एकटेपणा

Submitted by pranavlad on 6 May, 2020 - 03:00

एकटेपणा

सवय होतीच मला एकटेपणाची,
नव्हे कदाचित आवडच होती त्याची..!
नव्हते कोणी माझे अन् मीही नव्हतो कोणाचा,
खरंतर अभिमान होता मला माझ्या एकटेपणाचा..!

उंच, निरभ्र आकाशात स्वच्छंदीपणे,
मुक्त विहार करणाऱ्या गरुडासम, एकटा होतो मी..!
लहान लहान टेकड्यांच्या सहवासात,
उंच हिमालयाच्या शिखरासम, एकटा होतो मी..!

उंचावरुन गर्दीकडे पाहताना, ती कधी हवीहवीशी नाही वाटली,
होतो जरी एकटा, तरी एकटेपणाची भिती नव्हती वाटली..!
पण एकदा वाटले, पाहुया तरी गर्दी कशी असते..
उतरलो खाली, मिसळलो गर्दीत, ती ही काही वाईट नसते..!

मला आवडली ती, झाली सवय गर्दीची,
पण तिला नव्हती सवय माझ्यातील एकटेपणाची..!
तिच्यासाठी माझी जागा दूरच होती,
थोड्या दिवसांसाठी मजा ठीक होती..!

शेवटी गेलीच गर्दी पळून, पुन्हा एकदा मला एकटं सोडून..
तसा आवडतो मला, पण या वेळेस जरा वेगळा आहे एकटेपणा..
मनात राहिल्यात गर्दीच्या पाऊलखुणा,
स्वेच्छेने न स्विकारता, कोणीतरी बळजबरीने लादलेला आहे हा एकटेपणा..!

आजही आकाशात उडतो मी, मंद वाऱ्यावर डुलतो मी..
पण आज, गरुड नव्हे, पतंगासम आहे मी..!
आता उंच उडण्यासाठी, दोरीला ढील द्यावी लागते,
ढील दिल्यावर गर्दीपासुनचे अंतर अजुन वाढत असते..!

या एकटेपणाची आज थोडी भिती वाटते,
कारण दोरी कोणा दुसऱ्याच्या हाती असते..!
आधी प्रचंड आवडायचा स्वच्छ, शुध्द एकटेपणा..
आता मात्र मनाला सलतो, मानवी स्पर्श झालेला एकटेपणा..!

- प्रणव

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults