवाजा फोडून उरलेल्या दोन तुकड्यांना चाल करायचा इशारा करेल अशी व्यूहरचना आखली गेली होती. फाझलने आवश्यक त्या सूचना देऊन सगळ्यांना आपापली जबाबदारी आखून दिली. दुसऱ्या दिवशी सूर्य उगवल्यावर चढाईला सुरुवात होणार होती.

दुसऱ्या दिवशी युद्धाच्या आरंभाचे नगारे बडवले गेले आणि हजारभर सैनिक आपापल्या बाजूने इद्रीसच्या त्या छोट्याशा साम्राज्याचा लचका तोडायला सरसावले. दुसऱ्या फळीच्या सैनिकांबरोबर बिलाल मतीनच्या साम्राज्याचा झेंडा उंच फडकावत आपल्या रेशमी खोगीर लावलेल्या पांढऱ्या घोड्यावर ऐटीत बसला होता. त्याच्या आयुष्यातला हा महत्वाचा दिवस होता. ही लढाई जिंकली, की तो इतर तीन सरदारांप्रमाणे दरबारातला ' सैन्याचं नेतृत्व करणारा सिपहसालार' होणार होता.

उन्हं तापली तशी बिलालची चुळबुळ सुरु झाली. अजून कोणाकडून कसलीही खबर कशी आली नही, याचं त्याला आश्चर्य वाटत होतं. तीन-चार तासात इद्रीसच्या साम्राज्याचा पाडाव करण्याच्या त्याच्या वल्गना त्याच्या त्यालाच टोचायला लागल्या. अखेर त्याने आपल्या शंभर ताज्या दमाच्या सोजिरांना नक्की काय झाला आहे याचा मागोवा घ्यायला पुढे पाठवलं. बराच वेळ जाऊन सुद्धा ते परत आले नाहीत, तेव्हा मात्र तो थोडासा गोंधळला. बघता बघता त्याचे हजारभर सैनिक गायब झाले होते. आता तो स्वतः इरेला पेटला आणि त्याने आपल्या उरलेल्या सैनिकांना घेऊन त्या तटबंदीच्या दिशेने कूच केली.

तटबंदी आणि मतीनच्या सैन्याच्या मध्ये धुळीचा दाट पडदा पसरलेला होता. एक एक करत बिलाल आणि त्याचे योद्धे त्या वाळूच्या धुराळ्यात शिरले. घोड्यांच्या टापांचा आवाज तेव्हढा सगळ्यांना ऐकू येत होतं, पण आजूबाजूचं काहीही दिसत नव्हतं. बिलालने त्याचा घोडा तसाच पुढे नेला. हातात तलवारी घेऊन तो हवेतच फिरवायला लागला. समोरचं काहीच दिसत नसल्यामुळे त्याने एक-दोन वेळा आपल्या सैनिकांना उद्देशून युद्धाच्या घोषणासुद्धा दिल्या. अखेर ती धूळ कमी कमी होता ओसरत गेली आणि तो इद्रीसच्या राज्याच्या त्या तटबंदीसमोर आला. आजूबाजूला बघितल्यावर त्याला समजलं, की तो सोडून त्या रणांगणावर चिटपाखरू नव्हतं.

" कहां है सब के सब? आगे कूच करो...माझा एक एक सैनिक शंभर सैनिकांच्या बरोबरीचा आहे...पुढे या..." घसा फाडून बेंबीच्या देठापासून ओरडत बिलालने थयथयाट केला. काहीही प्रतिसाद नं आल्यामुळे त्याने घोडा फिरवला. मागे धूळ आणि वाळू सोडून काहीच दिसत नव्हतं. समोर तटबंदीवर सुद्धा एकही सैनिक दिसत नव्हता. तटबंदीच्या आजूबाजूचा खंदक खोल होता. त्यात काटेरी झाडं उगवलेली होती. असं असूनही मुख्य दरवाज्यासमोरचा खंदकावर टाकलेला लाकडी पूल तसाच होतं. सामान्यतः युद्धात सगळ्यात आधी तो पूल वर ओढून त्याच्या साखळ्या काढल्या जातात, पण समोरचं दृश्य बघून नक्की युद्ध सुरु आहे की नही असं प्रश्न बिलालला पडला.

