अकिरा कुरोसावा ( १९१० ते १९९९८ ) आणि तारे जमीन पर ( २००७ )

Submitted by सतीशगजाननकुलकर्णी on 10 May, 2020 - 07:42

अकिरा कुरोसावा ( १९१० ते १९९९८ ) आणि तारे जमीन पर ( २००७ )

दुनिया मे ऐसे ऐसे हिरे पैदा हुए जिन्होने दुनिया का नक्षा हि बदल दिया क्यो कि वो दुनिया को अपनी नजर से देख पाए. दिमाग उनके जरा हटके थे आसपास वालो को बरदाश्त नही हुआ तकलीफे खडी कर दि लेकीन उसके बावजुद वो जिते और ऐसे जिते कि दुनिया देखती रह गयी

“तारे जमीन पर” २००७ सालचा आमीर खान निर्मित आणि दिग्दर्शित व अमोल गुप्ते लिखित एक अविस्मणीय चित्रपट. या चित्रपटाचे प्रेरणास्थान अकीरा कुरोसावा या जपान मधील प्रतिभावंत दिग्दर्शकाच्या बालपणात आहे असे वाचनात आले होते. आणि त्याचमुळे त्याच्या संबधातील माहिती वाचण्याबाबतचे कुतूहल मनात जागृत झाले. सुप्रसिद्ध लेखक अच्युत गोडबोले आणि निलांबरी जोशी यांनी त्यांच्या लाईम लाईट या पुस्तकात अकिरा कुरोसावा बद्दल लिहिलेला सविस्तर लेख वाचनात आला आणि आपल्या कर्तुत्वाचा ठसा संपूर्ण जगात उमटवणार्या या दिग्दर्शकाचे बालपण किती दयनीय होते हे लक्षात आले.

अकिरा कुरोसावा जपान मधील “मोरीमुरा गाकूएन” या शाळेतला मंद विद्यार्थी. बालपणाचा कठीण प्रवास पार करून नंतर आयुष्याच्या एका टप्प्यावर तो पोचला पण त्या कटू स्मृती शेवटपर्यत त्याच्या मनात कशा कोरल्या गेल्या याची आठवण तो सांगत असे. कुरोसावा दिग्दर्शक झाल्यावर टोकियोच्या निचीगेकी थीएटरमध्ये आयोजित केलेल्या “फरगॉटन चिल्ड्रेन” या इनागाकी हिरोशी या दिग्दर्शकाचा खास शो पाहण्यासाठी गेला होता. हा चित्रपट एका मतीमंद मुलावर आधारित होता. वर्गातली सर्व मुले शिक्षक जे शिकवतात त्याकडे लक्ष देत असत पण त्यावेळी एक मुलगा मात्र या शिकवण्याशी आपला काही संबध नाही असे भाव करून बसत असे. जणू त्याचे विश्व इतर सर्व मुलांपेक्षा वेगळे होते. कुरोसावाने चित्रपटातील ते दृश्य जेव्हा पाहिलं तेव्हा त्याला नैराश्य आले आणि तो थेटर मधून बाहेर पडला. त्याच्या मनात एकच विचार येत होता त्या मुलाला आपण कुठेतरी भेटलोय, मनाच्या अस्वस्थ अवस्थेतच कुरोसोवा गाडीतून घरी गेला. चित्रपटात बघितलेला तो मुलगा कुरोसावाला परिचित वाटत असतो कारण कुरोसावा त्याच्या शालेय जीवनात असाच मंद असतो. आपल्या गत आयुष्यातील स्मृती त्याला त्या मुलात दिसत असतात आणि त्याचमुळे तो अस्वस्थ झालेला असतो.

कुरोसावाला त्याच्या लहानपणी शाळा तुरुंग वाटत असते. शिक्षक काय शिकवतात त्याला कळत नसे आणि कुरोसोवाला काही कळणार नाही असे गृहीत धरूनच शिक्षक इतर मुलांना शिकवत असत. खेळायला गेल्यावर सुद्धा तो सातत्याने दबकून असे. विध्यार्थ्यांच्या कुचेष्टेचा आणि शिक्षकांच्या उपहासाचा तो विषय होता. शालेय जीवनातील त्याची काही वर्षे अशीच न्यूनगंडाने त्रस्त झालेली होती.

