लाॅकडाऊन ( 'एका बाईची' रडकथा)

Submitted by वेलांटी on 14 May, 2020 - 09:24

तिचं नेहमीचं रूटीन नेहमीप्रमाणे सुरू होतं. मुलं, शाळा, नवर्याचा डबा , सकाळची घाईगडबड आणि संध्याकाळची पळापळ वगैरे. एक दिवस लाॅकडाऊन लागलं. तिला वाटलं बरं झालं. आता काही दिवस निवांत जातील. निदान फार गडबड उडणार नाही रोजच्यासारखी. करताकरता दोनचार दिवस गेले, अन लक्षात आलं, अरेच्चा ! एरव्ही सुटीच्या दिवशी जशी आपली धांदल उडायची तशी आता रोजच उडतेय. कामाला हाताशी कुणी नाही आणि त्यात सगळेच घरी. मग काय चहा ,नाष्टा, जेवण मग संध्याकाळी पुन्हा चहा-नाष्टा,रात्रीचे जेवण, झाडलोट वगैरे मधे आख्खा दिवस सरायला लागला. कसलीच उसंत मिळेना. पण सगळेच घरी एकत्र आहेत, अजून काय हवंय अशी तिने मनाची समजूत घातली. दहाबारा दिवसांत नवरामुले कंटाळली. मग त्यावर उपायही शोधले गेले. मोबाईल, टिव्ही ,गेम, मुव्ही वगैरे. मुले क्राफ्ट करण्यात, चित्रे काढण्यात हरवून गेली. संध्याकाळी टिव्ही वगैरे होताच. नवरा दिवसभर एकतर मोबाईलमधे डोकं घालून असायचा नाहीतर मित्रांशी फोनवर खिदळत असायचा. उरलेल्या वेळात घरातच बैठे खेळ वगैरे टाईमपास चालायचा.
जवळपास महिना झाला. दरम्यानच्या काळात लाॅकडाऊनमधे वेळ कसा घालवायचा, ते मानसिक संतुलन कसे सांभाळायचे यावर टिव्हीवर चर्चा झडू लागल्या. वेगवेगळे मन रमवण्याचे उपाय लोक सांगू लागले. मोबाईलवर विविध पदार्थांचे फोटो येऊ लागले. नवरा तिला ते फोटो दाखवू लागला. बायका आपापले साडीतले, सजलेले फोटो फेसबुकवर टाकू लागल्या. कुणी काही शोभेच्या वस्तू बनवू लागल्या. खूप दिवसांनी मिळालेला वेळ लोक कारणी लावत होते. आपले छंद जोपासत होते. नोकरी करणार्या बायका तर जाम खूश होत्या ईतकी सुट्टी मिळाल्याने. तिलासुद्धा हुरूप आला. पण प्रयत्न करूनही तिला वेगळे काही मनासारखे करणे जमेचना. दिवस कसा जायचा तेच कळायचे नाही. ती खट्टू व्हायची, मग स्वतःला समजवायची,आपला वेळ तर जातोयना कामात मग बास!
बरेच दिवस झाले. लोक खूपच कंटाळले आता. लाॅकडाऊन आता लवकर उठावे अशा चर्चा सर्वत्र सुरू झाल्या. लाॅकडाऊन उठल्यावर कायकाय करायचे याचे प्लॅनिंग सर्वजण करू लागले. नवरामुले वैताग व्यक्त करू लागली. सर्वांचा कोंडमारा होऊ लागला. चिडचिड सुरू झाली. ही मात्र अलिप्तच. आपल्याच कामाच्या रगाड्यात हरवलेली. कशाशी घेणेदेणे नसल्यासारखी.
एक दिवस नवरा अगदी वैतागला. त्याचा जीव कशातच रमेना. ती सहज म्हणाली, 'अहो इतके का वैतागताय? संपेल लाॅकडाऊन. उलट घरी रहायला, आराम करायला मिळतोय तुम्हाला.' नवरा फटकारल्यासारखा बोलला, 'तू जा! तुला काय कळतंय? तू कायम घरीच असतेस. ' भयंकर अपमानित वाटले तिला. तीच्या लक्षात आले, इतके दिवस तिला लाॅकडाऊनचा कंटाळा का येत नव्हता? लग्न झाल्यादिवसापासून ती एका अदृश्य लाॅकडाऊनमधेच होती. गेली दहाबारा वर्षे तिने 'घरातच' काढली होती. स्वतंत्रपणे, स्वतःच्या मर्जीने हवे तेव्हा, हवे तिथे कधीच जाऊ शकली नव्हती. एकही मोठा निर्णय अगदी स्वतःबाबतही कधीच घेतला नव्हता. हवे ते, हवे तेव्हा खाऊ, पिऊ, लेवू शकली नव्हती. नवर्याच्या जगाला तिने आपले मानले होते. लग्न झाले अन पूर्वीचे जग, मैत्रिणी सर्वकाही जणू विसरून गेली होती. नावाला घराची मालकीण पण तिची ताबेदारी कायम इतर कुणाकडेतरी राहिली होती. पिंजर्यातल्या पोपटाप्रमाणे पिंजर्यालाच जग समजू लागली होती.
वरकरणी ती गप्प बसली. पण आता ती विचार करू लागली, आपल्यासारख्या कितीतरी जणी असतील की लग्नानंतर त्यांच्या आयुष्यालाच टाळेबंदी लागत असेल. पण ईतर कुणी येऊन हे टाळे उघडणार नाही. आपल्यालाच हातपाय हलवावे लागतील. काहीतरी घरबसल्या का होईना पण छोटासा व्यवसाय सुरू केला पाहिजे. चार का होईना पण पैसे मिळवायला पाहिजेत. त्यातून थोडा का होईना स्वतःच्या छंदासाठी, आवडीनिवडीसाठी खर्च केला पाहिजे. थोडेफार का होईना, पण कुणाला न विचारता, स्वतःच्या मनाप्रमाणे जगले पाहिजे. तिने फेसबुक ओपन केले अन जुन्या मैत्रिणींच्या नावे सर्च करू लागली. आणि मनातल्या मनात आता तीही लाॅकडाऊन संपायची वाट पाहू लागली. आता तिलाही कंटाळा येऊ लागला होता.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद च्रप्स, पियू, देवकी.
गृहिणीला सतत गृहित धरले जाते. तू आता घराची मालकीण आहेस असे सांगून हव्या त्या साच्यात बसवले जाते हे खरंय.

