हतीफ

Submitted by Theurbannomad on 18 May, 2020 - 18:48

अहमद आणि त्याचे दोन-तीन मित्र आपल्या मेंढ्यांना घेऊन जवळच्या कुरणाकडे निघाले होते. गावापासून थोड्याशा अंतरावर असलेल्या एका डोंगराच्या पायथ्याशी एक छोटासा पाण्याचा झरा होता. त्या पाण्यामुळे तिथे एक छोटंसं हिरवं कुरण तयार झालेलं होतं. गावातले लोक आपल्या शेळ्या-मेंढ्यांना , उंटांना आणि घोड्यांना तिथे चरायला घेऊन जायचे. त्या डोंगररांगांमध्ये असलेले छोटे छोटे पाण्याचे ओहोळ त्या गावासाठी वरदान ठरले होते, कारण तिथला पिण्याच्या पाण्याचा मुबलक साठा वाळवंटातल्या त्या गावासाठी अमृतासमान होता. त्या डोंगरांबद्दल जुन्या म्हाताऱ्या लोकांनी त्यांच्या पूर्वजांकडून ऐकलेली कहाणी खरी मानली, तर ते डोंगर प्रत्यक्ष देवदूताने तिथे निर्माण केले होते. अजूनही डोंगरातल्या गुहांमध्ये देवदूत येतात आणि काही दिवस विसावा घेतात अशी आख्यायिका गावात प्रसिद्ध होती.

अहमदच्या आपल्या मेंढ्यांच्या कळपावर अतिशय जीव होता. त्यांच्या अंगावरची लोकर कातरतानाही तो इतक्या नाजूकपणे हात चालवायचा, की कधीही त्या प्राण्यांच्या अंगावर जखम व्हायची नाही. त्याने आपल्या पाळीव मेंढ्या अथवा शेळ्या कधीही खाटकाकडे विकल्या नाहीत. त्या मेंढ्यांच्या कळपाला इथे-तिथे जाण्यापासून रोखण्यासाठी त्याने कुत्रासुद्धा कधी पाळला नाही, कारण त्या मेंढ्या अहमदच्या आवाजानेच जागच्या जागी थांबायच्या. आजसुद्धा कुरणात चरायला सोडल्यावर अहमदने एका खजुराच्या झाडाखाली पथारी पसरली आणि आपल्या पिशवीतील रबाब काढला. मित्रांसोबत तास-दीड तास मनसोक्त रबाब वाजवल्यावर त्याने आणि त्याच्या त्या तीन मित्रांनी आपापल्या शिदोऱ्या उघडल्या. गप्पाटप्पा, मौजमस्ती आणि आणलेल्या शिदोरीचं भरपेट जेवण यात अजून दोन तास सरले. उन्हं कलायला लागली, तशी सगळ्यांनी आवराआवर करायला सुरुवात केली.

आपापल्या शेळ्या-मेंढ्या मोजायला लागल्यावर त्यांना अहमदच्या कळपातली एक मेंढी गायब झाल्याचं निदर्शनास आलं. अहमदसाठी त्याच्या शेळ्या-मेंढ्या काय आहेत, हे त्याच्या मित्रांना चांगलंच माहित होतं. संध्याकाळ होत आल्यामुळे गावात परतणं आवश्यक होतं. शेवटी दोन मित्र जनावरांना घेऊन गावात परततील, आणि अहमदबरोबर एक जण थांबून त्या परिसरात हरवलेल्या मेंढीचा शोध घेईल असा निर्णय घेऊन त्यांनी समस्येवरचा तोडगा काढला. अहमदला आणि त्याच्याबरोबर थांबणाऱ्या हमझाला आपापले खंजीर, उरलेलं खाण्यापिण्याचं जिन्नस, पाण्याच्या पिशव्या आणि तेल-पलिते देऊन बाकीच्या दोघांनी जनावरांसकट गावाकडे कूच केलं.

अहमद काहीशा घुश्श्यात हातात खंजीर घेऊन वाळू तुडवत आजूबाजूच्या परिसरात शोधाशोध करत होता. हमझा हातात खंजीर घेऊन आजूबाजूने कोणी श्वापद येत नाही ना, याकडे लक्ष ठेवत अहमदची सावली असल्यासारखा त्याच्या मागून चालत होता. दोन्ही मित्र आजूबाजूच्या परिसराचा एक एक कोपरा धुंडाळून शेवटी दामले आणि त्यांनी जमिनीवर बसकण मारली.

