औरंगाबाद रेल्वे अपघात- रक्ताळलेला भाकरीचा चंद्र

Submitted by टोच्या on 8 May, 2020 - 02:28

रक्ताळलेला भाकरीचा चंद्र

आता फक्त दोन दिवस
ओढत ताढत नेऊ पाय
लेकरू माझं घरी येईल
दारात वाट पाहते माय

चिरा पडल्या, फोड फुटले
उभंही राहू देईनात पाय
उरले नाही अंगात त्राण
विसावा जरा मिळेल काय

शांत शीतल गोल चंद्र
जणू चुलीवरची भाकर
क्षणात आली निद्रादेवी
खडबडीत खडीच्या गादीवर

जीव वाचवण्याच्या तुम्ही
नापास झालात परीक्षेत
मृत्यू गाठणारच असतो
तुम्ही जरी असाल परीक्षित

स्वप्न सुखाचे पाहता पाहता
कराल काळ आला धडधडत
स्वप्नांबरोबर थकली शरीरेही
घेऊन गेला ओरबाडत चिरडत

ज्या रेल्वेची वाट पाहून
थकली होती गात्र न गात्र
तीच आली अशी अवेळी
मिटवून गेली कायमची नेत्र

यापेक्षा दुर्दैव असावे काय
ज्यासाठी आयुष्य झिजले
खुनी रुळांवर रक्तामध्ये
भाकरीचे तेच चंद्र भिजले

Group content visibility: 
Public - accessible to all site users

रचना अंतःकरणात घुसली

पुन्हा डोळे भरून आले कविता वाचून

बिचारे!!!!!

पहिल्यांदा बातमी बघितली तेव्हा हाच मुद्दा मनात आला की रुळांवर कशाला झोपायचे! पण त्यांनी हे गृहीत धरले होते की ट्रेन्स बंदच आहेत, मग काय प्रॉब्लेम!

भरल्या पोटी या घटनेवर बोलुही नये असे वाटून आवरते घेतो

अशा कविता रचायची वेळ कोणावरही येऊ नये

कविता छानच आहे. हृदयस्पर्शी. मात्र अशी कुठलीच घटना घडू नये की त्या तीव्र दु:खाने कवीला कविता सुचावी.
पण कुठलीही तीव्र संवेदना कवीला अस्वस्थ करतेच. हे अगदी " मा निषाद प्रतिष्ठां त्वमगम: शाश्वती: समा l यत् क्रौंचमिथुनादेकं अवधी: काममोहितं ll इथपासून चालत आलेले आहे.
(हे छंदोबद्ध वाक्य कवी वाल्मीकी यांच्या तोंडून निघाले आणि त्यांना आपल्यातल्या काव्यशक्तीची जाणीव होऊन पुढे रामायणनिर्मिती झाली)

हिरा
<<कविता छानच आहे. हृदयस्पर्शी. मात्र अशी कुठलीच घटना घडू नये की त्या तीव्र दु:खाने कवीला कविता सुचावी.
पण कुठलीही तीव्र संवेदना कवीला अस्वस्थ करतेच. हे अगदी " मा निषाद प्रतिष्ठां त्वमगम: शाश्वती: समा l यत् क्रौंचमिथुनादेकं अवधी: काममोहितं ll इथपासून चालत आलेले आहे.
(हे छंदोबद्ध वाक्य कवी वाल्मीकी यांच्या तोंडून निघाले आणि त्यांना आपल्यातल्या काव्यशक्तीची जाणीव होऊन पुढे रामायणनिर्मिती झाली)>>

प्रतिसादाबद्दल धन्यवाद. सर्वप्रथम हे स्पष्ट करतो की मी कवी नाही. मात्र, सकाळच्या घटनेमुळे मी अस्वस्थ झालो आणि काही शब्द सुचले. अशी घटना कधीच घडू नये, हीच अपेक्षा.

कितीही नाडलेले, हालअपेष्टा भोगत असलात तरी स्वतःहून रूळावर झोपणे मूर्खपणाच आहे. कितीही गरीब असला तरी हे ढळढळीत सत्य आहे. अपघात स्थळ पाहिलेत तर आजूबाजूला बरीच मोकळी जागा, रिकामे शेत दिसेल. असे असूनही १५-२० माणसे सरळ रुळावर झोपतात हा वेडपटपणा आहे. रेल्वेगाडी काही बस किंवा ट्रक नाही की लोक झोपलेले पाहून बाजूने जाईल.
असा मूर्खपणा कुणीही करु नये.
ह्याचे समर्थन वा स्पष्टीकरण काय आहे? लोक इतके थकले होते की रूळावर झोपण्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता? अतर्क्य वाटते!

अगदी अगदी. त्या बेजबाबदार मजुरांवर आता मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र शासन पाच पाच लाख रुपये उडवणार आहे. खरं तर त्यांच्यावर लॉकडाउनचे नियम न पाळल्याबद्दल कायदेशीर कारवाई करायला हवी.

