डियर इरफान! - 'खेल दिखाके मदारी चला गया!'

Submitted by अज्ञातवासी on 5 May, 2020 - 00:50

डियर इरफान!
जे आर डी टाटांनी म्हटलंय जेव्हा तुमच्या जवळचं कुणी मृत्यूला सामोरं जातं, तेव्हा तुमचाही काही अंशी मृत्यू होतो.
आणि याची प्रचिती मला येतेय. आणि तिही संथपणे... मध्येच रात्री 'इशक तेरा तडपावे' लागत, आणि त्या निरागस मुलीइतकाच तुझा निरागस चेहरा डोळ्यासमोर येतो. 'तेनु सूट सूट करदा' लागत, आणि सामान्य माणसाची वरच्या आणि खालच्याही क्लासला जाण्याची तारांबळ आठवते.
तू प्रचंड निष्ठुर माणूस आहेस, हे मला तुला सांगायचंय. ५४ हे कधी जग सोडून जाण्याचं वय असतं का? तेही इतकं शांततेत? काहीही खळखळ न करता? तू एका दुर्धर आजाराने ग्रस्त आहेस, हे माहिती होतं, पण तू परत येशील, अजून नवनवीन चित्रपट करशील हे मी गृहीतच धरून चाललो होतो.
राजेश खन्ना हा माझा सगळ्यात आवडता अभिनेता, तो गेल्यावर कितीतरी दिवस मी उदास होतो, पण डोळ्यात पाणी आलं नव्हतं. आणि तू एकाच क्षणी डोळ्यात पाणी आणलं. तेव्हा कळलं, तूच माझा सर्वात आवडता अभिनेता होतास.
आयुष्यात एकदाच तुला भेटायचा प्रसंग आला, फक्त पाच मिनिटे, जास्त नाही...पण त्यामध्ये तुझ्या बोलण्यातला स्पष्टपणा, नम्रता, त्याहीपेक्षा बोलके डोळे, तुझा शब्दसाठा, आणि मध्येच येणारं स्मितहास्य... तू एक परफेक्ट माणूस होतास. बॉलीवूडच्या खोट्या चंदेरी मुलाम्यात तू चकाकणारा हिरा होतास!... तुझा चेहरा कधीच हिरोचा नव्हता, पण अस्सल होता. तुला काय बोलायचंय ना, हे डोळेच आधी सांगून जात.
तसा मी थोडासा जास्तच इमोशनल आहे, पण तुझ्याबाबतीत मी कायम खूप खूप हळवा होतो. म्हणजे तुझ्या बाबतीत मी कधी स्वप्नातही वाईट विचार केला नसेल, किंवा तू अभिनय केलेली एक फ्रेम नसेल, ज्यात तू स्वतःची छाप सोडली नसेल.
तुझी माझी पहिली ओळख झाली चॉकलेट मध्ये... आणि खरं सांगू? हा चित्रपट मी तुझ्यासाठी बघितला नव्हताच. फक्त 'हलका हलका सा ये नशा' हे गाणं बघून बघायला घेतला, आणि तू सुरवातीपासून जे गारूड केलं ते कधी उतरलच नाही. या चित्रपटापासून तू माझ्या मनाचा जो कोपरा व्यापला, तिथे आणि तिथे फक्त तूच होता.
तुझे मी अनेक चित्रपट पाहिले,
आणि कधीही तू मला निराश केलं नाही, कधीच नाही. मकबूलने मला कित्येक दिवस विचारमग्न ठेवलं. हासिलने हा माणूस माणसातला सैतानही किती ताकदीने दाखवू शकतो, याची जाणीव करून दिली. रोग मध्ये पोलीस ऑफिसर वेगळ्याच रुपात तू साकारला, तर साडेसात फेरे मधला तुझा कॉमेडी अंदाज भावला.
सैनिकुडू तर मी अक्षरशः जीव लावून बघितला. कारण सामना होता महेश बाबू विरुद्ध इरफान खान, आणि मी महेश बाबूचा कितीही मोठा फॅन असलो, तरीही यावेळी तुझ्याच पारड्यात मत पडलं. लाईफ इन या मेट्रो मधला मॉन्टी हे तुझं वेगळंच रूप.
दार्जिलिंग लिमिटेडमध्ये तू माझ्यासाठी एक वेगळाच सरप्राईज होता. संडे आणि क्रेझी फोर मध्ये तर तू अजून खुललास. चेहरा कोरा ठेवून समोरच्याला कसं हसवाव, यासाठी तुझ्याकडे लोकांनी क्लास लावायला पाहिजे.
मग तू आलास स्लमडॉग मिलेनियर मध्ये! आणि खरंच सांगतो, हॉलीवूडने तुला ऑस्करमध्ये बेस्ट सपोर्टिंग ऍक्टरचं साधं नोमिनेशन देऊ नये, याचा मला प्रचंड राग आला. जिंकलाच असतास तू.
सात खून माफ, बाबारे तुला सलाम! विशाल भारद्वाज आणि तू जेव्हा एकत्र आलेत ना, तुम्ही चित्रपटसृष्टीत एक धडा लिहावा, असं काम केलं. थँक यु मध्ये खिलाडी कुमार होता, अनेक कलाकार होते.तरी इरफान इरफानच होता.
२०१२ तुझ्यासाठी खूप चांगलं ठरलं.
'बिहड मे बागी होते है, डकेत होते है पारलियामेंट मे!'
नॅशनल अवॉर्ड विनर इरफान, पान सिंग तोमर साठी, जे तुला कधीच मिळायला हवं होतं. लाईफ ऑफ पाय सारखा ऑस्कर कॅटेगरी चित्रपट तसंच स्पायडर मॅन सारखा कमर्शियल चित्रपट, सगळीकडे इरफान खान दिसला... खूप छान वाटलं रे. असं वाटायला लागलं, तुला आता जे मिळतंय ना, ते खूप आधी मिळायला हव होतं. अगदी घरातलाच एक माणूस पुढे जातोय असं वाटत होतं.
हैदर तर विशाल भारद्वाजचा मास्टरपीस, आणि त्यात जेव्हा तुझी इन्ट्री होते ना, इरफान, तू काहीच्या काही उंचीवर नेऊन ठेवतोस रे तो चित्रपट... जबरदस्त!!!
पिकूमध्ये वेगळं रूप, आणि लगेच तलवार मध्ये वेगळा इरफान...मदारी मधला रडवणारा इरफान...
द लंचबॉक्स, तुझ्या कारकीर्दीला कळस चढवला या चित्रपटाने. यात तुझ्याशिवाय कुणाचाही विचार करू शकतच नाही, इतकी सुंदर भूमिका तू केलीस.
आणि आला हिंदी मीडियम... तुझ्या कारकीर्दीतला व्यावसायिकदृष्ट्या सगळ्यात यशस्वी चित्रपट...आणि माझा सगळ्यात आवडता. एक बाप, नवरा आणि सामान्य माणूस दाखवताना तू भूमिका जगला नाहीस, तर लोकांनी आयुष्यात कसं जगावं, याचा नकळत आदर्श घालून दिलास. हसवता हसवता कधी रडवून गेलास, नाही कळलं.
त्यानंतर ब्लॅकमेल बघितला. छाप सोडलीच तू...
आणि नशीबवान मी, अन्ग्रेजी मीडियम थेटरात बघितला. ट्रेलर मध्ये तू म्हटला होतास, 'जो होगा, इत्तेला करवा दिया जायेगा...' खूप खूप वाईट वाटलं रे. असं वाटलं, की एक जवळची व्यक्ती सोडून चाललीये. प्लिज यार... थांब ना... प्लिज....
यानंतर तू परत दिसशील का नाही माहीत नव्हतं. खूप अपेक्षा ठेवून गेलो रे, आणि तुला पडद्यावर पाहताच डोळ्यातून का पाणी यायला लागलं कळलचं नाही. ना चित्रपट बघितला ना काही. बघितला फक्त इरफान... आणि आयुष्यात तुला आणि पंकज त्रिपाठीला एकत्र बघून काहीतरी खूप मोठं मिळवल्याचं समाधान मिळालं. तुम्ही दोघे एकत्र दिसणं, माझ्यासाठी खूप मोठा आनंदाचा क्षण होता.
एक सांगू? बाकीचे कलाकार भूमिकेत शिरतात, भूमिका जगतात, पण तू त्या भूमिकेत इरफान ओतायचा. त्या त्या भूमिकेत इरफान खान आहे, ही जाणीव सदैव असायची, आणि कायम सुख देणारी असायची. तू जमीनीवरचा माणूस जरी साकारत असलास, तरी भूमिका उत्तुंग आकाशाला नेऊन ठेवायचास. पण तू खूप खूप कमी दिलंस आम्हाला. अजून खूप हवं होतं तुझ्याकडून. तुझी तुलना कुणाशीच होऊ शकत नाही, कारण एकच...
तू इरफान होतास... एक अभिनयाचं विद्यापीठ, ज्याचा विद्यार्थी तूच आणि कुलगुरुही तूच... ना तू कधी कुणाचा शिष्य।होतास ज्याची छाप तुझ्यावर पडावी, आणि ना कुणाचा गुरू, ज्याच्या अभिनयात तुझी छाप दिसावी.
एक सच्चा कलाकार होतास रे तू, पण एक सच्चा माणूसही तू होतास. तुझे डोळे कधीही खोटं बोलूच शकत नव्हते, आणि तुसुद्धा कधीही खोटं बोलला नाहीस.
तू सगळ्यांच्या वर होतास.... तू महान होतास....
थँक्स!!!!
पण पुन्हा सांगतो, तू खूप निष्ठुर वागलास!
पण जिथे असशील ना, तिथेही तू हसवशील आणि रडवशील सुद्धा!

