जिंदगी फिर भी.....

Submitted by ज्येष्ठागौरी on 4 May, 2020 - 07:15

जिंदगी फिर भी....

लेकीची नुकतीच एक मोठी( सत्व )परीक्षा झाली त्यात ती उत्तीर्णही झाली आणि द्विपदवीधरही झाली आणि अगदी नजीकच्या भविष्यकाळात काही काळ शिकायचा मनसुबा नसल्याचं तिनं जाहीर केल्यावर मी जरा मऊ(!) आवाजात तिला विनंती केली की तिनं आता तिची खोली आवरावी. म्हणजे तसा पसारा म्हणला तर फक्त पुस्तकं आणि वह्या आणि कागद , तिच्या वळणदार अगदी सुंदर अक्षरात लिहिलेली टिपणं आणि वह्या, पण गेल्या आठ वर्षात एक चिटोराही तिनं फेकला नाही किंवा फेकू दिला नाही.तिच्या या प्रचंड विश्वाला हात घालण्याचं धाडस मी आणि तिच्या बाबानं केलं,आतापर्यंत मुलांची खाजगीपण जपायचं म्हणून,कुठल्याही कपाटाला कुलूप नसताना ,एक नियम म्हणून मुलांचं कपाट आवरायचं ते त्यांच्या समोर असं ठरवलं होतं,आत्ताही तेच करत होतो.इयत्ता आठवीचं फ्रेंचचं पुस्तक,choir चं नोटेशन,राधिकानी दिलेली कंपासबॉक्स पासून gray's anatomy पर्यंत अनंत वस्तू या सागरात होत्या.पहिला दिवस तिनं आमची परीक्षा पाहिली मग हे तिच्या मनुष्य प्रयत्नांच्या पलीकडे आहे आणि आम्ही तिला दाखवल्याशिवाय काही टाकणार नाही हे जाणवून तिनं आम्हाला मुभा दिली आणि कामाचा आवाका,तीन दिवस,चार (कामचुकार)मजूर ह्या काळ काम वेगाच्या गणितासारखं काही काळानंतर खूपशी न लागणारी गर्दी कमी झाली ,कागद बारीक तुकडे करुन, कोरे कागद अगदी मध्यमवर्गीय आपलेपणानी बाजूला काढून आणि पेनं, पेन्सिली रबर यांचे मालक बदलून, आम्ही ते शिवधनुष्य पेललं म्हणा आणि आमच्या घरानी मोकळा श्वास घेतला.तिच्या याच खोलीत तिला तिच्या अभ्यासक्रमासाठी (भौतिकोपचार~physiotherapy) लागणारा हाडांचा सापळा,कवटीसहित टेबलावर काही काळ मांडून ठेवला होता,हाडं वेगवेगळी होती. पहिल्या दिवशीच काम करणाऱ्या आमच्या अनिताला हिव भरायची वेळ आली होती.नंतर आम्हालाही त्या कवटीची सवय झाली आणि पहिल्या वर्षानंतर तो बॅगेत गडप झाला आणि नंतर पुढच्या batch च्या मैत्रिणीला गेला.जसा आला तसा गेला पुढे.गेले आठ वर्षात साठवलेले,उपयोगी पडलेले,उपयोगी न पडलेले,आवडलेले,न आवडलेले तिचे शिक्षणाचे, कॉलेजचे,मैत्रिणींशी गप्पांचे,हसण्याचे,ताणाचे शिक्षकांचे,मैत्रिणींचे, रात्रभर अभ्यासाचे (याला बोली भाषेत नाईट मारणे म्हणतात)पाठांतराचे (रट्टा मारणे)आशेचे, निराशेचे,अपेक्षांचे क्षण तिच्या समोरुन हातातून डोळ्यासमोरुन निघून गेल्याचं दुःख स्पष्टपणे दिसत होतं.मधूनच काहीतरी अचानक सापडल्याचा आनंदही होत होता.पण एकंदर खूप पसारा बाळगल्याचा पश्चाताप झाला असं या घडीला तरी वाटलं.मुळात तिची वृत्ती संचयी आहे,बांधिलकी मानणारी आहे आणि प्रामाणिक आहे. तिच्या अभ्यासक्रमात पुढे काहीही लागू शकतं या काळजीपायी साठवलेला हा खजिना रिकामा करताना तिला यातना झाल्या.