आज उमलली कळी लाजरी

Submitted by निशिकांत on 4 May, 2020 - 00:02

मंद हवेच्या झोक्यावरती
मीत मनीचे गुणगुणले मी
आज उमलली कळी लाजरी
गोड अनुभुती, शिरशिरले मी

गेले असता भल्या पहाटे
फुले वेचण्या प्राजक्ताची
गंध घेउनी झुळूक येता
सळसळली पाने झाडाची
अंगावरती टपटपलेल्या
दवबिंदूंनी थरथरले मी
आज उमलली कळी लाजरी
गोड अनुभुती, शिरशिरले मी

चिउकाऊच्या गोष्टी सरल्या
स्वप्न गुलाबी पडू लागले
गोंधळ सारा किती अनामिक !
भाव आगळे मनी जागले
"तारुण्याशी हात मिळव तू"
कानी माझ्या कुजबुजले मी
आज उमलली कळी लाजरी
गोड अनुभुती, शिरशिरले मी

मला न कळले काय जाहले
कुठे तरी मन हरवुन असते
आरशात मी बघता बघता
कारण नसता गाली हसते
बिंब सांगते हळूच कानी
किती अताशा रसरसले मी
आज उमलली कळी लाजरी
गोड अनुभुती, शिरशिरले मी

मधाळ नजरा पुन्हा पुन्हा का
वळून माझ्यावरती पडती?
जणू वादळी सापडलेली
मी मिणमिणती असाह्य पणती
मुक्त बालपण कुठे हरवले?
लाख बंधने, हिरमुसले मी
आज उमलली कळी लाजरी
गोड अनुभुती, शिरशिरले मी

भावी युवराजाच्या स्वप्नी
रोमांचित मी झाले कणकण
इंद्रधनूचे चित्र रेखता
सुखावले अंतरी, तरी पण
मातपित्यांना कसे मुकावे !
उशीत रात्री मुसमुसले मी
आज उमलली कळी लाजरी
गोड अनुभुती, शिरशिरले मी

तरुण्याच्या उंबरठ्यावर पाय ठेवताना मुलीच्या मनात येणारे स्त्रीसुलभ भाव चितारण्याचा प्रयत्न केला आहे.

निशिकांत देशपांडे मो.क्र. ९८९०७ ९९०२३

Group content visibility: 
Public - accessible to all site users