एकटीच @ North-East India दिवस २९

Submitted by सुप्रिया राज जोशी on 17 May, 2020 - 10:33

अनुक्रमाणिका > https://www.maayboli.com/node/72984
अनुक्रमाणिका २ > https://www.maayboli.com/node/73598
अनुक्रमाणिका ३ >https://www.maayboli.com/node/74455

६ मार्च | दिवस २९

प्रिय आई,

कालच्या पत्रातला माझा जावई पुन्हा पुन्हा त्याच्या आईची आठवण काढत होता. त्याच्या आईची जागा दुसरे कोणी घेऊ शकत नाही ह्याची त्याला जाणीव होती. म्हणूनच त्याने मला सासूचा दर्जा दिला. पण माझ्या लग्नाने जिला माझ्या सासूचा दर्जा दिला तिच्या रूपाने मला मात्र दुसरी आई मिळाली.

आजचा दिवस संपला आहे आणि काल रात्रीपासूनची गोष्ट लिहायची बाकी आहे. गेल्या चोवीस तासात केवढ्या घडामोडी झाल्या. त्या वाटाड्या बाईने तिच्या घराचे दार लावून घेतले. मी मात्र तिच्या घराबाहेरच्या ओसरीवर आडोसा घेउन ताटकळत थांबूनच राहिले. माझ्याकडे दुसरा काहीही मार्ग नव्हता. गोरोम पाणी ला मला सोडून जीप पुढे निघून गेली होती. माझे परतीचे सारे मार्ग बंद झाले होते.
थोडा वेळ गेला असेल, त्या बाईने दरवाजा उघडून पाहिले तर मी तिथेच, थंडीत कुडकुडत उभी होते.

“फिर से गुस्सा मत होना, प्लीज| मै सोच ही रही हू के आगे क्या कर सकती हू|”
“तुम को एक बार बोला वो समझता नही है? टूरीस्ट को घर के अंदर लेने की मुझे परमिशन नही है| किसी को पता चल गया तो मेरी नौकरी चली जाएगी|”
“हा ... मै आपका प्रोब्लेम समझ सकती हू| आप बस इतनाही प्रोमीस करो के डोंग के लिये आप मेरे साथ चलोगी|”
“मै प्रोमीस नही कर सकती| अगर बारीश रुकती है तो चालूंगी| लेकीन अब तुम IB को कैसे जाओगे? तुमने तो गाडी को भी भेज दिया|”
“लेकीन मुझे IB को जाना ही नही है| एक बार उधर गयी, तो फस जाउंगी| फिर रात को दो बजे कौन मुझे इधर लेकर आएगा?”
“अरे तुम समझते नही हो| बारीश में वो रास्ते पे नही जा सकते|”
“क्यो? बारीश होगी तो थोडा जल्दी निकलेंगे और धीरे धीरे जाएंगे ... वैसे बारीश तो रुक भी जाएगी. आप उसकी बिलकूल चिंता नही करना. खाना खाओ और सो जाओ| दो बजे उठना है|”
“मुझे तो सोना है लेकीन तुमने परेशानी खडी कर दी|”
“कोई परेशानी नही. मै चुपचाप इधर घर के बाहर बैठती हू| छे घंटेही तो बाकी है| वैसे तीन बजे तक हमको डोंग के लिये निकलना होगा ना?”
“मैने बोला ना, के मै कुछ भी प्रोमीस नाही करूंगी|”
“मत करना ... लेकीन आप बार बार गुस्सा क्यो होते हो?”
“घुस्सा आएगा ना?तुम इधर कैसे रह सकते हो? अभी रात को कुछ हो गया तो मेरी जिम्मेदारी है|”

१९६२ मध्ये झालेल्या इंडो –चायना वॉर नंतर 4000 किलोमीटर लांबच लांब पसरलेल्या The Line of Actual Control च्या दोन्ही बाजूला दोन देशांचे सैनिक बारा महिने चोवीस तास पहारा देउ लागले. या LAC चा पश्चिमेकडे अक्साई चीनचा खुला वाळवंटी प्रदेश आहे. मागे राज आणि मी लडाख ला बाईक ने गेलो होतो तेव्हा आम्ही तिथे जाउन आलो. हा प्रवास करताना रस्त्याच्या बाजूला बंकर मध्ये लपलेले सैनिक आपल्या वर नजर आणि निशाणी लावून बसले असतात याची आपल्याला मुळीही कल्पनाही नसते.