मागील धाग्यावरचे काही प्रतिसाद.

अप्रतिम लेखन. इरफानच्या जाण्याने जणू कोणी खूप जवळची व्यक्ती गेल्यासारखे दुःख झाले .
Submitted by मनिम्याऊ on 4 May, 2020 - 21:53

बिल्लु, हिंदी मिडीयम, लाईफ ऑफ पाय, मदारी हे चित्रपट इरफान साठीच लिहीले गेले असावेत. अस वाटलेल मुवी बघताना. Miss him.. असा नट परत होणे नाही. Sad
Submitted by मन्या ऽ on 4 May, 2020 - 22:04

छान लेख. इरफानच्या भेटीबद्दल अजून लिहायला हवं होतं.
इरफानच्या जाण्याने जणू कोणी खूप जवळची व्यक्ती गेल्यासारखे दुःख झाले >>>>>+1111111
Submitted by चैत्रगंधा on 4 May, 2020 - 22:04

नुकताच अंग्रेजी मिडीयम बघितला होता. ही बातमी ऐकली तेव्हा खूप रडले. असं कधी वाटले नव्हते की एखाद्या फिल्म स्टार च्या जाण्याने एवढं दुःख होईल. Sad
Submitted by नौटंकी on 4 May, 2020 - 22:24

खरंच कमाल आहे ना! एखाद्या सेलिब्रिटी चं निधन होणं आपण बऱ्याचदा ऐकतो हळहळतो. पण काही काळाने परत जगराहाटीला सुरुवात करतो. पण यावेळी असं होत नाहीये. त्याचं जाणं पचवता येत नाहीये, असं का होत असावं? मी खूप विचार केला तेव्हा जाणवलं की तो ऍक्टर असून इतकी नैसर्गिक acting करायचा की त्या वेळपर्यंत आपण विसरायचो की हे एक नाट्य आहे. चेहऱ्याची रेष न रेष बोलायची त्याच्या. तो जाण्याचं खूप वैयक्तिक दुःख झालंय. आता एक एक करून पुन्हा त्याचे सगळे चित्रपट पाहत आहे, की जणू त्याद्वारे तरी तो पुन्हा भेटावा. त्याच्यात काहीतरी प्रचंड आकर्षून घेणारं होतं जेणेकरून कुणीही त्याच्याकडे दुर्लक्ष करूच शकत नसे.
आजच lunchbox पाहिला पुन्हा. किती कमी संवाद आहेत त्याचे पण काय जबरदस्त प्रभाव पडतो त्याचा. देवाने त्याला दीर्घायुष्य द्यायला हवं होतं...
Submitted by सान्वी on 4 May, 2020 - 23:23

खानावळीत अनेक खान होते/ आहेत...