पण कोणत्याही विषयात फारशी गोडी नसणाऱ्या या मुलाला चित्रकलेची मात्र आवड चांगली होती. वर्गात जेव्हा शिक्षक मुलांना चित्र काढण्याबाबत सांगत तेव्हा कुरोसावा त्यात उत्तम चित्रे काढून चांगली प्रगती दाखवत असे. त्याचमुळे शाळेत जाण्यासाठी तेवढीच एक ओढ त्याला वाटत होती. हळूहळू कुरोसावाचा अवगत असलेल्या या कलेमुळे आत्मविश्वास वाढू लागला. आणि त्याच्या आयुष्यात प्रगती होऊ लागली.
लहानपणी खडतर आयुष्य काढलेला हा मुलगा भविष्यात एक महान दिगदर्शक झाला आणि “ सेव्हन समुराई” ( शोले चित्रपट याच चित्रपटावर आधारित होता असे सांगितले जाते. ) “राशोमान” “इकिरू” या चित्रपटांचे त्याने दिग्दर्शन करून संपूर्ण जगात त्याने मानाचे स्थान मिळवले.
“ तारे जमीन पर” या चित्रपटातील ईशान अवस्थीची ( दर्शील सफरी ) कहाणी कुरोसावाच्या कहाणीशी मिळती जुळती. ईशान अवस्थी अवघा आठ वर्षाचा मुलगा. निष्पाप, निरागस.त्याची हि निरागसता चित्रपट बघत असताना भावते पण त्याच्या या निरागसतेला औदासिन्याची किनार आहे कारण हा कोवळा मुलगा शाळेत कुचेष्टेचा विषय आहे. वर्गातल्या शिकवण्याकडे त्याचे लक्ष नाही. सर्व मुले तल्लीन होऊन जेव्हा वर्गातील शिकवणे ऐकत असत तेव्हा ईशान खिडकीच्या बाहेर बघत बसलेला असे. शिक्षक जेव्हा त्याला एखादा प्रश्न विचारात असत तेव्हा ईशान त्याचे उत्तर देऊ शकत नसे. अक्षरे त्याची साथ देत नसत आणि आकड्यांचे त्याला वावडे होते. परिणामी, शिक्षक त्याला वर्गाबाहेर काढत. आणि त्याचमुळे वर्गात हजर असण्यापेक्षा वर्गाबाहेर तो जास्त असे. सातत्याने शिक्षा झालेला मुलगा अशी त्याची ख्याती होती. पण या उलट ईशानचा मोठा भाऊ रोहन ( सचेत इंजीनिअर ) अभ्यासात्त हुशार, नेहमी पहिला नंबर, आणि स्वभावाने तितकाच सालस. दोन मुलांच्यातील हा विरोधाभास बघून ईशानचे आईवडील ( आईची भूमिका टिस्का चोप्रा आणि वडिलांची भूमिका विपिन चोप्राने केली आहे ) नेहमी काळजीत असत. त्याची अभ्यासातील शून्य प्रगती आणि दंगेखोर स्वभाव, शाळा चुकवण्याकडे कल या गोष्टीमुळे ईशानचे वडील त्याला बोर्डीग स्कूल मध्ये ठेवायचे ठरवतात.