पण एक धडा जरुर मिळाला की एवढा संचय आवश्यक नाही. असो.जाता जाता एक मजेशीर गोष्ट, माझ्या ऑफिसजवळ एक बंगला आहे त्याचं नावच पसारा आहे.(ही टेप नाही)माझा नवरा म्हणतो तो पिसारा असणार पण ते नक्की पसारा आहे असं माझं मत आहे.आणि तसं असेल तर इतका प्रांजळ नाव दुसरं नाही घराला. पाय पसरून मोकळेपणाने गप्पा मारत असलेल्या एकत्र कुटुंबाचं चित्र उभं राहिलं डोळ्यासमोर.पण मुलगीच कशाला ,मीसुद्धा जराही हयगय न करता किती संग्रह केलाय. कपड्यांचा,दागिन्यांचा,पुस्तकांचा,भांड्यांचा, झाडांचा,लेखन साहित्याचा, ई मेल्सचा, माणसांचा , पिशव्यांचा, भावनांचा.या सगळ्याच गोष्टींनी मला खूप साथ दिली आहे,आनंद दिला आहे.समाधान दिलं आहे,सहवास दिला आहे आहे.खोटं कशाला बोला! एकंदरच आपल्याकडे भौतिक गोष्टींचा भरपूर साठा असेल तर श्रीमंती असं समीकरण आहे आणि काही वेळा परिस्थितीनुसार ते अगदी योग्य आहेच.पण मला आता मी किती अनावश्यक वस्तूंचा संग्रह करतीये हे गेल्या काही वर्षांत लक्षात येतंय. आता आवश्यक आणि अनावश्यक हे फार सापेक्ष आहे आणि विपश्यनेत शिकवतात तसं अनिश्च आहेच त्यामुळे माझ्याही बाबतीत, कधी आवश्यक असणारी गोष्ट ही अचानक अनावश्यक वाटू लागते आणि अनावश्यक वाटणारी गोष्ट उद्या आवश्यक वाटू शकते.म्हणजे लेकीने केलेल्या संचयाचं कारण परंपरागत असणार.असो !तर माझ्या भावनांच्या संग्रहापैकी अनावश्यक भावनांचा संग्रह हा त्यातलाच एक भाग आहे.मी काही लोकांबद्दल राग, असूया, द्वेष हे बाळगते का कधीतरी, हे तपासून पहायला हवं आणि तसं असेल तर त्याचाही निचरा व्हायला हवा आणि ही कृती वारंवार व्हायला हवी.हे आता जाणवतंय.आणि त्यातूनच एकंदरीत less is more हे फक्त मेकअप किंवा राहणीमानापुरतं मर्यादित नाही हे पटायला लागलंय बहुतेक बाबतीत.तसा चंगळवाद हा कायमच वाईट मानला गेलाय आणि सूक्ष्मवाद हा पूर्वीपासून आपल्याकडे होता,योग्य प्रमाणात अन्न रांधलं जायचं आणि ग्रहण केलं जायचं.काटकसरीने आणि निगुतीने संसार होत होते.अगदी सधन घरातसुद्धा ही अंगवळणी पडलेली चाल रीत होती. किंवा एक साधन म्हणूनही दागिन्यांकडे पाहिलं जायचं ,साध्य म्हणून नाही. खूप सतत उपलब्धता नसल्यामुळे जे साठवलं जायचं ते वेगळं,पण आता मी सगळं चोवीस गुणिले सात आणि तीनशे पासष्ठ दिवस बाजारात उपलब्ध आणि मिळणाऱ्या गोष्टीला मी तरीही माझ्या फ्रीजमध्ये दडपून ठेवते ही असुरक्षितता नाही तर काय.कोंड्याचा मांडा करणाऱ्या बायका होत्या माझ्या मागच्या पिढीत ,उत्तम परिस्थिती असूनसुद्धा अन्न वाया न जाऊ देणे किंवा आणलेल्या गोष्टीचा पुरेपूर वापर करणे हेच योग्य होते.सूक्ष्मवाद नेमके हेच सांगतो .Love the people and use the things and not otherwise..हे किती खरंय.
