लाॅकडाऊन ( 'एका बाईची' रडकथा)

Submitted by वेलांटी on 14 May, 2020 - 09:24

तिचं नेहमीचं रूटीन नेहमीप्रमाणे सुरू होतं. मुलं, शाळा, नवर्याचा डबा , सकाळची घाईगडबड आणि संध्याकाळची पळापळ वगैरे. एक दिवस लाॅकडाऊन लागलं. तिला वाटलं बरं झालं. आता काही दिवस निवांत जातील. निदान फार गडबड उडणार नाही रोजच्यासारखी. करताकरता दोनचार दिवस गेले, अन लक्षात आलं, अरेच्चा ! एरव्ही सुटीच्या दिवशी जशी आपली धांदल उडायची तशी आता रोजच उडतेय. कामाला हाताशी कुणी नाही आणि त्यात सगळेच घरी. मग काय चहा ,नाष्टा, जेवण मग संध्याकाळी पुन्हा चहा-नाष्टा,रात्रीचे जेवण, झाडलोट वगैरे मधे आख्खा दिवस सरायला लागला. कसलीच उसंत मिळेना. पण सगळेच घरी एकत्र आहेत, अजून काय हवंय अशी तिने मनाची समजूत घातली. दहाबारा दिवसांत नवरामुले कंटाळली. मग त्यावर उपायही शोधले गेले. मोबाईल, टिव्ही ,गेम, मुव्ही वगैरे. मुले क्राफ्ट करण्यात, चित्रे काढण्यात हरवून गेली. संध्याकाळी टिव्ही वगैरे होताच. नवरा दिवसभर एकतर मोबाईलमधे डोकं घालून असायचा नाहीतर मित्रांशी फोनवर खिदळत असायचा. उरलेल्या वेळात घरातच बैठे खेळ वगैरे टाईमपास चालायचा.
जवळपास महिना झाला. दरम्यानच्या काळात लाॅकडाऊनमधे वेळ कसा घालवायचा, ते मानसिक संतुलन कसे सांभाळायचे यावर टिव्हीवर चर्चा झडू लागल्या. वेगवेगळे मन रमवण्याचे उपाय लोक सांगू लागले. मोबाईलवर विविध पदार्थांचे फोटो येऊ लागले. नवरा तिला ते फोटो दाखवू लागला. बायका आपापले साडीतले, सजलेले फोटो फेसबुकवर टाकू लागल्या. कुणी काही शोभेच्या वस्तू बनवू लागल्या. खूप दिवसांनी मिळालेला वेळ लोक कारणी लावत होते. आपले छंद जोपासत होते. नोकरी करणार्या बायका तर जाम खूश होत्या ईतकी सुट्टी मिळाल्याने. तिलासुद्धा हुरूप आला. पण प्रयत्न करूनही तिला वेगळे काही मनासारखे करणे जमेचना. दिवस कसा जायचा तेच कळायचे नाही. ती खट्टू व्हायची, मग स्वतःला समजवायची,आपला वेळ तर जातोयना कामात मग बास!
बरेच दिवस झाले. लोक खूपच कंटाळले आता. लाॅकडाऊन आता लवकर उठावे अशा चर्चा सर्वत्र सुरू झाल्या. लाॅकडाऊन उठल्यावर कायकाय करायचे याचे प्लॅनिंग सर्वजण करू लागले. नवरामुले वैताग व्यक्त करू लागली. सर्वांचा कोंडमारा होऊ लागला. चिडचिड सुरू झाली. ही मात्र अलिप्तच. आपल्याच कामाच्या रगाड्यात हरवलेली. कशाशी घेणेदेणे नसल्यासारखी.
एक दिवस नवरा अगदी वैतागला. त्याचा जीव कशातच रमेना. ती सहज म्हणाली, 'अहो इतके का वैतागताय? संपेल लाॅकडाऊन. उलट घरी रहायला, आराम करायला मिळतोय तुम्हाला.' नवरा फटकारल्यासारखा बोलला, 'तू जा! तुला काय कळतंय? तू कायम घरीच असतेस. ' भयंकर अपमानित वाटले तिला. तीच्या लक्षात आले, इतके दिवस तिला लाॅकडाऊनचा कंटाळा का येत नव्हता? लग्न झाल्यादिवसापासून ती एका अदृश्य लाॅकडाऊनमधेच होती. गेली दहाबारा वर्षे तिने 'घरातच' काढली होती. स्वतंत्रपणे, स्वतःच्या मर्जीने हवे तेव्हा, हवे तिथे कधीच जाऊ शकली नव्हती. एकही मोठा निर्णय अगदी स्वतःबाबतही कधीच घेतला नव्हता. हवे ते, हवे तेव्हा खाऊ, पिऊ, लेवू शकली नव्हती. नवर्याच्या जगाला तिने आपले मानले होते. लग्न झाले अन पूर्वीचे जग, मैत्रिणी सर्वकाही जणू विसरून गेली होती. नावाला घराची मालकीण पण तिची ताबेदारी कायम इतर कुणाकडेतरी राहिली होती. पिंजर्यातल्या पोपटाप्रमाणे पिंजर्यालाच जग समजू लागली होती.
वरकरणी ती गप्प बसली. पण आता ती विचार करू लागली, आपल्यासारख्या कितीतरी जणी असतील की लग्नानंतर त्यांच्या आयुष्यालाच टाळेबंदी लागत असेल. पण ईतर कुणी येऊन हे टाळे उघडणार नाही. आपल्यालाच हातपाय हलवावे लागतील. काहीतरी घरबसल्या का होईना पण छोटासा व्यवसाय सुरू केला पाहिजे. चार का होईना पण पैसे मिळवायला पाहिजेत. त्यातून थोडा का होईना स्वतःच्या छंदासाठी, आवडीनिवडीसाठी खर्च केला पाहिजे. थोडेफार का होईना, पण कुणाला न विचारता, स्वतःच्या मनाप्रमाणे जगले पाहिजे. तिने फेसबुक ओपन केले अन जुन्या मैत्रिणींच्या नावे सर्च करू लागली. आणि मनातल्या मनात आता तीही लाॅकडाऊन संपायची वाट पाहू लागली. आता तिलाही कंटाळा येऊ लागला होता.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

