तो सध्या काय करतो

Submitted by सुरेखा कुलकर्णी on 3 May, 2020 - 11:12

तो सध्या काय करतो

"ती सध्या काय करते" ह्याच्यावर मैत्रीणींमध्ये जोरदार चर्चा चालू होती. अंजलीचं चहापाणी नाश्ता वगैरेचं काम चालू होतं. आज बर्याच दिवसांनी सगळ्या जुन्या मैत्रीणी जमल्या होत्या. चर्चेला उधाण आलं होतं. वेगवेगळ्या विषयावर चर्चा करणं, एखाद्या विषयाची खिल्ली उडवणं, तरूणपणी केलेले प्रताप, हसणं, खिदळणं असं चालू होतं. आणि गाडी आता एकदम "ती सध्या काय करते" ह्या चित्रपटावर येऊन थांबली होती. त्यांचा एकच सूर होता. प्रत्येकवेळी पुरुषालाच का मुभा?' त्याच्या आयुष्यात आलेल्या पहिल्या स्त्रीविषयी तो विचार करू शकतो पण असा विचार का नाही की स्त्रीच्या आयुष्यातही एखादा पुरुष येऊ शकतो . ती सुद्धा "तो सध्या काय करतो" असा विचार करू शकते. पण तिला उघड बोलायची सोय नाही. असं का?.
सध्या तिला निवांत वेळ होता. ती नुकतीच रिटायर झाली होती. दोन्ही मुलींचे लग्न झाले होते. नवरा चार वर्षापूर्वीच रिटायर झाला होता. पण घरात बसून काय करायचे म्हणून एका कंपनीत काम करीत होता. काम घरूनच होते पण महिन्यातून एक दिवस हेड ऑफीसला जावे लागे. आज तो हेड ऑफीसला गेला होता त्यामुळे आजचा दिवस तिचा होता. तिने ठरवले होते आता निवांत वेळ आहे तर खूप मौज करून घ्यायची, खूप फिरायचे, तिने सगळ्या जुन्या मैत्रीणी जमवल्या होत्या. एक दोन कोर्सेस जॉईन केले होते. किट्टी पार्टी, गेटटुगेदर, खरेदी, जुन्या मैत्रीणी, ह्यामध्ये ती रमून गेली होती. पण एक आठवण मात्र सारखी डोकं वर काढायची जी ती कुणालाही सांगू शकत नव्हती." खरंच काय करत असेल तो?." "एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही भेटं" असं झालं होतं अंजलीचं मन सैरभैर झाले. हास्यविनोदात दिवस गेला खरा पंण सगळ्याजणी गेल्या आणि डोक्यात विचारांची भ्रमंती सुरू झाली.
अंजलीला तीन मावशा आणि एक मामा तिचे आईबाबा, ती, तिच्या दोन मोठ्या मावशा, मामा सगळे पुण्यातच होते. सगळ्यात लहान मावशी मात्र कोल्हापूरला दिली होती. काही कार्य असले की तीच यायची. आणि कुणाकडे काहीना काही कार्य असायचेच. त्यामुळे अंजलीला पुणं सोडून कुठे जाण्याचा प्रश्नच नव्हता. तेंव्हा कोणी कारणाशिवाय प्रवास करीत नव्हते. तिचे एक काका आणि एक आत्त्याही पुण्यातच रहात होते. सुट्टी लागली कि सर्वांची मुलं थोडे थोडे दिवस सगळ्यांकडे रहायला जात. सुट्टी मजेत जाई. आता सगळेच मोठे झाले होते. कुणी शाळेत, कुणी कॉलेजला तर कुणी नौकरीला लागले होते. अंजलीचीही बारावीची परीक्षा झाली. एक महिना इकडे तिकडे रहाण्यात गेला. मे महिना होता. लहान मावशीच्या सुनेचे डोहाळजेवण होते. मामा मामी, मावशा सगळे जाणार होते. घरात आजीला सोडून आई जाऊ शकत नव्हती. म्हणून अंजलीला आई 'जा' म्हणाली. ती कोल्हापूरला कधीच गेली नव्हती. पुणं सोडून तिला कोल्हापूरला जायची इच्छा नव्हती. पण ती कंटाळली होती आणि दोनच दिवस जायचे होते म्हणून ती तयार झाली.