शेवटी घोडा पुढे नेत तो हळू हळू त्या पुलावर आला. खंदकात पडणं म्हणजे मृत्यूला आमंत्रण असल्यामुळे चारी बाजूला नजर ठेवत संथपणे आणि सावधपणे तो पुढे सरकत होता. दरवाज्यापाशी येऊन सुद्धा त्याला कोणी काहीही प्रतिकार केला नाही. दरवाज्याची प्रचंड लाकडी फळी त्याने उचलायचा प्रयत्न केला. त्याच्या शक्तीला ते वजन पेलवणारं नव्हतंच. अचानक आपोआप ती फळी वर उचलली गेली आणि दरवाजा आतल्या बाजूला उघडला. बिलाल चटकन आपल्या घोड्यावर बसला आणि त्याने दोन्ही हातात तलवार घेतली. लगाम तोंडात पकडून त्याने घोडा पुढे केला. त्या क्षणी आपण एकटे आहोत हा विचारही त्याच्या मनाला शिवला नाही.

आत आल्यावर त्याच्या समोर त्याला हजारभर लोकांचं सैन्य दिसलं. कोणाच्याही हातात लढाई करण्याची कोणतीही शस्त्र नव्हती. अंगावर चिलखत अथवा शिरस्त्राण नव्हतं. एखाद्या सणसमारंभाला जमाव तशा पद्धतीचं प्रसन्न हास्य प्रत्येकाच्या चेहऱ्यावर होतं. त्या सैन्याच्या मध्यभागी एका उंच घोड्यावर रेशमी कपड्यातला प्रसन्न चेहऱ्याचा एक मनुष्य त्याला दिसला. बिलालच्या हातातून तलवारी गाळून पडल्या. तो घोड्यावरून उतरला आणि काहीशा भारावलेल्या अवस्थेत तो हळू हळू त्या मनुष्याकडे चालायला लागला. जवळ पोचल्यावर तो मनुष्य घोड्यावरून उतरला आणि त्याने बिलालकडे बघून आपली पांढरी शुभ्र दाढी कुरवाळली.

" मेरा ही नाम इद्रिस है...तू साध्या माझ्या राज्यात आहेस. तुझं स्वागत आहे..."

" स्वागत? " बिलाल गोंधळला.

" हो...स्वागत...माझ्याबरोबर ये.." इद्रीसने बिलालला आपल्याबरोबर आपल्या शामियान्यात नेलं. तिथे उंची रेशमाच्या आसनावर दोघे विसावले. बिलालला त्याने आपल्या हाताने सुरईतून रत्नजडित चांदीच्या पेल्यात सरबत ओतून दिलं. स्वतः दुसरा पेला भरून घेतला.

" आपल्याला माहित आहे नं, की बाहेर सम्राट मतीन यांची १०००० ची खाडी फौज आपल्या राज्याच्या दिशेने चाल करून येत आहे? " बिलालने इद्रीसला प्रश्न केला.

" हो...माहित आहे. आणि त्यांच्या फौजेच्या सगळ्यात तरुण वीर सरदारच स्वागत मी करत आहे....हो नं?" इद्रिस गालातल्या गालात हसत उत्तरला.

" आपल्याला समेट करायचा असेल तर त्या संबंधात बोलायची मला परवानगी नाही...मला परत जाऊन हुजूरांना तास सांगावं लागेल.."

" अरे नहीं बेटा...समेट कैसा? मला तसं काहीच करायचं नाहीये..." इद्रिस पुन्हा एकदा हसला.

" माफ किजीये, आप मुझसे बडे है. लेकिन ये मेरी चेतावनी है...समर्पण केलं नहीं तर तुमच्या राज्यात कोणीही वाचणार नाही..."

" बेटा, धीरज रखो. बेसब्री ठीक नाही......"

" बेसब्री? आपल्याला मी बेसब्र वाटतोय? " बिलाल थोडासा चिडला.

