तिची व्यथा

Submitted by निमिषा on 5 May, 2020 - 03:07

तिची व्यथा

ती समोर पाहत होती पण, तिला काहीच दिसत नव्हतं. कारण, मनात विचार चालू असले की नजर स्वतःचं काम बंद करते. तिच्या मनात विचार थैमान घालत होते.
"घर! माझे घर! खरंच माझे आहे का घर? ही सगळी माणसं खरंच माझी आहेत का?
माझी आहेत म्हणून अशी वागतात ती माझ्याशी?
घरात नवीन बाळ येतं, तेव्हा ते ही अनोळखीच असतं ना? त्याला तुम्ही त्याच्या गुण दोषासकट स्वीकारता, मग हेच नियम सुनेच्या बाबतीत का लागू पडत नाहीत? जो तो तिला बदलण्याचा प्रयत्न का करतो? घरातल्या सुनेला हे सगळे प्रश्न पडावेच का?
ही सगळी माणसं वाईट आहेत असे मी अजिबात म्हणत नाही. कारण माणसं वाईट नसतातच. फक्त ती आपल्या मनासारखी नाही वागली की ती आपल्याला वाईट वाटू लागतात."

हातातली पेन्सिली ओठांनी स्पर्शून ती खोल विचारात बुडाली होती.

"काय काय बदलायचं? किती बदलायचं? बदल्यावरही समोरच्याचं समाधान होईल की नाही ही सुद्धा एक शंकाच.
समोरच्याला नाही पटले की पुन्हा बदला स्वतःला. बदल बदल आणि बदलच.
बदलूनच राहायचं, तर मग 'यांनी मला स्वीकारले' असे म्हणणे कितीपत खरे ठरेल?
मला ना असं वाटतंय की, आपण एका गाडीत बसलोय. गाडीने अचानक वेग घेतलाय. वेग ही वेगाहून वेगवान झालाय.
मी जागेवर बसलेय. वारा जोरात चेहऱ्यावर येतोय. झोंबतोय. भीती वाटतेय. मी डोळे गच्च बंद करून घेतलेयत. पुढे काय होणार माहित नाहीये. समोरची चित्र भराभर भराभर बदलतायत. श्वास घेणं कठीण होतंय. धाप लागलीय.
कुठेतरी ही गाडी थांबावी, वेग कमी व्हावा आणि पुन्हा श्वासाशी भेट व्हावी असं वाटतंय."

एसीच्या गार हवेत बसूनही तिला त्या क्षणी घाम फुटला होता. पण त्या घामाकडे लक्ष द्यायला वेळ कुणाला होता तिथं? ती तर एकाच काम करत होती. विचार, विचार आणि विचार.

"लवकर उठायचं, डबे बनवायचे. त्या जेवणात चवही आपल्या हाताची नको. चव चुकली की, दोन शब्द ऐकून घ्यायचे. अश्या सुंदर सकाळच्या सुरुवातीनंतर ऑफिसला जायचं ट्रेनचे धक्के खात. तिथे वेळेवर पोहचायचं. मनातले विचार बाजूला ठेऊन काम करायचं. वेळ संपली की, तेच धक्के खात घरी जायचं. स्वत:च्या शरीराला अजिबात न जुमानता पुन्हा किचनमध्ये जायचं. जेवण बनवायचं. भांडी घासायची.
पण... अजिबात दमायचं नाही
इतकं काम करून झालं की,ओंझळ पहायची स्वतःची. ती रिकामीच दिसणार. दिसलेच तर त्यात दोन शब्द दिसतील...कुणाच्या तरी तक्रारीचे."
मनात रडायला येत होत तिला. पण मनात असलेलं दरवेळी करायला कुठं जमतं आपल्याला?

मनातला राग तिला प्रश्न विचारात होता.
"आई हाक मारल्याने खरंच कुणी आई होतं का? जे नियम तुम्ही मला लावता, तेच स्वत:च्या मुलीला लावता का?
जर याचे उत्तर 'नाही' असे असेल, तर तुम्ही मला मुलगी मानलंय हा स्वत:चा गैरसमज दूर करा.
घरात जाताना भीती वाटते. वाटते की, आज काय नवीन होणार?
माझ्या रंगापासून छंदापर्यंत. छंदापासून व्यंगापर्यंत प्रत्येक गोष्टीत विरोध.
वीट आलाय. पण सांगावं कुणाला?
त्या आईला की त्या आईच्या मुलाला? यातले माझे कोण? कोणीच नाही!"

निमिषा मांजरेकर

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बोअरिंग घिसापिटा विषय. या विषयावर प्रत्येकी किमान पाच कथा, ललित, कोतबो फक्त एकट्या माबोवर सापडतील.

हं.....
सांगताही येईना अन सहनही करता येईना अशा अवस्थेत कितीतरी जणी आयुष्यभर होरपळतात.
पण हे सर्व पाहून फक्त सहानुभूती देण्याशिवाय आणि हळहळण्याशिवाय बर्याचदा माहेरची माणसंही काही करत नाहीत. मुळात 'वारा येईल तशी पाठ दे', 'आता तेच तुझं घर, लग्न झालं की माहेरचं घर परकं' ,'दिल्या घरी सुखी रहा' हे 'संस्कार' माहेरीच लहानपणापासून केले जातात. माहेरचा खरा भक्कम असा पाठींबा फार कमी मुलींना मिळतो. एकदा लग्न झाले की मुलगी शिकलेली असो वा नसो,कमावती असो वा नसो , तिच्या अगदी क्षुल्लक बाबीचीही कसलीही जबाबदारी 'माहेरची माणसं' घेत नाहीत हेच खरे आहे.
मुलीचं लग्न लावलं की आपली जबाबदारी कायमची संपली असाच समज असतो बर्याच घरात.

True