सप्तरंगी कावळा

Submitted by सामो on 14 May, 2020 - 10:00

पुस्तकविश्ववरती फार पूर्वी लिहीलेला एक पुस्तकपरिचय सापडला.
_____________________
सप्तरंगी कावळा

https://images-na.ssl-images-amazon.com/images/I/81AXIEmtIXL.jpg
.
माझी मुलगी ५ वर्षाची चिमुरडी होती तेव्हा एके दिवशी शाळेतून घरी आली आणि मला अधीरतेने म्हणाली "आई, मी ग्रंथालयातून एक पुस्तक आणलं आहे. आपण वाचू यात का? खूप सुंदर चित्रांचं पुस्तक आहे. मला आत्ताच्या आत्ता वाचायचं आहे." तिच्या बालहट्टाला मी आनंदाने रुकार भरत पुस्तक उघडले आणि मनात तुच्छतेने म्हटले - "रेनबो क्रो? म्हणजे सप्तरंगी कावळा? छे कावळा मेला सप्तरंगी कसा असेल? कावळा तो काळा तो काळाच. मेलेले उंदीर अन उकीरडा खाणारा."
पुढे आम्ही पुस्तक वाचू लागलो आणि ही नेटीव्ह अमेरीकन दंतकथा वाचता वाचता आम्ही गुंग होऊन गेलो. एक तर ती नेटीव्ह अमेरीकन कथा त्यात दंतकथा होती यातच तिच्या अद्भुततेचा उगम होता.कावळ्याच्या त्यागाची अतिशय करूण आणि विलक्षण अशी ती कहाणी होती.
फार फार वर्षापूर्वी दोन पायांचा प्राणी अस्तित्वात येण्याआधी , कावळा हा सर्वात सुंदर पक्षी होता. सप्तरंग आणि मधुर आवाजाची देणगी कावळ्याला निसर्गाने मुक्तहस्ते बहाल केली होती. सौंदर्याची तर त्याच्यावर लयलूटच होती. पण एकदा काय झालं खूप हिमवर्षाव होऊन, मऊमऊ आणि चमचमणार्‍या बर्फाने पृथ्वी गोठून गेली. आता या संकटावर मात कशी करायची म्हणून सर्व पशुपक्षांची सभा झाली आणि सर्वानुमते ठरले की कावळा हाच आकाशदेवतेकडे जाण्यास योग्य पक्षी आहे.
मग पुढे पुस्तकात खूप रसभरीत वर्णन, कविता येतात की ३ दिवस - ३ रात्री कावळा बिचारा कसा उडत राहीला आणि शेवटी आकाशदेवतेपर्यंत कसा पोचला. तेथेदेखील गोड आवाजात आळवणी करून त्याने आकाशदेवतेची कशी मनधरणी करून , आगीची भेट पदरात पाडून घेतली. भेट तर मिळाली, पण ही आग काडीवर घेऊन येई येइपर्यंत बिचार्‍याची रंगीत पिसं पार काळी ठिक्कर पडली. धूरामुळे आवाज कर्कश्श होऊन बसला. आणि अशा रीतीने पृथ्वीवरील प्राण्यांना आगीचे वरदान मिळाले पण कावळ्याने सौंदर्य आणि गोडवा कायमचा गमावला.
पण आजही तुम्ही जवळून कावळ्याचे पीस पहाल तर त्यावर सप्तरंग नाचताना दिसतात. होय खरच दिसतात. पक्षी नीरीक्षक हे जाणतात तुम्ही थोडे नीरीक्षण केले तर तुम्हालादेखील अनुभवता येइल.
या त्यागाच्या बदल्यात, आकाशदेवतेने कावळ्याला वर जरुर दिला की मानव हा अन्य पक्ष्यांना मारुन खाइल पण तुला मात्र कधीही खाणार नाही कारण तुझे मांस चवीला, धुरकट लागेल.
ती गोष्ट वाचल्यानंतर मी आणि माझी मुलगी थोडा वेळ शांत झालो, जरा खिन्नच वाटत होतं. ती अद्भुत गोष्ट खूप खूप आवडली होती हे नक्की.बाह्यरूपाने अंतरंगाचा ठाव घेता येत नाही हे पुनश्च अधोरेखीत झाले होते. ते पुस्तक वाचल्यानंतर कावळ्याकडे पहाण्याची माझी दृष्टी पूर्ण १८० अंशातून बदलली होती.
लहान मुलांच्या पुस्तकांचं हे छान असतं, या पुस्तकांमुळे आपली नाळ परत विसरलेल्या साध्या सोप्या संस्कारांशी, मूल्यांशी जोडली जाते.

