सफर

Submitted by Theurbannomad on 19 May, 2020 - 12:19

शालाब गावच्या व्यापाऱ्यांचा तांडा हळूहळू आकार घेत होता. दर वर्षीप्रमाणे मागच्या आठ-दहा महिन्यात समुद्राचा तळ पिंजून काढलेले टपोरे मोती एकत्र करून गावचे व्यापारी आज वाळवंट तुडवून मिस्र देशातल्या मोठ्या बाजाराकडे कूच करणार होते. चाळीस-पंचेचाळीस दिवस वाळवंट तुडवत त्यांचा तांडा प्रवास करणार होता. त्या तांड्याचा प्रमुख असलेला शरीफ जातीने एक एक गोष्ट नीट तपासून घेत होता. वाळवंट म्हणजे दिवसा आग ओकणारा सूर्य आणि रात्री हाडं गोठवणारी थंडी. निसर्गाच्या या रौद्र रूपात काहीतरी कमी म्हणून कि काय, पण त्या वाटेवरची तुरळक मनुष्यवस्ती आणि अचानक खंडणीसाठी कधीही उपटणारे टोळीवाले या सगळ्यांचा विचार करून बऱ्याच गोष्टींची तयारी काटेकोर आणि निजोयनबद्ध रीतीने करावी लागे. गाव अशा जागी वसले होते, की वाळवंट अथवा खोल समुद्र यापैकी एक पार केल्याशिवाय मिस्र देशात पोचणं अशक्य होतं. शरीफला आधीच्या पंधरा वर्षांच्या अनुभवामुळे या सफरीची चांगली सवय झाली होती. त्याच्या वडिलांप्रमाणे तो चाळिशीतच आपल्या गावच्या काफिल्याचा म्होरक्या झाला होता.

वीस-बावीस उंट, पंधरावीस खेचर आणि त्यांच्यावर लादलेलं खाण्यापिण्याचं जिन्नस, तंबूचे कपडे, वाटेत टोळीवाल्यांना नजराणा म्हणून द्यावं लागणारं उंची कापड अशा जय्यत तयारीनिशी एकदाचा तो तांडा निघाला. सगळ्यात पुढे असलेल्या उंटावर डोक्याला रेशमी मुंडासं बांधून शरीफ ऐटीत बसला होता. त्याच्या या सफरीनंतर त्याला 'आफताब-इ-सफर' चा किताब गावाच्या जिर्गाप्रमुखाकडून मिळणार होता. त्या भागातले बरेचसे तांडे दिवसा अंतर कापून रात्री विसावा घेत असले, तरी शरीफ आपला काफिला दुपारच्या रणरणत्या उन्हात आडोशाला विश्रांतीसाठी थांबवे. रात्री ताऱ्यांच्या माहितीच्या जोरावर दिशा इतक्या अचूक ओळखे, की त्या गार वातावरणात बरोबरीचे लोक आणि प्राणी जास्तीचं अंतर कापत. आज सुद्धा गाव सोडायला त्याने संध्याकाळचा मुहूर्त निवडला होता.

तांडा मजल दरमजल करत आठ-दहा दिवसात भगभगीत वाळवंटात पोचला. मनुष्यवस्त्या आता चांगल्याच मागे पडल्या होत्या. त्या रस्त्यात पुढे महिनाभर मनुष्यवस्ती दिसणं आता वाळवंटात सरोवर मिळण्याइतकं दुर्मिळ असणार होतं. प्रत्येक रात्री पुढे जाताना पिण्याच्या पाण्याचा साठा आणि जनावरांच्या कडब्याच्या साठा तपासला जायचा. या दोन्ही गोष्टींमध्ये काहीही चूक झाली, तर ती किती महागात पडेल हे शरीफसारख्या मुरलेल्या माणसाला नक्कीच माहित होतं.