" हमझा, भेड कहां गयी होगी? आज तक ऐसा कभी नही हुआ..."

" बिलकुल...मुझे भी समझ नही रहा है...आज नक्की काय झालाय कोणास ठाऊक...त्यात आज वारा इतका आहे की वाळूत पावलांच्या खुणा सुद्धा राहिल्या नाहीयेत..."

" मला वाटतं, आपण डोंगरात गेलं पाहिजे. तिथे पाणी शोधात गेली असेल माझी भेड..."

" माफ कर दोस्त, पण मला नाही वाटत हा विचार योग्य आहे. गावातले बुजुर्ग नेहेमी सांगतात, पहाड चढायला आपल्यासारख्या सामान्य बंद्यांना मनाई आहे...."

" हमझा, माझी भेड तिथे गेली असेल तर तिला घेऊन मी लगेच खाली येईन. मला बाकी काही शोधायची इच्छा नाही..."

" गावातल्या बड्या बुजुर्ग लोकांना एकदा विचारू....गावाकडे चल..."

" नाही हमझा, तोपर्यंत एकटी भेड जनावरं खाऊन टाकतील..."

" दोस्त, मी खाली थांबतो. चांद दिसल्यावर पण तू आला नाही, तर मी गावात जाऊन सगळ्यांना वर्दी देईन..."

वास्तविक बाकीच्या दोघांनी गावात खबर दिली असणारच, तेव्हा आणखी तिसऱ्याची त्याचं कारणासाठी थांबायची गरज नाही हे अहमदला समजत होतं. त्याने शेवटी आपला आग्रह सोडून हमझाला खाली थांबायला सांगितलं आणि तो स्वतः हळू हळू डोंगर चढायला लागला. एका सपाट भागापाशी आल्यावर त्याने तिथून हात हलवून हमझाला आपण गुहांच्या आत जात असल्याची खूण केली.

अहमदला पलित्याच्या प्रकाशात गुहीच्या आत थोड्या अंतरावरचं दिसत होतं. पाणी, वटवाघूळांची विष्ठा, खुरटी झुडपं याशिवाय तिथे काहीही दिसत नव्हतं. त्याने आपल्या शेळ्या - मेंढ्यांना एका विशिष्ट आवाजाची सवय लावली होती. त्याचा तो आवाज ऐकल्यावर मेंढ्या असतील तिथून आवाजाच्या दिशेने चालत अहमदकडे परतायच्या. तो आवाज काढत आता अहमद त्या गुहेत आपल्या हरवलेल्या मेंढीला शोधायचा प्रयत्न करत होता.

एक एक करून त्याने तिथल्या चारपाच गुहा धुंडाळल्या. एका गुहेत समोर आलेल्या सापालाही त्याने शिताफीने उडवून लावलं. एक छोटा वाळवंटी कोल्हा त्याला बघून गुहेतून बाहेर पळाला. पलित्याच्या प्रकाशामुळे वटवाघुळं फडफड करत इतस्ततः उडत होती. आतून काहीशा घाबरलेल्या अहमदला आपल्या मेंढीवरच्या प्रेमामुळे या सगळ्याला तोंड द्यायची हिम्मत जेमतेम एकवटता येत होती. आता तो एका अशा गुहेच्या तोंडाशी उभा होता, ज्याची उंची दोन पुरुषांइतकी होती. त्या गुहेच्या आतून चक्क एक प्रकारचा सुवास येत होता. आत कदाचित कोणी असेल, या कल्पनेने अहमद गुहेत शिरला.

पलित्याच्या प्रकाशात त्याला जे काही दिसलं, ते बघून त्याच्या डोळ्यांवर त्याचा विश्वास बसला नाही. गुहेच्या भिंतींवर रत्ने, हिरे अशा मौल्यवान वस्तू लटकलेल्या होत्या. एका चौथऱ्यासारख्या जागेच्या आजूबाजूला पाण्याचा छोटासा प्रवाह वाहत होता. चौथऱ्यावर एका चांदीच्या वाडग्यात ऊद दरवळत होता. मागे एक सोन्याचं आसन होतं. इतका जामानिमा कोणासाठी आहे, याचाच अहमदला कोडं पडलं होतं. आजूबाजूला कोणी आहे का, याचा कानोसा घेत त्याने एक-दोन मिनिट शोधाशोध केली. शेवटी कोणीही न दिसल्यामुळे त्यानेच हाक दिली..