सगळे बसने निघाले. पोहोचायला संध्याकाळ झाली. पण मे महिना असल्यामुळे तसा भरपूर उजेड होता. सगळे घरी पोहोचले. दादा घ्यायला आला होता. दादा नेहमी येत असल्यामुळे ती त्याला ओळखत होती पण वहिनीला ती पहिल्यांदाच पहात होती. परीक्षा असल्यामुळे मुलं कुणीच लग्नाला जाऊ शकली नाहीत. मावशीचं घर मोठंहोतं. गेल्याबरोबर मोठं अंगण. बरीच फुलझाडं लावलेली. कोपर्यात एक लहान मोरी, तिथे पाय धुवायला पाणी ठेवलेले. जांभळाचं, जांबाचं झाड. बहरलेली जुई, कण्हेरी. चार पायर्या चढून गेलं की ओसरी, तिथे झोपाळा,एका बाजूला बैठकीची खोली, एका बाजूला माजघर, देवघर, आत मोठाल्या चार खोल्या. बाजूला एका खोलीत शेतातले धान्य, दुसर्या खोलीत आंबे पिकायला ठेवलेले. त्यानंतर मागचे अंगण. तिथेही भरपूर फुलांची झाडं. बाजूला एक न्हाणीघर, संडास, आणि तीन खोल्यात एक भाडेकरू. त्यात नवराबायको, आठवी नववीच्या दोन मुली एक पाचवीचा मुलगा एवढे रहात. बाजूला वर जायला जिना होता. वर एक मोठा हॉल आणि समोर गच्ची. एवढे मोठे घर बघून अंजलीचे डोळे विस्फारले. पुण्यात तशी सगळ्यांची घरं स्वतंत्र असली तरी लहानंच होती. सगळेच नौकरदार होते. कुणालाच शेती नसल्याने सगळं विकतचंच. त्यामुळे मावशीकडे शेती असल्यामुळे धान्य घरचंच, शेतात गायी असल्यामुळे दूधदुभतं भरपूर. तिला हे सगळंच नवीन होतं. मावशीचं एकत्र कुटुंब होतं. तिचे दीर जाउ आणि त्यांची दोन मुलं. मोठा मुलगा प्रकाश नुकताच बी.कॉम झाला होता. धाकटी मुलगी वनिता नववीला. मावशीला एकच मुलगा. विलास.
रात्री सगळ्याची जेवण झाली. तिच्या वहिनीचा भाऊ म्हणजे विलासचा मेव्हणा रमेश आला. तो प्रकाशचा जिवलग मित्र. वहिनीचं माहेर जवळंच होतं. विलासचा प्रेमविवाह नव्हता पण ओळखीतली चांगली मुलगी म्हणून पैशाचा विचार न करता मागणी घालून करून घेतली होती. प्रकाश आणि रमेश एकाच शाळेत, एकाच वर्गात शिकले होते. दोघांनी बी.कॉमची नुकतीच परीक्षा दिली होती.
विलास आता थोडा मोकळा झाला होता. प्रकाश, विलास, रमेश, अंजली आणि वनिता असे सगळेजण वर हॉलमध्ये गेले. विलासने अंजलीची रमेशशी ओळख करून दिली. शेजारच्या भाडेकरूच्या सुमी नलीही गच्चीवर झोपायला आल्या. प्रकाश म्हणाला “चला आपण पत्ते खेळू”. अंजली एकदम खुश झाली. खाली मोठी माणसं गप्पा मारत बसली. दुसर्या दिवशी कार्यक्रमात दिवस गेला.चेष्टा मस्करी,गप्पा यामध्ये मस्त दिवस गेला. रात्री परत पत्त्याचा डाव रंगला. रमेश तिथेच राहिला. तो रोजच प्रकाशबरोबर गच्चीवर झोपायला येत असे. रमेश सकाळी उठून निघून गेला. आज एक दिवस राहून दुसर्या दिवशी सकळीच निघायचे होते. पण मावशीने मोठ्या मावशीला आग्रह केला. आली तशी महिनाभर रहावे असं मावशीचं म्हणणं होतं. मोठ्या मावशीच्या घरी मुलं सुना असल्यामुळे तशी अडचण नव्हती. ती तयार झाली. तिने अंजलीलाही आग्रह केला. प्रकाश वनिताही आग्रह करायला लागले. तिला घर माणसं सगळं खूप आवडले होते. ती तयार झाली. दोन दिवसासाठी पण यायला तयार नसणारी अंजली एक महिना रहायला तयार झाली.