आठवड्याभराच्या कठीण प्रवासानंतर काफिला एके दिवशी विश्रांती घेत असताना अचानक वाळूचं प्रचंड वादळ घोंघावत आलं आणि होत्याचं नव्हतं करून गेलं. वादळाची चाहूल कोणालाही लागली नव्हती. शरीफसारख्या अनुभवी व्यक्तीला सुद्धा येणाऱ्या वादळाचा यत्किंचितही अंदाज आला नव्हता.त्या वावटळीत बऱ्याच वस्तू सोसाट्याच्या वाऱ्याबरोबर उडून गेल्या. काही खेचर मृत्युमुखी पडले आणि खाण्यापिण्याचं बरंचसं जिन्नस वाळूत सांडलं. शरीफच्या आत्तापर्यंतच्या सफरीतलं हे सगळ्यात भीषण वादळ होतं. त्याने काफिला कसाबसा तगवून धरला आणि शक्य तितक्या गोष्टी जमा करून वाळवंटात पुन्हा एकदा तंबू ठोकले.

सुलतान आणि अली हे त्याचे दोन खास विश्वासू सरदार त्याच्याबरोबर सावलीसारखे असायचे. त्याच्या स्वामीनिष्ठेबद्दल गावात सगळ्यांना अतिशय आदर होता.शरीफ त्यांच्यावर आपल्या सक्ख्या भावंडांसारखं प्रेम करायचा. काफिला कसाबसा स्थिरावला आणि सावरला, तेव्हा शरीफने आपल्या तंबूत दोघांना बोलावून घेतलं. पुढच्या सफरीचं नियोजन करणं आता क्रमप्राप्त होतं.आता एक एक निर्णय, एक एक क्षण आणि एक एक अन्नाचा दाणा महत्वाचा ठरणार होता.

" सुलतान, क्या सुझाव है? आपल्याला फार फार तर एक हफ्ता पुरेल इतकंच जिन्नस वाचलंय...वापस मुड जाते है?" शरीफने आपल्या पहिल्याच वाक्यात मनातली हताश अवस्था बोलून दाखवली.

" हुजूर, आपण 'आफताब-इ-सफर' आहात...आपण इतक्या लवकर हार मानली? ऐसा क्या हुआ है? अली आणि सुलतान आपल्याबरोबर असेपर्यंत मागे वळायची भाषा आपल्याला करायची गरजच काय? पत्थर फोडून त्यातून पाणी काढून दाखवू आपल्यासाठी...आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही आपल्याला माघार घेऊ देणार नाही..."

"अली, सुलतान, तुमचे इरादे बुलंद आहेत. मला तुमची आणि तुमच्यासारख्या आपल्या जिगरबाज जाँबाज लोकांची चिंता नाही...मला चिंता आहे आपल्या बरोबर असलेले ते वीस व्यापारी. ते मामुली व्यापारी लोक आहेत...त्यांचं काय? आपले उंट, खच्चर आणि कुत्रे काय खाणार? त्यांचे हाल करून मला कोणताही खिताब नको आहे. माझ्या अब्बूजानना मी काय उत्तर देऊ? खिताबासाठी मी मासूम जीवांची पर्वा नाही केली?"

"जनाब, माफी असावी पण मी आपल्याला एक सुचवू? "अली या सगळ्या संभाषणाच्या वेळी कोणत्यातरी विचारात गढलेला होता. त्याने शेवटी आपलं तोंड उघडलं.

"बोल अली, तुला परवानगीची गरज नाही...बोल..." शरीफने आशेने अलीकडे मान वळवली.

" जनाब, मी आपल्या काफिल्यातल्या आठ-दहा जवान बंद्यांसोबत आजूबाजूच्या भागात जातो. वाटल्यास सुलतान सुद्धा तेच करू शकेल...कुठेतरी आपल्याला वस्ती मिळेल....तिथे आपण आपले मोती, अश्रफी आणि रेशम दिलं तर आपल्याला ते लोक काहीतरी जिन्नस नक्की देतील. सर सलामत तो अश्रफी पचास..." अलीने सुचवलेल्या उपायात तथ्य होतं.

"लेकिन अली, एक-दोन दिवसात काही हाती नाही लागलं, तर परत फिरायची वाट अजून कठीण होईल...आपण शेवटचं गाव सोडून आता हफ्ता झाला...तितकं अंतर कापायला राशन पुरवायला हवं..." शरीफ उत्तरला.

"हुजूर, उपरवाला मेहेरबान हुआ तो दो दिन क्या, दो घंटे में कुछ हासील होगा..."अली पुन्हा एकदा आग्रह करत शरीफ आणि सुलतानला समजावायला लागला.

