पुणेरी पाट्यांचं ‘अजूनेक’ वादळ !

Submitted by Charudutt Ramti... on 12 May, 2020 - 08:02

आज एक पोस्ट पहिली, कुणीतरी चेन्नई मध्ये वाईन शॉप च्या रांगेत उभे राहण्याकरिता, एक रोबो पाठवला अशी.

असेच रोबो जर पुण्यात आणि विशेषतः आधीच करोनाचा उत्पात झालेल्या पेठांमधील लोक वापरू लागले तर काय तऱ्हेच्या पुणेरी पाट्या (आणि दिवस ) पहायला मिळतील ह्या विषयीचा एक संक्षिप्त आढावा...

१. एका 'रोबो'स फक्त अर्धा किलोच बाकरवडी मिळेल. एक किलो हवी असल्यास त्याला परत दुसऱ्यांदा रांगेत उभे राहण्यास शिकवणे.

२. रोबोच्या हातात कापडी पिशवी अडवून मगच त्याला घरून पाठवणे. कापडी पिशवी नसेल तर तुमच्या 'रोबो'ला आंबा वडी मिळणार नाही याची कृपया नोंद घ्यावी. तसेच तुमच्या रोबोला आंबा ‘वडी’ आणि आंबा ‘बर्फी’ ह्यातील फरक स्पष्ट करून मगच आमच्या इथे पाठवा, तुम्हाला असेल एखादवेळेस परंतु त्याला “शिकवत” बसण्यात आम्हाला स्वारस्य नाही.

३. रोबोच्या गळ्यात आमच्या दुकानातून हव्या असलेल्या पदार्थांची यादी लटकवणे. तुमचा 'रोबो' काय बोलतो ते आम्हाला समजत नाही. "आमचा रोबो 'मराठी'त किती स्पष्ट बोलतो, तुम्हाला समजत कसं नाही? " असे वाद आमच्या दुकानातील कर्मचाऱ्यांशी घालत त्यांचा वेळ वाया घालवू नये.

४. म्हैसूर पाक संपलेला आहे. लॉकडवून मुळे पुरेसा खवा येत नाहीये, त्यामुळे बेळगावी कुंदा आणि धारवाडी पेढे सुद्धा संपलेले आहेत. तुमचा रोबो 'मराठी' आहे की 'कानडी' ह्याच्याशी काही आम्हाला देणे घेणे नाही.

५. " अहो आत्ता आमचा रोबो येऊन गेला तुमच्या दुकानात मघाशी त्याच्या डाव्या मनगटाचा कुठेतरी स्क्रू पडलाय, तुमच्या तुमच्या फरशीवर पडलेला दिसतोय आहे का हो एखादा ?" असे फोन करून उगाच आम्हाला त्रास देऊ नये. संध्याकाळी केर काढताना दुकानातील कर्मचाऱ्यास सापडल्यास तुमच्या रोबोचे निखळलेले स्क्रू वगैरे काऊंटर वर जमा केले जातील. आधार कार्ड अथवा ओळख पत्र (तुमचे! रोबोचे नव्हे) दाखवून दुसऱ्या दिवशी सकाळी अकरा वाजायच्या आत घेऊन जाणे.

६. तुमच्या 'रोबो'स सुट्टे पैसे जवळ ठेवण्यास सांगणे. गूगल पे ची सोय 'फक्त' जिवंत माणसांच्या करता आहे. रोबोंकडून फक्त कॅश पेमेंट स्वीकारले जाईल.

७. तुमच्या 'रोबो'चं कौतुक तुमच्या पाशी ठेवा, आमच्या साठी ‘तो’ फक्त एक गिऱ्हाईक आहे. इथे आम्ही मालकाला सोडत नाही, तुमच्या रोबोचं काय घेऊन बसलायंत !

८. इथे फक्त जिवंत व्यक्तींनी मोबाईल चार्जिंग करावे. तुमचा 'रोबो' इथे चार्जिंला लावून बाहेर पेठेत इतरत्र फिरायला जाऊ नये.

९. खरेदी झाल्यावर तुमच्या रोबो मध्ये 'दुकानाबाहेर जाऊन डाव्या बाजूला थांबण्यासाठी चे' प्रोग्रामिंग करावे. दुकानात रिकामटेकडे पणाने रोबो इकडे तिकडे भडकताना आढळल्यास विकलेले पदार्थ त्याच्याकडून काढून घेण्यात येतील.

१०. आज दुरुस्तीस टाकलेला रोबो दुसऱ्या दिवशी दुरुस्त झाल्यावर लगेचच परत घेऊन जाणे. दुकानात तुमचे दुरुस्त झालेले रोबो ठेवण्यास जागा नाही. दोन दिवस वाट पहिली जाईल. परत नेला तर ठीक, नाही तर त्याला आम्ही घरची धुणी भांडी करायला घेऊन जाऊ.

११. "रोबोला मास्क गरजेचा नाही" अश्या स्वरूपाची कोणतीही सूचना , आरोग्य खात्याकडून आलेली नाही. मास्क नसल्यास रोबोला दुकानात प्रवेश मिळणार नाही.

