शक्ति

Submitted by ज्येष्ठागौरी on 10 May, 2020 - 13:16

शक्ति
आपण अमिताभचा मोठा पंख असल्यामुळे त्याचे काही, गंगा जमुना सरस्वती, जादूगार,लाल बादशाह असे सन्माननीय अपवाद वगळता सर्वच सिनेमे एकदा नाही तर वारंवार बघितले असणार. अमिताभच्या प्रत्येक सिनेमांची पारायणं आपण केलेली असणार.तशातच १९८२ च्या सुमारास शक्ति हा सिनेमा आला.तो येण्याआधीच दिलीपकुमार आणि अमिताभ यांच्या पंख्यांमध्ये प्रचंड उत्सुकता होती आणि आल्यावर आणि पाहिल्यावर कोणी कोणाला कच्चा खाल्लाय अशा नरभक्षक चर्चा व्हायला लागल्या.तेंव्हा आपण अमिताभचा पंखा असणार म्हणून अमिताभनी दिलीपकुमारला कच्चा खाल्लाय असंच आपण मनातून ठरवलं.पण पुढं खूप वर्षांनी घरी एकटीनंच रात्री शक्ति बघून रुमाल भिजवला केलाय.तेंव्हा मात्र कोणी कोणाला कच्चा खाल्लाय हे पूर्णपणे डोक्याबाहेर गेलं आणि जरी थोडा बटबटीत आणि अवास्तव वाटला तरी त्या दोघांच्या अभिनयासाठी तो सिनेमा परत पाहिला, शेवट पाहून परत तीच घायाळ अवस्था.हाय!आणि आत्ताच का आठवला!बापूंची डायरी समीप आहे आणि त्यांचं मी न बघितलेलं आयुष्य हे मी वाचतीये.
माझे आजोबा हे ब्रिटिश लष्करात डॉक्टर आणि बापू हा त्यांचा एका मुलीच्या पाठीवर झालेला मुलगा.अतिशय लाडका.पण बापू खूप खोडकर होते असं ते स्वतःच सांगायचे. शाळेत कागदाच्या होड्या करुन त्यात शाई भरून कोणाच्या खिशात टाकणे अशासारख्या त्यांच्या खोडयानी त्यांनी शाळेत तर यथेच्छ मार खाल्लाच खाल्ला पण तक्रार घरी आली की बाबासाहेब कमरेच्या पट्ट्यानं त्यांना मारायचे.बापूंनी आयुष्यात आम्हाला कधी बोटही लावलं नाही की आमच्यावर त्यांचा आवाज चढला नाही.आम्हीच नाही पण रस्त्यावर कोणी मुलांना मारत असेल तर ते जाऊन तो प्रकार थांबवायचे.त्याच्यामागे हेच कारण होतं, एकतर त्यांना मुलं खूप आवडायची आणि ते म्हणायचे मार खाताना मुलांचा विलक्षण अपमान होतो जो ते मुलंच जाणे!
अक्का गेल्यावर बापूंचं आयुष्य सैरभैर झालं.ते आईच्या जाण्यानं अगदी आतून दुःखी झाले.एक सहा वर्षाचा आणि एक आठ वर्षाचा भाऊ यांची जबाबदारी त्यांनी आपली मानली.बापू सांगायचे की ते पोहे करायला शिकले ते धाकट्या भावंडांसाठी. घरात भरपूर माणसं कामाला आणि स्वयंपाकी असून ,त्या दोघांना काही कमी पडू नये म्हणून काय काय सुचेल ते करत राहिले.मग अक्का गेल्यावर बाबासाहेबांनी चार वर्षांनी दुसरं लग्न केलं तेंव्हा बापू सतरा अठरा वर्षाचे होते.अशा वयात वडलांनी केलेलं दुसरं लग्न, त्यात आजीला आधीच्या लग्नातील एक मुलगा.त्याच्यासकट सावत्र आई स्वीकारणं बापूंना अवघड गेलं.अक्कांच्या जाण्यानं एकाकी पडलेल्या बाबासाहेबांनी लग्न केलं ते एका मूल असलेल्या विधवा स्त्रीशी.हा काळ १९४२ चा होता हेही लक्षात घ्यायला हवं.त्यातून त्यांचा सुधारकी दृष्टिकोन दिसतो पण कदाचित बापूंना शांताताईना आई म्हणून स्वीकारता आलं नाही.बापू आणि माझे दोन्ही काका ह्यांची जबाबदारी होती म्हणून बाबासाहेबांनी दुसरं लग्न केलं हे बापूंना का बरं स्वीकारता आलं नसावं?एरवी अतिशय सुधारकीअसणाऱ्या आणि माणूसकी जपणाऱ्या बापूंना हे जाणवलं नसेल का?हा त्यांच्या वयाचा परिणाम होत की आईच्या प्रेमापुढे इतर गोष्टी मानायची त्यांची तयारी नव्हती?बाबासाहेबांनी बापूंशी बोलून हा निर्णय घेतला होता का का नाही!अनुत्तरित प्रश्न!