त्यातील सर्वात चांगला खान होता हा
Submitted by सुबोध खरे on 4 May, 2020 - 23:50

लेख छान. सान्वीशी सहमत. काल कुठल्यातरी वाहिनी वर त्याचा करीब करीब सिंगल लागला होता. एरवी मी कितीदाही पाहू शकायचे. आता बघू शकत नाही इतके उदास वाटते आहे.
मागच्या आठवड्यात एपिक वर आमच्या लहानपणीच्या 'जय हनुमान' शो मध्ये ऋषी वाल्मिकीच्या छोट्या रोलमध्ये पाहिले तेव्हा पुन्हा एकदा त्याचा संघर्ष लक्षात आला होता प्रकर्षाने !! त्याचे यश पाहून सकारात्मक व आशावादी वाटायचे एकुण आयुष्याबद्दल. पण नाही घात झालाच.. Sad
Cannot move on.....
Submitted by आदिश्री on 5 May, 2020 - 00:10

त्याचा चित्रपट बघण्याची हिम्मत होत नाहीये अजून. न बघितलेले आणि बघितलेलेही सगळे चित्रपट नंतर बघणार. छान लिहिलंय, फक्त 'तू एक परफेक्ट माणूस होतास', 'डोळ्यात पाणी आणलंस', असं केलंत तर बरं होईल.
Submitted by चंपा on 5 May, 2020 - 02:07

छान लेख! लंचबॉक्सचा उल्लेख कसा नाही? लंचबॉक्स साठी नोलनचा इंटरस्टेलर नाकारला होता इरफानने!
Submitted by जिज्ञासा on 5 May, 2020 - 08:29

हासील चा उल्लेख नाहीय... तो अक्षरशः गाजवला इरफान च्या डायलॉग नि.... मला अक्खी मुवि पाठ आहे...
और जान से मार देना बेटा, हम रह गये ना, मारने में देर नहीं लगायेंगे,भगवान कसम...
बादवे मी फॅन झालो ते रोग चित्रपटापासून...
Submitted by च्रप्स on 5 May, 2020 - 08:44

सर्व प्रतिसादकांचे धन्यवाद. काही बदल केले आहेत.
खरं सांगायला गेलं, तर हा लेख अजूनही अर्धवट आहे. यात अजून जसं सुचेल, तसं ऍड करत जाईल.
एखादी जवळची व्यक्ती सोडून जावं, दुःखावेग ओसारावा, मात्र आठवणी येत राहाव्यात अशी माझी अवस्था झालीये.
लंचबॉक्स, येस्सस्स... उल्लेख कसा राहिला माझं मलाच कळलं नाही. करतो अपडेट..
Submitted by अज्ञातवासी on 5 May, 2020 - 08:45

छान लिहिलंय. नॉकआऊट आणि जझबा मधल्या भूमिकाही मला आवडल्या होत्या.
Submitted by आगबबूला on 5 May, 2020 - 08:46

इरफान खान, एक मनस्वी अभिनेता. जी भूमिका करायचा ती अक्षरशः जगत असे. मी पिकू १५ ते २० वेळा पाह्यलाय. माझ्या कॉम्प्युटर वर सेव्ह करून ठेवलाय. अजूनही पहावासा वाटतो. अर्थात त्या पिक्चर मधले सगळेच आवडतात मला. पण नॅचरल अॅक्टिंग इरफान मध्ये उपजतच आहे असं वाटतं. आता त्याचा नवीन पिक्चर येणार नाही हे अजून गळी उतरत नाहीये.
Submitted by धनुडी on 5 May, 2020 - 09:39

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बाकी ईरफान गेलाय खरेच हे अजूनही पटत नाही. आतवर पोहोचलेच नाहीये.
पुढचा काही काळ आता त्याचा कुठलाच नवीन पिक्चर येणार नाही तेव्हा ही जाणीव हळूहळू घर करणार.. त्याचे कुठले पिक्चर पाहिले नसतील ते तेव्हासाठी राहू द्यावे असे वाटते.