Group content visibility: 
Use group defaults

खरचं अद्भुत गोष्ट ! अशा गोष्टी आपल्याला सर्व जीवांच्या सद्भावनेशी जोडतात. मुलांना संवेदनशील बनवतात.
**********
ह्या गोष्टीमुळे मला लहानपणी ऐकलेली , मोर आणि कोकिळेची गोष्ट आठलली. मोराचा आवाज व पाय दोन्ही त्याच्या रूपाइतकेच मनमोहक होते म्हणे आणि कोकीळ पक्षाने ते उसणे घेतले ( लग्नाला जायचे असे म्हणून ) आणि कधीच परत केले नाही . मोराचे सुरेख पाय व गोड आवाज
लबाडी करून कायमचा कोकीळेने घेतला. म्हणून ही गोष्ट ऐकल्यानंतर कोकिळेचा खूप दिवस राग यायचा मला Lol !

>>>कोकीळ पक्षाने ते उसणे घेतले ( लग्नाला जायचे असे म्हणून ) आणि कधीच परत केले नाही मोराचे सुरेख पाय व गोड आवाज
लबाडी करून कायमचा कोकीळेने घेतला. कोकिळेचा खूप दिवस राग यायचा मला Lol !>>> कसली गोड गोष्ट आहे. ही नव्हती माहीत मला Happy

सामो लहानपणी अण्णा म्हणजे माझे आजोबा हिच गोष्ट सांगायचे. ती अशी

खूप खूप वर्षापुर्वीची गोष्ट आहे.. त्यावेळी कुठल्याच प्राण्यांना-पक्ष्यांना रंग-आवाज नव्हते.. ते मिळवण्यासाठी कावळ्याला ऍज प्राणी-पक्ष्यांचा वकील (दुत) म्हणुन इंद्रदेवाकडे पाठवतात. आणि हे सार काम एका दिवसात पार पाडल्या जात. पण कामाच्या व्यापात कावळा स्वतःला विसरला. इंद्रदेवांच्या निघायच्यावेळी तो धावपळत पोचला. आणि इंद्रदेवांकडे फक्त काळा रंग उरलेला होता तोच त्याला मिळाला. तो परत जंगलात परतल्यावर सारे प्राणी-पक्षी हसु लागले. तेव्हा कावळा रडत रडत इंद्राकडे परत जातो. त्यावेळी इंद्राने कावळ्याला वरदान दिले. ते असे "मनुष्य इतर प्राणी-पक्ष्यांची शिकार त्यांच्या रंगबेरंगी पंखासाठी अन् मांसासाठी करेल पण तुझी शिकार करणार नाही."

बोध- दूसऱ्यांच्या भल्यासाठी झटत रहा. त्याचे फळ तुम्हाला एक दिवस नक्की मिळेल!
(जशी आठवली तशीच टाईप केलीये.. पण अण्णा सांगताना भारी वाटायच ऐकायला.. गेले ते बालपणींचे दिवस मागे उरल्या फक्त आठवणी..)

>>लहान मुलांच्या पुस्तकांचं हे छान असतं, या पुस्तकांमुळे आपली नाळ परत विसरलेल्या साध्या सोप्या संस्कारांशी, मूल्यांशी जोडली जाते.>> +१

लहान मुलांच्या पुस्तकांचं हे छान असतं, या पुस्तकांमुळे आपली नाळ परत विसरलेल्या साध्या सोप्या संस्कारांशी, मूल्यांशी जोडली जाते.>> ..+१. ....ही गोष्ट माझ्या आईने सांगितल्याचे अंधुक आठवते.
मन्या,तुझीही गोष्ट मस्त आहे.

धन्यवाद देवकी.. Happy
लहानपणी घरात/शाळेत ऐकलेल्या कथांचा संग्रह इथे माबोवर करायला हवा. अस वाटायला लागलंय..