सुचूनी मागे एकदा मधुमेहाबद्दल बोलताना सांगितलं होतं की आपली मानवाची म्हणजे विशेषत आशिया खंडांतल्या लोकांची जनुके ही उपासमारीची आहेत त्यामुळे आता जेंव्हा आपण जेव्हा भरमसाठ खातोय ते साठवलं जातंय आणि त्यातून हे जीवनपध्द्तीचे आजार होताहेत. म्हणजे जगण्यापुरतं खाणं अर्थात minimalism हाच योग्य मार्ग आहे.ते ओंजळी एवढं सात्विक असावं असं प्राचीन शास्त्र सांगतं.तेही सूक्ष्मवादाशी तंतोतंत जुळणारं आहे.वस्त्र एक कटीवर एक काठीवर ,हा जमाना गेलाय खरा पण त्यातला आशय आता माझ्या लक्षात यायला लागलाय.आसक्ती थांबलेली नाही, पण ही आसक्ती आहे ही जाणीव व्हायला लागलीये हेही नसे थोडके.अजूनही दोन कपडे घेतले की दोन द्यावे अशी आदर्श परिस्थती आली नसती तरी एक देण्यापर्यंत मजल आहे.
सूक्ष्मवादाकडे जायची वाट खडतर आहे.त्याचं पहिलं पाऊल म्हणजे Declutter अर्थात अनावश्यक वस्तूंचा त्याग.
मेरी कोंडो नावाच्या जपानी, फार छान बाई आहेत त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत"art of tidying up' किंवा "spark joy" अशा नावानी.आणखी त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे त्या सल्ला देतात घर कसं नीट नेटकं ठेवावं ह्याबाबत.एकूणच सध्या त्यांचं खूप कौतुक होतंय ते ऐकून मी त्यांचे व्हिडिओ क्लिप्स पाहिल्या.तर ती एक जपानी मुलगी आहे चटपटीत. अनावश्यक वस्तू कशा दूर कराव्यात ह्याचं फार गोड विवेचन ती करते.ती वस्तूंचं कपडे, पुस्तकं, कागदपत्रं, संकीर्ण (जसे इलेक्ट्रॉनिक वस्तू वायरी वगैरे)आणि भावनिक गुंतवणूक असलेल्या गोष्टी अशा पाच तत्वात वर्गीकरण करते.मेरी कोंडो प्रथम एकेक वर्गीकरण केलेली गोष्ट उदा कपडे, सर्व कपडे एकत्र आणून त्यातले न वापरले जाणारे,न होणारे,बाजूला ठेवले जातात ,मेरी कोंडो विचारते की "does it spark joy?एखादी गोष्ट तुम्हाला आनंद देते का,याचं उत्तर होकारार्थी असेल तर ती वस्तू ठेवायची आणि नसेल तर बाजूला काढायची.ती बाजूला काढण्याआधी तिला मनापासून धन्यवाद म्हणायचं कारण त्या वस्तूंनी आपली सेवा केलेली असते.सगळ्यात अवघड पाचवी पायरी आहे ती म्हणजे भावनिक गुंतवणूक असलेल्या गोष्टी,यापासून स्वतःला दूर करणं फार मुश्किल. म्हणून हे काम सगळ्यात शेवटी करायचं असंही मेरी कोंडो म्हणते.
तिच्या पुस्तकाला प्रतिसाद म्हणून घरातल्या गोष्टींचा आढावा घेतला आणि खरंच खूप गोष्टी निघाल्या ज्या वर्षानुवर्षं मी वापरत नव्हते आणि देतही नव्हते त्यामुळे दुसऱ्याला वापरायला दिले जात नव्हते. त्यात अनावश्यक मेल्स काढून टाकणं हेही आलं,त्यातून ऊर्जा वाचवली जाते असं वाचलंय.किंडल आणल्यामुळे काही पुस्तकं निघाली ज्यांना अलग करणं शक्य झालं पण तरीही माझ्या लाडक्या मराठी पुस्तकांना निरोप देणं मला माझी 'बस की बात' वाटली नाही.झाडं तर जिवंत आहेत त्यांना कसं सोडू?पण तरीही ही जाणीव नक्की आली की आता साठवायचं नाही तर आवरायचं, बेतात रहायचं,आणि जी वस्तू बाजूला करायची तिला सन्मानपूर्वक निरोप द्यायचा.कृतज्ञ राहून तिला पुढं जाऊ द्यायचं.असुरक्षित वाटण्याची भावना मागे टाकून, वापरात नसलेल्या वस्तू, वास्तवातल्या किंवा आभासी दोन्ही.