शेवटी बराच काथ्याकूट करून तिघांनी अलीच्या बोलण्याप्रमाणे पुढची कृती करायची ठरवली. त्यांनी तांड्यातल्या सगळ्यांना आपल्या परिस्थितीची जाणीव करून दिली. सगळ्यांच्या अनुमतीने दोन दिवस कळ काढून प्रयत्न करायचा अथवा माघारी फिरायचं यावर शिक्कामोर्तब झालं.

अलीने दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे नमाज पढून आपल्या सात-आठ साजिन्द्यांना बरोबर घेतलं. दुसऱ्या बाजूला सुलतान तयार झाला. त्यांनी वेगवेगळ्या दिशेला आपले उंट दौडवायला सुरुवात केली. दिवसभरात काहीतरी मिळवायचंच, अशा पक्क्या इराद्याने दोन्ही टोळ्या तो मैलोन्मैल पसरलेला वाळूचा महासागर तुडवत मदतीच्या शोधार्थ निघाल्या.

सायंकाळी सुलतान हात हलवत परत आला आणि त्याने शरीफला खालमानेने रिकाम्या हाताने परातल्याची खबर दिली. शरीफाने त्याच्या खांद्यावर थोपटून त्याला धीर दिला. डोळे मिटून आपल्या परवारदिगारची करून भाकली आणि अलीच्या वाटेकडे दोघे जण डोळे लावून बसले. एक दिवस वाया गेल्यात जमा होता. अली जर काही चांगली खबर घेऊन आला नाही, तर दुसऱ्याच दिवशी तांडा परतीच्या वाटेवर वळवायचा विचार शरीफच्या मनात हळू हळू पक्का व्हायला लागला.

चंद्र आकाशात पूर्ण दिसायला लागल्यावर दूरवरून उंटांच्या गळ्यातल्या घुंगरांचा पुसटसा आवाज शरीफच्या कानी पडला आणि तो सावध झाला. सगळ्यांनी आपापल्या तलवारी म्यानाबाहेर काढून पवित्रा घेतला. वाळवंटात भटके टोळीवाले लुटालूट करून खूनखराबा करून पळून जाण्यात वस्ताद होते. त्यातलेच कोणी असले, तर सावध राहिलेलं बरं म्हणून सगळ्यांनी आपापल्या दबा धरून बसायच्या जागी बंदुका आणि दारुगोळा जमा करून ठेवला. चार-पाच साजिंदे मौल्यवान वस्तूंचे पेटारे वाळूत पुरून त्यावर हातात तलवार घेऊन उभे राहिले.

पाच-दहा मिनिटात उंटांच्या आकृत्या स्पष्ट दिसायला लागल्या. चांदण्याच्या मंद प्रकाशात सगळ्यात समोरच्या उंटावर फडकत असलेलं काफिल्याचं निशाण सगळ्यांना दिसलं. अली परत येत असल्याची खात्री पटून सगळ्यांनी सुटकेचा सुस्कारा टाकला. अली इतक्या रात्री परत आल्याचं बघून शरीफला आश्चर्य वाटलं. संकेताप्रमाणे वाळवंटात कुठेही गेला तरी आपल्या काफिल्याकडे सूर्य मावळायच्या आत परतणं सुरक्षेच्या दृष्टीने अनिवार्य असतं, त्यामुळे अळीची कानउघाडणी करावी कि त्याच्या निष्ठेबद्दल त्याला शाबासकी द्यावी, या पेचात शरीफ सापडला.

अलीने उंटावरून उडी मारून झपझप पावलं टाकत शरीफकडे यायला सुरुवात केली, तेव्हाच अलीला काहीतरी गवसल्याची शरीफची खात्री पातळी. अपेक्षेप्रमाणे अलीने शरीफला सलाम करून खुशखबर दिली...

" परवरदिगार मेहेरबान है हुजूर...इथून अल-गोल ताऱ्याच्या दिशेला अर्ध्या बरीद अंतरावर
( १ बरीद = २३ किलोमीटर ) एक खूबसूरत आणि मोठं अमीर गाव आहे. तिथे एक मोठं वाहा सुद्धा आहे. ( वाहा - ओऍसिस ) आपल्या गावासारखा ऐसपैस बाजार, खजुराच्या बागा....हुजूर, आपण तिथे जाऊन हवं तितकं राशन आणि पाणी घेऊ शकतो..."