वस्तुस्थिती लिहिली आहे खरी पण स्त्री अजून किती दिवस रडत बसणार.. तिने स्वतः या सगळ्यातून बाहेर पडले पाहिजे... तिचे हातपाय तर कोणी बांधून ठेवले नाहीत ना.. कोण अडवतयं घराबाहेर पडायला.. तिला गृहीत धरले जाते कारण तिच्या विचारांमध्ये, बोलण्यामध्ये ठामपणा नसतो.. सुरवातीला ती एकटी तडजोड करत जाते आणि मग सगळ्यांना त्याची सवय लागते... मी तर म्हणेन हा lockdown चा काळ अतिशय उत्तम आहे, सगळ्या घरादाराच्या सवयी बदलायला.. सगळ्यांना जाणीव करून द्यायला.. सगळेच असे नाहीत, कितीतरी जण उत्साहाने घरात मदत करताहेत.. गृहिणीला appreciate करताहेत.. पण आपणच आपली काळजी घ्यायची असते हेच खरं.

धन्यवाद नौटंकी, साधना.
हा लाॅकडाऊनचा काळ फक्त घरातील मंडळींच्याच सवयी बदलण्यासाठी नाही तर स्वतःही अंतर्मुख होऊन आपल्या काही सवयी, विचार बदलण्यासाठी आणि लाॅकडाऊननंतरच्या योजना करण्यासाठी अतिशय उपयोगी आहे.

अरे त्यात काय? खायला प्यायला ल्यायला मिळ्तंय ना तिला? मग त्याबदल्यात घरची कामं करतेय त्यात काय मोठं?
आणि असेलच नेहमीच घरी. तर तेच नवरा बोलतोय ना? मग राग येण्यासारखं काये त्यात?

स्वतःही अंतर्मुख होऊन आपल्या काही सवयी, विचार बदलण्यासाठी आणि लाॅकडाऊननंतरच्या योजना करण्यासाठी अतिशय उपयोगी आहे. >>>

वेलांटी, बरोबरच आहे तुमचं. प्रत्येकाने अंतर्मुख व्हायलाच पाहिजे कारण इतका रिकामा वेळ आपल्याला परत आयुष्यात कधीही मिळणार नाही. किमान मी तरी स्वतः मध्ये असे बदल घडवले जे मला उभ्या आयुष्यात कधीही जमले नव्हते.

