कसे जीवनी हसावयाचे

Submitted by निशिकांत on 6 May, 2020 - 23:14

( मी आमच्या भागातील नवचैतन्य हास्ययोग परिवाराच्या शाखेचा व्यवस्थापक आहे. गेल्या सात आठ वर्षांपासून हे काम करताना सदस्यांमधे झालेले बदल बघून आणि त्यांनी दिलेल्या फीडबॅकवरून सुचलेली ही कविता. परवाच झालेल्याजागतिक हास्यदिनाचे औचित्य साधून ही कविता पोस्ट करत आहे )

आनंदाच्या वारीसंगे निघावयाचे
इथे कळाले कसे जीवनी हसावयाचे

दु:ख पेरले आयुष्याच्या मळ्यात आहे
हास्यमण्यांची माळ तरीही गळ्यात आहे
लाख कारणे असून नाही रडावयाचे
इथे कळाले कसे जीवनी हसावयाचे

त्रयस्थ आणि शिष्ट संस्कृतीतही भेटती
मित्र केवढे! प्रसंग येता जीव लावती
श्वास मोकळे कसे घ्यायचे? शिकावयाचे
इथे कळाले कसे जीवनी हसावयाचे

उलटी गिनती इथे पाहिली आयुष्याची
वयास विसरुन मजाक मस्ती रोजरोजची
निर्माल्याच्या मनात येते फुलावयाचे
इथे कळाले कसे जीवनी हसावयाचे

आम्ही सारे जमतो तेंव्हा खुल्या दिलाने
हास्य बहरते, हद्दपार असते रडगाणे
सूर गवसले, नवे तालही धरावयाचे
इथे कळाले कसे जीवनी हसावयाचे

इतिहासाची भाग जाहली आहे मरगळ
भासत असते वाळवंटही आता हिरवळ
आनंदाच्या डोही आता रमावयाचे
इथे कळाले कसे जीवनी हसावयाचे

हास्यक्लबातुन आशावादी उर्जा मिळते
सुरकुत्यातली उदासीनता क्षणात पळते
जगायचे ते आनंदाने जगावयाचे
इथे कळाले कसे जीवनी हसावयाचे

निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त कविता!
पण निर्माल्याची उपमा तितकीशी रुचली नाही..