" इथे कोणी आहे का? असेल तर कृपा करून सामोरे या..."

" ही गुहा माझी आहे...तू कोण? कोणाच्या परवानगीने आत आलास?" एक आवाज गुहेत घुमला.

" आपण कोण आहात? कृपा करून समोर या..." अहमदने पुन्हा एकदा विनंती केली.

" मी हतीफ आहे. मला शरीर नाही. मी फक्त आवाजाच्या स्वरूपातला जीन आहे. आवाजाव्यतिरिक्त माझं अस्तित्व नाही, त्यामुळे मी तुझ्या समोर असूनही तुला समजत नाहीये. तुला गुहेच्या बाहेर असल्यापासून मी बघत आहे..."

अहमदला भीतीची शिरशिरी आपल्या मणक्यातून गेल्याची जाणीव झाली. त्याचा घसा आधीच कोरडा पडला होता. तोंडातून शब्द फुटत नसल्यामुळे नुसतेच ओठ हलवत तो बावचळल्यासारखा इथे तिथे बघत होता. खालच्या एका दगडाला त्याचा पाय ठेचकाळला आणि तो समोरच्या पाण्याच्या ओहोळात पडला. कसंबसं स्वतःला सावरत त्याने उठायची धडपड सुरु केली.

" बेटा, घबराओ मत. मी तुला काहीही करणार नाही. माझी शक्ती मला जन्नतमधल्या देवदूतांकडून मिळते. मी त्यांचा रसूल आहे. त्यांचा संदेश मी त्यांच्या नेक बंद्यांपर्यंत पोचवतो. तू इथे का आलायस?"

अहमदच्या जीवात जीव आला. त्याने ओंजळीने थोडं पाणी प्यायलं. खाली पडलेली आपली पाण्याची पखाल, खंजीर, अर्धवट विझलेला पलिता आणि मुंडासं त्याने उचललं. कपडे झटकून त्याने मुंडासं पुन्हा एकदा डोक्याभोवती गुंडाळलं आणि हतीफला उत्तर दिलं....

" मी माझी हरवलेली भेड शोधतोय. संध्याकाळी परत जायची तयारी करताना मला एक भेड कमी दिसली. खाली खूप शोध घेतला पण नाही सापडली...म्हणून इथे वर शोधायला आलो..."

" तुझी एक भेड हरवली आणि तू तुझा जीव धोक्यात घालून इथे आलास? इथे गुहांमध्ये जंगली प्राणी आहेत...रात्री इथे येणं धोक्याचं आहे..."

" पण माझी भेड उद्यापर्यंत जिंदा नाही राहणार...मला तिला शोधणं गरजेचं होतं..."

" तू एक नेक बंदा आहेस बेटा..जो बंदा हरवलेली भेड शोधायला जीवाची पर्वा नं करता इतक्या रात्री अशा जागी येतो, त्याला मी हवी ती मदत करायला तयार आहे. तुझी भेड जिंदा आहे. मी तुला ती कुठे आहे ते सांगेन....तुला यापुढे काहीही मदत हवी असेल तरी सांग..."

अहमदला अतिशय आनंद झाला. त्याने हतीफचे आभार मानले.

" बेटा अहमद, तुला माझ्याकडून काहीही हवा असेल तरी माग...मी तुझी एक इच्छा पूर्ण करेन..."

अहमद विचारात पडला. तो अतिशय साधा असल्यामुळे मुळात हतीफकडून काय मागायचं, हेच त्याला कळत नव्हतं. अखेर त्याने खूप विचार करून हतीफकडे आपली एक मागणी ठेवली...

" मी तुझा विचार करून जर कोणताही प्रश्न विचारला, तर मला तू त्याचं खरं खरं उत्तर देशील? तशी शक्ती असेल तर मी गावात लोकांच्या समस्या सोडवू शकेन...:"

" जरूर. मी तुझ्याशी जे बोलेन ते तुलाच ऐकू येईल. पण एक लक्षात ठेव, माझं उत्तर आहे तसं तू सांगितलं पाहिजेस...अन्यथा त्या क्षणापासून मी तुझी साथ सोडेन...आणि तुझी रूह तुझ्या शरीरातून बाहेर पडून जहन्नुममध्ये इब्लिसच्या ताब्यात जाईल.."