संग्रह केलेली गोष्ट त्या त्या वेळी उपयोग ,आनंद, सोय, समृद्धी, समाधान तर देतेच पण त्याबरोबर एक काहीतरी मिळवल्याचा आनंदही देते.आपला अहं सुखावणारी भावना त्यात असतेच असते.पण त्या संग्रहाच्या पलीकडे एक निर्मोही भावना असते म्हणजे असायला हवी, संग्रहाचं दडपण, किंवा त्याचा गर्व ,दंभ नको पण लक्षात येत नाही चटकन. निर्भेळ आनंद फार छोट्या गोष्टींमधून मिळतो.हे कळायला फार काळ जातो पण कधीतरी ते उमजतं, कधीतरी ते सत्यात येतं.पण येतं तेंव्हा लखलखीतपणे येतं.
पाँव सूखे हुए पत्तों पर अदब से रखना
धूप में माँगी थी तुमने पनाह इनसे कभी
मला ऋचाबरोबर आवराआवरी करताना नेमक्या ह्या जीवघेण्या ओळी आठवल्या आणि हे आवरणं तिला का अवघड जात होतं ते समजलं.आणि त्याबरोबर हेही समजलं की जगण्यात आनंदाच्या छोट्या छोट्या खिडक्या असतात.संचय करण्यात आनंद जरुर आहे पण चिरकाल टिकणारा आनंद छोट्या गोष्टींमध्ये असतो. संचयामध्ये रेंगाळणं हा काही गुन्हा नाही.त्यात गुंतून पडणं किंवा गुंतागुंत होणं.विपश्यनेत सांगतात तसं "गांठे मत बांधो"तसं लेकीला सांगावंसं वाटलं ,सांगितलं पण तिचं तिला उमजलं तर जास्त बरोबर. वयानुसार आयुष्याच्या टप्प्यानुसार संचय होत राहणार, पण तरीही तो चांगला असावा.दहा स्वस्त गोष्टींपेक्षा एक मूल्यवान पण टिकाऊ गोष्टीचा ,चांगल्या शिक्षणाचा, विचारांचा, चांगल्या माणसांचा असावा. चांगल्या मूल्यांचा, बांधिलकीचा असावा.तो खूप लांबवर उपयोगी पडतो.साधं जगायला फार काही लागत नाही.आपल्या खिडकीतून दिसणारा आभाळाचा तुकडा हेच आपलं आकाश असतं.भौतिक गोष्टी काही काळ आनंद, मान जरुर देतात पण एखादं चांगलं पुस्तक,पातळ पोह्याचा चिवडा,माठातलं गार पाणी,काहीतरी सृजनात्मक,काही रचनात्मक घडणारं काम,आर डी बर्मनचं पाठीमागे चालू असणारं गाणं,मित्रमैत्रिणींची निर्विष चेष्टा मस्करी,सकाळच्या कोवळ्या उन्हाची तिरीप,चार पायाच्या दोस्तांची घसट, सुखाची व्याख्या आणि व्याप्ती यापलीकडे जात नाही,हे कळायला लागणारा विवेक जरा केस पिकायला लागल्यावर येतो.धावपळ करता करता ,संचय करता करता ,एका आयुष्यात सगळं करणं शक्य नाही हे एक क्षणी समजतं, पटतं आणि मग तो क्षण येतो,नीरव,संथ, उमजण्याचा,आणि गुलजा़रकाकांचे शब्द ,न बोलवता ,न राहवून आपली सोबत करत राहतात."थोडा है थोडे की जरुरत है,जिंदगी फिर भी यहां खूबसूरत है!"