दुसर्या दिवशी सकाळीच सगळे पुण्याला जायला निघाले. प्रकाश काही कामासाठी बाहेर गेला. रमेश आला नव्हता. तो परीक्षा झाल्याच्या दुसर्या दिवशी पासून बारा ते चार पार्ट टाईम नौकरी करीत होता. त्यांचे स्वतःचे छोटे घर होते पण वडिलांना नौकरी जेमतेमच होती मुलगी व घरचे लोक चांगले म्हणून पैशाकडे न पहाता मावशीकडच्यांनी वहिनीला करून घेतली होती. अंजली आज थोडीशी कंटाळली. तिला वाटले आपण उगीच राहिलो. रोज हे असेच असेल तर महिना कसा काढणार. पण तेवढ्यात नली, सुमी आल्या. वनिता होतीच. सगळ्याजणी वर हॉलमध्ये गेल्या आणि गप्पा मारत बसल्या. तिघी खूप गप्पा मारत होत्या आणि खूप हसत होत्या. अंजलीचा वेळ छान गेला. चार वाजता रमेश प्रकाश दोघेही आले. आल्याबरोबर प्रकाश म्हणाला,, " आज आपण नदीवर जाऊ या. सुमी नलीलाही घेऊन जाऊ." नदी जवळ म्हणजे चालत जाण्यासारखी होती. पाच वाजले होते. प्रकाश, रमेश, नली, सुमी, अंजली सगळे निघाले. मावशी म्हणाली, "आता तसे घरी काम नाही. आपणही जाऊ. तिथून तसेच मंदीरात जाऊन दर्शन घेऊन घरी येऊ". मग दोन्ही मावश्या, नली सुमीची आई, प्रकाशची आई ह्या पण निघाल्या. मावशीने सर्वांसाठी चिवडा घेतला. नदीजवळ वाळवंटात सगळे बसले. चिवडा वगैरे खाऊन झाला. नदीतही पाणी कमी होते. पाण्यातून चालायला बरे वाटत होते. त्या चौघीजणी मंदीरात गेल्या. मुलं सगळी वळवंटात गप्पा मारत बसली.
घरी आल्यावर रमेश त्याच्या घरी गेला. सगळ्यांची जेवणं झाली. रमेशही जेऊन आला. परत सगळे पत्ते खेळायला बसले. नंतर गच्चीवर झोपायला गेले. गच्ची खूप मोठी होती. सकाळी उठायची घाई नव्हती. अंजली खूप रमली. रमेश चार वाजता येई तो पर्यंत प्रकाश, वनिता नली सुमी यांच्याशी गप्पा चालत. प्रकाश नसेल तर त्या चौघी कॅरम खेळत. बघता बघता एक आठवडा झाला. आता रमेशची तिला खूप सवय झाली होती. ती नकळत चार वाजण्याची वाट पाहू लागली. तो आला की तिला खूप आनंद होई. पण एखाद्या दिवशी उशीर झाला तर ती बैचैन होत असे. तिचं खेळात लक्ष लागत नसे. तिच्या नकळत ती त्याची वाट पाहू लागली. त्याचा स्वभाव खूप लाघवी होता. दिसायला हीरो सारखा नसला तरी कुठल्याही तरूण मुलीला आवडेल असा होता. प्रकाश आणि तो दोघेही त्यांच्या कॉलेजच्या गमती जमती सांगत. विषय कधी प्राध्यापक, कधी मुली, मुलं, टर उडवणे किंवा गोड आठवणी असंच काहीसं असे. पण तिच्याशी बोलताना मात्र एक अंतर जाणवे. ती पुण्याची, मोठ्या शहरातली, थोडीशी फॅशनेबल, म्हणजे केस कापलेले, लहान बाह्याचे ब्लाऊज, वाढवलेली आकारबद्ध नेल पॉलीश लावलेली नखं, लिपस्टिक लावणे वगैरे अशी शहरी मुलगी त्यातून पाहुणी म्हणून आलेली.