अहमद आनंदाने गुहेबाहेर आला. हतीफने सांगितल्याप्रमाणे त्याने गुहेबाहेर येऊन डाव्या हाताला चालायला सुरुवात केली. काही अंतरावर त्याला त्याची हरवलेली मेंढी एका झुडुपामागे भेदरलेल्या अवस्थेत बसलेली दिसली. तिला उचलून घेऊन तो हळू हळू खाली उतरला. खाली कोणीही नव्हतं. अखेर मेंढीला घेऊन त्याने गावाच्या दिशेला चालायला सुरुवात केली. गावाच्या वेशीवरच त्याला गावकरी हातात कंदील घेऊन डोंगराच्या दिशेने येताना दिसले. त्यांना थांबवून त्याने सगळ्यांचे आभार मानले. हमझाने चांद दिसायला लागायच्या आधीच पोबारा केला असला, तरी त्याने अहमदची एका शब्दाने माफी मागितली नाही. मेंढी घेऊन अहमद घरी आला आणि आनंदाने भरपेट जेवला.

दुसऱ्या दिवसापासून त्याने हतीफच्या साहाय्याने गावातल्या लोकांच्या समस्यांची उत्तरं द्यायला सुरुवात केली. कोणालाही काहीही प्रश्न असला, की तो अहमदकडे येऊ लागला. लोकांना जसजशी प्रचिती येऊ लागली तसतशी अहमदची प्रतिष्ठा गावात वाढायला लागली. हळूहळू त्याच्याकडे गावाच्या जिरगाचं प्रमुखपद चालून आलं. आजूबाजूच्या गावांमध्येही त्याचा लौकिक पोचला आणि त्याच्या घरात रोज शेकडो माणसांची वर्दळ सुरु झाली.

त्याच्या मित्रांना त्याच्या ऐश्वर्याची आणि प्रगतीची असूया वाटायला लागली. अर्थात सर्वाधिक असूया हमझाला वाटत होती, कारण अहमदला नक्कीच डोंगरात काहीतरी गावसलंय आणि त्याच्याच जोरावर त्याला ही विद्या प्राप्त झालीय, अशी त्याची ठाम समजूत होती. अचानक एका साध्या मनुष्याचा बघता बघता गावाचा प्रमुख कसा होऊ शकतो,हे त्याला काही केल्या समजत नव्हतं. त्याने आणि त्या दोन मित्रांनी शेवटी एक निर्णय घेतला...

" आपण त्या डोंगरात जायचं. तिथल्या एका गुहेत अहमद गेला होता. खालून ती गुहा कुठे आहे हे मी बघितलं होतं. आपण सुद्धा संध्याकाळ झाली की तिथे जायचं..." हमझा आपल्या मित्रांना समजावत होता. " जो काही राज आहे, तो तिथेच आहे. काहीही करून त्याचा शोध घ्यायचाच..." अखेर तिन्ही मित्रांनी मिळून दोन दिवसांनी पौर्णिमेची रात्र झाली, की हे काम करायची योजना आखली. चंद्राच्या प्रकाशात जंगली प्राणी आणि वाईट शक्ती कमी बाहेर पडतात, असा त्यांचा समज होता.

ठरल्याप्रमाणे त्या दिवशी नेहेमीप्रमाणे तिघांनी आपापल्या मेंढ्या चरायला नेल्या. संध्याकाळ झाल्यावर गावात परत येऊन त्यांनी मेंढ्या घरामागे पडवीत बांधल्या. खाणं-पिणं उरकलं. बाहेर छतावर झोपायला जात आहे अशी थाप मरून ठरलेल्या वेळी तिघे ठरलेल्या ठिकाणी भेटले. वेशीच्या भिंतीवरून उडी मारून ते गावाबाहेर पडले. वेशीच्या दरवाज्यापाशी असलेल्या पहारेकऱ्यांना दिसायला नको म्हणून त्यांनी काळ्या रंगाची घोंगडी अंगावर पांघरून घेतली होती. वाळू तुडवत दबक्या पावलांनी ते हळू हळू डोंगराकडे चालायला लागले. तासाभरात डोंगराच्या पायथ्याशी पोचल्यावर त्यांनी कमरेचा खंजीर काढला. थोडं पाणी प्यायलं आणि चढाईला सुरुवात केली.