" देखो अपने आप को आईने में..." असं म्हणून इद्रीसने आपल्या समोरच्या बाजूचा एक पडदा ओढला. त्यामागे असलेला आरसा आता बिलालच्या समोर होतं आणि बिलालला त्यात आपला चेहरा दिसत होता.

बिलालने आपला चेहरा नीट निरखला. अचानक आरशातील बिलालचं प्रतिबिंब हसायला लागलं. बिलालने आपल्याच प्रतिबिंबाकडे बावचळल्यासारखं बघायला सुरुवात केली. नक्की काय होतंय, हे त्याला कळत नव्हतं. अचानक बिलाल त्या आरश्याकडे ओढला गेला आणि त्यात अंतर्धान पावला.

त्या दिवशी आपल्या सैन्याचा काहीही मागमूस नं लागल्यामुळे मतीन आणि त्याचे तिन्ही सरदार चिंताक्रांत अवस्थेत पुन्हा एकदा युद्धभूमीवरच्या त्या भव्य तंबूतल्या दरबारात हजर झाले. बघता बघता एक चतुर्थांश सैन्य गायब झालं होतं. सगळ्यांची मती कुंठित झाली होती. अखेर दुसऱ्या दिवशी सगळ्यांनी एकदम आक्रमण करावं असा ठराव करून सगळ्यांनी रात्रीच चढाईची तयारी करायला सुरुवात केली.

दुसऱ्या दिवशी सूर्य उगवल्या उगवल्या सात-आठ हजार सैनिक आपल्या तीन सरदारांच्या आणि सम्राट मतीनच्या नेतृत्वाखाली इद्रीसच्या राज्याचा घास घ्यायला सरसावले. धुळीचा वादळ समोर जमा होत होतं. घोड्यांच्या टापांचा आवाज आसमंतात दुमदुमत होता. उंच धरलेलं मतीनच्या साम्राज्याचं निशाण सैन्याबरोबर पुढे सरकत होतं. धुळीमध्यें शिरताच कोणाला काहीही कळेनासं झालं. सगळ्यांनी तलवारी उपसून अंदाधुंद फिरवायला सुरु केल्या. त्या सगळ्या गोंधळात अनेक सैनिक कापले गेले. अखेर धुळीच्या त्या वादळातून मतीन एकटा बाहेर पडला. बिलालप्रमाणेच तो सुरुवातीला गोंधळला आणि शेवटी समोर दिसत असलेल्या दरवाजाकडे त्याने आपला घोडा दामटवायला सुरुवात केली.

बिलालप्रमाणेच तो त्या लाकडी पुलावरून तटबंदीच्या मुख्य दरवाज्यासमोर आला. दार आपोआप उघडलं गेलं आणि त्याने आत प्रवेश केला. समोर तशाच पद्धतीचं दृश्य त्याला दिसलं. इद्रिस आपल्या घोड्यावरून उतरला आणि त्याने मतीनचं स्वागत केलं.

मतीन आता पुरता गोंधळला होता. मागे बघितल्यावर त्याला दूरवर धुळीचे लोट आणि वाळू याशिवाय काहीच दिसत नव्हतं. आपले सैनिक अजूनही येत असणार, अशा भ्रमात तो आपल्या घोड्यावर तसाच बसून राहिला. इद्रीसने त्याला पुन्हा एकदा खाली उतरून आपल्या शामियान्यात यायची विनंती केली. मतीनने समोर उभ्या असलेल्या 'सैन्याच्या' आणि इद्रीसच्या हातात काहीही शस्त्र नं बघितल्यामुळे आपल्याला समेटाची बोलणी करण्यासाठी इद्रिस शामियान्यात नेत असेल अशी त्याचीही समजूत झाली. मतीन घोड्यावरून पायउतार झाला आणि शामियान्यात गेला.