< खरेतर कितीही चांगल्या प्रकारे घर,मुले , संसार सांभाळला तरी त्याची कदर केली जात नाही>

ही सगळी फक्त स्त्रीची जबाबदारी आहे हे समीकरण मोडणे हा त्यावरचा उपाय आहे. गृहिणीपदाचे ग्लोरिफिकेशन करणे हा नव्हे.

ग्लोरीफिकेशन हा विषयच नाही. वास्तविक जीवनात अशा स्त्रियांची 'घरी बसलेली' असे म्हणून हेटाळणीच केली जाते. आता त्या पैसे कमवत नसल्या तरी घरासाठी राबतच असतात. घरी बसलेली असा उल्ल्लेख केला जात असला तरी अगदी काही एका जागी बसून खात नाहीत. त्यांना निदान आत्मसन्मानाने जगता यावे, इतर कुटुंबियांप्रमाणेच वागणूक दिली जावी ही अपेक्षादेखील पूर्ण होत नाही. मग त्या नाईलाजाने आपल्या घरी बसण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करू लागतात, जो निर्णय आधी त्यांनी पूर्ण विश्वासाने घेतलेला असतो.

तो आधीचा निर्णय घेतानाच स्पाउस आणि घरच्यांना स्पष्ट करायचं. मी तुमच्यासाठी घरी बसतेय. तेव्हा स्वतः करणार असलेल्या कामाची पैशात किंमत काढायची. आता ते काम अनमोल असतं, पैशात मोजता येत नाही , वगैरे पुस्तकी भाषा नको. कारण इतर अनेक स्त्रिया ते काम नोकरी, उद्योग करून मॅनेज करतात.

कथेतल्या नायिकेने नवर्‍याला सांगावं - तुला बसुन राहुन कंटाळा आला तर घरकाम कर. मी आराम करते. जर ते काम खरंच ग्रेट असेल तर नवर्‍याला तिच्या कामाची किंमत कळेल. आणि तो तिला नुसती बसून असतेस असं म्हणणार नाही.