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लेख आवडला. तुमच्या ऋचाला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा व अभिनंदन. Happy
अपरिग्रह ( अतिरिक्त संचय न करणे ) हा एक योगसुत्राचा नियम आहे. तो फक्त घर नीटनेटके ठेवण्यासाठीच नाही तर मनःशांतीसाठी सुद्धा आवश्यक आहे.

अतिशय छान लेख. प्रत्येक व्यक्तीला रिलेट करता येईल असा विषय आणि तो मांडलाही आहे उत्तम.

आम्ही दोघांनी दीड वर्षांपूर्वी Less is more ही आमची फॅमिली टॅग लाईन ठरवली आणि घराचं रिनोवेशन करताना प्रचंड वस्तुसंग्रह होता तो पहिल्यांदा कमी केला.मग घरातील फर्निचर आणि अतीव केलेलं डेकोरेशन बदलून टाकलं. आता घर सुटसुटीत आणि प्रशस्त दिसतं. बागही बरीच कमी केली आहे आणि आहे त्या झाडांवर पूर्ण लक्ष आणि वेळ देतो आहे. घराचं आणि फर्निचरचं फक्त उदाहरण दिलं, एकूणच जीवनशैली या टॅग लाईन प्रमाणे जगण्याचा प्रयत्न चालू आहे. अगदीच जमतं असं नाही पण प्रयत्न चालू आहे. पूर्वी मॉलमध्ये गेलं की खरेदी mandatory होती, ती सवय सुटते आहे. दहा गोष्टी आवडल्या तरी 2-3 उचलाव्यात इतपत कंट्रोल आला आहे. हे सगळं करताना मनाची तयारी आणि निग्रह करावा लागला होता, त्यामुळे मला तुमचा लेख विशेष आवडला.

लेख आवडला. आदिश्री व मीराचे प्रतिसाद ही छान आहेत. वस्तुंच्या बाबतीत जमलाय पण अनावश्यक भावनांचा निचरा करणं कठीण जातंय....

काही लोकांबद्दल राग, असूया, द्वेष हे बाळगते का कधीतरी, हे तपासून पहायला हवं आणि तसं असेल तर त्याचाही निचरा व्हायला हवा आणि ही कृती वारंवार व्हायला हवी.हे आता जाणवतंय. हे मला खूप आवडलं, पण कळतं पण वळत नाही सारखी गत आहे माझी.

अपरिग्रह पण खूपच आवश्यक आणि तितकाच अवघड आहे.

बघू, प्रयत्न करत रहायचं ठरवलं आहे.

लेख आवडला. तुमच्या ऋचाला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा व अभिनंदन. Happy
अपरिग्रह ( अतिरिक्त संचय न करणे ) हा एक योगसुत्राचा नियम आहे. तो फक्त घर नीटनेटके ठेवण्यासाठीच नाही तर मनःशांतीसाठी सुद्धा आवश्यक आहे.