त्यामुळे जरा मनात भीड होती. पण अंजलीच्या मनमोकळ्या स्वभावामुळे ती भीड चेपली. आणि मोकळ्या गप्पा सुरू झाल्या. एक आठवडा होऊन गेला. अंजली खूप रमली. हळू हळू ती मनाने रमेशच्या जवळ जात होती त्याच्या नकळतच्या स्पर्शानेही ती मोहरून जात होती. एकदा रात्री पत्ते खेळत असताना ती टाकलेला पत्ता उचलायला गेली तर तो पत्त्यावर हात ठेवायला गेला पण तिच्या हातावरच हात ठेवला गेला. तिने हात झट्कन काढून घेतला. ती कावरीबावरी झाली. त्या स्पर्शाने तिच्या अंगावर रोमांच उठले. त्यानेही हात काढून घेतला आणि हळूच तिच्याकडे पाहून हसला. तिने त्याच्या नजरेला नजर द्यायचे टाळले. पण नंतर वारंवार असे प्रसंग घडू लागले. कधी न कळत तर कधी जाणूनबुजून पण ती त्या स्पर्शाने मोहरून जात होती. त्याच्या स्निग्ध नजरेने तिच्या अंगावर मोरपीस फिरल्यासारखे वाटे. रात्री झोपली तरी तिला तो स्पर्श, ती बोलकी नजर जाणवत राही. पंधरा दिवस होऊन गेले. रोज कुठेतरी बाहेर जायचे, घरी आले कि पत्ते, रात्री चांदण्यातल्या गप्पा. कधी कधी नली सुमीला जेवण करून यायला उशीर होई. प्रकाशला कधी काही काम असे. तेंव्हा रमेश आलेला असे. मग ते दोघंच वर गच्चीवर जाऊन सर्वांची वाट पहात गप्पा मारीत बसत. उन्हाळा असल्यामुळे रात्री गच्चीवर स्वच्छ चंद्राचा प्रकाश, चांदण्यांनी भरलेलं आभाळ, झाडांच्या सावल्या, अंगणात उमललेल्या जुई, मोगरा या फुलांचा पसरलेला सुगंध, मधुनच येणारी थंडगार वार्याची झुळुक आणि समोर रमेश. सुख. सुख म्हणतात ते हेच असते का? असा तिच्या मनाला प्रश्न पडत असे .पुण्यात गजबजलेल्या ठिकाणी रहात असल्यामुळे सतत वाहनांचे आवाज, माणसांची गर्दी. एवढी शांतता तिने कधी अनुभवलीच नव्हती.
कुणी नसताना तो तिचाशी गप्पा मारी तेंव्हा मात्र तो हळवा होत असे. सगळं मनातले सांगत असे. घरची परिस्थिती फारशी चांगली नसल्यामुळे आणि तो एकुलता एक असल्यामुळे घरची जिम्मेदारी त्याच्यावरच होती. त्याला नौकरी आवश्यक होती. नौकरी करून पुढचे शिक्षण घ्यायचे ठरवले होते.एकदा बोलता बोलता तो म्हणाला," मी असं कधी कुणापाशी बोलत नाही कारण कुणापाशी मन मोकळं करावं असं कुणी भेटलंच नाही. तू पहिलीच मैत्रीण अशी आहेस जिच्यापाशी मी सगळं मनातले बोलतो." ती मोहरून गेली. रात्री तिला तेच आठवत राहिलं. एकदा नदीवर गेले असता ती दोघंच बोलत बसली. नली, सुमी, वनिता पाण्यात खेळायला गेल्या. प्रकाश काहीतरी खायला आणतो म्हणून गेला. ही दोघंच राहिली. तो म्हणाला," आधी मी तुझ्याशी फरसा बोलत नव्हतो. असं वाटायच. तू मोठ्या शहरातून आलेली. आम्ही तसे लहान गावातले. शहरातल्या मुलींना गावातले लोक तसे आवडत नाहीत. बहुतेक त्या शिष्ठ असतात असा माझा समज आहे." ती खळ्खळून हसली. तो पुढे म्हणाला," त्यात परिस्थितीत तफावत. साधी ओळख करून दिल्यावर तू नाकडोळे जरी मोडले असते तरी मला अपमान वाटला असता. मला अपमान अजिबात सहन होत नाही.मी खूप नशीबवान आहे मला प्रकाश सारखा निगर्वी मित्र मिळाला" ती म्हणाली, “आणि मी ? मी वाटते का तुला शिष्ठ" तो म्हणाला,” नाही, तू खूप स्वीइइइट आहेस." असे म्हणून त्याने तिला गालावर हळूच चापटी मारली. ती दचकली. तिच्या हृदयाची धडधड वाढली. ते वयंच असं असतं की आपली कुणी स्तुती केली कि मोहरून जावं. तिला हे सगळं हवहवसं वाटत होतं पण एक अनामिक भीतीही वाटत होती.' हे आपल्याला असं का होतं आहे. मन सारखं त्याच्याकडे का ओढ घेत आहे?. हे चांगले आहे का वाईट?'.