LAC चा पूर्वेकडचा भाग अरुणाचल प्रदेश मधील हा डोंगराळ परिसर आहे. गोरम पाणी पासून जेमतेम तीस किलोमीटर वर इंडो-चायना सीमा आहे. फार दुर्गम प्रदेश आहे. किबिटू पासून पुढे चालत चालतच बोर्डरवर पोहोचता येते. इथे रस्ता बांधू शकत नाही कारण हा ही दोन्ही देशांमधील वादग्रस्त बोर्डर आहे. दाट जंगलातल्या या दुर्गम बोर्डरवर रात्रीच्या अंधारातही नाईट व्हिजन टेलिस्कोप मधून डोळ्यात तेल घालून पहारा द्यायचा, हे काम वाटते तेवढे सोपे नाही. त्यामुळे पर्यटकांच्या बाबतीत सुद्धा इथे सतर्क रहावे लागत असावे. इंडिया-म्यानमार-चीन या तीन देशांमधली ट्रायजंक्शन बोर्डरही याच प्रदेशात आहे.

वालोंग मध्ये पूर्वी एक BSNL टोवर होता. तो ही बंद झाला. इथल्या लोकांना एकमेकांशी संपर्क साधण्यासाठी साधा फोनचा पर्याय सुद्धा उपलब्ध नाही. अशा दुर्गम ठिकाणी कोण्या परक्याची जबाबदारी घ्यायला कोणी दहा वेळा विचार करणारच.

एव्हाना आमचे नाटक पहायला आजूबाजूचे दोन चार लोक जमा झाले. माझी कितीही दया आली तरी सारेच हतबल होते. एक तास भर आमचा विचारविनिमय चालला असेल. शेवटी तिथल्या बांधकामाचा जमादार त्याच्या बाईक वरून मला IB (Inspection Bungalow) ला सोडायला तयार झाला. पाउस थांबायचे चिन्ह दिसत नव्हते. त्यामुळे माझा डोंग ला जायचा बेत जवळ जवळ संपुष्टात आल्यागतच झाला होता. म्हणूनच नाईलाजाने मी बाईकवर बसायला तयार झाले. माझे सामान सांभाळून मी भिजतच बाईकवर बसले. माझ्या प्रवासाची मोहीम आटोपती घेउन सर्वार्थाने माझा उलटा परतीचा प्रवास सुरु झाला.

चार किलोमीटर चे अंतर कापताना नको जीव झाला. अंग कुडकुडत होते, थंडीने दात कडकड वाजत होते, ओल्या मोजाच्या आत पावले बधीर झाली होती. IB ला पोहोचेपर्यंत कडाक्याच्या थंडीपावसात साध्या कपड्यानिशी बाईकवर बसून माझे अंग थिजून कसे गेले नाही, हे मला माहित नाही. पण माझी अवस्था बघून IB च्या केअर टेकर ने मला सर्वात आधी चुलीपाशी नेउन बसवले.

IMG_20190305_212117_0.jpg
काहीच वेळात तिथे रहाणारे इतर पाहुणे सुद्धा माझे ध्यान पहाण्यासाठी किचन मध्ये जमा झाले. एकीकडे शेकोटीच्या शेजारी ओल्या अंगाला सुकवत, दुसरीकडे आमच्या गप्पागोष्टी तासभर तरी रंगल्या होत्या. गप्पांचा रोख असा की, हातात फक्त दीड दिवस असताना डोंग ला पोहोचण्यासाठी मी काय काय दिव्य केले? माझ्या गोष्टीच्या असा शेवट ऐकून तिथे जमलेल्या प्रत्येकालाच थोडीशी हुरहूर वाटत होती.

