©राक्षसमंदिर - उपसंहार भाग ४ (अंतिम भाग)

Submitted by अज्ञातवासी on 11 May, 2020 - 14:31

उपसंहार - भाग ३
https://www.maayboli.com/node/74290

उपसंहार - भाग २
https://www.maayboli.com/node/74249

उपसंहार भाग १ - https://www.maayboli.com/node/74201

संपूर्ण कथा - 
https://www.maayboli.com/node/74130

"देवा, देवराज इंद्र आपल्या भेटीला आले आहेत." लक्ष्मीदेवी म्हणाल्या.
विष्णूदेवानी डोळे उघडले.
"प्रणाम भगवंत... इंद्राने लवून प्रणाम केला."
विष्णुदेव हसले. त्यांची प्रसन्न मुद्रा बघून इंद्रदेवाला हायसे वाटले व चेहऱ्यावरची चिंतेची छटा कमी झाली.
तेवढ्यात एक वैष्णव फळांच ताट व सोमरस घेऊन इंद्रदेवांजवळ आला.
"इंद्रदेव,तुम्ही फलाहार करा. तुमच्या चिंतेचं कारण मला ज्ञात आहे."
"भगवंता, इथे सर्व देव सोमरस पिऊन सदैव अप्सरांसोबत भोगविलासात मग्न असतात. त्यामुळे त्यांच्या प्रवृत्तीत आळस वाढला असून, ते अकार्यक्षम झाले आहेत. मात्र तिकडे राक्षसांनी सुतळ नगरीत एक अतिशय कार्यक्षम अशी व्यवस्था निर्माण करून देवतांपुढे आव्हान निर्माण केलं आहे. तो बळीराजा रात्रंदिवस महादेवाची तपश्चर्या करून महादेवाला प्रसन्न करून घेण्यासाठी नानाविध उपाय योजत आहे. जर राक्षसांना महादेव प्रसन्न झालेच, तर देव देवतांचा विनाश अटळ आहे भगवंत!"
विष्णुदेव शेषशय्ये वरून उठले. त्यांनी हाताची मागे घडी घातली बोलण्यास सुरुवात केली.
"देवेंद्र, सगळ्यात आधी तू जे सांगतो आहेस त्यात अर्धसत्य दडलेले आहे. सर्व देव आळशी नसून तुझ्याबरोबर राहणारे तुझे उपदेव आळशी बनलेले आहेत, आणि यात तुझाही सहभाग आहे. दुसरी गोष्ट तू सुद्धा बळी महाराजांचं नाव आदराने घ्यावस. हेही मला ज्ञात आहे की त्यांचं सर्वप्रथम आक्रमण स्वर्गावरच होईल.
तुम्हा सर्व देव देवतांचं रक्षण करणं माझं कर्तव्य आहे. पण माझं सर्वोच्च रूप सुतळ नगरीचं रक्षण करत आहे. त्यामुळे त्या नगरीत कुणालाही सरळ मार्गाने प्रवेश नाही. मात्र एक मार्ग असू शकतो."
"काय भगवंत?" देवेंद्रने उत्सुकतेने विचारले.
"मी मोहिनी अवतारात सुतळ नगरीत जाऊन बळीराजाची तपश्चर्या भंग करण्याचा प्रयत्न करेन.
आणि त्यासाठी मला जावं लागेल... राक्षसमंदिरातून!!!!"
★★★★★
अमित्राच्या जाण्यामुळे मित्र एकटा पडला. तो दिवसेंदिवस पश्चाताप करू लागला. अशा मनःस्थितीत त्याने शुक्राचार्यची भेट घेतली. त्यांनी त्याला मंदार पर्वतावर अकरा वर्षे तप करण्यास सांगितले. त्यांची आज्ञा प्रमाण मानून तो तपाला निघून गेला.
★★★★★
शुक्राचार्य पर्णकुटीत ध्यानस्थ बसले होते. कालमेध त्यांच्या बाजूला उभा होता.
तेवढ्यात बाहेर अंधारून आलं, पक्षी किलबिलाट करू लागले.
शुक्राचार्यांनी डोळे उघडले.
"कालमेध, आता जे तू बघशील, ते प्रचंड बीभत्स असेन. सांभाळून राहा."
रक्ताचा एक थेंब हळूहळू पर्णकुटीत आला. बघता बघता त्याची हळूहळू वाढ होऊ लागली, त्यात आतले अवयव दिसू लागले. त्यानंतर बाह्य रूप घेऊन त्याचं एका रक्ताळलेल्या मानवी आकृतीत रूपांतर झालं.
"रक्तबीजाचा रक्ताचा शेवटचा थेंब मी जपून ठेवला होता कालमेध!" शुक्राचार्य हसले.
★★★★★
अम्मा सुन्नपणे घरात बसली होती, मध्येच येणारा हुंदका मोठ्या प्रयत्नाने आवरत होती. स्वतःच्या नशिबाला दोष देत होती.
आधी नवरा गमावला, आणि आता मुलगा!
मल्लापा राक्षसमंदिरातच गेला असणार याची तिला तिळमात्र शंका नव्हती. कित्येकदा ती राक्षसमंदिराजवळ फिरून आली, पण त्याच्या आवारात पाऊल टाकायचा तिला धीर झाला नाही.
त्यानंतर तिने अक्षरशः संपूर्ण पंचक्रोशीत शोधले, पण मल्लापाचा तपास लागला नव्हता. तिने जीवाचा आकांत केला, पण शेवटी ती सुन्न झाली.
रात्रीची वेळ होती. अम्माने नुसता भात बनवून खाल्ला, आणि ती अंथरुणावर पडली.
तेवढ्यात दारावर टकटक आवाज झाला. अम्मा विचारात पडली. ती तशीच उठली, हातात काठी घेतली, आणि दाराकडे गेली.
कोण आहे? तिने आवाज दिला.
"मल्लापा... अम्मा दार उघड!"
अम्माला आनंदमिश्रीत आश्चर्याचा धक्का बसला. तिने घाईघाईने दार उघडलं.
दारात मल्लापा उभा होता!!!
"मल्लापा,"
अम्माने त्याला कडकडून मिठी मारली...
मल्लापानेही तिला घट्ट कवटाळले.
...आणि तो हसला... हसताना त्याचे पांढरेशुभ्र दात चमकत होते!
★★★★★
त्या स्त्रीने श्वेत वस्त्रे परिधान केली होती. चेहरा पदराने पूर्णपणे झाकला होता. ती झपाझप पावले टाकत राक्षसमंदिराकडे निघाली होती.
हळूहळू राक्षसमंदिर जवळ येऊ लागलं. ती आत जाणार, त्याक्षणी तिला आपल्या मनात अनेक तरंग उठल्याची जाणीव झाली.
'मोहिनीअस्त्र!' ती स्वतःशीच हसली.
शेवटी तिच्या नावावरून या अस्त्राच नाव ठेवण्यात आलं होतं!
'नमो पार्वतीपतये हर हर महादेव!!!' तिने जयघोष केला...
आणि ती आत निघाली.
ती आत जातच गडगडाटी हसण्याचा आवाज झाला व तिथेच असलेला एक शिलालेख सुर्यतेजाप्रमाणे चकाकू लागला, आणि त्यावर स्पष्ट सुवर्णाक्षरे उमटली!!!!