प्रकाशला सुद्धा हे जाणवले होते. एके दिवशी प्रकाश आणि ती दोघच असताना प्रकाश म्हणाला, "रमेश तुझ्याशी बराच मोकळा बोलतो नाही का?" ती दचकलीच. ह्याला आवडत नाही की काय जास्त बोललेलं, असं तिला वाटलं. ती नुसतीच गोंधळून बघायला लागली. लगेच प्रकाश म्हणाला, "तो तसा कुणाशी फारसं बोलत नाही. पण जेंव्हा कुणाशी मैत्री करतो तेंव्हा मात्र तो जिवापाड करतो. तसा फार संवेदनशील आहे. माझा लहानपणापासूनचा जिवलग मित्र आहे. खूप चांगला स्वभाव आहे. त्याला चांगली साथ देणारी कुणी मिळायला पाहिजे. मला खूप बरं वाटतं तो तुझ्यापाशी मन मोकळं करतो ते." ती म्हणाली, " हो मला पण खूप आवडला त्याचा स्वभाव. घरचे लोक पण खूप चांगले आहेत." तेवढ्यात मावशी वर आली म्हणून बोलणं थांबलं. पण प्रकाशचा दृष्टीकोन बदलला होता. कधी कधी दोघांना चिडवायचा.
महिना कसा गेला समजलेच नाही. मावशी म्हणाली," महिना झाला आता आम्ही निघतो दोन दिवसांनी." तिला धस्संच झालं दोन दिवसांनी जायचं. तिला कल्पनाच करवेना. म्हणजे आता आपल्याला रमेश दिसणार नाही ह्या कल्पनेनं तिला कासावीस होत होतं. परत कधी येणं होणार काय माहिती. जायचा दिवस उजाडला. रात्री पत्ते संपल्यावरही खूप वेळ रमेश, प्रकाश आणि ती गप्पा मारीत बसले होते. त्याचा चेहरा खूप उतरला होता. रात्री तिला झोपच लागली नाही. सकाळ झाली. रमेश निघाला. जाता जाता तो म्हणाला," बस साडेचार वाजता आहे ना? मी येतो साडेचारला.” तिने म्हट्ले," लवकर येशील का?" तो म्हणाला,"बघतो “ असे म्हणून तो निघाला. जाताना मागे वळून वळून व्याकूळ चेहर्याने बघत गेला. तिला कसे तरी झाले. प्रकाशने म्हट्ले," तो येणार नाही लवकर. फार प्रमाणिक आहे तो."
साडेतीन वाजता सामान अंगणात आणून ठेवले. विलास गाडी काढायला गेला.सुमी,नली, वनिता अंजलीला पत्र पाठवायला सांगत होत्या. नलीची आई आणि प्रकाशची आई मावशीला पुन्हा येण्याबद्दल सांगत होत्या वहिनीचे डोळेही भरून आले होते. मावशी अंजलीला सुट्टीत यायला सांगत होती. मावशीला रडू आवरत नव्हते. दोघी बहिणीनी एकमेकीला मिठी मारली. खूप दिवसांनी दोघी एकत्र राहिल्या होत्या. मनमोकळेपणानी गप्पा झाल्या होत्या. सगळ्यांचे प्रेम पाहून तिला भरून आले. रमेश आलाच नव्हता. तिचा पाय निघत नव्हता. बस स्टँडवर बस समोरच उभी होती. विलासने आणि प्रकाशने सामान गाडीत चढवले. दोघी खालीच थांबल्या होत्या. तिची नजर रमेशला शोधत होती. इतक्यात ड्राइव्हर आला म्हणून त्या बसमध्ये जाऊन बसल्या. ती खिडकीशी बसली. खिडकीतून तिचे डोळे त्याला शोधत होते. प्रकाश नुसताच उभा होता.