चारी बाजूंना नीट लक्ष देत आणि दगडाच्या खोबणीत हात-पाय अडकवत ते डोंगराच्या त्या भागापर्यंत आले, जिथे हमझाने अहमदला गुहेत जायच्या आधी पाहिलं होतं. त्या सपाट पठारासारख्या जागी उभा राहिल्यावर त्यांना समोर अनेक गुहा दिसल्या. पलिते पेटवून त्यांनी पहिल्या गुहेत प्रवेश केला.

अचानक आलेल्या प्रकाशामुळे वर लटकलेली वटवाघुळं इथे-तिथे उडाली. हळुवार वाहणाऱ्या पाण्याचा आणि सापाच्या सरपटण्याचा आवाज समोरून येत होता. गुहेच्या आत खोलवर जाऊनही त्यांना विशेष काही दृष्टीस पडलं नाही. निराश होऊन त्यांनी बाहेरचा रस्ता धरला आणि पुढच्या गुहेत प्रवेश केला.सहा-सात गुहा धुंडाळल्यावर अखेर ते त्या उंच गुहेसमोर आले. बाहेरून गुहा चांगलीच खोल वाटत होती. त्यांनी पलित्यावर चिंध्या चढवल्या, तेल टाकलं आणि पलिता चांगला पेटवून गुहेत पाय ठेवला. आठ-दहा पावलं आत आल्यावर त्यांना भिंतींवरची रत्न, पाण्याचा ओहोळ, चौथरा आणि सोन्याचं आसन दिसलं. आपल्या हाती अखेर अहमदचं गुपित लागलं , याची त्यांना खात्री पटली आणि ते आनंदाने नाचायला लागले.

" कोण आहात तुम्ही? इथे का आलात? " गुहेत आवाज घुमला. तिघांनी आवाजाचा मागोवा काढायचा निष्फळ प्रयत्न केला आणि शेवटी कोणीच दृष्टीस नं पडल्यामुळे प्रतिप्रश्न केला...

" समोर येऊन बोला...तुम्ही कोण आहात?"

हतीफने आपली ओळख दिली. आपल्याबद्दल सगळी माहिती अहमदप्रमाणे त्याने या तिघांना पुरवली.

हमझा क्षणभर विचारात पडला. इतर दोघांनी हमझाकडे बघून 'पुढे काय करायचं?' अशा अर्थाची खूण केली. शेवटी हमझाने हतीफला मनातला प्रश्न केला...

" आमच्या एका मित्राला तुम्ही भेटला होता का? त्याचं नाव अहमद आहे. काही महिन्यांपूर्वी तो त्याची हरवलेली भेड शोधत डोंगरावर आला होता...."

" होय. त्याच्या नेक इराद्यांमुळे मी त्याला वरदान दिलं होतं, की त्याच्या प्रश्नांना मी उत्तर देईन. त्याने माझ्या वरदानाचा उपयोग करून खूप चांगलं काम केलं आहे..."

" आम्हाला सुद्धा वरदान हवं आहे..." हमझा अडखळत बोलला.

" अहमदला मी वरदान स्वतः दिलं होतं. त्याच्या नेक इराद्यांमुळे आणि त्याच्या त्या मेंढीवरच्या त्याच्या प्रेमामुळे...त्याने माझ्याकडे वरदान मागितलं नाही. तुम्हाला मी काहीही द्यायला बांधील नाही. "

" आम्ही काय केलं की आम्हाला तुमचं वरदान मिळेल?" तिघांनी आळीपाळीने हतीफकडे तगादा लावला. गयावया केली. हतीफला शेवटी ते सगळं असह्य झालं.

" मी तुमच्यापैकी एकालाच वरदान देईन, पण त्याआधी तुम्ही आपापसात ठरवा की तो एक जण कोण असेल...आणि मला त्याच्या बदल्यात माझ्या गुहेच्या तोंडावर दगड ठेवून हवा आहे. तुमच्यानंतर इथे कोणीही आलेलं मला चालणार नाही..."