गोष्ट फक्त माझी नव्हती. आयुष्याच्या प्रवासात आपण सारेच एखाद्या उद्दिष्टापायी जवळचे सारे पणाला लावून प्रयत्न करतो. हातातला वेळ निसटून गेला आणि घट्ट धरून ठेवलेल्या मुठीतून साध्यही सुटून गेले अशी वेळ येते तेव्हा पुढच्या वाटचालीत तोंडी लावायला रिकाम्याच मुठीतले अनुभव तेवढे जवळ राहिले असतात.

नशिबाने IB मध्ये एक शेवटची रूम रिकामी होती. गप्पा आटपून तिथून जी उठले ती मऊ मऊ गादीत आणि गरम गरम पांघरुणात अंगाची घुटमळी करून घुसले. ज्या स्वप्नासाठी आटापिटा करत इथवर आले ते मात्र बाहेरच्या पावसात भिजत राहिले.

लोहित आणि बर्ह्म्पुत्रेची उपनदी या दोन नद्यांच्या संगमावर वसले असूनही डोंग पाण्याची तहान भागू शकले नाही, तसे लोकांच्या वस्तीने डोंग च्या पठाराकडे पाठ फिरवली. बेवारशी वाढलेले गवत आणि खुरटी झुडपं यांना डोक्यावर नाचवत प्रतिदिना प्रमाणे आजही डोंग भारत देशातील सूर्याच्या स्वागताला तयार होतेच. पण वातावरण असे चिंब ओले होते की त्या स्वागताचा स्वीकार सूर्याला करताच आला नाही. अगदी निश्चित गृहीत धरलेली घडी अचानक फिरून जाते आणि घटनेला वेगळीच कलाटणी मिळते, त्याच रहस्याची उकल म्हणजे प्रारब्ध की काय?

IMG_20190306_075140.jpg
रात्री मेल्यासारखी झोप लागली. सकाळी उठले, खिडकीचा पडदा सरकवला तर बाहेर इतकं सुंदर दृश्य दिसत होत. मी थोडीशी खिडकी उघडली काय तर एक मांजर टूपकन उडी मारून खोलीत शिरली आणि उबेला माझ्या पांघरुणात घुसू लागली. तिला माझ्या जवळची सारी बिस्कीटे मी खायला घातली तरी काल माझ्या जावयाने मला दिलेल्या दोन गुड डे च्या पुड्यांवर तिची बारीक नजर होती.
IMG_20190306_074310.jpg

तिला कसं सांगू की माझी स्वत:ची भूक भागवायला सुद्धा तो पुडा उघडून त्यातली बिस्किटे खाऊन टाकायला मी तयार झाले नसते. माझ्या खूप तरल अशा ट्रीपच्या शेवटच्या टप्यावरची ती एकच निशाणी माझ्याजवळ होती. ट्रीप संपत आली आहे हि जाणीव झाल्यावर मला अजून एखाद दुसरा दिवस इथेच थांबावे अशी तीव्र ओढ वाटू लागली. एक डोंगचा नाद सोडला तरी इथे पहाण्यासारखे खूप काही आहे.

१९६२ च्या लढाईत सिख, कुमओनी, गुरखा आणि डोंगरा रेजिमेंट ने प्राणाची शर्थ करून सलग बावीस दिवस जिथे लढा दिला त्या नामती हिल्सच्या भूमीवरचे वॉर मेमोरिअल पहायचे. कालपासून हैराण केलय त्या थंडीपावसाच्या नाकावर टिच्चून तिलामला जाऊन हॉट स्प्रिंगज मध्ये डुंबायचे. नाहीतर नितांत सुंदर लोहित नदीच्या काठी एकांतात एखाद्या दगडावर बसून नुसतेच मनन चिंतन करायचे.