१२. दुकानात ठेवलेले हॅन्ड सॅनिटाजझर फक्त जिवंत माणसांसाठी आहे. तुमच्या निर्जीव रोबोंच्या करिता नाही. रोबोंच्या करिता हात धुण्यासाठी दुकानाच्या डाव्या बाजूच्या मागील बोळात नळ आणि साबणाची सोय (निरमा असला तरी जपून वापरणे) उपलब्ध केलेली आहे. हात धुवून झाल्यावर नळ घट्ट बंद करण्याच्या सूचना तुमच्या रोबोस देऊन ठेवाव्यात.

१३. रोबोच्या हातावर "होम क्वारंटाईन" चा शिक्का आढळ्यास त्याला रांगेत उभे राहण्यास परवानगी नाही.

१४. इथे माणसांच्या साठी बाकरवडी/ मिठाई इत्यादी पदार्थ बनवले आणि विकले जातात. तुमच्या रोबोचे फूड नाही. तेंव्हा तुमच्या रोबोला 'थोडी चव दाखवितां का? ' अशी विचारणा करण्याचं प्रोग्रॅमिंग करून आमच्या कडे पाठवू नये.

१५. आम्ही केवळ ‘माणुसकी’ च्या नात्याने तुमच्या 'रोबो'ला आमच्या दुकानात येण्यास परवानगी देत आहोत, तेंव्हा तुम्ही तुमची 'रोबोट'की आमच्या पुढे दाखवू नका !

१६. 'रोबो'मुळे एखाद्यास व्यक्तीस किंवा एखाद्या व्यक्ती मुळे तुमच्या रोबोस विषाणू ची बाधा झाल्यास व्यवस्थापन जवाबदार राहणार नाही. तेंव्हा रांगेत तुमच्या पुढे/मागे उभ्या असलेल्या रोबोशी/व्यक्तीशी सोशल डिस्टंसिन्ग पाळणे/न पाळणे ह्या विषयी तुमच्या रोबोस आवश्यक त्या सूचना देऊन ठेवाव्यात.

१७. काउंटरच्या मागे उभे राहण्या करिता जुना 'रोबो' हवा आहे, पगार रोजच्या रोज देऊ केला जाईल, आणि दोन वेळेचे ‘चार्जिंग’ सुद्धा मोफत देण्यात येईल.

१८. कितीही भारी असला, तरी तुमच्या 'रोबो' चा 'रुबाब' आमच्या दुकानात चालणार नाही. 'हापूस' आंबे घ्यायला आमच्या कडे पाठ्वण्या पूर्वी त्याला त्याच्या 'पायरी' नुसार वागायला शिकवा.

१९. आमच्या रोबो करीता 'अनुरूप' स्थळ हवे आहे, जोडीदार 'ग्रीन' झोन असल्यास उत्तम ! 'रेड' झोन वाल्यांनी शक्यतो फोन करू नये. आर्थिक परिस्थिती उत्तम असल्यास 'ऑरेंज' झोन चे स्थळ असेल तरीही हरकत नाही.

२०. होम क्वारंटाईन असणाऱ्यांसाठी बाहेरची कामं करण्यासाठी फुलली चार्ज रोबो भाड्याने मिळतील : दिवसाचे भाडे ५५० रु. फक्त , जी.एस.टी. वेगळा आकारला जाईल. ( संध्याकाळी रोबो परत देताना, कार मधूनच 'ड्रॉप' करावा, त्याला चालत इकडे पाठवू नये. )

२१. आमच्या उपहारगृहातील रोबो फक्त ऑर्डर स्विकारण्या साठी उभे आहेत...त्यांना उगीच 'फडके मारून घे', 'पाणी आण', 'दोन कटिंग घे' असल्या वायफळ सूचना देऊन काहीही एक उपयोग होणार नाही. आधीच कामावर कामगार कमी आले आहेत, त्यामुळे जास्त अधीरपणा दाखवू नये... कारण मालकांचं डोकं फिरल्यास जे काही थोडेफार पदार्थ मिळताहेत ते ही बंद करण्यात येतील.

२२. पुणे यंत्र'मानवाधिकार' परिषदे तर्फे होणाऱ्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकां साठीचे अर्ज तूर्तास संपले आहेत. त्यामुळे , कोऱ्या अर्जांचा पुढील गठ्ठा परिषदेच्या खजिना विहीर शाखेतील मुद्रणालयातून येईस्तोपर्यंत रांगेत उभे असलेल्या रोबोंनि इकडे तिकडे खिडकीत विचारपूस आणि चौकश्या करत, 'आपला' आणि परिषदेच्या कार्यालयातील 'इतर' रोबोंचा वेळ निष्कारण वाया घालवू नये.

भविष्यात अश्या करोना ग्रस्त रोबोंच्या अजूनही काही पुणेरी पाट्या आढळण्याची शक्यता असल्यास त्यांचा मायबोलीकर वाचकांनी इथे जरूर निर्देश करावा.

चारुदत्त रामतीर्थकर
१२ मे २०२०
स्थळ : (अर्थात) पुणे

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

९. खरेदी झाल्यावर तुमच्या रोबो मध्ये 'दुकानाबाहेर जाऊन डाव्या बाजूला थांबण्यासाठी चे' प्रोग्रामिंग करावे. दुकानात रिकामटेकडे पणाने रोबो इकडे तिकडे भडकताना आढळल्यास विकलेले पदार्थ त्याच्याकडून काढून घेण्यात येतील >>>> हे जाम आवडलं