रक्षोभुवनमित्यस्मिन् ग्रामे राक्षसमन्दिरे ।
रक्षसां रक्षणायात्र संस्थितो राक्षसोत्तमः ॥
महाराजो बलिः साक्षात् मूर्तिरूपेण पूजितः ।
निषिद्धं गमनं तत्र देवानां राक्षसद्विषाम् ॥

टीप - कथेतील शेवटचा श्लोक पंडित प्रणव गोखले यांनी लिहिला असून, त्यांचे व हा श्लोक उपलब्ध करून दिल्याबद्दल श्री हरिहर (शाली) यांचे विशेष आभार.

||समाप्त||

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

संपली??? मालाप्पा कसा आला परत नन्तर काय केलं त्याने? त्या मोहिनीचं काय झालं?

भारी शेवट !!!
श्लोकाचा मराठी अनुवाद पण हवा होता.

छान कथा. पण त्या रक्तबीजातून मल्लाप्पा पुन्हा जिवंत केला का शुक्राचार्यांनी?
की अमित्र मल्लाप्पा म्हणून गेला?

छान कथा. पण त्या रक्तबीजातून मल्लाप्पा पुन्हा जिवंत केला का शुक्राचार्यांनी?
की अमित्र मल्लाप्पा म्हणून गेला?>>>> मला पण हाच प्रश्न पडलाय. आणि कथा थोडी घाईत गुंडाळल्यासारखी वाटली. शेवटच्या श्लोकाचा अर्थ द्या ना मराठीत.

मला वाटतं की रक्तबीजाच्या रक्तापासून शुक्राचार्यांनी मल्लाप्पाचे शरीर निर्माण केले, ज्यात अमित्राने प्रवेश केला. आणि इकडे विष्णूंनी मोहिनीरुप धारण करून बळीची तपस्या भंग करण्यासाठी सुतळ नगरीमध्ये जाण्यासाठी राक्षसमंदिरात प्रवेश केला.