नाईलाजाने घरी बसण्या च्या निर्णयाचा पुनर्विचार - म्हणजे घरी बसण्याचा निर्णय स्वखुषीने, आवडतो म्हणून घेतला होता का? मग तक्रार कशाला?

जेव्हा घरी बसण्याचा निर्णय घेतला जातो तेव्हा बर्याचदा घरची मंडळी आनंदाने संमती देतात. कारण लहान मुलांची, घराची सर्व जबाबदारी आता गृहिणीवर येणार असते. घरच्या कामातून, कटकटीपासून त्यांची सुटका होते. पण जसजशी मुले मोठी होत शाळेत जाऊ लागतात, इतके दिवस घरकामात बुडालेल्या गृहिणीला थोडी मोकळीक किंवा उसंत मिळू लागते की लगेच तीला 'घरी बसून काय काम असते? घरीच तर असते' असे हिणवले जाते. तिला देण्यात येणारी वागणूक बदलते. आता ही गोष्ट काय कुणी आधी सांगून ,ठरवून करत नाहीत. तिला असे अनुभव जवळच्या व्यक्तींकडूनच यायला लागले की तिला प्रश्न पडतो, 'मग आपण तरी आपल्या मनाप्रमाणे केव्हा जगायचे?'मग ती निर्णयाचा पुनर्विचार करू लागते.

तो आधीचा निर्णय घेतानाच स्पाउस आणि घरच्यांना स्पष्ट करायचं. मी तुमच्यासाठी घरी बसतेय. तेव्हा स्वतः करणार असलेल्या कामाची पैशात किंमत काढायची. आता ते काम अनमोल असतं, पैशात मोजता येत नाही , वगैरे पुस्तकी भाषा नको. कारण इतर अनेक स्त्रिया ते काम नोकरी, उद्योग करून मॅनेज करतात.

कथेतल्या नायिकेने नवर्‍याला सांगावं - तुला बसुन राहुन कंटाळा आला तर घरकाम कर. मी आराम करते. जर ते काम खरंच ग्रेट असेल तर नवर्‍याला तिच्या कामाची किंमत कळेल. आणि तो तिला नुसती बसून असतेस असं म्हणणार नाही.

>>>>>>>

असे नाही होत. कितीही स्पष्ट सुनावले तरी कोणाला काहीही फरक पडत नाही. आणि गृहिणी फक्त नवरा असेल तर करेल खरंच आराम पण मुले असतील तर ती त्यांना उपाशी थोडीच ठेवणार आहे.. कितीतरी वेळा मी स्वतः अतिशय आजारी असताना खास मुलांसाठी उसने अवसान आणून परत कामाला लागले आहे. घरात बाकीचे नव्हते का हा प्रश्न इथे नको. मुले मोठी झाली की हा प्रश्न नाही येत. त्यांचं ते मॅनेज करू शकतात.

नाईलाजाने घरी बसण्या च्या निर्णयाचा पुनर्विचार - म्हणजे घरी बसण्याचा निर्णय स्वखुषीने, आवडतो म्हणून घेतला होता का? मग तक्रार कशाला? >>>

हा निर्णय मुळात नाईलाजाने पण स्वखुशीने घेतला आहे अशी स्वतः ची समजूत करून घेतलेली असते. आणि बऱ्याच वेळा तशी खरंच गरजही असते.

पण सुरुवातीपासूनच काहीच महत्त्वाकांक्षा नाही अशा स्त्रिया एवढा विचार नाही करत. अशाही बऱ्याच जणी पाहण्यात आहेत.

हा माझा शेवटचा प्रतिसाद. इतकंही स्पष्ट बोलायची हिंमत नसेल आणि अपमानास्पद वाटणारी बोलणी गप्प राहून ऐकायची तयारी असेल तर आजारी पडण्याचं नाटक करावं. पण तुम्ही तुमच्या पुढच्या प्रतिसादात त्यानेही फरक पडणार नाही अशी गाठ मारून ठेवलेली दिसते.
आता एकच करा. तुमच्या आधीच्या पिढीने जे संस्कार तुमच्यावर केले ते तुम्ही पुढच्या पिढीवर करू नका. तीही धमक असेल का याबद्दल शंका आहे.
जाउ दे.