शरीफ आनंदाने हरखून गेला. त्याने अलीला आपल्या बोटातली अंगठी देऊन त्याचे आभार मानले. तांडा पुढच्या काही मिनिटात त्या दिशेला निघाला. मध्यरात्र व्हायच्या आधी जर त्या गावात पोचलो, तर गावातल्या लोकांना आपल्या येण्यामुळे त्रास होणार नाही असा विचार करून त्यांनी उंटांना सुसाट वेगाने दौडवलं. अर्ध्या-पाऊण तासातच त्यांना समोर गावाची वेस दिसायला लागली. वेशीच्या भिंतीमध्ये मशाली खोचलेल्या होत्या. दरवाज्यापाशी आठ-दहा पहारेकरी तलवार घेऊन उभे होते. त्यांनी उंटांच्या आकृत्या वेगाने आपल्यापाशी येत असल्याचं बघून संकेताचा नगारा वाजवला. बघता बघता शंभर माणसांचं सैन्य गावाच्या वेशीबाहेर घोड्यांवर आणि उंटांवर स्वार होऊन उभं राहिलं.

शरिफने तांडा एका अंतरावर थांबवून सुलतान आणि अलीला पुढे पाठवलं. त्यांनी सगळी हकीकत सांगितल्यावर वेशीवरच्या मुख्य सरदाराने आपल्या साथीदाराला गावाच्या प्रमुखाकडे पाठवलं. त्यांची परवानगी घेऊन त्याने काफिल्याला गावात यायची परवानगी दिली.

मध्यरात्र व्हायला जेमतेम एक-दोन तास बाकी होते. तशाही वेळी त्या गावकऱ्यांनी आपल्या गावात आलेल्या या पाहुण्यांचं थाटात स्वागत केलं. त्यांच्या जेवण-खाण्याची व्यवस्था केली. जनावरांना भरपूर कडबा खाऊ घातला. जनावरांनी सुद्धा बरेच दिवसांनी मिळालेल्या ताज्या गवताचा बघता बघता फन्ना उडवला. शरीफला गावच्या प्रमुखाने दावतसाठी यायचा प्रस्ताव दिला. तितक्या रात्री सगळ्यांसाठी नर्तकींचा कार्यक्रम ठेवला गेला. शराब आणि शरबत आणली गेली. शरीफ त्या सगळ्या पाहुणचाराने भारावला.

रात्री उशिरापर्यंत गावात रंगारंग कार्यक्रम सुरु होता. अली आणि सुलतान तेव्हढे कार्यक्रमातून आधीच बाहेर पडले होते. त्यांना शरिफने काफिल्याकडे असलेलं जिन्नस, पाणी आणि वाचलेल्या सामानाची नीट मोजणी करायला सांगितलं होतं. दुसऱ्या दिवशी गावात जमलं तर थोडे मोती विकावे, थोड्या रेशमी ताग्याच्या मोबदल्यात गावातून कपडे विकत घ्यावे आणि पुढच्या सफरीच्या सामानाची बेगमी करावी, असा शरीफचा बेत होता.

हुकुमाप्रमाणे दोघांनी सामानाची व्यवस्थित मोजदाद करून आपल्याकडच्या कातड्याच्या तुकड्यावर त्याची रीतसर नोंद केली. जनावरांची मोजदाद केली. बरोबर आणलेल्या भेड-बकऱ्यांपैकी जेमतेम चार-पाच उरल्या होत्या. मधाचे आणि खजुराचे बुधले सुद्धा बरेचसे त्या वादळात हरवले होते. साधारण किती आणि काय काय जिन्नस गावातून विकत घ्यावं लागेल, याची अंदाजे यादी करून अलीने आपल्याकडच्या किमती मालाची संदूक शोधायला सुरुवात केली.

"सुलतान, आपली संदूक?" अलीने सुलतानकडे बघून प्रश्न केला.

"या खुदा...अली, दोस्त, तू काही वेळापूर्वी काफिल्याकडे येत होतास ना, तेव्हा तुझी ओळख पटेपर्यंत आम्ही सावधगिरी म्हणून तलवार काढून दबा धरून बसलो होतो. टोळीवाले असले तर झटापट होणार... त्यांच्या हाती आपल्या किमती वस्तू लागल्या तर सगळी मेहनत वाया जाईल म्हणून आम्ही संदूक वाळूत पुरून ठेवली होती...घाईघाईत आणायची राहिली...वापस जाना होगा..."