Submitted by आदिश्री on 5 May, 2020 - 00:23
>>>>
+११११११

मलाही हल्ली विरक्तीचे झटके यायला लागले आहेत. असंख्य कात्रणे जमवायचा छंद होता. कित्येक वर्षे जमवत राहिलो. आता जरुरी पुरते ठेवायचे व बाकी काढून टाकायचे म्हणतो. पण हे जरुरी प्रकरण फार सापेक्ष आहे. कित्येक वर्षांचा जुना पत्रव्यवहार मी ठेवत आलेलो आहे. एखाद्याला पत्र पाठवले तर त्याची कार्बन प्रत माझ्याकडे ठेवतो.कधीतरी संदर्भ म्हणून उपयोगाला येतो. कधी कधी आयुष्यात आपणच आरोपी, आपणच फिर्यादी व आपणच न्यायाधीश असतो अशावेळी पुरावा म्हणुन ही कागदपत्रे उपयोगी पडतात. सामाजिक लेखनात तर कधी कधी आपल्याला निरोपयोगी असणारा कचरा इतरांसाठी संदर्भमूल्य असतो.अशी कागदपत्रे चिवडताना मी कधी कधी कालकुपीत जातो.अडकूनही बसतो.परत काळच बाहेर काढतो. वैराग्याचा झटका आला की 25-30 वर्षांपुर्वीची कागदपत्रे नष्ट करतो.त्या त्या काळाची ती अपत्ये असतात. आपण जीवापाड जपलेल्या गोष्टी इतरांसाठी कचरामूल्याच्या असतात हे माहित असूनही आपण त्या आपल्या अस्तित्वासाठी जपत राहतो.आताच्या डिजिटल युगात मी काही कागदपत्रांचे/ पुस्तकांचे डिजिटायझेशन केले आहे. पण मूळ फेकवत नाहीत. आता आवरायला हवं. तुम्ही मेलात की तुमच्यासाठी जग बुडाल.मग ते ओझे इतरांसाठी. संदर्भमूल्यावरुन आठवल की उपक्रमावर मी ज्योतिषाच्या माझ्या पुस्तकाची लेखमाला लिहित होतो. त्यात एक संदर्भ साप्ताहिक सकाळ 1989 चा होता. मी तो लिहून ठेवला होता. पुस्तक लिहिताना तो लिहिला होता. उपक्रमाचे वाचक चिकित्सक. किस पाडणारे. कुणी मागितलाच तर तयार ठेवा म्ह्णुन कागदपत्रे शोधू लागलो. मूळ तो लेख मला सापडलाच नाही. . त्यावेळी मी तो अंक उगीच सारखे पैसे का खर्च करा म्ह्णुन घेतला नव्हता असे लक्षात आले.मग अस्वस्थ झालो. लगेच सकाळ कार्यालय गाठले. तिथे तो त्यांच्या ग्रंथालयात मिळाला. त्यांच्या नियमानुसार प्रतिवर्षी असलेल्या संदर्भ फी नुसार काहीतरी 110 रुपये भरले व त्या लेखाची झेरॉक्स मिळवली. त्यावेळी वाचवलेले चार रुपये वसूल झाले.पण शांत झोप लागली. पुढे तो कोणी पुरावा म्हणून मागितलाच नाही ही गोष्ट वेगळी. असो आता मात्र आवरलच पाहिजे.नाहीतर अडकून बसायचो कलकुपीत. बास झाल आता.

सर्वांना धन्यवाद,मी मायबोलीवर प्रथमच लिहीत असल्यामुळे, मला अजून प्रत्येकाला वैयक्तिक धन्यवाद/प्रतिसाद कसा द्यावा ह्याची कल्पना नाही.पण आपण सर्वांना लेखन आवडलं त्यामुळे हुरुप नक्की वाढला.

सर्वप्रथम अतिशय सुरेख लेखाबद्दल अभिनंदन आणि आभार. या लेखातील सर्वात आवडलेली गोष्ट म्हणजे अनुभवावर आधारलेले लेखन. मी अनेकदा विद्यापीठांमध्ये ऐकतो तशी ही शूष्क चर्चा नाही, तुम्हाला काही तत्त्वं आपल्या आयुष्यात प्रत्यक्षात आणण्याची तळमळ आहे आणि त्यासाठी तुम्ही जी धडपड करता आहात ती तुमच्या लेखनात जाणवते आहे.

माझा हा प्रतिसाद प्रदीर्घ होण्याची शक्यता आहे. ते तुम्हाला गैर वाटणार नाही अशी अपेक्षा आहे. तसे वाटल्यास आधीच क्षमा मागतो. हा प्रतिसाद तुमच्या लेखनातील विचारांना दिलेला प्रतिसाद तर आहेच पण मला काय वाटते ते मलाच जाणून घेण्याच्या इच्छेनेही केलेले हे लेखन आहे. सर्वप्रथम मला तुमच्या लेखातील मूळ विचार पटतो आणि अगदी छोट्या स्तरावर मी देखिल हा विचार प्रत्यक्ष आयुष्यात आणण्यासाठी प्रयत्न करीत असतो हे येथे मला नमुद करावेसे वाटते. कारण काही अनुभवांची चर्चा मला करायची आहे आणि त्यावर इतरांची मतेही जाणून घ्यायची आहेत.