शेंडे नक्षत्र, भरत,
रुळांवर झोपणे हा मूर्खपणा आहे, ते तेथे का झोपले, त्यांनी लॉकडाउनचे नियम मोडले हे सर्व प्रश्न रास्तच आहेत. पण, ते गाडीखाली येऊन मेले हे दुर्दैवी आहे. विशेष म्हणजे लोको पायलटने हे लोक दिसल्यावर जोरात हॉर्न वाजवून कचकचून ब्रेक मारले. पण तोपर्यंत गाडी त्यांना चिरडून पुढे गेली होती. चालक खाली उतरल्यानंतर त्याने हंबरडा फोडला. मरणारा कोणीही असला तरी तो माणूस आहे हे महत्वाचे.

काय करावं या लोकांना.
पण कुठे मेले? अंथरूणात मेले का? चालून दमले होते तर दगडाची उशी करून झोपावं. रुळ ही काय झोपायची जागा आहे का? रुळावर झोपले म्हणजे निष्काळजी माणसे. माणूस मेला की गेमा चालू होतात. ट्रेन यांना शोधत खुनशीने वागली का? अक्कलशुन्य माणसे.

तैमूर, हे लोक भुसावळमधून रेल्वे मिळेल या आशेने रुळारुळाने चालले होते. रस्त्याने पोलिस अडवतात ही भीतीही होतीच. रात्रभर त्यांनी प्रवास केला तोपर्यंत गाडी आली नाही. पहाटे साडेचार वाजता विश्रांतीसाठी ते रुळावरच बसले आणि थकल्यामुळे सगळ्यांना झोप लागली. त्यानंतर हा अपघात घडला, असे त्यांच्यातील वाचलेल्या लोकांनी सांगितलंय.

मला तुमच्या कवितेमुळे ही बातमी कळाली. अत्यंत दुर्दैवी.
बेफिंशी सहमत.
मला तरी त्यांचा दोष वाटत नाही, चूक झाली पण काही तरी कारण असेल नं !! सगळ्या दुःखाचे मूळ अति लोकसंख्या आहे. त्याने गरीबी, बेकारी , दैना येते आणि जीवाला किंमत रहात नाही Sad .
मृतांना श्रद्धांजली .

ओह
त्रासातून टोकाचा प्रतिसाद दिला.
सॉरी.

कविता वाचली. काल टीव्ही वर ती द्रुश्य पाहिले नाही. व्यथित झाले मन. असं वाटलं ही आहेरे व नाहीरेतली दरी कमी व्हावी.... बेसिक गरजा रोटी कपडा मकान प्रत्येकाला मिळाव्या.

हा धागा उघडायचा नव्हता
ती बातमीही मी दृश्य स्वरुपात पाहिली नाही
ईतके कणखर मन नाहीये माझे
त्यांच्या कुटुंबियांना किमान योग्य ती आर्थिक मदत व्हावी. यावरून वाद होऊ नयेत.
मुंबईतही लोकल ट्रेनमधून पडून कित्येक मरतात, आयुष्यातून ऊठतात, मुंबईकरांच्या जीवाला काही किंमत नाही असा मागे माझा धागाही होता. या देशातच नव्हे तर जगात प्रत्येकाला किमान अन्न वस्त्र निवारा मिळायला हवे. आयुष्याला किंमत हवी.अन्यथा माणूस म्हणून आपले वेगळेपण काहीच नाही...

तैमूर, <त्रासातून टोकाचा प्रतिसाद दिला.
सॉरी.>
साहजिक आहे. रूळ काय झोपायची जागा आहे का? हा प्रश्न प्रत्येकाला पडू शकतो.
मंजूताई, सध्या स्थलांतरितांच्या निमित्ताने ही दरी अधिकच वाढली आहे.
ऋण्मेष, कुठलाही अपघात वाईटच.

अतिशय दुर्दैवी घटना. समूहाच्या मानसशास्त्राचा माझा अभ्यास नाही पण त्यांच्यापैकी एकालाही रुळांवर विश्रान्तीसाठी टेकण्यात, झोपण्यात धोका जाणवू नये याचे अपार आश्चर्य वाटले. मन अस्वस्थ झाले.

खरंच खूप दारुण घटना
आणि त्यात ही रचना...
संपूर्ण चित्र समोर उभ राहतोय...
राहिला प्रश्न त्यांच्या मानसिकतेचा...माणूस जसा दैनंदिन जीवनात अश्या बऱ्याच बारीसारीक गोष्टींकडे दुर्लक्ष करतो तसच हे ही त्यातलाच...मी त्यांच्यापैकी एक असतो तर कदाचित मी सर्वांना प्रेमापोटी शिव्या घालून बाजूलाच बसायला/झोपायला सांगितले असते...for safe side...

पण कधी कधी असंही वाटत की जर मृत्यू हा अटळच असेल तर त्यांच्या ही लक्षात कसे येईल आणि जीवाची काळजी तरी कशी वाटेल...

यावरून असा लक्षात येतं सरतेशेवटी. अज्ञान. लॉकडाऊन् म्हणजे खरंच सगळं शंभर टक्के बंद होत का ? की थोड्याफार प्रमाणात चालू असतील गाड्या? असे साहजिक प्रश्न पडले असते तर कदाचित दुसऱ्या दिवशी आपला जीव वाचल्याची जाणीव झाली असती.

माणूस. झोपलेला. चूक करणारा.
माणूस. रेल्वे बनवणारा. विकास करणारा.
माणूस. लोको पायलट. जीव वाचवण्याचा प्रयत्न करणारा.
यात मृत्युला दोष देऊन सुद्धा कसं चालेल?