मग त्यांचं मन घरात रमेना. अभ्यासात लागेना.ते सैरभैर झाले. मित्रमंडळींच्यात जास्त रमले.मित्र कोण तर पु लं देशपांडे म्हणजे भाई, वसंतराव देशपांडे म्हणजे बुवा,मधुकर गोळवलकर,मधु ठाणेदार, अभिनेते राजन जावळे.
त्यांचा पिंड कलाकाराचा होता पण बाबासाहेबांची अपेक्षा वेगळी होती ,ही सगळी मंडळी त्यांना गाणं बजावणं करणारी वाटायची.माझे एक काका नेत्रतज्ञ ,एक काका लष्करात अभियंता पण बापू फक्त बी ए झाले याचंही खूप दुःख बाबासाहेबांना होतं.घराण्याची परंपरा मोडतीये बापूंमुळे असा समज त्यांच्यात आला.बापूंनी सैन्यात जायचा प्रयत्न केला पण चष्मा आड आला.मग बापूंना सकाळमध्ये नोकरी लागली ,प्रेस रिपोर्टर आणि फोटोग्राफरपासून 'स्वराज्य'चे संपादक आणि सकाळचे सहसंपादक हा प्रवास खूप खडतर आणि कठीण होता पण बापूंनी तो मोठ्या कष्टानं केला. पण हे सगळं बाबासाहेबांच्या मनासारखं नव्हतंच.त्यांना बापूंचं काम कधीही upto the mark वाटलं नाही.ते बापूंना खूप बोलायचे.बापू कधीही उलटं उत्तर द्यायचे नाहीत.लग्न झाल्यावर बापूंचं आयुष्य आईमुळे स्थिरावलं आणि सावरलं.बापूंनी खूप मान मिळवला पत्रकारितेमध्ये आणि त्यांचा सर्व क्षेत्रातला मित्र आणि स्नेही परिवार अफाट होता.पण बाबासाहेबांच्या नजरेत ते कमी पडले.पुढे मोहननी नाटकात काम करायला सुरुवात केल्यावर हाच संघर्ष आणखी धारदार झाला.मोहन बाबासाहेबांचा फार लाडका,त्यानी डॉक्टर व्हावं असं वाटायचं पण बापूनी त्यांना समजावून सांगितलं की त्याचा प्राण कलेत आहे मी त्याला अडकवू शकत नाही.त्यावरून आई आणि बापू दोघांनी बोलणी खाल्ली.पण बापू ठाम राहिले.
बापू आणि बाबासाहेब ह्या दोन भिन्न अतिशय वेगळ्या आणि आतून एकमेकांवर खूप प्रेम करणाऱ्या व्यक्तींमध्ये कायम एक अंतर राहिलं.बापूंना बाबासाहेबांचं प्रेम समजत नव्हतं असं नाही, त्यांचं आयुष्य एका सहृदय व्यक्ति असलेल्या बापूंना समजलं नव्हतं असं म्हणणं चूक आहे.अक्का गेल्यानंतर त्यांची बाबासाहेबांच्याकडून काहीतरी वेगळी अपेक्षा होती का?
कधीतरी बोलले होते का हे दोघे?कधी अपेक्षा सांगितल्या होत्या का? नव्हे किमानपक्षी भावना सांगितल्या होत्या का दोघांनी एकमेकांना?माहिती नाही.बापू आणि बाबासाहेब ह्या दोघांच्यात एक अंतराय होता.तसा किती नात्यांमध्ये असतो.आपल्या अगदी जीवाभावाच्या व्यक्तींपासून आपण मनानी दूर जातो. शिक्षण, कर्तृत्व,पैसा, मानमरातब ह्याच्या पारड्यात आपण नात्यांना तोलत राहतो का? आपल्याभोवती एक तटबंदी बांधून घेतो हटवादीपणाची. ज्याला आपण मान अपमानच्या उपाध्या देतो.माझ्या विपश्यनेच्या शिबिरात, मला ज्यांनी विनाकारण दुखावलं होतं(असं मला वाटतंय/वाटत होतं)त्या सहा लोकांपैकी तीन लोकांना मी मनातून क्षमा करु शकले. खरंतर हा खूप मोठा शब्द आहे,पण असं म्हणूया की त्यांच्याबद्दलची कटूता काही प्रमाणात कमी झाली.तीन लोकांची अजिबात नाही पण जन्मभर बांधलेल्या गाठी एकदम सुटायच्या कशा!