पातंजल योगसूत्रात अपरिग्रहाचा विचार यम नियमातील पहिल्या पाच यमांमध्ये केलेला आहे. आणि योगातील हा भाग अगदी पहिल्या पायरीवर येतो. योगसूत्राची ही विशिष्ट जीवनपद्धती अंगिकारणे हे त्या अष्टांगमार्गात आवश्यकच आहे. अनेकदा आपल्या प्राचीन शास्त्रांमध्ये एखाद्या मार्गावर चालण्याचा अधिकारी कोण याची चर्चा केलेली आढळते. पूर्वी ही चर्चा मला अनाठायी वाटायची. आता मात्र त्यामागील तत्त्व पटतं. एखादी जीवनशैली अंगिकारण्यासाठी काही विशिष्ट पात्रता अंगी यावी लागते असं आता वाटु लागलं आहे. म्हणूनच काही मार्गांमध्ये ऐहीक अशा सर्व इच्छापूर्ण झाल्यावर ब्रह्मजिज्ञासेकडे वळण्याची शिफारस केली आपल्या. चार आश्रमांमध्ये संन्यास आणि वानप्रस्थ हे गृहस्थाश्रमानंतर असण्याचे इंगितही हेच असणार.

माझी समस्या अशी आहे की मूळात आपण एकटे नसतो, एकटे राहात नाही. त्यामुळे एखादी जीवनपद्धती स्विकारण्यासाठी आपण अगदीच मोकळे नसतो. आपल्या निर्णयाचा इतरांचा आयुष्यावर अपरिहार्यपणे परिणाम होत असतो आणि मग आतून अपरिहार्य असा संघर्ष सुरु होतो. हा संघर्ष फार मोठ्या लोकांच्या आयुष्यात मी पाहिला आहे. याची तड लागणे गरजेचे असते अन्यथा जीनवातला आनंद निघून जातो. जीवनशैली अंगिकारायची ती सुख, समाधान, शांतता मिळविणासाठी आणि नेमकं त्यामुळेच असलेली शांतताही गमावून बसायची असा हा तिढा असतो. जेथे समजूतदार माणसे असतात, जेथे कमीतकमी दुसर्‍याचे विचार समजून घेण्याची किमान इच्छा असते तेथे या गोष्टी काही अंशी सोप्या झालेल्या असतात. पण अनेक घरांमध्ये तसे होत नाही.

एकदा एका मोठ्या माणसाचं पुस्तक वाचलं होतं. त्यात त्यांने स्वतःचा मृत्युच्या जवळ जाण्याचा अनुभव वर्णन केला होता आणि त्यातून वाचल्यावर आयुष्याला जी जबरदस्त सकारात्मक कलाटणी मिळाली त्याबद्दल लिहिले होते. त्यांचे म्हणणे असे होते की माणसाला केव्हातरी मृत्यु दिसावा म्हणजे त्याच्या आयुष्याला कलाटणी मिळते. मला तेव्हाही ही बाब फारशी पटली नव्हती आणि आता इतक्यावर्षानंतर व्यसनमुक्ती क्षेत्रात काही वर्षे घालवल्यावर तर तो मला अतिशय भाबडा आशावाद वाटतो. नुसता मृत्यु दिसला असे नव्हे तर मृत्युच्या दारात उभी राहिलेली माणसे स्वभावातला धूर्तपणा पुरेपूर टिकवून धरलेली पाहिली आहेत. जेव्हा तुम्ही अशा माणसांच्या सहवासात असता तेव्हा काही विशिष्ट गोष्टी या फार म्हणजे फारच वैयक्तीक पातळीवर अंगिकारता येतात, अन्यथा ती गोष्ट करताना दुसर्‍याला दुखवावे लागते. म्हणजे ती गोष्ट केल्याचे समाधान नाहिसेच होते.