ईशान बोर्डिंग स्कूल मध्ये जातो आणि दंगेखोर ईशान अजुनी एककल्ली होतो. वर्गात तासनतास गप्प बसून राहणे, कोणत्याच विषयात रस न घेणे. इतर मुलांच्याप्रमाणे मौजमजा न करणे या गोष्टी वाढत जातात. आणि बोर्डिंग स्कूल मध्ये त्याची प्रगती होण्याऐवजी अधोगती होते. पण ईशानच्या आयुष्यात राम निकुंभ( आमीर खान ) नावाचा शिक्षक येतो आणि त्याचे आयुष्य पालटते. ईशान मध्ये चित्रकलेचा एक असामन्य गुण आहे आणि त्याच्या वयाच्या मानाने त्याची विचारक्षमता हि कितीतरी पुढच्या पातळीची आहे हे तो हेरतो. इतकेच नव्हे तर तो अभ्यासत त्याला रस नाही कारण दोन अक्षरातील फरक त्याच्या लक्षात येत नाही हे तो ओळखतो. ईशानला फक्त अभ्यसात मदतीची गरज आहे. आणि राम निकुंभ ती मदत करतो.
ईशानच्या मनातील न्यूनगंड घालवण्यासाठी निकुंभ एक चित्रकला स्पर्धा आयोजित करतो. या स्पर्धेमध्ये सर्व शिक्षक, विद्यार्थी यांनी भाग घ्यायचा असतो. सर्व मुले आणि शिक्षक वेगवेगळी चित्रे काढतात. ईशान निसर्गाचे बहारदार चित्र काढतो तर निकुंभ ईशानचे हसरे चित्र. जे चित्र त्याच्या मनात असते. ईशानचा या स्पर्धेमध्ये पहिला नंबर येतो आणि ज्या शिक्षकांनी त्याला शिकवले त्याचा दुसरा नंबर. शिष्याकडून गुरु हरला जातो. निकुंभच्या दृष्टीने हा सगळ्यात मोठा विजय असतो कारण ईशानला त्याची दिशा दाखवणे हेच त्याचे उदिद्ष्ट असते. आणि ते साध्य होते. चित्रपटाच्या शेवटी ईशानचे आई वडील परीक्षेचा निकाल बघण्यासाठी येतात. अभ्यासात्तील ईशानची प्रगती, शिक्षकांनी त्याची केलेली प्रशंसा बघून ते गहिवरतात, राम निकुंभ बद्दल कृतज्ञता व्यक्त करतात आणि चित्रपट संपतो.

तारे जमीन पर या चित्रपटाचे हे कथानक. बघायला गेल तर साधे पण तितकेच मनाचा ठाव घेणारे. कारण हि कथा मनोविश्लेषणात्मक आहे. शालेय जीवनात कुणाही मुलाच्या आयुष्यात हि कथा घडली असेल किंवा घडू शकेल. एका मुलासारखा दुसरा मुलगा कधीच नसतो. प्रत्येक मुलाची बुध्दी कधीच समान असू शकणार नाही. प्रत्येकाला निसर्गाने वेगळी ताकद दिली आहे.. आणि या ताकतीने प्रत्येक मुलगा आपपल्या आयुष्यात तारया सारखा चमकत असतो. आकाशात विहार करणारे हेच तारे जमिनीवर लहान मुलांच्या रुपात आले आहेत. म्हणूनच या चित्रपटाला तारे जमीन पर हे नाव शोभते.

चित्रपट सुरु होतो आणि शब्द आणि आकडे यांच्या दुनियेचे प्रतिनिधी शिक्षक, विद्यार्त्यांचे निकाल सांगू लागतात. वर्गातल्या प्रत्येक मुलाला चांगले मार्क्स मिळतात आणि ईशानला प्रत्येक विषयात दोन अथवा तीन मार्क्स. सुरवातीलाच आपल्यला कळते एका अपयशी मुलाची हि कहाणी आहे. हे अपयश जास्ती उठून दिसते कारण ईशानचा मोठा भाऊ रोहन मात्र खूप हुशार आहे. घरी आल्यावर रोहन जेव्हा ईशानला त्याचे मार्क्स सांगतो तेव्हा त्याची आई ईशानला मार्क्स विचारते. पण ईशान या सर्व बाबतीत बेदरकरार आहे.स्व:ताचे पेपर्स त्याने घरी आल्यावर कुत्र्यांना खेळायला दिलेले असतात. ईशान केवळ अभ्यासात कच्चा विद्यर्थी नाही तर स्वभावानेही तो चिडखोर आहे, त्याच्या स्वभावात एक प्रकरचे बंड आहे. पण तो मुलत: दंगेखोर किंवा चिडखोर नाही तर त्याचा हा स्वभाव त्याच्या अपयशातून निर्माण झालेल्या न्यूनगंडातून आलेला आहे, आणि त्याच मुळे खेळत असताना तो जेव्हा एका मुलावर चिडतो तेव्हा तो मारायला उठतो किंवा टेरेसवर जात असताना तो कुंड्या फोडतो आणि वर जाऊन स्व:ताच्या भावनांना वाट मोकळी करून देतो. लहान मुल असो किंवा मोठे माणूस, दाबून ठेवलेल्या भावना कुठेना कुठेतरी कोणत्याही प्रकारे व्यक्त करत असतेच. कधी त्या हळवे पणाने व्यक्त होतील तर कधी रागाने, बंडखोरीने. ईशान बंडखोर आणि तापट आहे आणि हळवा तसाच आहे. ईशानच्या आयुष्यातील काही कटू आणि काही गोड भावना. पण या सार्यातून त्याला मोकळे व्हायचे आहे. शाळेच्या अभ्यासाला कंटाळून किंबहुना घाबरून ईशान एक दिवस शाळेतून पूर्ण दिवस बाहेर राहतो आणि रस्त्यावरून तसाच निरुद्देश्य हिंडत राहतो. तो हिंडत असताना सोबत “a little sweet, a little sour, a little close not too far all I need is to be free “ हे भावपूर्ण गाण ईशानचे एकटेपण अधिकच केविलवाणे होऊन आपल्यासमोर येते. ( संगीत दिग्दर्शक : शंकर एहसान लॉय )