भरत, तुम्ही फारच वेगळा अर्थ काढला बहुतेक. मी माझ्या बद्दल जे बोलले ते माझी मुले अगदी लहान होती तेव्हाचं. इथे स्पष्ट बोलायला येते तर घरात कोण अपमानास्पद बोलणे ऐकून घेणार आहे. मी जे सांगते आहे ते आजूबाजूच्या स्त्रियांचं पण निरीक्षण करून सांगतीये. तुम्ही सांगताय ते सॉल्युशन आणि मी सांगतिये ते तिथपर्यंत पोचण्यात येणाऱ्या अडचणी. तुम्ही चुकीचं सांगताय असे माझे अजिबात म्हणणे नाही.

हं.... अनेक स्त्रियांचे प्राॅब्लेम जवळपास सारखे असले तरी त्यावरचे सोल्युशन घराघरातील परिस्थितीप्रमाणे वेगवेगळे असते. प्रत्येकीने आपल्यापुरते सोल्युशन शोधून, तिथपर्यंत पोहोचण्यासाठी करावी लागणारी अडथळ्यांची शर्यत पूर्ण करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करावा.
सर्व वाचकांचे आभार!

एकट्या गृहिणी ची जबाबदारी नाहीय की तिने अख्ख्या कुटुंबाला व्यस्त आणि आनंदी ठेवणे..सर्वांनी याचा विचार करायला हवा. स्वतः गृहिणी नी हे सर्व आपल्याच डोक्यावर घेणे गरजेचे नसते. गृहिणीं ची ही गोष्ट चुकते कधीतरी. आपला मान आपल्याच हातात असतो.

छान आहे मांडणी. आपल्याला नवरा-घर यापलिकडे विश्व हे हवेच १००% हवे. नाहीतर मग नवरा बायको तरी काय गप्पा मारणार? साचलेपण येणारच ना.

अहो ताई हा विषय चावून चोथा झाला आहे. आता ताज्या दमाच्या स्त्रिया मुलींनी लग्नाची गरज आहे का? प्रत्येकीला मूल व्हायलाच हवे का? आमच्या कडे ओस्साच तस्संच लागत वगैरे नखरे सहन करायची खरंच गरज आहे का? हा विचार करूनही जुना झाला आहे. प्रत्येक व्यक्तीने आर्थिक बाबीत स्वतं त्र असले पाहिजे व घरकामही प्र्त्येकाने आपापले करावे. भूक लागल्या स बनवावे किंवा ऑर्डर करावे .

फेकून द्या ही पुरू ष प्रधान व्यवस्थेची जोखडे व घ्या एक नवा ताजा स्वतंत्र श्वास. असे माझे कथेतील स्त्रीला सांगणे आहे. लिव्ह युअर ओन लाइफ.

प्रत्येकीने आपल्यापुरते सोल्युशन शोधून, तिथपर्यंत पोहोचण्यासाठी करावी लागणारी अडथळ्यांची शर्यत पूर्ण करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करावा.
>>> कथेतील नायिकेचा पुढचा प्रवास पण लवकर येऊ द्या. काय अडथळे आले, कोणी सहकार्य केले अगदी सगळे वर्णन करा..

धन्यवाद संध्या, अमा, नौटंकी.
@सामो, धन्यवाद. तुम्ही प्रतिसादामध्ये जे सांगितले, नेमका तोच अर्थ या कथेतून मला अभिप्रेत आहे.
बाकी नोकरी करणार्या बायकांचेदेखील असेच काही प्रश्न असतात ज्यामुळे त्याही असलेली नोकरी सोडायचा विचार करतात. अशा बायकांचेदेखील प्रमाण लक्षणीय आहे. तूर्त या कथेत फक्त हाऊसवाईफ असणार्या बायकांचा प्रश्न मांडला आहे.

Pages