नुकतेच तो जायच्या आधी या लॉकडाऊनमध्ये त्याचा ब्लॅकमेल पाहिला होता. छान वाटलेला. ईरफान टच आहे. जरूर बघा.

Submitted by ऋन्मेऽऽष on 5 May, 2020 - 01:48

छान लिहिलंय. एका फिल्म अ‍ॅक्टरच्या जाण्याने इतकं दु:ख होईल असं खरंच वाटलं नव्हतं.
ॠषी कपूरच्या जाण्याने पण इतकं दु:ख झालं नाही तेवढं इरफान खान मुळे झालं.

सुंदर लेखन..

इरफानचे अजून खूप काही द्यायचे बाकी होते..!

पुन्हा तुलना सुरु
दुःख असंं पारड्यात टाकून तोलता येत का ?>> हे माझ्या प्रतिसादावर आहे का?
मी आधीचे प्रतिसाद वाचले नाहीत. मला जे मनाला वाटलं ते लिहिलं. तुलना वैगेरे काही नाही.

इरफानचे अजून खूप काही द्यायचे बाकी होते..! >>>> +१११११ आणि आपण खूप पहायचे बाकी होते.
तिकडचे प्रतिसाद इकडे लेखात टाकले हे बरं केलेत.

कालच हिंदी मीडियम पुन्हा बघितला. २० वी तरी वेळ असेल.
पण यावेळी इरफानने सगळ्यात जास्त इमोशनल केलं.
पुन्हा इरफान आपल्यात नाहीये, ही जाणीव आणखी गहरी झाली.
_/\_

आताच संपूर्ण कुटुंबासोबत मदारी बघितला. म्हणजे मीच बघत होतो, पण हळूहळू सगळे जॉईन झाले.
सुन्न व्हायला झालं सगळ्यांना.
अजून खूप आयुष्य हवं होतं या माणसाला... अजून खूप काही दिलं असतं त्याने...

द लंचबॉक्स, तुझ्या कारकीर्दीला कळस चढवला या चित्रपटाने. ~~+111111 खूपच सुंदर चित्रपट.. नवाजुद्दीन आणि इरफान ..दोघेही अत्यंत आवडते आणि अमेझिंग स्टोरीलाईन .. कितीही वेळा पाहू शकते मी हा मूव्ही. सेम विथ पिकू .. खरच काही काही माणसं इतकी भारी असतात ..
खूपच वाईट वाटतय त्याच्या जाण्याचं.. सगळं अर्धवट सोडून.. काल पिकू मधली गाणी बघताना खूप भरून आलं.. विश्वास नाही ठेवावा वाटत .. we miss u Irrfan.. miss u so much.. Sad

इरफानचे अजून खूप काही द्यायचे बाकी होते..!
लेख आवडला ~~+11111111

आताच संपूर्ण कुटुंबासोबत मदारी बघितला. म्हणजे मीच बघत होतो, पण हळूहळू सगळे जॉईन झाले.
सुन्न व्हायला झालं सगळ्यांना.
अजून खूप आयुष्य हवं होतं या माणसाला... अजून खूप काही दिलं असतं त्याने...>>>>मदारी मधील मासूम सा गाणे या वेळी त्याच्याशी खुप रीलेट होतेय असे वाटते..
इतके दिवस झाले त्याला जावून, पण अजुनही त्याला मिस करतेय. त्याच्याच फिल्म मधून त्याला शोधतेय.
तु ये इरफान... ह्या कचकड्यान्च्या बाहुल्या आणि तोंड वेंगाडण्याला अभिनय म्हणणार्यांमध्ये आम्हाला गरज आहे तुझी...
आम्हाला नाच-गाणे करनारा हीरो नाही तर साधा सरळ मध्यमवर्गीय दिसणारा, मध्यमवर्गीय प्रश्न असणारा, मध्यमवर्गीय राहणारा आमच्यासारखाच माणूस पडद्यावर बघायचा आहे. तु ये इरफान.... प्लीज ये.. Sad

मेरे आस पास था मासुम सा....