बस सुरु झाली तेवढ्यात तो सायकलवर येत असलेला दिसला. बस सुरु झालेली पाहून त्याने सायकल तशीच बसच्या दिशेने वळवली. तो बस बरोबर सायकल चालवत होता. काहीतरी बोलत होता. पण तिला ऐकु येत नव्हते. बसने वेग घेतला तसा तो धापा टाकत तो खाली उतरला. हात हलवत उभा राहिला. पाणावलेले डोळे आणि धपापणारा तो त्याचा व्याकूळ चेहरा. तिने तोंड फिरवले. पूर्ण प्रवासात तिचे डोळे भरून येत होती, ती डोळे पुसत होती पण मावशी झोपली होती म्हणून तिला कळत नव्हते, तिला खूप कसेतरी होत होते. हृदयात एक प्रचंड पोकळी निर्माण झाली आहे असे वाटत होते. असं वाटत होतं की बस मधून उतरावं धावत त्याच्याकडे जावं अन त्याला म्हणावं की "मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत रे." पण ती काहीच करू शकत नव्हती.
आल्यावर एक आठवडा तिला करमलेच नाही. कोल्हापूरमधला क्षणक्षण आठवत होता. कसाबसा एक आठवडा गेला. जून महिना सुरु झाला. सगळ्या मैत्रीणी आल्या. तिला जरा बरं वाटलं. कोणतं कॉलेज ,कोणता विषय ह्याची चर्चा सुरु झाली. रिझल्ट चांगला लागला. तिने आणि तिच्या वर्गातल्या जवळ्पास सगळ्या मुलीनी मुलींच्या कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. नवीन कॉलेज, नव्या जुन्या मैत्रीणी, मोकळं वातावरण, हळूहळू ती रमत गेली. मैत्रीणींबरोबर फिरणं, हॉटेल, सिनेमा, गप्पा आणि अभ्यास ह्यात ती सगळं विसरली. “आपल्याला पडलेलं एक गोड स्वप्नं” ह्या पलिकडे तिच्या लेखी काही राहिलं नाही. सात आठ महिन्यानी एकदा एक दिवसासाठी मावशीबरोबर जाण्याचा प्रसंग आला. पुन्हा आठवणी जाग्या झाल्या. पण रमेश दिवसभरात दिसला नाही. प्रकाशला दुसर्या गावी नौकरी लागली होती. वनिता, नलीसुमी शाळा अभ्यास ह्याच्यातच होत्या. रात्री निघताना तिने विलासला विचारले,"रमेश आला नाही रे. काय करतो सध्या?" विलास कोरडेपणाने म्हणाला,"नाही. त्याचं माझं भांडण झालं. तो म्हणाला,"तुझ्या बहिणीवर माझं प्रेम आहे. तिलाही मी आवडतो." तू मला कधी बोलली नाहीस?" तिला शॉकच बसला. ती म्हणाली, "अरे तूच तर ओळख करून दिलीस. आम्ही फिरायला वगैरे जात होतो तेवढंच. काहीही काय आपलं. त्याला सांग असं काहीही नाही म्हणून." अपल्याला न विचारताच त्याने एकदम असं सांगितले त्याचा तिला राग आला होता.
त्यावेळी ती रागात बोलून गेली खरं. पण तिने त्याला तोडले तरी ती त्याला विसरू शकली नव्हती. काय खोटं बोलला होता तो?त्याची काय चूक होती? त्या प्रेमाचा अंकूर तर आपल्याही मनात फुटला होता. आपण असं बोललो किती दुखावला गेला असेल तो. तो म्हणाला होता "मला अपमान सहन होत नाही". आपण तर त्याचा खूप अपमान केला. प्रकाशही म्हणाला होता "तो फार संवेदनशील आहे." किती दुखावला असेल तो.