पण तुमच्या कथेचा मूळ गाभा स्त्रीला सतत गृहीत धरणे, तिने स्वतःला चूल आणि मूल यामध्ये अडकवून घेणे याबद्दल आहे म्हणून मी त्या अनुषंगाने प्रतिसाद दिला.

, 'तू जा! तुला काय कळतंय? तू कायम घरीच असतेस. ' भयंकर अपमानित वाटले तिला

>>>>>

ज्यांना थप्पड चित्रपट कळला नाही वा थपडेचीच चर्चा करत राहिले त्यांनी हि कथा जरूर वाचावी.
हे वरचे वाक्य तीच तशीच एक थप्पड होती.

कथा आवडलीच.

धन्यवाद सस्मित, नौटंकी.
सस्मित तुम्ही जे सांगितलेत तेच तिच्या नवर्याने एका वाक्यात तिला ऐकवले आहे. यात तिच्या नवर्याचाही पुर्ण दोष नाही. तिच्या आजच्या अवस्थेला तीसुद्धा काहीअंशी जबाबदार आहे. हे लक्षात आल्याने तिनेसुद्धा आता आत्मविश्वासाने काही पावले उचलायचा आणि पूर्वीच्या चुका टाळायचा निर्णय घेतला आहे.
यामुळेच शिर्षक 'रडकथा' दिले आहे. ऐकणार्यालाही असली रडकथा कंटाळवाणीच वाटते पण वेळीच सुधारणा केली नाही तर संपूर्ण आयुष्य रडकथा बनून राहते.

मी तर म्हणेन, उलट नवऱ्याने तिला ऐकवले ते बरे झाले. किमान तिला राग येऊन ती स्वतःसाठी जगेल तरी.. अन्यथा सगळे कळत असूनही स्वतःचा कोंडमारा करण्यात आयुष्य जाते आणि नंतर वेळ निघून गेल्यावर प्रचंड मनस्ताप होतो.

अवांतर - अशा सर्व गृहिणींनी एकत्र येऊन काहीतरी करणे उत्तम असते.. घरून सपोर्ट नाही मिळाला तरी एकमेकींच्या सहकार्याने निश्चितच आयुष्य सुधारता येते.

अशा परिस्थितीत एक ठाम निर्णय घेणे अतिशय महत्वाचे असते. तो टर्निंग पाॅइंट असतो. एकदा निर्णय झाला की, त्या अदृश्य बेड्या कितीका मजबूत असेनात, गळून पडायला वेळ लागत नाही.

अजून किती काळ, शिकलेल्या तरीही लॉकडाउनमध्ये जन्म काढणाऱ्या बायकांच्या कहाण्या येणार?
नवीन Submitted by भरत. on 15 May, 2020 - 14:54

>>>>>>

बाई शिकली की ती अचानक सुपरवूमन होते हा एक गैर्समज आहे. निव्वळ शिक्ष्णाने समानता येत नाही. अजूनही बरेच गोष्टी आहेत.

सुपरवुमन नको होऊ दे.
पण शिक्षण मिळून इतकाही विचार करता येत नसेल तर शिक्षण वायाच गेलं.

लहान मुलांना कोण बघणार हाच बऱ्याच वेळा मोठा प्रश्न असतो. आणि घरात आजी आजोबा असले तरी प्रत्येक कुटुंबात त्यांच्याकडून सहकार्य मिळेलच असे नाही.

सुपरवूमन हा शब्द मी फक्त मुद्दा चटकन स्पष्ट करायला वापरला.
शिक्षण काहीच करत नाही असे म्हणत नाही. ते नक्कीच एक लढायचे साधन आहे.. पण मुलगी शिकली आत्मनिर्भर झाली ईतकेच नसते असे म्हणायचे आहे.

ज्यांना थप्पड चित्रपट कळला नाही वा थपडेचीच चर्चा करत राहिले त्यांनी हि कथा जरूर वाचावी.
हे वरचे वाक्य तीच तशीच एक थप्पड होती.
कथा आवडलीच.>>+१