माझ्यात आणि माझ्या आपल्या माणसात काही काळ अंतराय निर्माण होतं, ते मी आपणहून मिटवायला हवं ही जाण आली.दरवेळी जमेल असं नाही पण प्रयत्न करण्याचा विवेक आला.
बापू सांगायचे की बाबासाहेबांनी अखेरच्या काळात बापूंचा हात हातात घेऊन त्यांना सांगितलं की मी तुला ओळखायला कमी पडलो,मी वेगळ्या पट्टीनं तुला जोखत राहिलो.तू माणसांची श्रीमंती जी मिळवलीस ती मला खूप उशीरा कळली.पण माझं तुझ्यावर खूप प्रेम होतं आणि आहे.ते दोघंही खूप रडले.त्यात त्यांचं अंतराय वाहून गेलं बहुतेक.आई सांगायची की बाबासाहेबांचा अंत जवळ आलाय ही गोष्ट मान्य करणं हे जवळ जवळ पन्नाशीच्या बापूंना काही केल्या जमेना कारण आई गेल्यानंतर खूप वर्षं त्यांना आणि त्यांच्या भावंडाना फक्त बाबासाहेब आधार होते,त्यांची नाराजी जाणवूनसुद्धा,त्यांचा खूप धाक असून.आमच्या घरचे डॉक्टर अण्णा वडगावकर जे बाबासाहेबांचे शिष्य होते,त्यांनी बाबासाहेबांची शारीर अवस्था सांगून,समजावून सांगून, गहिवरलेल्या बापूंच्या पाठीवर हात फिरवला. बाबासाहेब गेल्यानंतर सगळ्या कुटुंबाला दुःख तर होतं पण बापूंच्यातलं दुखावलेपण मात्र गेलं होतं. होतं ते फक्त निर्मळ दुःख,काहीतरी अनमोल निखळल्याचं. काही सांगायचं,ऐकायचं राहिलं नव्हतं.नातं खूप वर्षांनी का होईना नितळ झालं होतं. Goodbyes hurt when the story is not finished...
आतून आतून खूप गहिरं प्रेम असणाऱ्या दोन व्यक्ती एकमेकांच्यात अंतराय कसं येऊ देतात हे न कळणारी गोष्ट आहे.माणसांचे परस्परांशी असणारे संबंध,त्याची गुंतागुंत सगळं अनाकलनीय आहे. एकमेकांवरचं प्रेम हे अव्यक्त राहिलं तर मनात फक्त समज , गैरसमज, दुरावा ह्या गोष्टींना थारा मिळत जातो.नात्याचा मोठेपणा, माणसाचा स्वभाव हे सगळं प्रेम व्यक्त करण्याच्या आड येतं.
प्रेम नसेल तिथे हे सगळं कदाचित स्वीकारता येतं पण प्रेम असेल तिथे हे सगळं पूर्ण चित्र पालटून टाकतं.सगळं नश्वर आहे, अनिश्चित आहे,क्षणभंगुर आहे हे प्रत्येकाला माहिती असतं तरी.नसेल कळलं तर कित्येकदा तर मृत्यु किंवा विरह हे लखलखीतपणे दाखवतो. माणसाची किंमत,त्याचं आयुष्यातलं स्थान सगळं सगळं. नंतर उरते ती फक्त हळहळ, चुटपूट. काही सांगायचं राहिल्याची जाणीव, त्यातलं अधुरेपण, जन्मभर वागवत राहावी लागणारी कधीही न भरुन येणारी एक पोकळी आणि मनाच्या कुपीत परजून ठेवलेली एक लखलखीत सुरी.
फासलों के दरमियाँ
नज़दीकियों की खोज़ में
कतरा कतरा टूटता रहा
मैं हर पल तेरी सोच में
दूर बहुत दूर कर दिया
तूने मुझे अपने आप से
मैं तेरी और चलता रहा
अपने वजूद की खोज में।

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूपच छान. अबोल प्रेम किंबहुना कोणतीही अबोल आणि तीव्र भावना ही गैरसमजाला, अंतराय (छान शब्द वापरलाय तुम्ही) आणि बेचैनीला कारणीभूत होत असावी का?