ईशानच्या हरकती बघून त्याला बोर्डिंग स्कूल मध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला जातो. तो निर्णय घेतल्यावर अथवा बोर्डिंग स्कूल मध्ये गेल्यावर ईशानच्या मनाची भावपूर्ण अवस्था आपल्या समोर दिग्दर्शकाने समर्थपणे साकार केली आहे. तुडुंब गर्दीने भरलेले रेल्वे स्टेशन. आपल्या आईचे बोट धरून ईशान प्रवासास निघाला आहे.अचानक रेल्वे सुटते. ईशानची आई डब्यात चढते आणि गर्दीमध्ये ईशानचा हात सुटतो. ईशान एकटाच “आई आई” म्हणून ओरडत जातो. आणि त्या भयानक स्वप्नातून तो जागा होतो. आपल्या आईला सोडून राहण्याची कल्पना त्याला मान्य नाही. आईलाहि त्याला सोडायचे नाही.ईशानचे रडणे बघून आई धावत येते. ईशान आकांताने सांगत असतो त्याला बोर्डिंग स्कूल मध्ये जायचे नाही आणि आई त्याला समजावत असते. दोघेही घट्ट मिठी मारून रडतात.

ईशानची रवानगी बोर्डिंग स्कूल मध्ये होते. त्याला सोडून गाडी परत चालली आहे आणि बोर्डिंगच्या नव्या वातावरणात ईशान एकटाच आहे. आणि सोबत “तुझे सब पता है ना मा” हे मन हेलावून टाकणार गाण. या गाण्यातील शेवटच कडव तर खूपच अर्थपूर्ण आणि ईशानच्या मनातील भावना आपल्या पर्यत पोचवते “ जब भी कभी पापा मुझे जोर से झुला झुलाते है मा, मेरी नजर ढूडे तुझे, सोचू तू आ के थामेगी मा” वडील जेव्हा जोरात झोका देतात तेव्हा तो आईला शोधात असतो. किती भाबडे दिवस होते ! पण आज वडिलांनि बोर्डिंगला ठेवले आहे पण त्याची आई त्याच्या जवळ नाही. ईशानच्या भावना अनावर होतात आणि बाथरूम मध्ये जाऊन तो रडू लागतो. त्याचवेळी त्याची आईसुद्धा गाडी मध्ये भावाकुल झाली आहे.
बोर्डिंग स्कूल मध्ये सुद्धा ईशानची अभ्यासात काहीच प्रगती नाही. उलट तिथे भावनिक कोंडमारा होत आहे. शिक्षक त्याला रागवत असत आणि मित्र त्याची चेष्टा करत असत. आपल्या घरापासून लांब असणार्या ईशानला नको ती शाळा असे झाले आहे. आणि त्यातच एक दिवस त्याचे आईवडील त्याला भेटायला येतात. दरवाजा घट्ट लावून ईशान स्व:तशीच आक्रंदत असतो. आईवडील बाहेरून आग्रह करतात तरीसुद्धा तो दरवाजा उघडत नाही. त्याला आता कुणीच नको आहे. काही काळापुरते आलेले आईवडील त्याला नको असतात. पण शेवटी नाईलाज म्हणून तो जेव्हा दरवाजा उघडतो तेव्हा समोर असणार्या मैदानावरून जोरजोरात पळू लागतो. स्व:ताच्या मनातील धुमुसणारा राग ! हा राग केवळ आई वडिलांवरचाच नाही तर तो परिस्थितीवरचा सुद्धा आहे. ईशानला खुश करण्यासाठी जाताना त्याचा भाऊ ईशानला चित्रकलेची आवड आहे म्हणून रंगपेटी देतो. पुन्हा तीच निरोपाची वेळ. ईशानला एकटे टाकून आईवडील गाडीतून निघून जातात आणि ईशान खोलीत येऊन ती रंगपेटी कपाटात ठेऊन टाकतो. ज्या रंगाचा आता तो भोक्ता होता ते रंग त्याला नकोसे झाले आहेत. जणू त्याचे आयुष्य बेरंग झाल आहे.