पण शिक्षण मिळून इतकाही विचार करता येत नसेल तर शिक्षण वायाच गेलं>>>

भारतात असे किती शिक्षण वाया जाते, स्त्री/पुरुष दोघांचेही याचा आढावा घेतला तर वाया जाण्याचे प्रमाण अतिशय जास्त आढळेल. आपल्या आजूबाजूला समोरच्या सीटवर पाय ठेवणारे, खिडकीतून थुंकणारे, कुठल्याही वस्तूचे कव्हर काढले की ते तिथेच फेकून देणारे, नळाचे पाणी घेऊन नळ बंद करायला विसरणारे किंवा तिथला ग्लास चुकून सोबत घेऊन जाणारे, मतदान न करणारे, सिविक सेन्स न पाळणारे, कुठलेही नियम न पाळणारे, नियम फक्त इतरांसाठीच असतात यावर दृढ विश्वास असणारे वगैरे वगैरे भरपूर शिक्षित अडाणी आपल्याला भेटतात. त्यांचे सर्व शिक्षण फुकटच गेले ना? अनुभव असा असतो की माणूस जितका जास्त शिकलेला, इंग्रजी फाडफाड बोलू शकणारा, तितका अडाणीपणाही जास्त. अवांतर खूप झाले, क्षमस्व.

मोराल ऑफ द स्टोरी : भारतात शिक्षण हे चांगली नोकरी, छोकरी/छोकरा मिळवण्यासाठी आहे. शिक्षणाचा शिक्षितावर काही परिणाम झालाच तर तो दैवयोग समजावा. अन्यथा असे काही होणे अपेक्षित नसते.

माझ्या मुलाला मीच सांभाळणार हा अट्टाहास, चोवीस तास मुलाच्या दिमतीला राहून, अति लाड करून मुलाला माजवून ठेवणे आणि वरून मी करिअरचा किती त्याग केला असा ढोल बडवणाऱ्या बाईचे उदाहरण माझ्या घरात आहे. अशा गोष्टी वाचल्या की मला सचिन कुंडलकरचा गृहिणीवरचा वादग्रस्त लेख आठवतो... मी होते म्हणून सगळं निभावलं.

मुलाला स्वतः सांभाळायचा निर्णय घेणे आणि त्यासाठी करिअरवर पाणी सोडणे हेदेखील चुकीचे नाही. एखादी आई मुलांच्या चांगल्या संगोपनासाठी असा निर्णय सहज घेऊ शकते. मात्र प्रश्न हा आहे, की नंतर त्यांना पश्चाताप का होतो किंवा पुन्हा काम किंवा नोकरी का करावीशी वाटते. त्यांनी मुलांचे संगोपन निश्चितच शक्य तितके चांगले केलेले असते. मात्र खरी गोष्ट ही की, नोकरी करणार्या बायका व त्यांना घरीदारी मिळणारी वागणूक, स्वातंत्र्य (सामाजिक, आर्थिक), त्याचा आत्मसन्मान वगैरे बाबी आणि या घरी बसलेल्या बायकांना मिळणारी वागणूक, त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन यात जमीनअस्मानाचे अंतर असते, हे सत्य आहे. प्रत्येक बाबतीत गृहित धरणे, कुचंबणा होणे, मनासारखे वागता-जगता न येणे अशा गोष्टी बाहेर कुठे बोलता येत नाहीत पण सहन कराव्या लागतात. कारण वरकरणी पाहता या बायकांना 'काहीच कमी' नसते. तोंड दाबून बुक्क्यांचा मार असह्य झाला की त्यांना पश्चाताप होतो अन त्या नोकरीधंदा करायचा विचार करतात. खरेतर कितीही चांगल्या प्रकारे घर,मुले , संसार सांभाळला तरी त्याची कदर केली जात नाही. (ईंग्लिश-विंग्लिश मधील श्रीदेवी म्हणतेना, 'मुझे प्यारकी जरूरत नही है, जरूरत है बस थोडीसी ईज्जतकी') अगदी तसेच आहे हे.

अजून किती काळ, शिकलेल्या तरीही लॉकडाउनमध्ये जन्म काढणाऱ्या बायकांच्या कहाण्या येणार? >>>> भरत यांच्या या आणि या धाग्यावरील बाकी प्रतिसदांशी सहमत. स्वतःलाच आत्मसन्मान नसेल, आपणच घरादाराला गृहीत धरून देत असू तर ते स्वतःचं चॉईस आहे. त्यासाठी कुढायच कारण नाही. आणि नसेल पटत तर त्यासाठी का बरं आधीच प्रयत्न केले नाहीत? अपमान होऊन किंवा 'थप्पड' बसून जाग येण्याचा क्षण येइपर्यंत परिस्थिती का येऊन द्यावी?

Pages

नवीन प्रतिसाद लिहा