हमझाने इतर दोघांना जवळ जवळ दटावलं आणि स्वतःच्या नावावर एकमत करायला लावलं. त्याने हतीफला स्वतःला तेच वरदान द्यायला सांगितलं, जे अहमदला मिळालं होतं. हतीफने मान्यता दिली आणि वरदानाची अट समजावून सांगितली. वरदान मिळाल्याच्या धुंदीत हमझाने सगळ्याला मान्यता दिली आणि तिघे गुहेबाहेर आले. गुहेबाहेर एका बाजूला पडलेला प्रचंड शिलाखंड त्यांनी सरकवून गुहेच्या तोंडाशी आणला. गुहेच्या वरच्या बाजूला चढून तिथून त्यांनी दगडांची रास खाली ढकलली. अखेर तासाभराच्या प्रयत्नांनंतर गुहा बंद झाली.

तिघांनी गावाच्या वेशीपर्यंत येऊन भिंतीवरून हळूच उडी मारून गावात प्रवेश केला. दबक्या पावलांनी आपापल्या घराकडे येऊन छतावरच्य बाजल्यावर अंग टाकलं. हमझा रात्रभर आनंदाच्या उकळ्या फुटत असल्यामुळे झोपलाच नाही. दुसऱ्या दिवसापासून त्याने अहमदच्या घरी येणाऱ्या लोकांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरं स्वतः द्यायला सुरुवात केली. इतर दोघे लोकांना हमझाच्या घरी घेऊन यायला लागले. अहमद काय समजायचं ते समजला, पण आपल्या मित्रांच्या प्रगतीचा त्याला हेवा वाटला नाही.

सुरुवातीला पैसे तिघांत समसमान वाटायची बोलणी झाली असली, तरी हळू हळू हमझाची दादागिरी वाढायला लागली होती. त्याने स्वतःची मनमानी सुरु केली होती. त्या दोघांमधला हमीद आता हमझाशी उभा दावा मांडायला लागला. दुसरा आसिफ विशेष कुरबुर नं करता पदरात पडेल ते स्वीकारत होता, त्यामुळे हमझाचे हमिदशी असलेले वाद आता पराकोटीला गेले होते. . एके दिवशी किरकोळ कारणावरून त्यांच्यात सुरु झालेला वाद हातघाईपर्यंत वाढला आणि हमीदने हमझाला त्याचं पितळ उघड पडायची धमकी देऊन घर सोडलं.

त्या रात्री हमझाने हमीदला समेटाच्या नावाखाली घरी दावत झोडायला बोलावलं आणि त्याच्या अन्नात विष घालून त्यांची हत्या केली. आपल्याच घराच्या मागे खड्डे खणून त्यांना पुरलं आणि जमीन पूर्वीसारखी करून केलेल्या प्रकारचा मागमूस राहणार नाही अशी व्यवस्था केली. दुसऱ्या दिवशी हमीद अचानक गायब झाल्याची बातमी अक्ख्या गावात पसरली. आठवडाभर शोधाशोध झाली.

अहमदला आपला मित्र अचानक गायब झाल्याचं नवल वाटलं. शेवटी त्याने हतीफला प्रश्न टाकला आणि सगळी हकीकत समजून घेतली. आपल्या मित्राच्या विश्वासघातकी कृत्याला कुठेतरी आपल्याला मिळालेल्या शक्तीतून त्याच्या मनात निर्माण झालेली असूया आहे, हे त्याला जाणवलं. त्याला मनापासून वाईट वाटलं आणि गावकऱ्यांनी विचारेपर्यंत आपणहून त्यांना काहीही नं सांगायचं त्याने निर्णय घेतला.

इथे हमझाने आसिफला सांगून प्रेत उकरून काढलं, गोणपाटात गुंडाळलं आणि मेंढ्या चरायला घेऊन जाताना खेचरांवर लादून ते आसिफला डोगराच्या मागच्या बाजूला एका विशिष्ट जागी टाकून द्यायला सांगितलं. ते गोणपाट जाळून पुरावे नष्ट करायला सांगितले. भल्या पहाटे वेशीपर्यंत आसिफला पोचवून तो स्वतः घरी आला. गावातल्या लोकांना तिथे पाठवायचं आणि प्रेत मिळाल्यावर गावकऱ्यांचा विश्वास संपादन करायचा असा त्याचा डाव होता. सकाळी सकाळी जिरगा भरला होता. गावातल्या प्रत्येक घरातला प्रत्येकजण आज जिरग्यात आवर्जून आलेला होता. असिफ तेव्हढा 'कामगिरीवर' असल्यामुळे त्या गर्दीत दिसत नव्हता. जिरगाचे सदस्य जमले. त्यांनी अहमद आणि हमझा या दोघांना सर्वांसमक्ष प्रश्न करायचा निर्णय घेतला. एकाकडून तरी प्रेताचा ठावठिकाणा कळेल अशी त्यांची अटकळ होती.