पण अमित्राचे असे वागण्याचे कारण आणि पुढं काय होणार याचा अंदाज येत नाहीये.. बाकी श्लोकाचा अर्थ मलाही नाही कळला.

गोष्ट छान वाटली वाचायला.... कळावी म्हणून उपसंहार लिहीला, तरीही नवीन काही तरी न कळलेले राहिले.

अमित्र आपली नैतिक जबाबदारी म्हणून मल्लापा बनून त्याच्या अम्माची काळजी घेणार का (तिचे उरलेले ११ वर्षे आयुष्य संपेस्तोवर) ?

रक्तबीजाच्या रक्त थेंबातून पुन्हा रक्तबीज गुणाचाच राक्षस तयार व्हायचा -- अशी अविरत साखळी -- असे देवीमहात्म्यात वाचलेय. त्यातून माणूस बनला म्हणजे --- कसलीही तत्त्वे / नीतीमत्ता / विधीनिषेध न पाळण्याची वृती माणूस पुढच्या प्रत्येक पिढीतही दाखवणार.... त्या वृत्तीला अंत नाही असा अर्थ घ्यायचा का?

राक्षसद्विषाम् -- म्हणजे "राक्षसांचा द्वेष करणार्‍या".... हे आधीच्या देवता शब्दाचे विशेषण म्हणून वापरले आहे.
राक्षसांचा द्वेष करणार्‍या ( = राक्षसांचे शत्रू असणार्‍या ) देवांनी तेथे जाणे निषिद्ध आहे, असा अर्थ लागतो त्या ओळीचा.

छान संपवली आहे . ते मलप्पा ऐवजी कटप्पा नाव असते पात्राचे आणखी मजा आली असती वाचायला . तेवढाच आम्हाला हिरो झाल्याचे समाधान .
पुस्तक छापा - मी घेईन विकत नक्की .

@दिप्ती - लवकर रुमाल काढ मग Happy धन्यवाद
@पाथफाईंडर - धन्यवाद
@नौटंकी - धन्यवाद
@मऊमाऊ - धन्यवाद
@बोकलत -धन्यवाद
@आसा - धन्यवाद. या श्लोकाचा अर्थ आधीच आलेला आहे (संदर्भ - शुक्राचार्य)
@स्पार्कल - धन्यवाद
@धनुडी - धन्यवाद
@अजय - धन्यवाद
@कारवी - तुम्ही चांगलं एक्स्प्लेन केलंत. पहिली शक्यता बरोबर आहे. धन्यवाद!

सर्व प्रतिसादकांचे धन्यवाद...

श्लोकाचा अर्थ -
राक्षसभुवन गावातल्या राक्षसमंदिरात देवतानाही प्रवेश नाही. राक्षसांच्या रक्षणाकरताच या मंदिराची उभारणी झाली आहे. इथे मूर्तीही राक्षसाची स्थापन होते, व महाराक्षस म्हणून राक्षस महाराज बळींची पूजा करतात

काही उत्तरे.
१. अमित्रने मल्लापाचा वापर मित्राच्या मुक्तीसाठी केला, मात्र त्यात मल्लापाचा बळी गेला, ही गोष्ट त्याला टोचत होती. म्हणून त्याचं परिमार्जन करण्यासाठी तो मल्लापा बनून अम्माची सेवा करण्यास गेला, तिच्या आयुष्याची उरलेली ११ वर्षे नीट जाण्यासाठी.
हिंट - १. कथेत एकदा मल्लापा अधिरराजला भेटायला जातो, तेव्हा रात्री फक्त त्याचे पांढरेशुभ्र दात चमकताना दिसतात.
२. मित्र पुरुष रूप घेण्यास पटाईत होता, असाही उल्लेख आला आहे.
कारवी यांनी ही शक्यता मांडली होतीच.

२. रक्तबीज आणि मोहिनी या दोन स्वतंत्र कथा होतील, राक्षसमंदिर सिरीज मधल्या. स्टे ट्यून.

तूर्तास समाप्त Happy

अज्ञा, कथा पुर्ण करण्यासाठी अभिनंदन! Happy
मस्त झाली कथा.. राक्षसमंदीर, आणि काही प्रसंग तु अगदी डोळ्यासमोर उभे केले..

आता अवांतर आणि महत्वाचं! बाकीच्या कथा कधी पुर्ण करणार? वाट बघतीये! Happy

धन्यवाद.
२. मित्र पुरुष रूप घेण्यास पटाईत होता, असाही उल्लेख आला आहे.
इथे अमित्र हव का?