"आपल्या काफिल्याची जागा कशी समजणार पण?"

" ज्या ताऱ्याच्या दिशेने आलो त्याच्या बरोब्बर विरुद्ध सरळ जाऊया...आपण विझवलेल्या शेकोट्या आणि टाकून दिलेले पलिते दिसले की मिळाली आपली जागा...."

शरीफ सुलतानवर चिडेल म्हणून दोघांनी गपचूप आपापले उंट सोडले आणि ते दोघे वेशीबाहेर पडले. एकही पहारेकरी वेशीवर कसा नाही, याचं त्यांना आश्चर्य वाटलं, पण मेजवानी सुरु असल्यामुळे सगळे तिथेच असतील असा विचार करून त्यांनी उंटांना सुसाट दौडवायला सुरुवात केली. कोणाच्या लक्षात यायच्या आधी त्यांना संदूक घेऊन परतायचं होतं.

तांड्याची जागा शोधायला त्यांना अपेक्षेपेक्षा जास्त वेळ लागला. शेकोट्या विझलेल्या असल्यामुळे दुरून त्यांना कोणत्याही खुणा दिसू शकल्या नाहीत. शेवटी बराच वेळ शोधाशोध केल्यावर एकदाची त्यांना ती जागा सापडली. संदूक पुरलेल्या जागेची शोधाशोध झाली आणि शेवटी त्यांना ती संदूक मिळाली. ती संदूक उंटावर लादून अली आणि सुलतान मागे वळले. वजनामुळे उंटांचा वेग आता निम्म्यापेक्षाही कमी झाला होता. हळू हळू पहाटेची चाहूल लागायला सुरुवात झाली आणि दोघांनी शरीफला काय उत्तर द्यायचं याची उजळणी करायला सुरुवात केली. सुलताननें आपली चूक कबूल करावी कारण शरीफला परिस्थिती माहित असल्यामुळे तो साधी समाज देऊन झाला गेलं विसरेल, हा अलीचा प्रस्ताव सुलताननें मान्य केला.

बराच वेळ गेला. सूर्य पूर्ण उगवल्यावर सुद्धा गाव कसं दिसत नाही, हे कोडं दोघांना सोडवता येत नव्हतं. आदल्या रात्री जेमतेम पाऊण तासात दिसलेलं गाव आता चार-पाच तास झाले तरी दृष्टीक्षेपात येत नव्हतं. आपली वाट चुकली की काय, अशा विचाराने दोघे गोंधळले. सैरभैर होऊन दोघांनी वाळवंट उभं आडवं तुडवलं. उंटांनी शेवटी मान टाकल्यावर अखेर दोघांनी काही वेळेपुरता शोध थांबवला.

सूर्य डोक्यावर आल्यावर दोघांनी जवळचं उरलं सुरलं जिन्नस संपवून उंटांना उठवलं. वाळवंटात कुठे काही मदत मिळते का, या विचाराने त्यांनी फुटेल त्या वाटेवर पुढे जायला सुरुवात केली. जवळ जवळ तिन्हीसांजा झाल्यावर त्यांना अखेर एका छोट्याशा तांड्याचं दर्शन झालं. जीव एकवटून त्यांनी त्या तांड्याच्या दिशेने जायला सुरुवात केली. तांड्यापर्यंत पोचता पोचता अलीला भोवळ अली आणि सुलतान अतिश्रमामुळे उंटावरच आडवा झाला.

तांड्याच्या लोकांनी दोघांना पाणी दिलं, खायला घातलं आणि बदलायला कपडे दिले. थोडं ताजतवानं होताच त्यांनी सगळ्यांचे आभार मानून आपली कहाणी सगळ्यांना कथन केली. तांड्यातील एक वृद्ध बद्दू पुढे आला. त्याने खोदून खोदून पुन्हा पुन्हा दोघांना सगळी हकीकत विचारली आणि डोकं धरून तो मटकन खाली बसला.

"काय झालं? आपण असे घाबरलात का? "अली आणि सुलताननें त्याला प्रश्न केला.

"बेटा, अफसोस के साथ बता रहा हूं...तुमचा काफिला गेला...भूल जाओ उसे अब...""