दूरवर पसरलेले विस्तीर्ण आकाश. खोल दरी आणि शाळेच्या इमारतीच्या एका उंच बाल्कनीतून ईशान वाकून बघत आहे. त्याच्या मनात काय विचार असतील? हे एकटेपण त्याला खात असेल का? आपल्याला काहीच येत नाही याची खंत वाटत असेल का? आपण इतके वाईट आहोत कि आपल्या आईवडीलानी आपल्याला दूर ठेवलं? हे आयुष्य ----. ईशानच्या मनात काय विचार असतील याचा जेव्हा आपण विचार करत असतो तेव्हा ईशान पाठीमागून त्याचा एक अपंग मित्र येतो. आणि ईशानला बोलावत असताना स्व:ताच पडतो. ईशान त्याला आधार देतो. थोड्यावेळापूर्वी जो ईशान शून्य नजरेने खोल दरीत पाहत होता तो आपल्याला मोठा वाटू लागतो. ईशानची खाली गेलेली नजर आपल्याला बरेच काही सांगून जाते. ईशानचा अपंग मित्र त्याला समजावतो आणि एक नवीन शिक्षक आला आहे ही आशावादी बातमी सांगतो. पण ईशानच्या चेहऱ्यावर कसलेच भाव नाहीत

या नवीन चित्रकला शिक्षकाचे नाव आहे राम निकुंभ. ईशानच्या शाळेत तो टेम्पररी शिक्षक म्हणून आला आहे. तो जसा कलेचा शिक्षक आहे तसाच मनोरुग्ण विद्यार्थ्यांच्याकडे जाऊन त्यानाही तो शिकवत असतो. त्यांच्यातील एक होऊन त्यांच्या सुखदु:खात सहभागी असतो.त्याची मैत्रीण जबिना ( गिरीजा ओक ) त्याला साथ देत असते. राम निकुंभचे मन त्याच्या कलेइतकेच सुंदर आहे. ईशानचे आणि त्याचे वेगळे नाते प्रस्थापित होण्यासाठी सुरवात होते. पहिल्याच दिवशी तो विद्यर्थ्यांचे मन जिंकतो. एक दिवस वर्गात सर्व मुलांना तो चित्र काढायला सांगतो. प्रत्येक मुलगा त्याच्या आवडीचे चित्र काढतो. पण ईशान तसाच शांत बसला आहे. चित्र काढायला कोणतीच अट नाही. मनात येईल ते चित्र काढायचे आहे. पण तरीही ईशान चित्रकलेची आवड असून गप बसला आहे, मनात विचाराचे वादळ, निकुंभला आश्चर्य वाटते. तो ईशानशी बोलण्याचा प्रयन्त करतो, पण काहीच प्रतिसाद नाही, शाळा संपते. ईशान एकटाच सभोवताली पसरलेल्या निसर्गाकडे एकटक लाऊन बसला आहे.एरवी प्रसन्न असणारा निसर्ग आपल्यलाहि उदास वाटतो कारण ईशान उदास आहे. हॉस्टेल वर परतल्यावर त्याच्या आईचा फोन येतो. तो काहीच बोलत नाही. आई बोलत राहते आणि ईशान रिसिव्हर बाजूला ठेऊन निघून जातो. ईशानची मनोवस्था गहिऱ्या पद्धतीने आपल्या पुढे साकार केली आहे.