वयस्कर बुजुर्गांनी अखेर सर्वसंमतीने दोघांना प्रश्न केला...

" कृपाकरून आपल्या शक्तीला आणि परवारदिगारला स्मरून सांगा...हमीदचा मृतदेह कुठे मिळेल?"

अहमदला आदल्या दिवशी हतीफला हा प्रश्न केला होता. आता त्याला मिळालेलं उत्तर त्याला तसंच्या तसं सगळ्यांना द्यावं लागणार होतं आणि ते खोटं दिल्यास त्याची जहन्नुममध्ये रवानगी निश्चित होती.एक दीर्घ श्वास घेऊन त्याने डोळे मिटले आणि काळजावर दगड ठेवून हमझाच्या घरामागच्या त्या जागेची माहिती सगळ्यांना सांगितली. गावकरी काही क्षण स्तब्ध झाले आणि त्यांनी हमझाकडे बघितलं. त्याने या गोष्टीचा साफ इन्कार करत अहमदला बोल लावले. शेवटी त्या जिरगातला सगळ्यात वयोवृद्ध बुजुर्ग उठला आणि त्याने हमझाला उत्तरं द्यायची आज्ञा केली.

प्रेत डोंगराच्या त्या विवक्षित जागी पोचलं की नाही, याची खातरजमा करण्याच्या दृष्टीने हमझाने हतीफला प्रश्न विचारला. हतीफ उत्तरला, " ते प्रेत तुझ्या घरामागे आहे..खड्ड्यात.." हतीफ आपल्याशी मुद्दाम खोटं बोलत आहे, आपल्या हातून घडलेल्या कुकर्मामुळे मुद्दाम तो आपली दिशाभूल करत आहे अशी आता हमझाची खात्री पटली. चरफडत त्याने हतीफला अहमदप्रमाणेच बोल लावले आणि डोळे उघडले. आपल्या योजनेनुसार उत्तरादाखल सगळ्यांना त्याने डोंगराच्या त्या विवक्षित जागेची माहिती उत्तर म्हणून दिली.

पुढच्याच क्षणी आकाशातून एक काळ्या धुळीची वावटळ घोंघावत हमझाच्या आजूबाजूला जमा झाली आणि त्या वावटळीतून हमझा बघता बघता गायब झाला. गावकरी ते बघून चक्रावले. त्यांनी घाईघाईने हमझाच्या घराच्या मागच्या बाजूला शोधाशोध सुरु केली. जमीन खणत खणत अखेरीस त्यांना ती जागा सापडली आणि हमझाने खून केल्याची सगळ्यांची खात्री पटली. अहमदला सगळ्यांनी दुवा दिली आणि हमझाला शिव्याशाप देत हमीदच्या दफनाची तयारी करायला सुरुवात केली.

......दफनच्या वेळी मूठभर माती कबरीवर टाकताना एकट्या आसिफच्या चेहेऱ्यावर आनंद आणि हसू होतं.....

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त
कुठे वाचलेली ऐकलेली कथा आहे का? की स्वरचित आहे? छान आलेत संदर्भ

Ithe arbee lokankadoon aiklelyaa lokakathaannmadhye kahi pramamaat swataahchya bajune additions karoon goshtee tayaar kelyaa ahet.

आवडली गोष्ट
ह्या सगळ्यां गोष्टींचे पुस्तकच काढायला हवे

आवडली गोष्ट
आपले दोन्ही blog पाहिले
लिहीत रहा,शुभेच्छा

Arabian Nights, A thousand nights and a night, Alif Laila, Hatimtai सारख्या रंजक कथांचा फील आहे तुमच्या लेखनाला, आवडले.

या कथेतल्या ग्रामसभांनी अफ़ग़ान राष्ट्रपतिंच्या वार्षिक ‘लोया जिरगा’ ची आठवण करुन दिली