पण पत्रात आधी म्हटलय ना, तसा काल रात्रीच माझा परतीचा प्रवास सुरुही झाला होता. जवळपास सात वाजता सामान खांद्यावर टाकून मी निघतच होते की IB च्या केअर टेकर ने हाक देउन मला किचन मध्ये बोलावले आणि आग्रहाने मला पोटभर गरम गरम न्याहारी खाऊ घातली.
IB पासून पायऱ्या उतरत उतरत मी जिथे पोहचले, जीप तिथूनच निघणार होती. परतीसाठी सीट मिळायला मुळीच प्रोब्लेम आला नाही. साडे आठ झाले तरी जीपच्या सीट्स भरेनात आणि जीप निघेना तसा माझा जीव वर खाली होऊ लागला. त्याचे कारण असे की आज मला तेजू मध्ये मुक्काम करून चालणार नव्हते, तर पुढे न्यू तिनसुकिया ला पोहोचून, पुढे गोहातीला जायची काय व्यवस्था करता येईल ते ही शोधायचे होते. आणि मी तेजू ला पाचच्या आधी पोहोचले नाही तर पुन्हा एकदा त्या टप्यावर तशीच अडकून पडणार जशी इथे येताना अडकले होते.

पण प्रवास नेहमीच आपल्या तंत्राने होत नाही. आठ नाही, साडे आठ नाही, नऊ च्या दरम्यान जीप एकदाची निघाली आणि माझ्या लक्षात आले की त्या मांजरी पासून लपवायला मी गुड डे चे पुडे जे गादीखाली लपवून ठेवले होते ते तिथेच राहिले. नाईलाजाने मी जीप उलटी वळवायला सांगितली. वालोंग चे IB एका टेकडीच्या वरती आहे, मी पळत पळतच पायऱ्या चढल्या. पाच मिनिटात खोलीतून अनमोल ठेवा घेउन धापा टाकत मी परत आले.
IMG_20190306_074806.jpg
आता आणखी काही अडचण उद्भवू नये एवढा विचार करतच होते तर ड्रायव्हरच्या लक्षात आले की जीप च्या डोक्यावर बांधून ठेवलेले प्रवाशांचे सारे सामान भिजत आहे. कारण त्यावर टाकलेले प्लास्टिक कधी उडून गेले कळलेच नाही. आमची जीप पुन्हा एकदा उलटी वळली. या प्रकारात सकाळचे दहा वाजून गेले तरी आम्ही वालोंग पासून धड दहा किलोमीटर सुद्धा आलो नव्हतो.

पुढे पन्नास किलोमीटर सरले असतील, वातोंग नुकतेच पार केले होते आणि ड्रायव्हर ने पुन्हा एकदा ब्रेक लावून गाडी उभी केली. तिथे नुकतीच भयंकर दरड कोसळली असावी, कारण रस्त्यावर सर्वत्र मोठमोठ्या आकाराच्या शिळा पडल्या होत्या. गाडीत चार पुरुष आणि तीन बायका आणि दोन मुले होती. सारे गाडीतून उतरलो. पुरुषांनी शक्ती लावून झाली, बायकांनी अक्कल लढवून झाली. पण तो अडथळा हलवणे किंवा पार करणे दोन्ही अशक्य होते. फोनला नेटवर्क सुद्धा नव्हते. तो रस्ता असाही होता की मदतीला बोलवावे तरी कोणाला? अशा धुवाधार पावसात कोण कशाला रस्त्यावर उतरेल? आज तेजू हून निघालेली जीप एवढे एकच वहान इथे संध्याकाळ होईस्तोवर नक्की पोहोचेल, या पलीकडे कुणाचाच भरवसा नव्हता. हे लक्षात आले तसे आजच्या माझ्या पुढच्या प्रवासाबद्दलच्या साऱ्या अपेक्षातून मी मुक्त झाले. तसे करण्यावाचून दुसरे काहीच माझ्या हातात नव्हते.

VID_20190306_122053.jpg
भल्यामोठ्या शिळा जशा सरकवता येईनात तसे एकेकाने त्यांना तोडायचे काम हाती घेतले. पुरुषांची शक्ती पणाला लागली. समोरून एक बाईक आली. आणखी चार हात कामाला लागले. कितीतरी वेळ अशी दगडफोड चालली होती. सहा जणांच्या टीम ने प्रचंड मेहेनत करून अशक्य वाटणारे काम शक्य करून दाखवले. रस्ता मोकळा झाला. आम्ही पुढच्या वाटेला लागलो. डोंग ला येतानाच्या प्रवासात इतका दंगा चालू होता की खिडकी बाहेरचे सौंदर्य बघायला विशेष संधीच मिळाली नव्हती. आता मात्र दंगा फक्त मनात चालू होता. खिडकीला नाक लावून उलटे धावणारे दृश्य मी गपचूप पहात राहिले.