एक दिवस राम निकुंभ ईशानच्या वह्या बघतो. आणि ईशानच्या पालकांना भेटायचे ठरवतो. जो ईशाल वर्गात चित्र काढायलाही तयार नाही तो चांगली चित्रे काढू शकतो हि गोष्ट जेव्हा निकुंभला कळते तेव्हा आश्चर्य वाटते. ईशानचे वडील ईशानच्या तक्रारी सांगत असतात. राम निकुंभ त्यांना सांगतो मुलगा आजारी आहे हे माहित आहे पण तो आजारी का आहे याचा कधी शोध केला का? ईशानची खरी समस्या आहे अक्षरे त्याला ओळखत नाहीत. पण तरीही ईशान हा विशेष मुलगा आहे. त्याच्या वडिलांना ते मान्य नाही कारण व्यवहारी जगात या कलेचा काही उपयोग नाही. ईशानच्या वडिलांनी ईशानच्या कलेला प्रोत्साहन दिले असते तर कदाचित परिस्थिती वेगळी असली असती. पण त्या वातावरणातच तो कोमेजला आहे. आदिवासी समाजात जर झाड तोडायचे असेल तर त्याच्यावर कुणी कुऱ्हाड चालवत नाही, झाडाला ते भरपूर शिव्या शाप देतात आणि झाड आपोआप कोमेजत. ईशानची अवस्था अशीच झाली आहे.

राम निकुंभ ईशानच्या आई वडिलांना भेटून परत येतो. ईशानच्या वडिलांशी त्याचे मतभेद झाले आहेत तरी निकुंभच्या मनाची उमेद सोडलेली नाही. तो वर्गात शिकवत असताना अनेकक्षेत्रातील अनेक थोर लोक मग आईन्स्टाइन असो किंवा अभिषेक बच्चन पर्यत सर्वाना कसा लहानपणी शिकत त्रास झाला हे समजून पद्धतीने सांगतो. निकुंभ वर्गातील सर्व मुलांना हे सांगत आहे पण त्याचे खरे लक्ष आहे ईशान. ईशानबद्दल त्याला प्रेम आहे कारण स्व:ता राम निकुंभची कहाणी तशीच आहे. लहानपणी अक्षरे ओळखताना त्याला त्रास व्हायचा. रामचे वडील त्याला समजू शकत नाहीत. तो आयुष्यात काही करू शकणार नाही असे त्यांना वाटत होते पण रामने स्व:ताचे आयुष्य बदलले.

त्या दिवशी सर्व मुलांना घेऊन राम निकुंभ निसर्गाच्या सहवासात जातो. मुलांनी मनसोक्तपणे आंनद लुटावा अशी त्याची इच्छा असते. सर्व मुले दंगा करत असतात. एका कोपऱ्यात बसून चार काठ्या गोळा करून ईशान एक नाव तयार करतो. आणि ती नाव पाण्यात सोडून देतो. आनंदाने सर्व मुले जण टाळ्या वाजवतात. आयुष्याच्या प्रवाहात ती त्याची जीवन नौका नवीन प्रवासास निघाली आहे. निकुंभ ती नौका घेऊन आपल्या आईवडिलांच्या फोटोजवळ ठेवतो. ज्या मुलाला समजून घ्यायला त्याचे आई वडील कमी पडले त्या मुलाने दुसऱ्याची जीवन नौका आयुष्याच्या प्रवाहात यशस्वीपणे सोडलेली होती.