शामियान्यात आसनावर बसल्यावर इद्रीसने त्यालाही सरबताचा पेला देऊन दाढी करवाली आणि त्याच्या समोरचा तो रेशमी पडदा ओढला. त्या पडद्यामागचा आरसा आता खुला झाला. त्यात मतीनला स्वतःचा चेहरा दिसू लागला. मतीन आपल्या चेहेऱ्याकडे बघत सरबताचा घोट घेणार तोच तो चेहरा अचानक मतीनकडे बघत हसू लागला आणि मतीनच्या हातातला पेला पडला.

" हे काय चेटूक आहे? इद्रिस, ये धोखा है...काला जादू है...तुम धोखेबाझ हो..." मतीन धडपडत उठायचा प्रयत्न करायला लागला. इद्रिस आता आपल्या जागेवरून उठला. त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि त्याने खुलासा करायला सुरुवात केली.

" मतीन, ये आईना ' करीन आईना ' है. करीन कौन जानते हो? करीन म्हणजे प्रतिबिंबाचं जग. पण करीनच्या जगात कपटीपणा, धोका, खूनखराबा नसतो. तुझ्या ज्या भावाला तू कपटाने मारलंस, त्या भावाचा जिवाभावाचा मित्र म्हणजे हा तुझ्यासमोर उभा असलेला इद्रिस. माझ्या मुलीशी तुझ्या भावाचा निकाह झाला होता...तुझ्याच भीतीमुळे तुला यातलं काहीही त्याने सांगितलं नव्हतं. तो एक नेक बंदा होता. त्याला खूनखराबा नको होता. त्यानेच त्याच्या नेक कामांच्या दुआ मिळवून करीनच्या जिन्नाला वश करून घेतलं होतं.त्याने दिलेला हा आईना कपटी लोकांना जहन्नुम लोकात पाठवतो आणि त्या लोकांच्या प्रतिबिंबात जान घालून त्यांच्यापासून नेक बंदे या दुनियेत पाठवतो."

" हा धोका आहे...तू माझ्या सरदारांना आणि सैनिकांना धोक्याने संपवलंस..."

" नहीं...मैने कुछ नहीं किया. बाहेर वाळूचं वादळ आहे नं, त्यात त्यांनीच एकमेकांना मारून संपवलं. तुमचं दिल नेक नसेल तर डोळे बंद झाल्यावर आजूबाजूचा कोणीही शत्रू वाटतो...मी फक्त करीनच्या जिन्नाकडून वादळ निर्माण करून घेतलं. "

" पण माझ्या भावाला यातून काय मिळणार? त्याला काय माझा सूड घ्यायचा होतं फक्त? "

इद्रिस पुन्हा एकदा हसला. त्याने आरशाकडे बोट दाखवलं. तिथे मतीनला त्याचा भाऊ आणि बिलाल दिसायला लागले. मतीन आता सैरभैर झाला...

इद्रीसने आता पुढचा खुलासा केला..." मतीन, बिलाल तुझ्या भावाचा आणि माझ्या मुलीचा मुलगा आहे....तो अनाथ नाही. त्याला सगळं काही समजलेलं आहे...आता तू जहन्नुममध्ये जाशील आणि करीन जिन्ना बिलालला तुझं राज्य सांभाळायला परत पाठवेल...."

हळू हळू मतीन त्या आरशाकडे खेचला जायला लागला. बिलाल आरशातून बाहेर यायला लागला. थोड्याच वेळात मतीन आरशात पूर्णपणे अंतर्धान पावला आणि आरशात बिलालला त्याचं खरं प्रतिबिंब दिसायला लागलं. त्याने इद्रीसला घट्ट मिठी मारली आणि तो इद्रीसबरोबर बाहेर आला.

बाहेर इद्रीसचं सैन्य दोघांचं स्वागत करत त्यांच्या नावाचा जयजयकार करायला लागलं. मतीनचं क्रूर साम्राज्य आता सहृदयी इद्रीसच्या आणि स्वतःची ओळख नव्याने पटलेल्या 'सनाथ' बिलालच्या नेक हातात आलेलं होतं.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सर्व पात्रे इतकी स्पष्ट डोळ्यासमोर उभी राहतात की 'अॅलिस इन वंडरलॅड' प्रमाणे स्वतःच त्या परिकथेत फिरून आल्यासारखं वाटलं!