200 किलोमीटर पैकी १७५ किलोमीटर चा प्रवास तर डोंगराच्या पोटातूनच करायचा. बर्फाच्छादित डोंगर मागे टाकून आपण हिरव्या डोंगरराईत शिरतो. पण प्रवासाच्या प्रत्येक टप्यावर लोहित नदी रत्याच्या बाजूबाजूने किंवा रस्त्यावरील ब्रिजच्या खालून वहात आपल्याला एकसारखी सोबत करते. रस्ता मात्र मुळीच एकसारखा नाही. कुठे काळाशार गुळगुळीत रस्ता, दरडी कोसळली तिथे तिथे दगड मातीने खडबडीत केलेला रस्ता, अधेमधे तर चिखलात दबून गेलेला कच्चा रस्ता ... माझा परतीचा रस्ता वळणावळणावर तऱ्हा बदलत होता. घरी परतायच्या विषयावरच्या तऱ्हेतऱ्हेच्या विचारांमुळे माझ्या मनात कोलाहल चालू होता. परवा रात्री नऊचे व्हिमान पकडायला गोहाटी स्टेशन वरून डायरेक्ट गोहाटी एअरपोर्ट कडे निघावे लागणार की काय? पण जिथे बस आणि ट्रेन च्या वेळा किंवा रुट्स माहीतच नाहीत तिथे धड त्याचेही उत्तर मिळेना.

दुपारचे दोन वाजून गेले होता. अंगमेहेनत झाल्यामुळे पुरुषांना खूप भूक लागली असणार. शिवाय जीप मध्ये दोन लहान मुले ही होती. आता जेवायला कमीजास्त कितीही वेळ थांबलो तरी मला फरक पडणार नव्हता कारण माझ्या प्रवासाचे भवितव्य आता जवळ जवळ स्पष्ट झाल्यासारखे होते. माझ्या शेजारी बसून प्रवास करणारया बाईने मला ते बोलूनही दाखवले, “आज शाम छे बजे की लास्ट बस भी आप को नही मिल सकती|”

प्रत्येक अनिश्चीत प्रवास हा अकल्पिताच्या भीतीपोटी करण्या पेक्षा त्याच्यावरच्या विश्वासापोटी करावा. एकदा बळेच का होईना पण आपल्या मनाला तसे वळण लावता आले की वारंवार एका अजब अनुभवाची प्रचीती येते. कुठून काय सूत्र हलतात ते माहित नाही पण ध्यानी मनीही नसताना आपल्या समस्येचे उत्तर अचानक असे काही आपल्या समोर येउन उभे रहाते, की मन थक्क होते. ह्यातली अद्भूतता ज्याने अनुभवली आहे त्याला ‘मी माझा प्रवास आखला’ या शब्दातला फोलपणा सर्वात अचूक माहित असेल. अशा सोलो साहसी प्रवासासाठी नाही तर प्रत्यक्ष आयुष्याच्या वाटचाली साठी सुद्धा ही जाणीव कमावली, तरी तेच या प्रवासातची माझी सर्वात मोठी कमाई आहे, असे मला वाटते.

आमच्या ड्रायव्हरने गाडी कुठेच थांबवली नाही. ज्या रस्त्यावर डोंग ला येताना आम्हाला दहा तास लागले होते तोच रस्ता सहा तासात पार करून सहा वाजायच्या आत त्याने मला तेजू च्या बस स्टॅन्डवर नेउन सोडले. साडे सहा वाजता न्यू तिनसुकिया साठी बस निघणार होती. बसमध्ये बसल्यावर जसे माझ्या फोनला नेटवर्क सापडले तसा लग्गेच मी घरी फोन जोडला.