काळ पुढे सरकत गेला. तिचं शिक्षण झांलं. बँकेत नौकरी लागली. पुढे एका सधन कुटुंबातील बँकेत उच्च पदावर असणार्या मुलाशी लग्नं झालं. भूतकाळ विसरून संसारात रमली. दोन मुली झाल्या. नौकरी, मुली ह्यात वेळ कसा जात होता समजत नव्हते. संसारातील नवी नवलाई ओसरली आणि तिच्या लक्षात यायला लागलं की नवरा खूप अरसिक आहे, थंड आहे. तो कशालाही विरोध करत नाही पण त्याला कशाचीही हौसमौज अशी नव्हतीच. तेंव्हा तिला प्रकर्षाने त्याची आठवण यायला लागली, अधुनमधून त्याच्या आठवणीत मन गुंतू लागलं. तिने सगळ्या आठवणी हृदयाच्या एका कप्यात ठेवल्या होत्या. जेंव्हा कधी तिला बैचैन होई तेंव्हा तेंव्हा तो कप्पा ती उघडून बसे. जेमतेम एक महिन्याचा सहवास पण तिला जाणवलं की त्या एक महिन्याने तिचं सगळं जीवन व्यापून टाकलं आहे. तेंव्हा फोन नव्हते. ती भावाला पत्र लिहित असे. पण पत्रात असं काही विचारता येत नसे. पुढे घरी फोन आला पण फोनवर विलास जास्त बोलत नसे. बोलला तरी तो रमेश सोडून इतरच जास्त बोले. रमेशविषयी ती कुणालाच काही विचारू शकत नव्हती. आणि ठरवल्यासारखे कुणी त्याचा विषय काढत नव्हते. एकदा तिने फोनवर धैर्य करून विलासशी इकडचे तिकडचे बोलून "तुझे मेव्हणे कसे आहेत" म्हणून विचारले तेंव्हा "ठीक आहे" ह्या पलीकडे तो बोलला नाही. कशाचा थांग पत्ता लागू दिला नाही. नक्की काहीच माहीत नसल्यामुळे तिने कधी प्रकाशलाही विचारायचे धैर्य केले नाही.
पण सहा महिन्याखालची गोष्ट एके दिवशी तिला खूप बैचैन झाले. तिने ठरवले, एकदा भावाला फोन करायचा, रमेशला भेटायचे, त्याची माफी मागायची आहे. “आता काय हरकत आहे?. मला या वयातही एवढा विचार करावा लागतो आहे. आताच्या मुली किती धीट असतात. बिनधास्त मुलांबरोबर बोलतात, फिरतात, आईवडिलांची ओळख करून देतात. पण तो काळ वेगळा होता. मुली थोड्या मोठ्या झाल्या की मुलांशी बोलायला बंधनं असायची. संस्कारही तसेच होते. रमेश घरचाच असल्यासारखा होता. त्याच्याबरोबर जाताना प्रकाश, सुमी नली सगळेच असायचे आणि मी कधी नव्हे ती गेलेली म्हणून जास्त बंधनं नव्हती”. पुण्याला आल्यावर त्याच्याबद्दल काही कळायला मार्ग नव्हता. पत्र पाठवायचे धैर्य नव्हते आणि थोडाफार विसरही पडलेला होता. लग्न झाल्यानंतर नवा बहर ओसरला, नवर्याच्या थंडपणाची कल्पना आली तेंव्हा त्याची प्रकर्षाने आठवण व्हायला लागली. आता मुलींचं लग्नं झाल्यावर रिकामा वेळ जास्त असल्यामुळे प्रकर्षाने आठवण यायला लगली. फोन करावा कि नाही असा विचार करण्यातच सहा महिने गेले.
आज मैत्रीणीमुळे सगळ्या आठवणींना उजाळा मिळाला होता. सगळ्या गेल्या, घरात कुणीच नव्हते. नवरा रात्री उशीरा येणार होता. खूप बैचैन होत होतं. रिकामा वेळ खायला उठत होता. आज फोन करायचाच तो काहीही म्हणू दे. असे म्हणून तिने विलासला फोन लावला. थोडसं इकडचं तिकडचं बोलून तिने सरळ प्रश्नं केला, " कुठे असतो रे रमेश? काय करतो? केंव्हाही विचारलं की तू टाळतोस." भाऊ एक मिनिट बोलायचं थांबला आणि म्हणाला," अगं दोन महिन्याखाली तो हार्ट अ‍ॅटॅकने गेला. कधी रमलाच नाही गं संसारात." "काय" ती किंचाळली. धक्काच बसला तिला. तो सांगत होता, " आर्थिक दृष्ट्या त्याच्या कुटुंबाला त्रास होणार नाही कारण नौकरी चांगली होती. प्लॉट्सचा खरेदीविक्रीचा व्यवसाय करायचा, चिक्कार प्रॉपर्टी जमवली, दोन्ही मुलं हुशार निघाली” . तो बोलतच होता पण तिला काही ऐकू येत नव्हते. हातातला फोन गळून पडला होता. कानात कुणी तापलेली सळी घालावी तसं झालं होतं. काळजावरच घाव बसला होता. हृदयात जपून ठेवलेली एक आठवण कायमची दुभंगली होती.