खूप छान गोष्ट ,माझे मुलं गोष्ट सांगितल्या शिवाय झोपत नाहीत आज मी हीच गोष्ट सांगते.
माझी भाची 3-4 वर्षाची असताना बालगीत ऐकत होती त्यात एका बाळाला सगळे चिमणी,मोर .....असे पक्षी प्राणी काही काही देऊन जातात आणि शेवटी कावळा येतो आणि तो सगळं घेऊन जातो..माझी भाची म्हणायची कावळा किती मीन आहे बाळाचं सगळं नेत आहे,आणि तिला खूप वाईट वाटायचं.मग मलाही कावळ्याचा राग यायचा☺️

>>>आज मी हीच गोष्ट सांगते.>>> नक्कीच. माझ्या भाच्यालाच काय पण अनेकसहकार्‍यांच्या, नातलगांच्या लहान मुलांना मी नेहमी हे पुस्तक ख्रिसमस गिफ्ट म्हणुन भेट दिलेल आहे. तुमच्या मुलांना, भाचीला नक्की आवडेल ही गोष्ट.

अजुन एक लहान मुलांना आवडेल अशी आदर्शवादी आणि सुंदर गोष्ट मध्यंतरी वाचनात आली. आपल्या मातीत रुजलेली ही कथा मला विलक्षण काव्यात्मक व गोड वाटली. नवा धागा काढण्याऐवजी, ती माझ्या शब्दात, इथे देते आहे.
--------------
दानशूर , दयाळू व राज्यकारभार निपुण, न्यायी असा एक राजा होता. त्या राजाने त्याच्या इहलोकातील वास्तव्यात इतके पुण्य कमावले की, मृत्युपश्चात तो स्वर्गात गेला. स्वर्गात त्याने नाना विलासोपभोग भोगले जेणेकरुन त्याचे पुण्य क्षीण होत गेले व त्याच्या पाप-पुण्याचा साठा समसमान झाला. चला याचा अर्थ परत मर्त्यलोकात जायची वेळ आली.
पण राजाला काही परत मर्त्यलोकात जायचे नव्हते त्यामुळे त्याने ब्रह्मदेवाकडे प्रार्थना केली की मला स्वर्गातच राहू द्या. मी अतिशय दयाळू, उदार, न्यायी होतो.
ब्रह्मदेव यावर म्हणाला की "हे जर खरे असेल तर तुला नक्कीच कोणी ना कोणी मर्त्यलोकात सापडेल जे तुझी अजुनही आठवण काढत असतील. असा जर कोणी प्राणी भेटला तर तुला स्वर्गात परत स्थान मिळेल"
या वचनाने, राजा खूष झाला व मनात म्हणाला "नक्कीच अनेक जणांना माझे नाव अजुनही स्मरणात असेलच की." व तो तडक पृथ्वीवर गेला. आता शेकडो वर्षे होउन गेलेली होती व पृथ्वीवरील जीवन, रहाणी, आचार-विचार सर्व काही पार बदलून गेलेले होते. व कोणालाच या राजाची स्मॄती राहीलेली नव्हती.
राजा पार निराश व खिन्न होउन एका तळ्याकाठी येउन बसला. थोड्या वेळाने त्या तळ्यातून एक कासव बाहेर आले व राजाला पाहून प्रथम थबकले व नंतर आनंदविभोर झाले. ते राजापाशी जाउन म्हणाले "महाराज आमचे अहोभाग्य आपण आज आमच्या घरी आलात. आपली काय सेवा करु, कसे आभार मानू मला काही कळेनासे झाले आहे."
यावर राजा आश्चर्यचकित होउन विचारता झाला "तू मला ओळखतोस?"
यावर त्या कासवाने राजाला सांगीतले "अर्थात महाराज! मी माझे पूर्वज, वंशज सारेजण आपले गुणगान गातात. आपण फार पूर्वी, ज्या गायी दान केल्या होत्या, त्या गायींच्या खुरांनी जो खड्डा पडला त्यात पावसाचे पाणी साठून तर हे आजचे तळे निर्माण झाले, ज्यात आमच्या पीढ्यानु पिढ्या जगत आहेत. आपले आभार कसे मानावे हेच आम्हाला कळत नाही."
हे ऐकताक्षणी राजा अदृष्य झाला व परत स्वर्गात गेला.

असे असते दानाचे महत्व.

Mast....