दुसरा मुद्दा हा संतोषाचा आहे. तुमची घडण ही बर्‍याच अंशी तुमचे बालपण, शिक्षण, तुमची जडणघडण कशी झाली कुणी केली यावर अवलंबून असते. याउपर मी जगत राहावे, मला पुरेसे मिळावे, मला पुरेसे मिळेल कि नाही? याबद्दलची असुरक्षितता ही तर मला जीवनातली एक प्राथमिक स्वरुपाची प्रेरणा वाटते. जे मंडळी विचार करून त्या प्रेरणांवर स्वार होतात ती काही अंशी वेगळ्या वाटेने जाण्याचा विचार करु लागतात. पण बाकीचे बहुतेक वेळा त्यातच कायमचे अडकून पडलेले असतात. या लॉकडाऊनच्या काळात देखिल विशिष्ट प्रकारचे बिस्किटच हवे, कुठलेही फळ चालणार नाही सफरचंदच हवे, असा आग्रह धरून घरातील तरुणांना कोरोनाची पर्वा न करता वारंवार बाहेर पिटाळणारे ज्येष्ठ नागरिक मला ठावूक आहेत. निदान मुंबईत तरी मी तहानेने व्याकूळ होऊन कुणाचा मृत्यु झाल्याचं ऐकलेलं नाही. पण पाणी येणार नाही अशी आवई उठताच घरातील बारीकसारीक भांडी भरून पाण्याचा साठा करणारी माणसे पाहिली आहेत. अशांबरोबर राहताना सूक्ष्म जीवनपद्धती कशी अंगिकारता येईल हेही पाहावे लागेल.

असे असताना मग पूर्वीच्या संन्यासमार्गाचे इंगित कळते. पाश तोडल्यावरच काही मार्ग स्विकारता येतात. हातापायत बेड्या असल्या तर कठीण जाते. हे झालं हेकट माणसांच्या बाबतीत. पण प्रेमाच्या माणसांना दुखावूनही अशा तर्‍हेचे मार्ग स्विकारणे हे कितपत शक्य आहे याचाही विचार करावा लागेल. थोडक्यात काय तर सर्वच माणसे वयाच्या कुठल्याही टप्प्यावर गंभीर विचार करून आपल्या आयुष्यात प्रत्यक्ष बदल करु लागतील याची शाश्वती नसते. आपण एकट्याने असे बदल करणे नेहेमीच शक्य नसते. कोण कुठल्यावेळी यात सोबतीला येईल आणि कोण सतत अडचणी आणून मार्ग अडवून धरेल याबद्दल काहीही सांगता येत नाही. जीवनाचं स्वरुपच अशा तर्‍हेच्या गुढांनी भरलेलं आहे अशी माझी नम्र समजूत आहे.

छान लेख आहे.
माझी समस्या अशी आहे की मूळात आपण एकटे नसतो, एकटे राहात नाही. त्यामुळे एखादी जीवनपद्धती स्विकारण्यासाठी आपण अगदीच मोकळे नसतो. आप्ल्या निर्णयाचा इतरांचा आयुष्यावर अपरिहार्यपणे परिणाम होत असतो आणि मग आतून अपरिहार्य असा संघर्ष सुरु होतो. >> अतुलजींचं म्हणणं पटलं. असा अनुभव फार वेळा घेतला आहे. विशेषतः बरोबरीच्या लोकांत आपल्या साध्या राहणीमानाची काही वेळा अवहेलना होते, तर काही वेळा 'रसिक नाही' अशी संभावना होऊ शकते. गरज व हव्यास यांच्यामधील फरक नेहमी कळतोच असे नाही. किंबहुना कळपातील एक म्हणून जगण्याचं अमान्य करणं हे कठीणच आहे.

लेख खूप छान, आवडला...
Love the people and use the things and not otherwise..हे किती खरंय.>>> हे वाक्य खरंच खूप आवडलं!!!