Many happy returns of the day! May your days are brightened with smiles and your life is lit up with love. आजचा हा खास दिवस उजाडताना डोंगच्या पठारावर सुर्याच्या थेट समोर उभे राहून मला हेच आवाहन करायचे होते, म्हणून सारी धडपड चालली होती. पण वेळ अशी आली की एक फोन जोडून त्या शुभेच्छा व्यक्त करायलाही सारा दिवस वाट पहावी लागली.

NH13 वरून NH15 कडे जाताना बसने लोहित नदीला पार केले तेव्हा मी जागी होते. मी तिला शेवटचे गुडबायही केले. गेला माहिनाभर घरापासून दूर दूर नेणारी वळणावळणांची मी चालते आहे. ती वाट आता मागे पडली. डोळ्यासमोर हमरस्ता आहे. मला माझ्या घराला घेउन चालला आहे. पण हा मार्ग मी निवडलेलाच नाही, तो माझ्या नशिबाचा अनिवार्य भाग फक्त आहे, असे का वाटते आहे? ... कळत नकळत उलट सुलट तुटक जड जड विचार डोक्यात येतच राहिले आणि मधेच थकून कधी झोप लागली मला कळलेच नाही. रात्री नऊ वाजता न्यू तिनसुखिया ला स्टेशन ला पोहीचले. रात्री बारा नंतर इथून ब्रम्हपुत्रा मेल निघणार, ती पकडली की उद्या दुपारी बारा वाजता गोहाटीला पोहोचता येईल.

आता हातात दोन तास आहेत आणि एक नंबर करायची सोय शोधायची एवढे एकच अर्जंट काम आहे. विचार करायची ताकद संपली असावी कारण टोईलेट शोधता शोधता जशी माझी नजर स्टेशनवरच्या एका बायो टोयलेट च्या डिस्प्लेकडे गेली तशी मी त्याचा पाठी जाऊन दरवाजा कुठे दिसतोय का ते शोधून आले. इथे भर स्टेशनवर कसे काय कोणी काचेचे टोयलेट उभे करून ठेवेल, हे इतके सुद्धा मला न कळावे?

IMG_20190306_220332.jpg

मला वाटलं, माझे डोके विचारांच्या वजनाने काम करायचे थांबले असेल. म्हणून आधी तेवढी एक अर्जंट सोय साधल्यावर शांत बसून डोक्यातला एकेक विचार पत्रात उतरवायला सुरवात केली.
आजचा दिवस खूप स्पेशल आहे, तसे आजचे पत्र स्पेशल आहे. कालचे पत्र एका सासू ने लिहिले होते आजचे पत्र एका सासूला लिहिले आहे!

सुप्रिया.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खुप छान लिहिलेय, आवडले.

प्रवास संपत आला की मला खूप निराश वाटायला लागते. खूप जणांना कधी घरी जाऊ असे होते पण माझे उलटे आहे. कालचक्र उलटे फिरवून तोच प्रवास परत करावा असे वाटायला लागते. असो. तुमचा हा लेख वाचतानाही थोडे वाईट वाटले, की आता लेखमालिका संपायला आली.

बहुतेक सगळे लेख वाचले आणि आवडले.
प्रवास संपत आला की मला खूप निराश वाटायला लागते. >> +१. खरंच! प्रवासात लाभणारे नवनवीन रूप, गंधादि अनुभव मागे टाकून रूटीनच्या चक्रात अडकण्याच्या कल्पनेनेच बेचैनी वाढते.

हा भागही छान. पण अठ्ठाविसाव्या दिवशी नेमकं काय घडलं हे वाचण्याची परवानगी वेब-मास्टर देत नसल्याने सुरुवातीला काही कळत नाही.

वेब मास्टर नाही देत कारण चुकून माझे सेटिंग पब्लिक करायचे राहून गेले

सर्वांना धन्यवाद! साधना अगदी खर आहे. माझ्या मनातलं सांगितल. आईला (सासूला) फोन केला तेव्हा तिला सुद्धा हेच सांगितलं होत की तिची आठवण येते आहे पण घरी यावे असे नाही वाटत. त्यावर ती म्हणाली, "हो पण आपण संसारात पडलो आहोत. म्हणून घरी परत यायचं असत." केवढ मोठ सार सांगितलं.