सौ. सुरेखा कुलकर्णी
हैदराबाद

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हृदयस्पर्शी... प्रत्येकीच्या आयुष्यात असा 'तो' असतोच. आयुष्याच्या कुठल्यातरी वळणावर भेटलेला, मनाच्या खोल कप्प्यात जपलेला. अगदी प्रेमच असले पाहिजे असं नाही पण त्याचा सहवास आवडलेला, आणि तो सध्या काय करतो याची उत्सुकता असलेला.

धन्यवाद सर्वांना. खूप वर्षांनी आले मायबोलीवर. खूप अडचणी आल्या. कारण सगळं बदललं आहे. सान्वी खूप छान प्रतिसाद.

छान झाली आहे कथा. शेवट अनपेक्षित नाही; पण तो सहजपणे झाला आहे. साध्या-सोप्या भाषेतील गोष्ट प्रवाहीपणे पुढे जात राहते, हेच लेखकाचे यश.

हो असं घडू शकतं. एखाद्या छोट्या खऱ्या घटनेच्या आधारावरच कथा असते. नावं, स्थळ जरी काल्पनिक असले तरी घटना सत्य असते.
विलास रमेश, प्रकाश कुणीही हयात नाही. जिच्या बाबतीत हे घडलं. तिला दोन महिन्याखाली ही धक्कादायक बातमी समजली जिने मला रडून ही बातमी सांगितली. कारण ह्या सगळ्याची मी साक्षीदार होते.

छान लिहिली आहे कथा. तुमच्या वरच्या प्रतिसादावरून वाटतंय की खरी घडलेली आहे.
खूप सहज साधी, कुठेही उगाचच जजमेंटल किंवा फिलॉसॉफिकल न होता लिहिली आहे.

धन्यवाद किशोर मुंढे. मी खूप वर्षांनी मायबोलीवर आले. जुने मायबोलीकर मला जास्त दिसले नाहीत. नवीन पिढीला माझे लिखाण आवडेल कि नाही असे वाटले होते.

कथा चांगली आहे. विषय नाजूक आहे. कथानक वास्तववादी असल्याने अधिक भिडले. आणि हे प्रत्यक्षात घडलेले आहे असे आपण लिहिलेच आहे. पण कथा म्हणून माझी प्रतिक्रिया थोडीशी नकारात्मक आहे. पात्रांची भरपूर व अनावश्यक मांदियाळी आहे. उदाहरणार्थ प्रकाश या पात्राचे कथानकाच्या दृष्टीने काय प्रयोजन कळले नाही. तीच गोष्ट इतर अनेक पात्रांची. त्यामुळे वाचकाचा नाहक गोंधळ वाढतो असे माझे व्यक्तिगत मत. हा भाग सोडला तर बाकी मस्त.

प्रकाशमुळे ती रमेश बरोबर फिरायला जाऊ शकते, बोलू शकते. नाहीतर विकासने ओळख करून देण्याइतपतच ते प्रकरण राहिले असते. . नली, सुमी यांच्यामुळे ती तिथे रमते ,रहायला तयार होते. ती पुणं सोडून जात नाही त्यांचं कारण पुण्यातच रहाणारे तिचे नातेवाईक. म्हणून त्यांचा उल्लेख. छान प्रतिसादाबद्दल धन्यवाद. ऋन्मेष तुम्हाला पण.

प्रकाशमुळे ती रमेश बरोबर फिरायला जाऊ शकते, बोलू शकते. नाहीतर विकासने ओळख करून देण्याइतपतच ते प्रकरण राहिले असते. . नली, सुमी यांच्यामुळे ती तिथे रमते ,रहायला तयार होते. ती पुणं सोडून जात नाही त्यांचं कारण पुण्यातच रहाणारे तिचे नातेवाईक. म्हणून त्यांचा उल्लेख. छान प्रतिसादाबद्दल धन्यवाद. ऋन्मेष तुम्हाला पण.