ईशानचे आयुष्य सर्वोतपरीबदलायचे असा जणू निश्चय निकुंभने केलेला असतो. खर म्हणजे बोर्डिंग स्कूल मधून प्राचार्य त्याला काढणार असतात पण निकुंभ ईशानसाठी विशेष प्रयन्त करून त्याला नवीन अक्षर ओळख देतो. ईशानचा आत्मविश्वास वाढू लागतो आणि तो अजुनी वाढवा त्याच्यातील कलागुणांना वाव द्यावा म्हणून निकुंभ चित्रकला स्पर्धा आयोजित करतो. या स्पर्धेत सर्व विधार्थी आणि शिक्षक या दोहोंनी भाग घ्यायचा असतो.

स्पर्धेचा तो दिवस उजाडतो. पहाटे उठून ईशान बाहेर जातो. आज स्पर्धा आहे याचा कोणताच उत्साह त्याच्या ठिकाणी नाही. शाळेपासून लांब असणार्या एका पठारावर ईशान जाऊन बसतो. सभोवताली निसर्गरम्य वातावरण. कदाचित मनातील चित्राचे प्रतिबिंब तो पाहत होता. शांतपणे तटस्थपणे. स्पर्धेसाठी सर्व जण जमू लागतात. थोड्याच वेळात स्पर्धा चालू होणार असते पण ईशान अद्यापही तिथेच आहे- निसर्गाच्या सहवासात. स्पर्धा चालू होते. सर्व जण चित्र काढू लागतात. ईशान अद्यापही आला नाही म्हणून निकुंभ अस्वस्थ आहे. आणि इतक्यात ईशान येतो आणि सर्वांबरोबर चित्र काढू लागतो. ईशानने त्याच्या मनात असणाऱ्या निसर्गाचे चित्र काढले आहे आणि राम निकुंभने त्याच्या मनात असणार्या हसऱ्या ईशानचे. आपापल्या मनात असणाऱ्या प्रतिमा कागदावर उमटतात.

स्पर्धेचा निकाल लागतो. आणि ज्या राम निकुंभने ईशानचे आयुष्य बदलले तो स्पर्धेमध्ये दुसरा येतो आणि ईशान पहिला. शिष्याकडून गुरूची हार होते. टाळ्यांचा कडकडाट होतो. पण ईशान बक्षीस घ्यायला जाताना गांगरून गेला आहे.ज्या मुलाने उपेक्षा सहन केली, त्याच्या वाट्याला एवढा मानसन्मान आल्यावर तो असाच गंगारणे स्वाभाविक होते. अखेर ईशान बक्षीस घेतो पण बक्षीस घेताना तो गहिवरतो आणि निकुंभला मिठी मारून रडू लागतो. कारण त्या मानसन्मानाचा खरा हकदार निकुंभ असतो.

निकाला दिवाशी ईशानचे आईवडील येतात. आणि त्याची प्रगती बघून त्यानाही आश्चर्य वाटते. जो मुलगा उपेक्षित होता, त्या मुलाबद्ल शाळेतल्या शिक्षकांनी काढलेले कौतुकाचे उदगार बघून त्यांना गहिवरून येते. चित्रपट संपतो. पण त्या वातावरणातून आपण बाहेर येत नाही . सर्व प्रसंग आपल्या डोळ्यासमोरून जाऊ लागतात. आणि स्व:ताच्या न कळत आपल्याही डोळ्याच्या कडा ओलावतात आणि खोलवर रुतून बसलेले गदिमांचे एक गाणे अलगद ओठावर येते

एके दिनी परंतु पिल्लास त्या कळाले,
भय वेड पार त्याचे वाऱ्यासवे पळाले
पाण्यात पाहताना चोरूनिया क्षणेक ,
त्याचेच त्या कळाले तो राजहंस एक

सतीश कुलकर्णी ( 9960796019)

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

छान लिहिलय परीक्षण . अकिरा कुरोसावा ह्यांच्याबद्दल मला नवीन माहिती समजली. त्यांचा आणि तारे जमीन पर चा अन्योन्य संबंध आधी माहित नव्हता. धन्यवाद पुन्हा एकदा सुंदर चित्रपटाची आठवण करून दिल्याबद्दल !