"म्हणजे?" दोघांनी विस्फारलेल्या डोळ्यांनी त्याच्याकडे बघत विचारलं.

" तुमच्या काफिल्याला दिसलेलं गाव तिलिस्मी मायाजाल होतं. रेगिस्तान रात्रीच्या वेळी मायावी शक्तींच्या ताब्यात असतं. माझ्या आजोबांनी मला एकदा त्या गावाबद्दल सांगितलं होतं. तिथे राहणारे लोक म्हणजे पिशाच लोकातले आत्मे आहेत...तिथल्या झाडांना खत म्हणून गोश्त आणि पाणी म्हणून खून द्यावं लागत...डोळ्यांना ते गाव खूप सुंदर दिसतं. रेगिस्तानतून सफर करणाऱ्या लोकांना ते आपल्याकडे आकर्षित करतात...काफिले गावाकडे यावे म्हणून शैतान वादळ तयार करतो आणि लोकांना भरकटवतो. एकदा आत गेल्यावर तिथून कोणी बाहेर पडूच नाही शकत, कारण आधी शैतान लोकांना शराब पाजून वेड लावतो आणि मग सगळ्या माणसांना आणि जनावरांना तिथले पिशाच, झाडं आणि शैतान खाऊन टाकतात...सकाळ झाली की गाव गायब होतं."

अली आणि सुलतान नखशिखांत हादरले. त्यांना हे सगळं ऐकून जबरदस्त धक्का लागला. अलीने स्वतःची छाती बडवून घेत स्वतःला शिव्या द्यायला सुरुवात केली. डोकं बडवून घेत तो धाय मोकलून रडायला लागला. कसंबसं त्याला शांत करत सुलतानने स्वतःला सावरलं. तांड्यातल्या लोकांनी दोघांना धीर दिला. एक-दोन दिवस आपल्याबरोबर राहू दिलं आणि शेवटी दोघांनी परतीची वाट धरली.

शालाब गावात सगळं ऐकून हलकल्लोळ माजला. अक्ख गाव कोणीतरी नजर लावल्यासारखं भकास वाटायला लागलं. अनेकांनी आपले मोत्याचे व्यापार गुंडाळून दुसरे व्यवसाय सुरु केले. अनेकांनी वाळवंटाचा प्रवास टाळून समुद्री मार्गाने जा-ये करणं सुरु केलं.अली आणि सुलतान यांनी फकिरी पत्करून मशिदीत लोकांची सेवा करण्यात हयात घालवली. आजही गावातल्या जुन्या जाणत्या लोकांना जेव्हा गावाच्या इतिहासाबद्दल विचारलं जातं, तेव्हा त्यांच्याकडून त्या दुर्दैवी घटनेचा उल्लेख होत असताना सगळं वातावरण निस्तेज होतं. तेजस्वी राहतो तो गावाच्या मध्यभागी उभारलेला शरीफचा पुतळा आणि त्याखाली लिहिलेली 'आफताब-इ-सफर' चा खिताब !

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आपल्याकडे अरबी नाईट्स आणि इसापनीती यापलीकडे अरबी लोककथांची विशेष माहिती नाही पण अरबी लोककथा अतिशय सुरस आणि स्वप्नरंजक आहेत. त्यांच्या कथेत नेहेमी भूतप्रेत जादूटोणा जिन्न पऱ्या असेच उल्लेख असतात. त्यांच्या जुन्या काळातल्या आयुष्यात असलेली अनिश्चिती आणि खड्तरपणा तसेच त्यांच्या आत्ता आत्तापर्यंत अस्तित्वात असलेल्या टोळ्या या सगळ्यांचा त्यांच्या कथेवर प्रभाव असतो. मला भूमध्य समुद्राच्या भागातल्या लोककथा वेगळ्या, सौदी अरेबिया/ कुवैत /दुबई अशा वाळवंटी भागातल्या वेगळ्या आणि ओमानच्या अजून वेगळ्या वाटल्या आहेत कारण तिथल्या संस्कृती खूप वेगळ्या आहेत. त्या कथांची तोंडओळख करून द्यायचा हा प्रयत्न आहे.

मला तर पुन्हा लहान झाल्यासारखं वाटलं. इतकं गुंगून जायला होतं कथा वाचताना!

नवीन प्रतिसाद लिहा